एक होता राजा. त्या राजाचा एक प्रधान होता. राजाला एक मुलगा होता व प्रधानाला एक होता. राजपुत्र व प्रधानपुत्र मोठे मित्र होते लहानपणापासून ते एकत्र वाढले. एकत्र खेळले. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. प्रधानाच्या मुलाचे लग्न झाले होते. राजपुत्राचे अद्याप लग्न झाले नव्हते. राजा एके दिवशी त्या दोघांना म्हणाला. 'तुम्ही दोघे जा, जगभर हिंडा व राजपुत्राला अनुरूप वधू शोधून काढा.’प्रधानपुत्र म्हणाला  ‘हो आम्ही सर्व जागाची मुशाफिरी करतो.’

ते दोघे मित्र निघाले. दोघांनी दोन घोडे घेतले होते. घोडे देखणे असून चपळ होते. वार्‍या प्रमाणे त्या घोडयांचा वेग होता. घोडयावर बसून दोघे जात होते. नद्यानाले, रानेवने, दरीखोरी, हिंडत ते चालले. कधी शहरे बघत तर कधी तपोवने बघत. कधी राजवाडे बघत तर कधी आश्रम. असे करीतकरीत ते खूप दूर गेले; परंतु राजपुत्राला योग्य अशी मुलगी त्यांना दिसली नाही.
एके दिवशी ते फार थकले होते. एका विस्तृत व विशाल तळयाच्या काठी त्यांनी मुक्काम केला. तळयाचे पाणी निर्मळ व रूचकर होते.

संध्याकाळ झाली होती. सूर्याचे शेवटचे किरणही गेले. आकाशात लाल रंग पसरला होता व त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले होते. फार सुंदर शोभा दिसत होती. त्यांनी घोडयांना पाणी पाजले; त्यांना चारा घातला व झाडाशी बांधून ठेवले. दोघे मित्र घाटावर बसले होते. त्यांनी संध्या केली. नंतर त्यांनी फराळ केला. सुंदर गाणी म्हणत ते बसले होते. शेवटी दोघेजण झोपले.

इतक्यात एक प्रचंड आवाज आला. तळयाच्या पाण्यातून तो आवाज येत होता. पाण्यावर कोणी काही तरी आपटीत असावे तसा तो आवाज होता. घोडे खिंकाळू लागले. त्या आवाजाने ते दोघे मित्र जागे झाले. पाहातात तो एक प्रचंड सर्प त्या तळयातून बाहेर येत होता. तो आपली फणा दाणदाण त्या पाण्यावर आपटीत होता. राजपुत्र व प्रधानपुत्र घाबरले. तो प्रचंड सर्प तळयातून बाहेर आला. त्या सर्पाच्या फणेवर मणी होता. तो मणी त्याने खाली टाकला. त्या मण्याचा प्रकाश सर्वत्र पडला होता. त्या प्रकाशात सर्प आपले भक्ष्य शोधू लागला. प्रधानपुत्र व राजपुत्र भीतीने झाडावर चढले. त्या सर्पाची दृष्टी त्या घोडयांकडे वळली. सर्पाने ते दोन्ही घोडे खाऊन टाकले. झाडावर बसलेल्या त्या दोघा कुमारांना भीती वाटली. झाडावर चढून साप आपणास गिळंकृत करतो की काय असे त्यांस वाटले. परंतु साप अन्यत्र फणफणत गेला. इतक्यात प्रधानपुत्राला एक युक्ती सुचली. सापाच्या मण्यावर घोडयाची लीद टाकली तर त्या मण्याचे तेज नाहीसे होते, असे त्याने ऐकले होते. झाडाच्या खाली घोडयांची लीद पडलेली होती. प्रधानपुत्र धीरे-धीरे खाली उतरला व त्याने तेथील लीद घेऊन त्या मण्यावर टाकली. लगेच आजूबाजूला अंधार पडला. प्रधानपुत्र पटकन् झाडावर चढला. तो सर्प रागारागाने फणा आपटीत होता. हळुहळू तो आवाज येतनासा झाला. सर्प तळयात गेला असावा असे त्या दोघा मित्रांस वाटले.

सकाळ झाली. दिशा फाकल्या. ते दोघे मित्र खाली उतरले. खाली उतरल्यावर थोडया अंतरावर तो प्रचंड सर्प मरून पडला आहे. असे त्यांना आढळून आले. त्यांना फार आनंद झाला. दोन उमदे घोडे मरण पावल्याबद्दल त्यांना फार वाईट वाटले. प्रधानपुत्र त्या मण्याजवळ गेला. त्याने तो मणी तळयावर धुण्यासाठी नेला. तो काय आश्चर्य! हातात मणी घेऊन पाण्यात उतरताच पाण्यातील सर्व दिसू लागले. त्या तळयाच्या तळाशी त्यांना सुंदर बाग दिसली. मोठमोठे बंगले दिसले. त्या दोघांनी पाण्यात बुडी घेण्याचे ठरवले. परस्परांनी परस्परांचे हात धरले व हातात तो मणी धरला. त्यांना पाण्यात कसलीच अडचण झाली नाही. ते दोघे एकदम पाण्याच्या तळाशी आले. तेथे सुंदर बगीचा होता. फुलझाडे होती. फळझाडे होती. त्यांनी फळे खाल्ली, फुले तोडून वासासाठी घेतली. ते हिंडत हिंडत एका बंगल्याजवळ आले. तो एक सुंदर राजवाडा होता. ते त्या राजवाडयात शिरले. तेथे आत एक पलंगडीवर एक सुंदर मुलगी होती. ती दीन होती, केविलवाणी दिसत होती. ती त्या दोघा कुमारांना म्हणाली, 'तुम्ही येथे कशाला आलात? आता तुम्ही जिवंत दोघा कुमारांना म्हणाली, 'तुम्ही येथे कशाला आलात? आता तुम्ही जिवंत राहाणार नाहीत. तो दुष्ट सर्प तुम्हास मारील. त्याने माझ्या घरची सर्व माणसे मारली व मला अभागिनीला मात्र जिवंत ठेवले. तो रोज मला छळतो. धड जगू देत नाही, मरु देत नाही. तुम्ही परत जा. '

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel