आयुष्यात अनेक गोष्टी अनपेक्षितपणे व योगायोगाने घडतात हे सत्य आहे. नाहीतर आता लडाखच्या बाईक ट्रिप बाबत माहित होणे, त्यासाठी ग्रुप तयार होणे, नविन बुलेट त्यासाठी विकत घेणे या सर्व बाबी योगायोगानेच घडल्या मात्र "लडाख जो पर्यंत बोलवत नाही, तोपर्यंत तेथे जाणे होत नाही". याचा प्रत्यय आला.
सर्व प्रथम 2016 साली लडाखला जायचे म्हणून मयूर पुरोहितच्या मार्गदर्शनाखाली ग्रुप तयार केला. त्यात किशोर, निखिल, हरीभाऊ, मयूर, दंडवते असे सहा - सात जण होतो. आणि दुर्देवाने जाण्याच्या 4-5 दिवस आधी ॲक्सीडेंट होवून हात फ्रॅक्चर झाला आणि माझे जाणे रद्द झाले.
2017 साली श्री. सुनिल गिद, श्री. शशांक भंडारी व मी असे फॅमिलीसह बाईकवर जाण्याचे ठरविल, सर्व बुकींग झाले. लडाखची फायनल मिटींग झाली आणि हात दुखण्याचे निमित्त झाले म्हणून चेकींग केले आणि एन्जोप्लास्टी करावी लागली. त्यावेळी श्री. सुनिल गिद म्हणाले, अजित आमचे असे आतापर्यंत चारवेळा रद्द झाले, जोपर्यंत तिकडून बोलवणे येत नाही तोपर्यंत खरे नाही. यात श्रध्दा-अंधश्रध्देचा भाग सोडून देवू, मात्र असे घडले होते.
मग 2018 साली लडाखला जायचे मात्र जावून ट्रिप पूर्ण केल्याशिवाय कोणालाच सांगायचे नाही व तशी ताकीद मुलांनाही दिली. त्यांनीही शहाण्यासारखे कोणी विचारले तर आई-बाबा काश्मिरला गेले आहेत एवढेच फक्त सांगितले. त्यापूर्वी मग डिसेंबर 2017 मध्ये आम्ही दोघे भूतानला बुलेटवर जावून आलो.
अखेर मे 2018 उजाडला आणि आमची लगबग सुरु झाली. दोनवेळा रद्द झाल्यामुळे यावेळी नाशिकहून आमच्याबरोबर कुणीच नव्हते. मग दिल्ली येथील ग्लोबल टुर्स मार्फत बुकींग केले आणि श्रीनगरला पोहचलो. 27 मे पासून टुर सुरु होणार होती.
श्रीनगर पृथ्वीवर स्वर्ग असे म्हटले जाते त्या काश्मिरची राजधानी ! यापूर्वी 2012 साली काश्मीर गेलो होतो, तेव्हा जागोजागी व 50 - 100 मीटर्स अंतरावर आपले जवान बंदोबस्तासाठी उभे होते. कारण त्यावेळची काश्मीरची परिस्थिती धगधगती होती. लाल चौकात तर जायलाही मिळाले नव्हते. मात्र आता 2018 साली फारच कमी बंदोबस्त् सर्वत्र होता. लाल चौकातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते आणि तेथे फक्त 10-15 पोलीस होते. हे बदलेले चित्र सुखकारक होते.
श्रीनगरमध्ये फेरफटका मारला, काही जणांशी परिस्थितीबाबत चर्चा केली, त्यावेळी त्यांच्या मनात असलेली देशाची प्रतिमा, बेरोजगारीची समस्या, या बाबींवर त्यांनी खुलेपणाने चर्चा केली. एक जण म्हणाला कि, सर आज बेरोजगारी मुळे पोष्ट ग्रॅज्युएट, सॉफ्टवेअर इंजिनियर्स अतिरेकी होत आहे. इथे उद्योगधंदे नाहीत, बाहेर कोणी काश्मिरी म्हटले कि काम होत नाही, त्यातल्या-त्यात तुमच्या महाराष्ट्रात व साऊथ मध्ये आमची समस्या समजावून घेतली जाते व आम्हाला काम मिळते. काम मिळाले तर कोण अतिरेकी होईल ? त्याचेही म्हणणे बरोबर होते मात्र त्याला मी काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर तो देवू शकला नाही.
त्याला विचारले कि, रोजगार का नाही ? उद्योगधंदे का येत नाही ? त्याचे उत्तर त्याला माहित होते मात्र त्याने दिले नाही.
त्याला दुसरा प्रश्न विचारला, मान्य आहे, तुमच्याकडे नोकरी नाही, घर चालावयचे आहे, त्याकरीता पैसे पाहिजेत म्हणून काहीजण अतिरेकी होतात मग हे सांग देशाचा झेंडा का जाळतात ? पाकीस्तान जिंदाबाद या घोषणा का देतात ? याचे उत्तर मात्र तो देवू शकला नाही, असो..! नमनालाच घडाभर तेल झाले.
सकाळी बुलेटला किक मारली आाणि "झोजीला पास" कडे प्रयाण केले.
"झोजीला पास" काश्मिरच्या लडाख सेक्टरला जोडणारा सर्वात धोकादायक व अखंड बर्फ असलेला पास या झोजीला पास बाबत असे म्हटले जाते कि, "झोजिला मे नही गिरे, तो क्या गिरे" अशा या वेडयावाकडया वळणाच्या, अत्यंत खडतर रस्त्यावर बुलेट चालवितांना आकाशातले सर्व देव आठवतात. आमच्या ग्रुपमध्ये एकुण 46 जण होते त्याच 8 जोडपी होती जी बुलेटवर होती, त्यात केरळहून 5, गुजरातहून 2, व महाराष्ट्रातून आम्ही. बाकी सर्व यंग बॉईज कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश येथून आलेले होते.
झोजिलाचे वातावरण हे क्षणार्धात बदलणारे, अचानक पाऊस, बर्फवृष्टी असे सर्व प्रकार येथे पाहिला मिळतात. निसर्गाचे अत्यंत रुद्ररुप येथे आपणास बघावयास मिळते.
मग आले देशाच्या अभिमानाचे ठिकाण " कारगिल " 1999 च्या युध्दाने आपल्याला कारगिल माहित झाले, मात्र प्रत्यक्षात वर्षानुवर्षे आपले जवान शत्रूशी, निसर्गाशी, प्रतिकुल परिस्थितीत तोंड देवून दिवसरात्र जागता पहारा देत असतात म्हणून आपल्याला शांत झोपता येते. त्या सर्व वीरांना त्रिवार प्रणाम.
कारगिल, बटालीक व द्रास असे सेक्टर आहे. यातील कारगिल सेक्टर मध्ये टायगर हिल, द्रास सेक्टरमध्ये टोलोलिंग ही शिखरे आहेत. या ठिकाणी कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन मनोज पांडे, रायफलमन संजयकुमार, ग्रेनेडीयर योगिदरसिंग यादव यांनी पराक्रमाची शर्थ केली होती. त्यात कॅप्टन विक्रम बात्रा व कॅप्टन मनोज पांडे, रायफलमन संजयकुमार, ग्रेनेडीयर योगिदरसिंग यादव यांना सर्वोच्च पुरस्कार "परमवीर चक्र" प्रदान करण्यात आला. या ठिकाणी कॅप्टन मनोज पांडे स्मारक आहे. या सर्व वीरांना "मानाचा मुजरा" अर्पण करुन कारगिल येथे थांबलो.
येथे सर्व सोबत असले तरी कही स्वतंत्र नावे मार्शलने दिली होती. साऊथची जी मुले होते ती रजनीकांतचे फॅन म्हणून त्यांना प्रथम रजनी गारुप व नंतर अण्णा ग्रुप असे नाव दिले. केरळमधील आलेल्या 5 जोडप्यांमध्ये एकजण डॉक्टर होती म्हणून त्या ग्रुपला डॉक्टर ग्रुप, तर गुजरातमधून आलेल्यांना गुज्जु ग्रुप अशी नावे दिली होती.
आता लेहकडे प्रवास सुरु झाला वाटेत "पत्थर साहिबा" हा गुरुव्दारा लागतो. तेथे सातारा जिल्हयातील "वाठार स्टेशन" या गावच्या सैनिकांची भेट झाली.
लेहला श्रीनगरहून व मनालीहून अशा दोन्ही मार्गांनी जाता येते, व दोन्ही बाजूने अंतर जवळ-जवळ सारखेच म्हणजे 400- 450 कि.मि. आहे. लेहलडाख भागात सर्वत्र अनेक मॉनेस्ट्रीज व छोटया समाध्या म्हणता येतील अशा प्रकारची निमुळती होत जाणारी चौकोनी पांढ-या रंगाची बांधकामे आहेत. याला "चोटांग" असे म्हणतात.
लेहपासून जवळच "मॅग्नेटीक हिल " नावाचा भाग आहे. येथे तुम्ही तुमचे वाहन न्युट्रल मध्ये उभे केल्यास ते या टेकडीच्या चढाकडे आपोआप ओढले जाते. मी सुध्दा बुलेट न्युट्रलमध्ये करुन पाहिली तेव्हा "बुलेट" आपोआप चढाकडे ओढली गेली.
लेह येथे एअर पोर्ट व मिल्ट्रीचे तळ आहे. येथे असलेल्या पेट्रोलपंप हो शेवटचा पेट्रोलपंप आहे. त्यामुळे पेट्रोल स्वत:ला कॅरी करावे लागते. येथे "हॉल ऑफ फेम" आहे. येथुन जवळच "थ्रि-इडीयटस" या पिक्चरमुळे प्रसिध्द झालेली "फुंग-सुक-वांगडुची" शाळा आहे जी चित्रपटात पँगाँग लेकच्या काठी दाखवली आहे,प्रत्यक्षात या दोघामधील अंतर जवळ-जवळ 150 ते 200 कि.मि. आहे.
रस्त्यात मुनलँड या चंद्रावर असलेल्या जमिनी सदृष्य ठिकाणाला व त्यानंतर लामायुरु या ठिकाणच्या मोनेस्ट्रीला भेट दिली. लामायुरु मॉनेस्ट्री ही दहाव्या शतकात बांधण्यात आली आहे.
लेहहून नुब्रा व्हॅली कडे जाण्यासाठी दुस-या दिवशी प्रयाण केले. वाटेत बाईकरच्या दृष्टीने सर्वात आव्हानात्मक अशी "खारदुंगला-पास" लागते. हिची उंची 18340 फुट आहे. अत्यंत कमी ऑक्सीजन असलेली ही खिंड असून जगातील सर्वात उंचावरील "मोटोरेबल" रोड येथे आहे. खारदुंगला पासला आपण जास्तीत-जास्त 5 ते 10 मिनीट थांबू शकतो कारण येथे श्वासोश्वास घेण्यास त्रास होतो. या ठिकाणी मिल्ट्रीने एक सुंदर वाक्य लिहीले आहे. "ये जो आपके लिए ॲडव्हेंचर है वो हमारी रोजमरा कि जिंदगी है" खरच अशा शूरांना वंदन, खारदुंगला पासला जातांना सोबत भिमसेनी कापुर व लसूण ठेवावा कारण श्वासोश्वासाचा त्रास झाला तर उपयोगी पडतो. महत्वाचे म्हणजे येथे जातांना मनात "मला त्रास होईल" असा विचार ठेवू नका, कारण तसा ठेवल्यास हमखास त्रास होतो.
खारदुंगलाची चढाई संपवून नुब्राच्या उताराकडे निघालो. खारदुंगलाला सवत्र बर्फ तर नुब्रा हा वाळवंटी भाग वाटेत दिक्षित येथे कलर्ड बुध्दाची जवळ-जवळ 106 फुटाची मुर्ती आहे. ही मुर्ती 14 व्या शतकातील आहे. नुब्रा येथे डबल पाठीचे उंच आहेत. जे इतरत्र आढळत नाही.
आता नुब्राहुन प्रवास सुरु झाला पँगाँग लेक कडे! पँगाँग लेक हा 3-इडियटस या चित्रपटामुळे सर्वांना माहित झाला. या तलावाचा 37% भाग भारतात तर 63% भाग हा चिनमध्ये असून अतिशय सुंदर निळे पाणी असलेला हा तलाव अनेकदा माणसाप्रमाणे रंग बदलतो. मात्र हा तलाव पूर्णत: खारट पाण्याचा आहे. हिवाळयात हा तलाव संपूर्ण गोठून बर्फ होतो. तेव्हा काही धाडसी मंडळी यावर बाईक फिरवतात. पँगाँग लेकच्या काठी तंबूमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते. येथे इलेक्ट्रीसिटी नाही, त्यामुळे जनरेटरने वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे रात्री 10 वाजेनंतर संपूर्ण अंधार होतो. वारे जोरदार वाहत असल्याने येथे अतिशय थंडी असते.
अशा सर्व उंच ठिकाणांवर तुम्ही काही गोष्टी पाळणे अतिशय जरुरीचे असते. अन्यथा जीवावर बेतू शकते. तुम्ही हालचाली हळू केल्या पाहिजे, धावणे, भराभर चालणे, या गोष्टी टाळल्या पाहिजेत. दारु, सिगारेट, अशाबाबी टाळल्या पाहिजेत, खारदुंगला सारख्या ठिकाणी सर्व अंग झाकले पाहिजे नाहीतर फ्रॉस्ट बाईट (बर्फाळ प्रदेशात आजार ) मुळे तुमचा हात निकामा होवू शकतो.
आता प्रवास होता " हॅनलेचा" हॅनेल हे चायना बॉर्डर जवळ असणारे गाव, जाण्याचा रस्ता म्हणजे 180 कि.मि. पैकी 130 कि. मी. ऑफ रोड होता,आपल्याकडे रस्ते बांधकामाच्या वेळी ज्याप्रमाणे भराव टाकता त्या टाईपचा. अशा रस्त्यात बुलेट चालविणे म्हणजे कसरत 20/30 चा स्पिड, एक पाय सतत जमिनीला टेकलेला, कारण तो नाही टेकला तर आपण जमिनीला टेकू हे निश्चित. या भागाला मिलीट्रीच्या दृष्टीने महत्व असल्याने त्याबाबत काही जास्त लिहीत नाही. कारण या ठिकाणी खारदुंगला पेक्षा जास्त उंची असलेला भाग आहे, त्याचे नांव उमलिंगला पास व ऊची 19300 फुट आहे, एका महाभागाने त्याचे शुटींग करुन सोशल मिडीयावर टाकले, तेव्हापासून आर्मीने या भागात सिव्हीलीयन्सला परवानगी देणे बंद केले आहे.
हॅनले हे संपूर्ण वाळवंटचा 25-30 घरांचे गांव आहे. येथे हॉटेल नाही. त्यामुळे स्थानिकांच्या घरीच राहण्याची सोय होते. हॅनलेला जातांना रस्त्यात एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलो. येथील जेवण म्हणजे फक्त मॅगी किंवा नॉनव्हेज /आम्लेट याशिवाय काही नाही. येथे जवळच एक शाळा होती. तिथल्या लहान मुलांना चॉकलेट वाटले त्यावेळी त्यांच्या चेह-यावर पसरलेला आनंद अवर्णनीय होता. शासन काश्मीर मध्ये मोठा निधी खर्च करते, त्यातीलच काही भाग त्यांचाच भाग असलेल्या लडाखवर खर्च केला तर त्या भागाचा विकास होईल.
यानंतरचा प्रवास होता " सुमोरीरीचा " ( Ts-Moriri ) सुमोरीरी येथे एक लेक आहे. पूर्वी पर्यटक तेथे गर्दी करत मात्र आता पॅगाँग लेक मुळे याचे महत्व् घटले आहे. या ठिकाणी अतिशय थंडी म्हणजे तापमान मायनस दहा अंश होते. त्यानंतर सॉसर येथे गेलो. सॉसर हे अतिशय थंड ठिकाण, येथे लेक आहे मात्र तो आटला आहे. येथे बघण्यासारखे काही नाही. येथे पाण्याचे फार हाल आहेत फक्त एक बादली पाणी एकाला मिळत असे.
सॉसर येथे आमच्या बुलेटस बदलल्या गेल्या. कारण जे & के पासिंगच्या गाडया हिमाचलचे वाहन सप्लायर्स येवू देत नाहीत. तर हिमालयाच्या पासिंगच्या गाडया जे & के वाले येवू देत नाही. जे & के च्या गाडया अतिशय टॉप कंडीशन मधल्या तर हिमाचल पासिंगच्या गाडया एकदम डबडा.
सॉसरहुन ग्रुप लिडर बदलला. नवा लिडर आला मात्र तो अतिशय ढिला त्याला स्वत:लाच स्वत:वर आत्मविश्वास नसलेला. आता एकच मुक्काम होतो तो म्हणजे जिस्पा. येथून सर्व उतारच होता. मात्र सर्चुहून निघालो आणि उशिर झाल्याने रस्त्यावरुन वाहणा-या नाल्यांना वेग आला होता व पाणी वाढले होते. सर्चुला जाताना 16 हजार फुटाची " गोटा पास " व 21 हेअरपीन बेण्ड (वळण) लागतात.अशात रस्त्यात तीन मोठया पासेस (खिंडी) एक नकीला पास, दुसरी " चांगला पास " तर तिसरी " बारलाचा पास " यातील चांगला पास तर उजेडात पार झाली मात्र बारलाचा पासच्या आधी लागण-या नाल्यामुळे भरपूर उशिर झाला. कारण नाल्यातील पाणी गुडघ्याच्यावर होते आणि त्यामुळे नाल्यातून गाडी ढकलून पार करावी लागली. त्यात कडाक्याची थंडी " बारलाचा पास " म्हणजे चेन्न्ई एक्सप्रेस मधला व पूर्वी शाहीद कपूर आणि करीना कपूरच्या " जब वुई मेट " या गाण्यामध्ये ज्या दोन्ही बाजूंनी बर्फाच्या भिंती दाखविल्या आहेत तो पास. यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 10-12 फुटाच्या बर्फाच्या भिंती, रस्त्यावर बर्फ तोल गेला तर या बर्फाच्या दगडी भिंतीवर जावून आदळणार कसेबसे " बारलाचा " पार केला तर पुढे समजले की, पाणी वाढल्यामुळे " जिस्पाला " जाण्याचा रस्ता बंद केला आहे. आता मुक्काम एखादया गावात ढाब्यावर करावा लागेल. मात्र त्याला इलाज नव्हता. पुढे लागणारे गाव " झिंग-झिंग बार " मात्र येथे एकही बार नाही तर साधे ढाबे आहेत जेथे रु. 200 परहेड घेवून जेवणाची व मुक्कामाची सोय केली जाते. थंडी मुळे सगळे वैतागलेले व थकलेले त्यामुळे येथील दाब्यांमध्ये सर्वांनी मुक्काम केला. सकाळी प्रवासाचा शेवटचा टप्पा मनाली कडे निघालो. वाटेत जिस्पा येथे चहा-नाश्ता केला व " रोहतांग पासकडे " निघालो.
" रोहतांग पास " बघून अत्यंत वाईट वाटले कि, काय आपण निसर्गाची अहवेलना करतो आहोत. 1987 साली एन.सी.सी.त असतांना " रोहतांग पास " येथे ट्रेकिंगला गेलो होतो मात्र त्यावेळी मे महिन्यातही असलेल्या सर्वत्र बर्फ यामुळे मढी येथूनच मागे फिरावे लागले होते. व रोहतांग दर्शनाची रुखरुख तेव्हापासून मनात होती. मात्र आता पर्यटकांनी अस्वच्छ केलेले रोहतांग बघितले आणि आपली आपल्याच लाज वाटते. रोहतांग पास हून मनाली फक्त 60 कि.मि. आहे. पूर्वी मनालीहून रोहतांगला जायचे असले तर पहाटे 3 वाजेला निघावे लागायचे मात्र आता संपूर्ण रस्ता सुना होता. संध्याकाळी 5 वाजता मनालीला पोहचलो.
पूर्वीचे अक्षरश: तीन-चार वर्षापूर्वीचे मनाली आाणि आताचे मनाली यातील तापमानात कमालीचा बदल झाला आहे. असेच राहीले तर मनाली हे कधी काळी हिलस्टेशन होते. असे पाठयपुस्तकात वाचायची वेळ येईल.
आपण निसर्गाकडून जे मिळाले आहे. त्याचा उपयोग न होता फक्त ते ओरबाडतो आणि नंतर बाहेरच्या देशात किती शिस्त आहे. यावर लेक्चर झोडतो.
असो मनालीला पोहचलो आणि अखेर लडाख बाईक टूर पूर्ण झाली, व एक स्वप्न पूर्ण झाले.
अशा बाईक टुर्समध्ये सर्वांनी घ्यावयाची काळजी म्हणजे सर्व प्रथम बाईक ही मार्शलच्या मार्गदर्शनाखालीच चालवा, ओव्हरटेक करु नये. कारण तुम्ही कितीही चॅम्पियन असाल तर अशा भागात तुम्ही प्रथमच जात आहात व मार्शलचा तो रोजचा रस्ता आहे त्यामुळे कुठे वळण, नागमोडी रस्ते, बाईक घसरण्याची शक्यता, खडडे यांचे ज्ञान त्याला आपल्या पेक्षा जास्त असते हे लक्षात ठेवा. अशा उंच ठिकाणी माऊंटन सिकनेस येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जास्तीत जास्त बिसलेरीचे पाणी प्या, कारण त्यात ऑक्सीजन असतो. आता तुम्ही म्हणाला हिमालयाचे एवढे स्वच्छ पाणी असतांना बाटलीचे पाणी कशाला ? तर हिमालयाचे पाणी हे अतिशय शुध्द असते. त्यामुळे त्यातून ऑक्सीजनचा पुरवठा हवा तेवढा होत नाही त्यामुळे बाटलीबंद पाणी प्यावे. श्वासोश्वासाचा त्रास झाल्यास लसणाच्या पाकळया चावाव्यात. थंडी पासून चेहरा हात पाय सर्वांचे सरंक्षण होईल असे पाहावे. ज्याला ॲडव्हेंचर आवडते त्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली आताचा ही लडाख टूर करावी कारण काही वर्षांनी याचाही बाजार होणार आहे.
लेखक: अजित मुठे, नाशिक
ईमेल: ajitmuthe@yahoo.com