'खरेच, आज साखळी काढून ठेवली नाही. 'असे म्हणून तिने गळयातील ती सोन्याची साखळी उशीखाली काढून ठेवली. दासीने विचारले, 'काढूनशी ठेवलीत?' राणी म्हणाली, 'ती काढून ठेवली नाही तर ती बोचते व झोप येत नाही. मी रोज ती काढून ठेवते. उशीखाली ठेवते. एक क्षणभरही या साखळीला मी विसंबत नाही.'

दासीला ती गोष्ट महत्वाची वाटली. तिने ती गोष्ट प्रधानाच्या मुलास सांगितली. प्रधानाच्या मुलाच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या. राजपुत्राने ज्या सोन्याच्या साखळीबद्दल सांगितले, तीच ही याबद्दल त्याला शंका राहिली नाही. ती सोन्याची साखळी कशी मिळवावी ते त्याला समजेना.

प्रधानपुत्राने ती गोष्ट राजपुत्र व त्याची बायको यांना सांगितली. राजपुत्राच्या बायकोने धाडस करावयाचे ठरविले. आपल्या पतीचे प्राण कायमचे आपणच परत आणावे असे तिने नक्की नेले.

सकाळची वेळ होती. राजपुत्राच्या बायकोने आपले पाहिले फाटके लुगडे काढले. ती ते नेसली. भिकारणीच्या वेषाने आपल्या मुलास कडेवर घेऊन ती निघाली. तिचे रुप राणीला लाजवील असे होते; परंतु तिची वस्त्रे भिकारणीला शोभतील अशी होती. हिंडता हिंडता ती राजवाडयात आली. सावत्र राणी अंगणात होती. ती भिकारीण राणीला म्हणाली,' 'राणी, राणी, मला नाही कोणी. मला उद्योगधंदा द्या, मी गरीब आहे. तुम्ही सांगाल ते काम करीन. मी तुमचे केस विंचरुन देईन. हलक्या हाताने वेणी घालीन. 'राणीला आश्चर्य वाटले. त्या भिकारणीचे रुप पाहून तिचा मत्सर वाटला. अशी सुंदर स्त्री आपली दासी असावी असे तिने ठरविले.

'त्या पाण्याने हातपाय धुवून ये व माझे केस विंचर बघू. ,असे सावत्र राणी म्हणाली. त्या वेषधारी भिकारणीने तसे केले. हलक्या हाताने ती राणीचे केस विंचरु लागली. एक केस तडतडला नाही. इतक्यात मुलगा रडू लागला. कोण रडते म्हणून दुसरी राणी पाहावयास आली. त्या राणीला पाहाताच सावत्र राणी म्हणाली, 'तुमचा मुलगा नाही आला. तो या जन्मी नाही यावयाचा. काय मेली आशा तरी! म्हणे माझा मुलगा येईल, माझा मुलगा येईल.!

त्या भिकारणीला राजपुत्राची खरी आई कोण हे लगेच समजले. आपल्या पतीचा चेहरा व त्या चेहरा यांत तिला साम्य दिसू लागले. आपल्या सासूच्या पाया पडावे असे तिला वाटले; परंतु तिने धीर धरला. ती राणी त्या रडणार्‍या मुलाजवळ आली व म्हणाली, किती गोड मुलगा आहे! माझा बाळ देखील लहानपणी असा दिसे; परंतु दैवाला नाही पाहावले. देव मला मेलीला नेता तर! परंतु सोन्यासारखी मुले नेतो आणि आम्हाला रडायला ठेवतो! द्या, मी जरा घेते त्याला.'

'काही नको घ्यायला. मी माझी दासी आहे आणि तूही खबरदार त्यांच्याजवळ बोलशील तर. तुला कामावर ठेवणार नाही. 'सावत्र राणीचे शब्द ऐकून ती थोर राणी निघून गेली. ती वेषधारी भिकारीण मुलग्याच्या उगी करुन 'उद्या येईल' असे सांगून गेली.

रात्री राजपुत्राला सारी वार्ता तिने सांगितली. लवकरचे तुम्हाला मी मुक्त करीन असे ती म्हणाली.

तो मुलगा आता चारपाच वर्षाचा झाला होता. त्याला सर्व समजू लागले होते. एके दिवशी मुलाला आई म्हणाली, 'बाळ आज त्या राणीकडे आपण जाऊ, त्या वेळेस तेथे तू मोठयाने रडू लाग. मी किती समजावले तरी उगी राहू नकोस. मी तुला विचारीन. 'का रे रडतोस? तू राणीच्या गळयातील सोन्याच्या साखळीकडे बोट कर. ती सोन्याची साखळी मिळेल, तेव्हाच रडावयाचा थांब.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel