सर्वोत्कृष्ट ई-साहित्य पुरस्कार विजेत्या लेखकाची नवी साय-फाय कादंबरी धारावाहिक स्वरुपात
भाग १
(सन २०२०)
अमेरिका येथील नासा संस्थेच्या प्रयोगशाळेत ८-१० वैज्ञानिक सुरक्षा कवच घालून एका गुणधर्मावर प्रयोग करत असतात. एका पारदर्शक नळीमधून ते वैज्ञानिक विशिष्ट संयुगांवर ऑक्सिजन सोडतात. भांड्यामध्ये लाल रंगांचे अनेक दगड होते जे त्यांनी मंगळ ग्रहावरून आणले होते. ऑक्सिजन सोडल्यावर त्या दगडांमधून निळ्या रंगाचा धूर येण्यास सुरुवात झाली. तो धूर काही क्षणातच संपूर्ण प्रयोगशाळेत पसरला. वैज्ञानिक आता त्यावर हायड्रोजन सोडतात. हायड्रोजन जसजसा त्या संयुगांवर पडतो तसतसा तो निळा धूर येणे बंद होते आणि त्या दगडातून लाल रंग नाहीसा होतो.
आता तो दगड पृथ्वीवरील सामान्य दगडासारखा दिसू लागतो. लाल रंगामध्ये त्या विशिष्ट संयुगांसोबत ऑक्सिजन आणि हायड्रोजन मिसळले गेल्याने त्यातून विशिष्ट द्रव तयार होतो. खरी परीक्षा तर आता असते. तो द्रव ते एका पारदर्शक भांड्यात ओतला जातो आणि त्यावर पुन्हा प्रक्रिया केली जाते ज्यात तो द्रव पदार्थ पाणी आहे हे सिद्ध होते.
अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर त्यांना हा प्रयोग करण्यात यश आले होते. प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद त्या सर्व वैज्ञानिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
बाहेर उभे असलेले परीक्षक, नासा आणि इस्रोचे वरिष्ठ अधिकारी काचेच्या खिडकीबाहेरून हा प्रयोग पाहत होते. वैज्ञानिकांनी आतमधून प्रयोग यशस्वी झाल्याचा इशारा दिला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एकच आनंदभाव दिसू लागला.
"तुमच्या वैज्ञानिकांनी खूप मोठा शोध लावला आहे." नासाचे वरिष्ठ अधिकारी इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हस्तांदोलन करत म्हणतात.
"मंगळ ग्रहावरून तुमच्या रोबोने हे दगड आणले नसते तर हे शक्य झालं नसतं." इस्रोचे अधिकारी म्हणतात.
"आपल्या या शोधामुळे अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांची ताकद हजारो पटींनी वाढली आहे."नासाचे अधिकारी.
"हो, आणि आपल्या या शोधामुळे मनुष्य जातीला खूप मोठा फायदा होणार आहे." इस्रोचे अधिकारी.
"आपण तात्काळ ही बातमी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताच्या पंतप्रधानांना सांगितली पाहिजे."असे म्हणत दोन्ही अधिकारी वैज्ञानिकांचे अभिनंदन करत तेथून बाहेर निघतात.
गेल्या ८ वर्षांपासून नासा आणि इस्रो या दोन्ही संस्थांचे एका गुप्त मोहिमेवर काम सुरु होते. या मोहिमेमध्ये त्यांना मंगळ ग्रहावर मनुष्यासाठी पोषक वातावरण तयार करायचे होते ज्यात त्यांना आज यश मिळाले होते. आज झालेल्या यशस्वी प्रयोगामुळे या दोन्ही संस्थांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार होताच, पण मानवाला मंगळ ग्रहावर वास्तव्य करता येईल या विधानाला पुराव्यासह दुजोरा मिळाला होता.
दोन्ही संस्थांचे मुख्य अधिकारी आपापल्या गाड्यांमध्ये बसून नासा संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या दिशेने निघतात. काही अंतर पुढे जाताच प्रयोगशाळेत एक मोठ्ठा स्फोट होतो. हा स्फोट इतका भयानक असतो की संपूर्ण प्रयोगशाळा उध्वस्त होते आणि दूर अंतरावर असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या गाड्याही जळून खाक होतात. स्फोटात सर्व वैज्ञानिकांसह दोन्ही संस्थांचे मुख्य अधिकारी देखील आपला जीव गमावतात.
दुर्घटनेनंतर तात्काळ एफ.बी.आय. तर्फे चौकशी करण्यात येते. सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहण्याचा प्रयत्न केला जातो. स्फोटामुळे संपूर्ण डाटा नष्ट झाला होता. प्रयोगशाळेत अनेक स्फोटक पदार्थ होते पण ते सर्व पदार्थ वैज्ञानिकांच्या नेहमीच्या वापरातील होते, त्यामुळे स्फोटक पदार्थांमुळे ही घटना घडली असेही म्हणता येत नव्हते. अनेक गोष्टी आणि महत्वाची कागदपत्रे नष्ट झाली होती. स्फोट इतका मोठा होता की तेथील लोखंड देखील वितळले होते. या सर्व घटनेमध्ये मंगळ ग्रहावरील दगड मात्र जसेच्या तसे होते. ही दुर्घटना सर्वांसाठी एक रहस्य ठरली होती.
सरतेशेवटी मंगळ ग्रहावरील दगडातून अतिउष्ण किरणे निघून त्यांचा स्फोट झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो. स्फोटाचे कारण आणखी काही असू शकत होते, मात्र अंतराळ मोहीम राबविणाऱ्या दोन आघाडीच्या संस्थांमधील वैज्ञानिक आणि संशोधकांचा मृत्यू झाल्याने खूप मोठी हानी झाली होती. संपूर्ण जग या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत होते. परिणामी वैज्ञानिकांच्या सुरक्षेखातर मंगळ ग्रहावर मनुष्य वास्तव्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सर्व संस्थांच्या मोहिमा कायमच्या बंद करण्यात येतात.
(क्रमशः)