ज्योती अंबेकर
मराठी बातम्यांची विश्वासार्ह ओळख म्हणजे ज्योती अंबेकर. सह्याद्री वाहिनीवर आपण अनेकदा त्यांना पाहिलं, ऐकलं असेल. फक्त बातम्याच नव्हे तर अनेक मोठमोठे कार्यक्रम, मुलाखती अशा विविध ठिकाणी त्या आपल्याला भेटल्या आहेत. वृत्तनिवेदिका, सुत्रसंचालक, मुलाखतकार, दूरदर्शनच्या सहाय्यक संचालिका अशा अनेक भूमिका बजावताना त्यांना आलेले अनुभव, आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि स्त्री म्हणून समाजाच्या मानसिकतेविषयी आलेले अनुभव या सगळ्याविषयी ज्योती अंबेकर यांनी आपल्याशी संवाद साधला आहे.
( मुलाखत आणि शब्दांकन : वैष्णवी कारंजकर)
तुम्हाला स्त्री म्हणून तुमच्या घरच्यांकडून किंवा सहकार्यांकडून कधी भेदभाव सहन करावा लागला आहे का? अशाप्रसंगी एक स्त्री म्हणून तुमची वागणूक कशी होती?
क्वचित प्रसंगी असे अनुभव आले पण मी त्याबद्दल प्रखर वाद घातला. तो अन्याय मी कधीही सहन केला नाही. काही वेळा गावातही हे अनुभव आले. कारण आम्ही ग्रामीण भागात राहत होतो. त्या भागात स्त्री पुरुष भेद जास्त प्रमाणात आहे. माझ्या घरी मात्र असं वातावरण नव्हतं. वडिलांनी कायमच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच मी आयुष्यात बरंच काही करू शकले. पण हे सगळं करत असताना काही ठिकाणी तो फरक जाणवत होता. आपण मुलगी आहोत म्हणून काही गोष्टी करायला आपल्याला अडचण येते हे जाणवत होतं. काही लोकांच्या नजरेतला भेद मला कायम खटकायचा. कामाच्या ठिकाणी कधी कधी हाताखालच्या लोकांना माझी कामं करायला कमीपणा वाटायचा. शेवटी मी त्यांच्याशी या विषयावर बोलले. काही लोक नकळत टोमणे मारायचे, कधी काही टिप्पणीही करायचे पण याविषयी अधिक कडक कायदे आल्यावर परिस्थिती काही प्रमाणात बदलली. मी कायम अंतर राखून राहायचे. पण कायम एक दडपण मनावर असायचं. फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या आजूबाजूच्या तसंच मला भेटणार्या पुरुषांनाही मी स्त्री असल्याचं दडपण असायचं. पण मी खंबीर राहिले आणि माझ्या कामाशी प्रामाणिक राहिले आणि बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. मला वाटतं सगळ्यांना ते जमायला हवं.
या बरोबरच तुम्ही तुमच्या स्त्रीत्वाचा फायदा घेणे चुकीचे आहे हे मला स्त्रीयांना सांगायचं आहे. तुम्ही स्पष्टवक्त्या असायला हवं. काही लोकांना हा आपला गर्विष्ठपणा वाटू शकतो पण खरंतर हे सुरक्षा कवच आहे जे आपण आपल्या भोवती तयार करून घेत असतो.
आपली भारतीय संस्कृती सांगते की स्त्रीयांची पूजा केली पाहिजे, सन्मान केला पाहिजे पण एकीकडे स्त्रीयांवर होणार्या अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय समाजाची स्त्रीयांबद्दलची भूमिका ही भारतीय संस्कृतीपासून दुरावत चालली आहे असं तुम्हाला वाटतं का?
समाज हा स्त्रीला सोयीने देवी करतो आणि सोयीने दासी करतो. मला हे अजिबात पटत नाही. एकदा तुम्ही तिला देवी केलंत की तुम्ही तिला देव्हार्यात बसवता पण तिला माणूस म्हणून जगता यायला हवं. स्त्रीला देवी किंवा दासी व्हायचं नाही. तिला माणूस व्हायचं आहे. संस्कृतीच्या नावाखाली स्त्रीला विनाकारण जुलमाच्या जोखडात अडकवू नका. उदाहरण म्हणून घेऊ की कोणत्याही जातिधर्मातील कोणताही छोटा-मोठा सण असो, सगळं काम स्त्रीवरच पडतं. तिला जमत नसेल तरीही जबाबदारीच्या ओझ्यामुळे ती ते काम करतच राहते. संस्कृती टिकवणे ही कुटुंबातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, कोणा एकाची नाही.
मी अनेक देशांमध्ये फिरले, अनेक लोकांना भेटले पण सगळीकडे हीच गोष्ट आहे. सगळा विषय बाईपणाजवळ येऊन थांबतो तेव्हा खूप वाईट वाटतं. बाईला माणूस म्हणून समजून घेण्यासाठी मी अनेक स्त्रीवादी विचारवंतांची, महान व्यक्तिमत्त्वांविषयीची पुस्तके वाचली आहेत. त्यांची मते जाणून घेतली आहेत. कोणीही असं म्हणत नाही की स्त्रीला देवत्व द्या, संस्कृतीच्या नावाखाली तिला जखडून ठेवा. या विषयी वाचताना, स्त्रीला माणूस म्हणून बघण्याच्या प्रक्रियेत बंडखोर स्त्रीवादी लेखिकांनी मला जास्त आकर्षित केलं.
प्रत्येक स्त्रीने खंबीर भूमिका घ्यायला हवी. सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन संस्कृती जपावी, परंपरा टिकवावी.
स्त्रीयांवर होणार्या अत्याचारांमागे, बलात्कारांमागे स्त्रीयांना दुय्यम समजण्याची भूमिका कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं का?
जगभरात सगळीकडे हीच परिस्थिती आहे. सगळीकडे स्त्रीयांवर अत्याचार होत आहेत, स्त्रीयांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यातून जर देश गरीब असेल, शिक्षणाचं प्रमाण कमी असेल, लोकसंख्या जास्त असेल तर याचं प्रमाण जास्त असतं. आणि हे अन्याय अत्याचार आज होतात असं नाही. हे फार पूर्वीपासून सुरु आहे. पण पूर्वी या गोष्टी दबून राहायच्या कारण त्यावेळी जागरुकता नव्हती, माध्यमे नव्हती. त्यामुळे तेव्हा दखल घेतली जात नव्हती. पण आता एखादी गोष्ट जास्त काल लपून राहू शकत नाही. ती लवकर बाहेर येते. त्यामुळे मी या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघते. अत्याचाराला वाचा फुटते आहे, अन्याय समोर येत आहे. त्यामुळे मी या काळात जन्माला आले याचा मला अभिमान आहे. आता या अन्याय अत्याचारांची दखल घेणे शासनाला घेणे, समाजाला घेणे भाग आहे. त्यामुळे अत्याचार समोर येत आहेत. सामाजिक स्तरावर, देशस्तरावर प्रगती होत आहे. लोकांचे राहणीमान, विचार यांच्यावर प्रभाव पडत आहे. त्यात सुधारणा होत आहे. त्यामुळे अन्याय लपून राहत नाही. अन्याय- अत्याचाराला वाचा फुटणे ही चांगली गोष्ट आहे. मुलींमध्ये हिंमत येत आहे. शिक्षण, विचार यांचा प्रभाव पडत आहे. आजकालच्या मुली अन्याय सहन करत नाहीत.
स्त्रीयांबद्दलची भूमिका बदलणे हा स्त्रीयांवरचे अत्याचार, बलात्कार रोखण्यासाठीचा उपाय आहे असं तुम्हाला वाटतं का?
ही समाजव्यवस्थेमध्ये हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. पूर्वीच्या तुलनेत या प्रक्रियेत आज बरीच सुधारणा आहे आणि कालौघात ती होत राहील. कारण, आजकाल घरोघरी मुलींच्या शिक्षणावर भर दिला जात आहे. सरकारही या बाबतीत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे, योजना राबवत आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी माध्यमं, सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. पण कौटुंबिक स्तरावर मुलींचा व्यापक दृष्टीकोन घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना विचारांनी सक्षम केले पाहिजे. व्यक्तिगत स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत. मोठ्या प्रमाणावर मुलींनी, मुलांनी वाचन केलं पाहिजे. आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी बौद्धिक, भावनिक, वैचारिक विकास करत राहायला हवं.