आशा अरूण पाटील, सोलापूर
'रामू'
'उपस्थित मॅडम!' या आवाजासरशी माझे त्याच्याकडे लक्ष गेले.
'साहेब, आज आला तर तुम्ही आणि काल कुठे शाळा भरवली होती ? जा आई किंवा बाबांना घेऊन ये.'
एवढं सगळं बोलणं उरकलं, तरी रामूची मान खालीच. नखाने जमीन कोरणं सुरूच.
'राम्या, मुर्खा मी कोणाशी बोलते.'
माझ्या मनातला सगळा राग माझ्या बोलण्यातून ओसंडत होता. त्यासरशी तो भानावर येत बोलू लागला. 'मॅडम, आई आजारी आहे. तिला दवाखान्यात न्यायचं आहे.'
मी त्याचा नेहमीचाच बहाणा समजून त्याच्यावर ओरडले.
'रडगाणे गाऊ नकोस. यावेळेस वडिलांना आणल्याशिवाय मी वर्गात बसू देणार नाही.'
तसा तो मुसमुसत वर्गातून बाहेर गेला.
वडिलांना घेऊन पंधरा- वीस मिनिटांनी तो परतला. वडीलही जरा रोडावल्यासारखे दिसत होते. काळजीने चेहरा आकसला होता.
'नमस्कार मॅडम, म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्याचं काय झालंय, रामू शाळेला येतो म्हणत होता; पण म्याच येऊ दिलं नाही. कारण आमच्या घरच्यांना दवाखान्यात अॅडमिट करायचय अन् त्यासाठी पैसा हवाय. म्या आठवड्याला एक साडी साच्यावर विणतो. त्यासाठी रामूची मदत लागतीया. म्हणून धाडलं नव्हतं त्याला शाळेला. या बारीला तेवढं बसू द्या.'
मी विचारलं,' तुम्हाला एका साडीमागे किती रुपये मिळतात आणि तेवढ्यावर भागत का ?'
'आठवड्याला सातशे रुपये मिळत्यात.एक साडी विणल्यावर अन् आमच्या घरची बिड्या करत होती. थोडाफार घरचा घरखर्च भागायचा; पण ती पण बंदच हाय सध्याला, आजारी असल्याने झोपूनच असती ती'.
त्याचं बोलणं ऐकून माझं डोकं सुन्न झालं. महागाईच्या या जमान्यात या गरिबांचं कसं व्हायचं? किती मिळवायचं, किती खर्चायचं? पोटावर की दवाखान्यावर.
'घरचं काम कोण करते?'
माझ्या या प्रश्नावर त्यांनी मुलीची शाळा बंद करण्याचं कारण समजलं. 'शालू ,माझी पोरगी. गेल्याच वर्षी सातवी झाली. अभ्यासात लई हुशार; पण आईच्या आजारपणामुळे शाळा सोडून घर काम करती नव्हं का? तिला नाहीतर रामूला शिकवावं वाटतंया. म्हणून त्याच्या आईने आग्रह धरला.'
पुढे काही बोलण्यासारखं राहिलं नव्हतं. तरीही मी थोडा धीर देऊन,
'रामूची शाळा बुडवू नका. त्याच्या शिक्षणाने त्यालाच काय तुम्हालाही फायदा होईल तो स्वतःच्या पायावर उभा राहिल. त्यामुळे तुमची आर्थिक चिंता दूर होईल.' असे सांगितले.
या सर्व सल्ल्याचा कितपत फायदा झाला किंवा होईल माहित नव्हते. शेवटी मी त्यांना निरोप दिला व माझे शिकवण्याचे काम सुरू केले. रामू तसा वर्गात इतर मुलांपेक्षा एक दोन वर्षांनी थोरच. शाळेत घालतानाही पालकांची शिक्षणाबद्दलची उदासीनता. त्यातच गोड बोलून समजावून सांगून नाव घातले. सात वर्षांचा रामू पहिलीत घेतला. रामूच्या वयामुळे समज चांगली व वर्गात तो हुशारही होता. त्यातच हळूहळू त्याला शाळेची गोडी निर्माण झाली.वर्गात नेहमी प्रत्येक गोष्टीत पहिला नंबर येई. खेळ इतर स्पर्धा किंव्हा अभ्यास, या सर्वांत तो प्रावीण्य मिळवत असे. रामू तू जर शाळेला आला नाहीस; तर तुला दुसऱ्या तुकडीत बसवेन. या वाक्यासरशी रामू पहिलीत सुद्धा रडायचा व आता सुद्धा रडतो. माझ्या हाताखाली सहा वर्षे शिकल्यामुळे तो चांगलाच रमला होता. आमच्या शाळेत असे बरेच विद्यार्थी होते, जे काम करून शाळाही शिकत होते. रामूला जर योग्य मार्गदर्शन मिळाले, तर तो नक्की यशस्वी होईल. याची मला खात्री होती.
दिवसामागून दिवस जात होते. रामूची आई जाऊनही एक वर्ष सरून गेलं. रामू आता महिन्यातून एक दोन दिवस सुट्या वगळता, रोज शाळेला येत असे. कधी काम असेल तर परवानगी घेऊनच रजा घेत असे. एकदा माझ्या तासाला मुलांना मी गम्मत म्हणून काही प्रश्न विचारत असतानाच, 'कोण काय होणार?' याविषयी विचारत होते. रामूवर नंबर आल्याबरोबर तो उत्साहाने उभा राहिला.
'साहेब' होणार म्हणाला. सर्वजन या उत्तराने खळखळून हसू लागले. त्याची चेष्टा करू लागले. 'साहेब म्हणे साहेब, साहेब कधी शाळा बुडवितात का ? म्हणे साहेब. तोंड बघा साहेबांचं'
पण त्याच वेळी मला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक जाणवत होती. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तसेच रामूचेही होते. तो प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक पटकावत होता. त्याची चौकस बुद्धी, जिद्द, ध्येय, चिकाटी या गुणांची जोड असल्यामुळे तो ताऱ्यांप्रमाणे चमकत होता. सातवी झाल्यावर मात्र तो माझ्या वर्गातून दुसऱ्या वर्गात गेला. सात वर्ष माझ्या हाताखाली शिकलेला विद्यार्थी नक्कीच माझं नाव कमावेल, ही मला आकांक्षा वाटत होती. माझं नाही म्हटलं तर त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष होतेच.
दहावीचं वर्ष असल्यामुळे त्याच्यावर अभ्यासाचं ओझं होतं; पण तरीही शिक्षकांनी नियोजनबद्ध अभ्यासाचा आराखडा दिल्यामुळे, तो सहजरित्या अभ्यास करत होता. इतके वर्ष त्याने वडिलांसाठी कामात मदत करत करत, पेपर टाकण्याचेही काम केलं. जे मिळेल ते काम तो स्वीकारत होता. कधी फळं, कधी भाजी तर कधी किराणा दुकानात देखील कामाला जात असे; पण या वर्षी शाळेने त्यालाही सर्व काम सक्तीने बंद करायला लावली. त्याला शाळेतील अनेक शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला. वह्या,पुस्तकं, मार्गदर्शन हे त्याला भरभरून मिळत होतं. रामूने कधी भाकरीच्या पूर्ण चंद्राची आशा केली नाही. वेळ भागून जाईल एवढे चार घास खाऊन अभ्यासाला गाठ घालत होता.अभ्यास एके अभ्यास, अभ्यास दुणे अभ्यास त्याने केला. श्रमाच्या वेलीला यशाची फुलं येतात आणि ती आलीच पाहिजेत. त्याने बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं. पुढे त्याच्या बोर्ड परीक्षेच्या मार्कांमुळे त्याला विज्ञान शाखेत सहज प्रवेश मिळाला. 'ए प्लस' मिळाल्यामुळे शाळेत त्याचा सत्कार झाला. त्या वेळेस त्याला शिकविलेल्या सर्व शिक्षकांना आनंद झाला. जणू त्यांचाच सत्कार झाला होता. अकरावी, बारावी त्याने यशस्वीरित्या पार पाडली. त्याला तिथेही शिक्षकांचा पाठिंबा होताच; पण त्याला डॉक्टर किंवा इंजिनिअर करण्याचा खर्च भागविणे कठीण होते. मी त्याला एखाद्या धार्मिक संस्थेची मदत घेण्याविषयी सुचवले असता, डॉक्टर किंवा इंजिनीअर यापेक्षा वेगळा मार्ग अवलंबण्याची, त्याने इच्छा व्यक्त केली. त्याने बीएससी चांगल्या मार्कांनी पास केले. पुढे त्याने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी फॉर्म भरला. पूर्व परीक्षा पास होऊन मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली; पण तोंडी परीक्षेत तो कमी पडला. मात्र पूर्ण तयारीने दुसऱ्या वेळेस अर्ज भरून त्याने घवघवीत यश प्राप्त केले. त्याचा महाराष्ट्रात विसावा नंबर आला. त्याची जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. एव्हाना त्याच्या बहिणीचे लग्न झाले. घरची जबाबदारी वडिलांनी समर्थपणे पेलवली होती. त्याचे यश पाहून, त्यांना आकाश ठेंगणे वाटू लागले. आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज झाले होते. खरंच गरिबांच्या घरी भाकरीचा चंद्र पहायला मिळणंही महत्त्वाचं. त्यांच्यासमोर अनेक सुखं हात जोडून आज उभी होती. मनात मात्र एक रूखरूख होती. हे सर्व सुख पाहायला रामूची आई हवी होती; पण देवापुढे आपल्या सर्वांचे हात टेकलेले असतात. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यातच जीवन जगण्याचं खरं कौशल्य असतं. हळूहळू त्याने आपल्या पदावर प्रमोशन मिळवलं. त्याच्या वडिलांनी त्याचे दोनाचे चार हात केले. रामूने ही वडिलांना साचा काम बंद करायला लावले.
आपल्या जिद्द, चिकाटी व ध्येयासक्तीच्या जोरावर अपेक्षित यश मिळवून आज तो खरंच साहेब झाला. गुरुपौर्णिमेदिवशी गुरु भेट घेऊन शाळेत आला. तो जेव्हा सर्व शिक्षकांना भेटायला आला तेव्हा सर्वांना 'आदर्श शिक्षक पुरस्कार' मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. साहेब आल्याच्या थाटात तो आला आणि सर्वांचे डोळे आनंदाश्रूंनी ओले झाले.