लेखक - आशिष अरुण कर्ले
आरोग्यम धनसंपदा
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामध्ये 'आरोग्य' ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे. आरोग्याशी संबंधित सेवांमध्ये औषधनिर्मिती आणि औषधपुरवठा या खूप महत्त्वपूर्ण सेवा असतात आणि या सेवा पुरवण्याचे काम फार्मासिस्ट करतो. आत्तापर्यंत तुमचा कधी ना कधीतरी फार्मासिस्टशी संबंध आला असेलच. अगदी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करण्यापासून ते शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या गरजांपर्यंत...
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शन) औषध वितरित (डिस्पेन्स) करणे, एवढीच काय ती लोकांना फार्मासिस्टची ओळख असते. दुसऱ्या शब्दात 'एक औषधवाला' अशीच प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या पलीकडेही फार्मासिस्टची अनेक कर्तव्ये, पैलू आहेत. फार्मासिस्टच्या अशा अनेक पैलूंबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
चला... तर मग जाणून घेऊया, कोण आहे फार्मासिस्ट आणि काय आहे त्याची भूमिका तुमच्या आरोग्यसंदर्भात...
१२ वी विज्ञान शाखेनंतर ज्या व्यक्तीने औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) मध्ये पदविका (डिप्लोमा D.Pharm) अथवा पदवी (डिग्री B. Pharm)पूर्ण केले आहे, ती व्यक्ती फार्मासिस्ट असते. १२ वी नंतर डिप्लोमा २ वर्षांचा, तर डिग्री ४ वर्षांची असते. पदवीनंतर M.Pharm, MBA, PhDशा उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय १२ वी नंतर D.Pharm (डॉक्टरेट ऑफ फार्मसी) हा ६ वर्षांचा अभ्यासक्रम आहे.
डॉक्टरांनी लिहून दिलेली औषध वितरित करणे, एवढीच काय ती आपल्याला फार्मासिस्टची ओळख आहे. पण याशिवाय अनेक महत्वपूर्ण कामे फार्मासिस्ट करतो. आरोग्यविषयक अनेक सुविधा पुरवण्यामध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते. औषधयोजने (प्रिस्क्रिप्शन) ची सत्यता आणि वैधता तपासण्याचे अधिकार फार्मासिस्टकडे असतात. औषधयोजनेमध्ये जर काही त्रुटी असेल तर त्यासंदर्भात तो डॉक्टरांशी चर्चा करून बदल सुचवू शकतो. औषधांची तपशीलवार माहिती, त्याचा शरीरावर होणारा परिणाम,औषधांची परिणामकारकता (Potency), औषधांतील कार्यकारी तत्व (Active Pharmaceutical Ingredients API),औषधांचे दुष्परिणाम (Side Effects), औषधयोजनेची सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन हे केवळ आणि केवळ फार्मासिस्टकडेच मिळू शकते.
औषधयोजनेची सत्यता आणि वैधता पाहून औषधांचे वितरण करणे, वितरित केलेल्या औषधांची नोंद ठेवणे,औषधांच्या वापरासंदर्भात रुग्णांना मार्गदर्शन/समुपदेशन करणे, औषधांचा रुग्णांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे, रुग्ण इतिहास (Patient History) नोंद करणे, औषधांची वैधता तपासणे, विविध प्रकारांनुसार औषधांची मांडणी तसेच वर्गीकरण करणे, औषधसंशोधन करणे, आरोग्यासंदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, योग्य औषध योग्य वेळी योग्य ठिकाणी "किमान नफा" या तत्वावर रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे, नशा निर्माण करणाऱ्या तसेच घातक औषधांचे (Narcotics and Harmful Drugs) कायदेशीर नियमानुसार वितरण करणे आणि त्यांची नोंद ठेवणे, ही सर्व फार्मासिस्टची कामे आहेत.
फार्मासिस्ट हा तुमच्या आरोग्यासाठी सदैव तत्पर असतो. तुमचं आरोग्य हीच त्याच्यासाठी महत्वपूर्ण बाब आहे. फार्मासिस्टशिवाय इतर कोणीही औषधवितरण करणे अथवा प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधवितरण करणे नियमबाह्य आहे. यामुळे उपचारांमध्ये त्रुटी (error) येऊ शकतात.
तुमच्या आरोग्यसंदर्भात सर्व समस्यांबाबत तुम्ही फार्मासिस्टशी मनमोकळेपणाने बोलू शकता. फार्मासिस्ट तुम्हाला प्रिस्क्रिप्शनशिवाय घेता येणारी औषधे (Over The Counter Drugs) तसेच सौंदर्य प्रसाधने (Cosmetics) खरेदी करण्यामध्ये योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करू शकतो. रक्तदाब (B.P.) मोजणे, रक्तातील शर्करेचे (Sugar) प्रमाण मोजणे, वजन, उंची, BMI मोजणे तसेच प्रथमोपचाराच्या सर्व सेवा आणि सुविधा फार्मासिस्ट देऊ शकतो.
फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा (link) आहे. व्यस्त कामकाजामुळे डॉक्टर रुग्णांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, डॉक्टरांकडून पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही परंतु फार्मासिस्टकडून तुम्हाला औषधयोजनेसंदर्भात तज्ज्ञ सल्ला आणि मार्गदर्शन मिळू शकते. औषधयोजनेसंदर्भात तपशीलवार माहिती ही केवळ आणि केवळ फार्मासिस्टकडेच मिळू शकते.
आजच्या ऑनलाइन युगात डिस्काउंटसाठी रुग्ण ऑनलाइन औषध खरेदी करतात परंतु रुग्णांनी हे लक्षात घ्यायला हवे की डिस्काऊंटपेक्षाही आपलं आरोग्य महत्वपूर्ण आहे. आपत्कालीन स्थितीत फक्त फार्मासिस्टच तुम्हाला औषधे उपलब्ध करून देऊ शकतो. याशिवाय रुग्ण समुपदेशन, औषधवापरासंदर्भात सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन हे केवळ फार्मासिस्टकडूनच मिळू शकते. आता तुम्हीच ठरवायचे आहे की तुम्ही औषधे ही एका कुरियर बॉय कडून घेणार की चार वर्षे शिक्षण घेतलेल्या फार्मसी संदर्भात संपूर्ण ज्ञान असलेल्या वेल क्वालिफाइड फार्मासिस्टकडून?... निर्णय तुमचा आहे.
तुमच्या आरोग्यविषयक सर्व समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी फार्मासिस्ट सदैव तयार असतो. गरज आहे ती तुम्ही पुढे येऊन त्याच्याशी मैत्रीचे नाते निर्माण करण्याची!
तुमच्या आरोग्यविषयक सर्व समस्यांबाबत फार्मासिस्टकडून निःसंकोचपणे मार्गदर्शन आणि सल्ला घेऊ शकता. फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...
WE ARE PHARMACIST, ALWAYS READY FOR YOUR HEALTH. BETTER DRUGS FOR BETTER WORLD!