त्रिंबकभट राजाकडे आला. त्याची तेथे दाद लागेना; परंतु शेवटी एका भल्या माणसाने त्याला राजाकडे नेले. राजा म्हणाला, 'पुन्हा कशाला आलास म्हातार्‍या? तुमचा, खटला आम्हाला चालवता येत नाही. दोघे सारखे दिसता. काय द्यावा न्याय?' त्रिंबकभट म्हणाला, 'राजा, रानात मी रडत होतो. तेथे गुराखी लोक खेळत होते राजाराजाचा खेळ. रामा गोवारी राजा झाला. इतर शिपाई झाले. त्या शिपायांनी मला त्यांच्या खेळातल्या राजाकडे नेले. तो रामा गोवारी मला म्हणाला, 'सांग तुझे दु:ख. 'मी सारी हकीगत सांगितली. तेव्हा रामा गोवारी म्हणाला, 'हा तर साधा खटला आहे. मी योग्य तो निकाल देईन. जा, राजाला सांग. तुमच्या खर्‍या राजाला सांग की तुला नसेल न्याय देता येत तर रामा गोवारी देईल. 'महाराज, आपला अपमान करण्याचा माझा हेतू नाही; परंतु कधी कधी पोरांची बुध्दी थोरांना लाजविते. आपण प्रयोग करून पाहावा. त्या गोवार्‍याला बोलावून विचारावे. जर त्याने हा प्रश्र सोडविला तर मी सुखी होईन. माझ्या मुलाबाळांत परत जाईन. ऐका एवढे महाराज.'

राजाने प्रयोग करून पाहावा असे ठरविले. दूसर्‍या दिवशी न्यायमंदिरात कोण गर्दी? ती बातमी सर्वत्र पसरली. गुराखी न्याय देणार. रामा गुराखी न्यायासनावर बसणार. सर्वांना आश्चर्य वाटत होते. त्या रामा गोवार्‍याला बोलावण्यात आले. त्याच्याबरोबर त्याचे इतर गुराखी सवंगडीही आले होते. रामा गोवारी येताच राजा उभा राहिला, सारे अधिकारी उभे राहिले. सारे लोक उभे राहिले. जणू कोणी राजाधिराजच आला!

राजा म्हणाला, 'आज रामा गोवारी न्यायासनावर बसणार आहे. या रे त्याच्या मित्रांनो, असे त्याच्याभोवती शिपायांप्रमाणे उभे राहा.'

रामा गोवारी न्यायासनावर बसला. भोवती इतर गुराखी खांद्यावर घोंगडी, हातात काठी असे उभे राहिले. राजा, त्याचे प्रधान, त्याचे अधिकारी बाजूला बसले होते. खटल्यास सुरूवात झाली.

'कोठे आहेत ते दोन्ही त्रिंबकभट? त्यांना समोर उभे करा. रामा गोवारी म्हणाला.'

खरा त्रिंबकभट व खोटा त्रिंबकभट दोघे समोर उभे करण्यात आले. खोटा त्रिंबकभट हसत होता. खरा रडत होता. लोकांना आता काय होते हे पाहाण्याची उत्सुकता होती.

'दोन बाटल्या आणा बघू येथे. शिपाई, कोण आहे तेथे? बाटल्या आणा. रामा गोवारी म्हणाला.'

तेथे दोन बाटल्या आणण्यात आल्या.

रामा गोवारी त्या दोन्ही त्रिंबकभटांस उद्देशून म्हणाला, 'तू म्हणतोस मी त्रिंबकभट, तू म्हणतोस मी त्रिंबकभट. तू म्हणतोस की हे घरदार, ही मुलेबाळे, ही बायको - सारे माझे आणि तूही तसेच म्हणतोस. ठीक. हे पाहा. या येथे दोन बाटल्या आहेत. जो खरा त्रिंबकभट असेल तो या बाटलीत शिरून दाखवील. पाहू या कोण शिरून दाखवतो. हं आटपा, जलदी करा.'

लोकांची उत्कंठा वाढत होती. काय होते इकडे सर्वांचे डोळे होते. खरा त्रिंबकभट म्हणाला, 'बाटलीत कसे येईल शिरता?' परंतु खोटा म्हणाला,

'मी शिरून दाखवतो. 'आणि खरोखरच एकदम लहान होऊन तो त्या बाटलीत शिरला. तो बाटलीत शिरताच रामा गोवार्‍याने वरती एकदम बूच बसविले, लोक आश्चर्यचकित झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel