मराठीचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर लोकांच्या मनात जी चुकीची भावना निर्माण झाली आहे की फक्त इंग्रजीच अभ्युदयाचे साधन आहे ही दूर व्हायला हवी.
लोकमान्य टिळकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भाषणात सांगितलेलं की आईचे मूल दाईच्या दुधावर जगलं तर त्याला आईच्या दुधाची किंमत राहत नाही !
त्यामुळे आपली भाषा ही सुद्धा इंग्रजीपेक्षाही समृध्द आहे त्यामुळे आपली मायबोली मराठी ही आपल्या अभ्युदयाचे साधन होऊ शकते असा विश्वास सर्व मराठी भाषकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे ज्यातून मराठीचा शिक्षण व व्यवहारात वापर वाढेल आणि भाषेचा उत्कर्ष होईल यात कुठलीच शंका नाही.
भाषा टिकण्यासाठी ती शिक्षण आणि व्यवहारात आली पाहिजे हा विचार खूप आधी टिळकांनी मांडला होता. त्याची अंमलबजवणी झाली नाही हेच दुर्दैव आहे.
आपण सर्वांनी पुढाकार घेऊन भाषेचा व्यवहारात अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रयन्त करायला पाहिजेत.
आपण दहावी पर्यंत जरी मराठीत शिकलो तरी पुढे काही जास्त समस्या येत नाही सुरवातीला थोडा त्रास होतो, पण सुरवातीला मराठीत आपल्या मातृभाषेत शिकल्याने सर्व संकल्पना चांगल्या समजल्या आसतात व पाया मजबूत असतो.
त्यामुळे जर भाषेचा विकास करायचा असेल तर तिला शिक्षणात, व्यवहारात, आणि दैनंदिन वापरात आणावी लागेल.
फार्मसी सांधर्भात मराठीत लेख नव्हते म्हणून मी मराठीत फार्मसीचे लेख लिहीत आहे.
सर्वानी जर आपल्याला क्षेत्रातील लेख लिहिले तसेच नवीन संकल्पना त्यांचे पर्यायी शब्द याबाबत जागरूकता निर्माण करून आपली मराठी भाषा व्यवहारात जास्तीत जास्त वापरायला हवी.
ज्या पद्धतीने माणसाला जगण्यासाठी श्वास घेणे आवश्यक असते त्याच पद्धतीने भाषेभाषेलाही जगण्यासाठी श्वास घेणे आवश्यक असते आणि भाषेचा श्वास हा तिचे शब्द आहेत. त्यामुळे भाषा टिकवायची असेल तर त्या भाषेतील शब्दवापर,शब्दांची संख्या वाढली पाहिजे. आपल्या मराठी भाषेत शब्दसंपदा म्हणजेच तिचा श्वास कमी नाही. परंतु दुर्दैवाने आपण आपल्या मराठी भाषेत परकीय भाषांतील(इंग्रजी, हिंदी) शब्द वापरून आपल्या भाषेचा श्वास कोंडीत आहोत. आज आपण एका वाक्यात एक ते दोन इंग्रजी शब्द वापरत आहोत. भविष्यात संपूर्ण वाक्यच इंग्रजी होण्याची भीती मला वाटतं आहे.
अशाने भाषेचे अस्तित्व धोक्यात येईल. भाषेची अभिवृद्धी करायची असेल तर ती भाषा शिक्षणात,व्यापरात,शासकीय कामात, प्रसार माध्यमात सक्तीची करण्यात आली पाहिजे असे मत लोकमान्य टिळकांनी व्यक्त केले होते.त्या काळात इंग्रजांची सत्ता असल्याने ते शक्य नव्हते. पण आता मात्र हे शक्य झाले आहे कारण आपण स्वतंत्र आहोत आपल्याकडे लोकशाही आहे.
आता गरज आहे ती फक्त लोकमान्य टिळकांनी व्यक्त केलेले मत कृतीत आणण्याची.
यावेळी मला टिळकांनी मांडलेला एक विचार आठवतोय,
"आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?"-लोकमान्य टिळक.
पण माझ्या मते तथाकथित शिक्षित देशबांधव नव्हेच तर आत्ताचे शिक्षित देशबांधव सुद्धा साहेबांची पिण्यात बरोबरीच काय तर त्या पेक्षा दहा पटींनी जास्त पितील पण त्यांची राज्यकारभारातील जागा कधीच मिळविणार नाहीत. किमान माझं मत खोटं ठरवण्यासाठी आणि आपल्या मातृभाषेचा विकास करण्यासाठी मराठी भाषा कला, क्रिडा, व्यापारा, शिक्षण,विज्ञान, राज्य शासन , व्यवहार, दळणवळण अशा सर्व ठिकाणी प्रत्येक बाबतीत मराठी भाषा सक्तीची करावी.
देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे लोटली तरी मराठी भाषेच्या विकासाबद्दल योग्य ते निर्णय घेण्यात आले नाहीत ही आपल्या सर्वांसाठी लांछनास्पद बाब आहे.
आशिष अरुण कर्ले.
३२ शिराळा (सांगली)
भ्रमणध्वनी क्रमांक ९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.