जेंंव्हा केंव्हा मराठीमध्ये बोलण्याचा आग्रहाचा विषय येतो किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की  मराठीचा आग्रह हा केवळ अहंकार आहे

पण हा अहंकार नाही

हा आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे तिच्या ऋणांप्रती खारीचा वाटा आहे कृतज्ञता आहे....


स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी लोकांची मराठी भाषे प्रती कमी होत चाललेली आत्मीयता ओळखून मराठी भाषेच्या विकासासंदर्भात त्यांचे मत मांडलं होतं...

लोकांच्या मनामध्ये हा चुकीचा गैरसमज निर्माण झाला आहे की केवळ इंग्रजीत त्यांच्या अभ्युदयाचे साधन आहे यामुळे ते मराठीकडे दुर्लक्ष करीत आहेत. परंतु हे साफ चुकीचे आहे केवळ भारत हाच देश आहे की जिथे इंग्रजीला अवास्तव महत्त्व दिले जात आहे जगामध्ये कित्येक देश आहेत जे त्यांच्या मातृभाषेलाच महत्त्व देतात ( जपान चीन जर्मनी स्पेन इटली...) यामागे कुठलाही अहंकार नसून एक वैज्ञानिक सत्य आहे. वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झाली आहे की मातृभाषेमध्ये गोष्टी पटकन आत्मसात होतात कारण त्याच भाषेमध्ये आपली विचारक्षमता आकलन क्षमता अधिक असते.

आज लोक इंग्रजीला अवास्तव महत्त्व देतात आपल्या मुलांना इंग्रजी माध्यम सेमी इंग्रजी माध्यम अशा शाळांमध्ये घालतात परिणामी बऱ्याचदा असं होतं की मुलांना गोष्टी न समजता केवळ घोकंपट्टी होती व त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. आज कित्येक अशी मुले आहेत की ज्यांना पटकन मराठी मधील अंक समजून येत नाहीत त्यांना त्यासाठी विचार करावा लागतो व कित्येक अशी आहेत की ज्यांना इंग्रजीत सांगितल्याशिवाय समजतच नाही पण असा प्रकार मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांच्या बाबतीत जाणवून येत नाही त्यांना मराठी ही आणि इंग्रजीतील अंक हे नीट समजून येतात. हा मराठी माध्यमात शिक्षण घेतल्यावर तुम्हाला पुढे जाऊन इंग्रजी माध्यमात उच्च शिक्षण घेताना थोड्याफार समस्या जाणवतील परंतु इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांपेक्षा निश्चितच तुमची आकलन क्षमता जास्त असेल कारण यापूर्वी तुमच्या सर्व संकल्पना मराठी भाषांमधून अगदी पक्क्या झालेल्या असतील. आज जर तुम्ही पाहिलं की उच्च शिक्षण असेल किंवा स्पर्धा परीक्षा असतील या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे त्या सर्वांचे मातृभाषेतूनच शिक्षण पूर्ण झालेला आहे.

मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे असे अनेक फायदे आहेत.


बर्याच जणांचे असे म्हणणे आहे की मराठीचा आग्रह का..? मराठीचा आग्रह नसण्याने काय काय परिणाम समोर होत आहेत हे पाहिल्यावर तुम्हाला निश्चितच समजून येईल की मराठीचा आग्रह का असायला हवा...

आमच्या नातेवाईकांची एक छोटी मुलगी आहे ती टीव्हीवर कार्टून हिंदी भाषेत बघते याचा परिणाम असा होतो की जेव्हा तिला कोणी मारते किंवा ती घाबरते तेव्हा वाचवा वाचवा ती वाचवा वाचवा असं न म्हणतात बचाव बचाव असं बोलते कित्येक मुले तर घरी हिंदी बोलतात का तर कार्टून हिंदीत बघतात ना...

ही सर्व कार्टून चैनल कन्नड तमिळ तेलगू या दाक्षिणात्य भाषेमध्ये उपलब्ध आहेत हिंदीत देखील उपलब्ध आहेत मग मराठीत का नाहीत? याचे उत्तर हेच आहे की आम्ही कधी मराठीचा आग्रह धरलाच नाही हिंदी मध्ये आहे तो हमे चल जात आहे पण जर आपण इथेच मराठीचा आग्रह धरला असता तर निश्चितच हे सर्व चैनल मराठीत देखील डब करून आले असते...

डिस्कव्हरी नॅशनल जॉग्रफि या बाबतीतही तसंच आहे... हिस्टरी टीव्ही 18 ने यापूर्वी मराठी भाषेचा पर्याय दिला होता परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की म्हणावा तितका प्रेक्षक वर्ग न लाभल्याने मराठी डबिंग बंद झाले... कित्येक असे डीटीएच ऑपरेटर आहेत त्यांची सिस्टिम लँग्वेज मध्ये कन्नड तेलुगू हिंदी अशा भाषा आहेत परंतु मराठी भाषा नाहीत याचं कारण आपण मराठीचा न धरलेला आग्रह... यासंदर्भात मी एकदा तक्रार केली असता मला समोरून उत्तर आले होते की हिंदी भाषा आहे ना समोरचा बोलणारा मराठी भाषिक होता! हिंदी आहे पण मराठी नाही ना जोपर्यंत आपण फक्त आणि फक्त मराठीच असा आग्रह धरणार नाही तोपर्यंत ते तो पर्याय उपलब्ध करून देणार नाहीत... म्हणून आपण सर्वच क्षेत्रात मराठीचा आग्रह धरला पाहिजे.


लोकमान्य टिळकांनी या आधीच सांगितलं होतं की जोपर्यंत भाषा आहे व्यवहारात शिक्षणात आणि व्यापारात येणार नाही तोपर्यंत भाषेचा विकास होणार नाही आणि या सर्व क्षेत्रात मराठी भाषा येण्यासाठी भाषेच्या अग्रहा शिवाय दुसरा पर्याय नाही...


विविध बँका संस्था कंपन्या यांची माहिती पत्रक माहिती पुस्तके की आपण मराठीत मागितली पाहिजे...

जर आपण ती मराठीत मागितली नाहीत तर ती मराठीत कशी येतील आज तमिळ तेलगू कन्नड भाषा सर्व क्षेत्रात आहेत कारण त्या भाषिकांनी त्या भाषेचा आग्रह धरलेला आहे तसा!  मग आपल्या मातृभाषेसाठी आपण का तसा आग्रह धरू नये... आपण जर इतर पर्यायांमध्ये समाधान मानलं तर आपल्या भाषेचा पर्याय आपल्याला मिळणारच नाही...

म्हणूनच सर्वच क्षेत्रात मराठीचा आग्रह धरा....


संदेश मराठीतच टाईप करा....


फोनवर बोलताना सुरुवात मराठीतून करा हॅलो नाही तर नमस्कार म्हणा...


बँका कंपन्या संस्था यांची माहिती पत्रके व माहिती पुस्तकाची मराठीतूनच मागणी करा....


(तुम्हाला जर मराठीतून माहिती मिळत नसेल अथवा माहितीपत्रक माहिती पुस्तक किंवा मराठीतून सुविधा मिळत नसेल तर थोडा वेळ काढून यांना लेखी तक्रार करा मग ती मेल द्वारे असेल किंवा पत्राद्वारे...)


तुम्ही जा कोणत्याही क्षेत्रात काम करतात त्यावर मराठीमध्ये साहित्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा...


बोलण्याची सुरुवात मराठीतूनच करा...


स्वतःच्याच राज्यात पाहुणे बनू नका

महाराष्ट्रात मराठीतच बोला...



आशिष अरुण कर्ले.

३२ शिराळा (सांगली)

ashishkarle101@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel