ज्या गुणांवर जीवनाची सारी इमारत उभारावयाची असते, जे गुण पायाभूत असतात, ते गुण आपण अंगी बाणवून घेण्याचा प्रयत्न करू या. आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणात त्या गुणांवर जोर देऊ या. भर देऊ या. “तुम्ही यशस्वी झालात की नाही, तुम्ही कार्यसिध्दी मिळविली की नाही ? हा प्रश्न महत्त्वाचा नाही. परमेश्वर असा प्रश्न तुम्हाला विचारणार नाही. परंतु तुमच्याजवळ सत्य, सरलता, साधेपण, धैर्य, चारित्र्य वर्गरे सद्गुण आहेत की नाहीत हे विचारण्याचा मात्र कोणालाही अधिकार आहे. आपल्याजवळ या सद्गुणांची मागणी करण्याचा हक्क वाटेल त्याला आहे. हे निरनिराळे सद्गुण म्हणजे तळमळीची, कळकळीचीच ती नानाविध रूपे आहेत. तळमळीच्या सागरातील लाटा म्हणजेच हे नाना सद्गुण; तळमळीच्या आकाशगंगेतीलच हे विविध तारे; तळमळीच्याच बागेत फुललेली ही नानाविध फुले. ज्याच्याजवळ तळमळ असते, आंतरिकता असते तो पुरुष एकाच ध्येयाच्या पाठोपाठ सारखा जात असतो. धिमेपणाने, अप्रतिहतपणे, न डरता, न डगमगता, न रडता, न पडता, सारखा तो जात असतो; या तळमळीच्या प्रेरणेनेच तो आपल्या ध्येय-तार्‍याकडे सर्व संकटांतून व कष्टांतून जात असतो.

अशा प्रकारची जी तळमळ तिलाच धर्म म्हणतात. ही जी नितांत स्थिर निष्ठा, हा जो अविश्रांत ध्येयार्थ कष्टाळूपणा- तोच धर्म होय. ही तळमळ म्हणजेच आपले खरे स्वरूप. तिच्याशिवाय बाकी सारे निस्सार आहे. ह्या जगात जे प्रचंड विचारवारे वाहत असतात, ज्या अनंत महान् घडामोडी होत असतात, त्यांमध्ये आपण या तळमळीमुळेच भाग घेतो. या तळमळीमुळेच अंत:करणात वादळे होतात. कोणत्यातरी वस्तूसाठी आपण वेडे होतो व त्या वस्तूंच्यासाठी आपण स्वत:चे जीवन फेकून देतो. त्या ध्येयाकडे जात असता प्रचंड झंझावातात आपण तृणपर्णाप्रमाणे इतस्तत: फेकले जात असतो. परंतु यापेक्षा दुसरे भाग्य कोणते ? एखाद्या महान् यात्रेत लक्षावधी लोक जमतात- देवदर्शनासाठी कोण मारामारी, लोटालोट कोण; परंतु त्यांतच मौज आहे, परम सुख आहे. ध्येयासाठी आपण उपयोगात आणले जावे याहून परम भाग्य कोणते, श्रेष्ठ सौभाग्य कोणते ? कोणत्या तरी महान् ध्येयाच्या बाबतीत आपला उपयोग केला जावा, हेच जीवाचे सुख. देवाच्या हातातील, धर्माच्या हातातील, ध्येयाच्या हातातील खेळणी बनू या. ते ध्येय आपणास नाचवू दे; फिरवू दे, चढवू दे, फेकू दे, मारू दे, काहीही करू दे. ध्येयदेवाचे दास ! याहून थोर पदवी दुसरी कोणती आहे ? काटे पसरलेल्या रस्त्यांतून, फटके खात, तडाखे खात, घाव झेलीत, पुढे धडपडत जाणे- याहून भाग्य कोणते ? न थांबता, न भिता, निराशा व मृत्यू पुढे दिसत असतानाही, परमानंदाने थै थै नाचत, निराशेचीच आशा करीत व मरणाचे चिरजीवन करीत अविश्रांतपणे व अदम्यपणे पुढे, आणखी पुढे जाणे याहून भाग्य कोणते ?

तळमळ ! बस्स, एका तळमळाची जरूरी आहे. सर्व अनुभवांची किल्ली सर्व साक्षात्काराचा पाया, सर्व सुखाची खनी- म्हणजे ही तळमळ होय. सर्व सद्गुणोतील अत्यंत साधा परंतु अत्यंत महत्त्वाचा व अति परिणामकारक सद्गुण म्हणजे ही तळमळ होय. अदृश्य परमात्म्यावर दृष्टी खिळणे, दूर असलेल्या ध्येयदेवाबद्दल वेडे होणे; यापेक्षा दुसरे काय पाहिजे ? ही आंतरिक तळमळ म्हणजेच पूर्ण विजय. ज्याला परम वस्तूची तळमळ लागली, ध्येयाचे वेड लागले, त्याच्याजवळ सत्य, पावित्र्य व धैर्य यांशिवाय दुसरे काय दिसणारं ? दुसरे काय असणार ? निर्मळ दृष्टीचीच ही विविध रुपे आहेत. जो मनुष्य आपल्या जीवितध्येयाकडे धिमेपणाने एकेक पाऊल दृढपणे रोवीत पुढे जात असतो, ज्याला ते ध्येयच रात्रंदिवस जागृती, स्वप्नी दिसत असते, ज्याला एकच ध्यास, एकच आस, अशा पुरुषाजवळ असत्य, दंभ, भीरूता, क्षुद्रता, स्वार्थ इत्यादी दुर्गुण येऊच शकणार नाहीत. त्याला पाप, लोभ, मोह भूल पाडू शकणार नाहीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel