नमस्कार सर्व मराठी भाषिक बांधवांना विनंती आहे की स्वतःवर आणि आपल्या मुलांवर देखील हिंदी भाषा लादु नका. मराठी भाषेत मनोरंजनाचा आग्रह धरा. मराठी भाषेतच संवाद साधा. कारण अनेक तज्ञांचे म्हणणे आहे, " तुम्ही तुमचे शिक्षण, विचार, तुमच्या कल्पना, तुमचा संवाद , तुमचे मनोरंजन तुमच्या मातृभाषेमध्ये मनमोकळेपणाने आणि आत्मीयतेने मांडू शकता." ह्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली मातृभाषा म्हणजेच मराठी भाषा. मराठी माणसाने मराठी भाषेतच संवाद साधून मन मोकळे करून मराठी भाषा जतन केली पाहिजे.
आजच्या घडीला मराठी भाषिक संख्येच्या बाबतीत कन्नड, तमिळ, तेलुगू या भाषिकांहून अधिक असून देखील सुद्धा कित्येक कार्टून्स व माहितीविषयक वाहिन्या जसे की, डिस्कव्हरी , नॅशनल जिओग्राफिक हे कन्नड, तमिळ, तेलगू भाषेत उपलब्ध आहेत. परंतु आपली संख्या अधिक असूनही आपल्या भाषेत उपलब्ध नाहीत याला केवळ एकच कारण आहे आणि ते म्हणजे आपल्याला हिंदी चालतं आणि आपण मराठीचा आग्रह धरत नाही.
माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की, तुम्ही सर्वांनी वरील सर्व वाहिन्या हिंदी भाषेत बघणं टाळा व या वाहिन्या मराठी भाषेत उपलब्ध होण्यासाठी त्यांना ईमेल, कॉल याद्वारे विनंती करा.
मराठी भाषिकांची संख्या ही खूप मोठी आहे. त्यामुळे जर आपण हिंदी भाषेत या वाहिन्या बघण्याच टाळलं तर निश्चितच त्यांच्या टीआरपीवर परिणाम होईल व ते मराठी भाषेत सेवा उपलब्ध करून देतील.
तुम्ही इतर वाहिन्यांचं राहू द्या परंतु किमान कार्टून वाहिन्यांच्या बाबतीत तरी आग्रह धरा कारण ज्या वयात मूल भाषा शिकत असतात त्या वयात जर त्यानी स्वतःची मातृभाषा सोडून इतर भाषेत कार्टून पाहिले तर याचा निश्चितच परिणाम त्याच्या भाषा शिकण्यावर होईल.
माझ्या पाहण्यातील एक उदाहरण आहे, " आमच्या एका नातेवाईकांची लहान मुलगी होती. ती पोगो टीव्हीवर छोटा भीम हिंदीमध्ये पाहायची. याचा तिच्या मराठी बोली भाषेवर टिव्हीमधल्या हिंदी भाषेचा इतका परिणाम झाला की, जर तिला कोणी मुलं घाबरवू लागली किंवा मारू लागली तर ती" वाचवा वाचवा" म्हणण्याऐवजी "बचाव बचाव" म्हणायची! विनोदाचा भाग सोडून द्या ही सत्य घटना आहे... या गोष्टींचा मुलांवर निश्चितच परिणाम होत आहे...
जोपर्यंत भाषा ही शिक्षण व्यवहार,व्यापार, मनोरंजन अशा सर्व क्षेत्रात वापरली जाणार नाही तोपर्यंत भाषेचा विकास होणार नाही... आणि हे सर्व होण्यासाठी एकच गोष्ट करण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे मराठी भाषेचा आग्रह धरणे आणि मराठी भाषेचा प्रचार करणे.
आणि केवळ एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी मराठीत सेवा मिळतात त्यांचा अधिकाधिक लाभ घेणे व त्यांना प्रोत्साहित करणे.
काही वर्षांपूर्वी हिस्टरी टिव्ही १८ यांनी मराठी भाषेत सेवा उपलब्ध करून दिली होती. परंतु मराठी प्रेक्षकांचा लाभलेला कमी प्रतिसाद यामुळे त्यांनी हे काम थांबवलं कारण जोपर्यंत त्यांना तितका टीआरपी मिळणार नाही तोपर्यंत त्यांना ही सेवा देता येणार नव्हती. यासाठी आपण आपल्या भाषेत मनोरंजनाचा आग्रह धरला पाहिजे. आणि ज्या सेवा मराठीत मिळत आहेत, त्यांचा लाभ घेतला पाहिजे...
सध्या सोनी याय ही एकमेव कार्टून वाहिनी आहे. की जी मराठी भाषेत सेवा देते. त्यामुळे कृपया सर्वांनी सोनी याय ही वाहिनी घ्या. आणि ती मराठी भाषेतच पहा. कारण ती इतर भाषेतही उपलब्ध आहे... या वाहिनीची मराठी भाषेत सेवा सुरू राहण्यासाठी अधिकाधिक मराठी लोकांनी मराठी भाषेत ही वाहिनी पाहण्याची आवश्यकता आहे... बऱ्याच टीव्ही किंवा सेट अप बॉक्सच्या रिमोट वरील निळी कळ (बटन) दाबून भाषा बदलू शकता... आणि त्यामुळे आपली मराठी भाषा जतन करु शकता.
कृपया ही माहिती अधिकाधिक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा...
आशिष अरुण कर्ले.
९७६५२६२९२६
ashishkarle101@gmail.com
#मी मराठी एकीकरण समिती
#मराठी बोला चळवळ