जयंत नाईक
मनीषा आपल्या खास मैत्रिणीच्या घरून निघाली तेव्हा चेहऱ्यावर हसू घेऊनच. खरंच सगळ्या पुरुषांना बायका म्हणजे अबला, त्यांची काळजी घ्यायची जबाबदारी आपलीच आहे असे का वाटते? आज तिची मैत्रीण उज्वला हिचा विवाह ठरला म्हणून उज्वलाने तिच्या घरी पार्टी ठेवली होती. मोजकेच लोक होते पण बहुतेक सगळे मनीषाला ओळखत होते .हा प्रकाश का असेच काही तरी नाव असलेला तरुण तिथे कोणीतरी नवीनच होता. मनीषाला तो ओळखत नव्हता. मान्य आहे की आज मनीषा खूप सुंदर दिसत होती. पावसाळ्याचे दिवस म्हणून तिने आज डार्क हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्यावर पिवळ्या आणि गुलाबी रंगाची सुरेख नक्षीकाम केलेली बॉर्डर होती. तशी ती जरा थोराड होती पण अगदी बांधेसूद, सावळा रंग, खांद्यापर्यंत व्यवस्थित बॉब केलेले केस. आज मोकळे सोडलेले, नाही तर नेहमी तिचा पोनीटेल असे. ती जेव्हा घरी जायला निघाली तेव्हा अजून बरेच लोक रेंगाळत होते. घरी आई वाट बघत असेल हे माहित असल्याने मनीषाने सर्वांचा निरोप घेतला. उज्वलाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन ती निघाली . आपली खूप मोठी अशी पर्स तिने खांद्याला लावली. एक छोटेखानी धोपटी होती ती खरे म्हणजे. तेवढ्यात प्रकाश म्हणाला,
" मनीषा, मी तुम्हाला सोडायला येऊ का ? खूप रात्र झाली आहे. रागावू नका पण तुम्ही एकट्या आहात म्हणून म्हणतोय !"
असे तो म्हणाला आणि बाकी सगळ्या मनीषाच्या मैत्रिणी फिसकन हसल्या. प्रकाश एकदम गोरामोरा झाला. आपले काय चुकले हेच त्याला कळले नाही .
" अहो, आत्ता कुठे अकरा वाजतायत ….अजून खूप वर्दळ आहे. दहा मिनिटावर तर आहे माझे घर आणि माझी मोटार सायकल आहे की ...तुम्हाला उगीच त्रास कशाला?", मनीषा म्हणाली आणि तिला असेही वाटले की कदाचित या निमित्ताने याला आपले घर बघून ठेवायचे तर नसेल? बाकी मुलगा चांगला वाटतो आहे.
" म्हणजे तुम्ही मोटार सायकल चालवता ?" प्रकाश म्हणाला. परत सगळेजण हसायला लागले. प्रकाशला कळेना ही सगळी मघापासून का हसत आहेत? आपल्याला ही मुलगी आवडली आहे हे रहस्य यांना कळले की काय ?
" का ? आजकाल किती तरी मुली विमाने चालवतात मग मी काय मोटार सायकल चालवू नये ?" मनीषा रागाने म्हणाली. प्रकाश एकदम खजील झाला.
" मला माफ करा ,मला आश्चर्य वाटले एवढेच .."
" असू दे ...तसे बऱ्याच जणांना वाटते. पण तुमच्या ऑफरबद्दल आभार. मी जाते एकटी. धन्यवाद ." मनीषा म्हणाली. मनीषा बाहेर आली तर थोडासा पाऊस पडत होता. तिने मग मोटार सायकलच्या मागच्या बाजूला लावलेल्या पत्र्याच्या पेटीतून रेनकोट काढून घातला. आपली पर्स त्या पेटीत ठेवली आणि ती घराकडे निघाली. दहा मिनिटांचा रस्ता. आत्ता रहदारी पण फार नसते. बहुतेक सर्व रस्ता0 वर्दळीचा. शेवटचा एक दोन मिनिटांचा जरा सुनसान रस्ता. आत्ता घरी जाऊ. असे काहीसे विचार तिच्या मनात होते.
ती काही चार पाच मिनिटांचे अंतर गेली असेल नसेल तोच तिच्या मोटार सायकल मधून कसला तरी विचित्र आवाज झाला आणि एकदम आचके दिल्यासारखे करत ती बंदच पडली. आता काय झाले हिला? आत्तापर्यंत तर बरी होती की? एका महिन्यापूर्वीच सर्विसिंग केले होते की ! असा विचार करत मनीषा खाली उतरली. गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. स्टॅंडवर लावली. पेट्रोल संपले नाही ना हे बघितले. भरपूर पेट्रोल होते. मग तिने इतर बारीकसारीक तपसण्या केल्या. गाडी परत सुरु करून पाहिली. ती काही सुरु होईना. आता पाऊसही थांबला होता. तिने मग रेनकोटची सगळी बटणे काढली. डोक्यावरची टोपीही काढली आणि परत आपले प्रयत्न सुरु केले. पाच दहा मिनिटांनी बर्याच वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून गाडी तर सुरु झालीच नाही पण ती घामाघूम तेवढी झाली. शेवटी गाडीचा नाद सोडून तिने घरी चालत जायचा निर्णय घेतला. जवळ तर आलोय आपण. तिने मोटार सायकल व्यवस्थित लॉक केली, आपली पर्स घेतली आणि घराच्या दिशेने भर भर चालायला सुरुवात केली. मुख्य रस्ता तिने हा हा म्हणता संपवला. आता हा आतला रस्ता, मग आपल्या सोसायटीचे गेट. चालत फार तर फार दहा मिनिटे.
ती आतल्या रस्त्यावर आली. इथे जरा काळोखच होता. अंधाराची भिती, मनुष्याच्या आदिमपणापासून असलेली, मनीषाच्या नकळत तिच्या मनात अवतरली. अंधार आणि सुनसान रस्ता. कडेच्या झाडांच्या सावल्या वेगवेगळ्या आकृत्या दाखवत तिच्या अंगावर चालून आल्या. लहानपणापासून तिला माणसांची कधीच भिती वाटली नाही पण भुताखेताची खूप वाटायची. पण इथे आत्ता आपल्या घराच्या इतक्या जवळ कशाला येतील ती भुते ? मनीषाने आपलीच समजूत घातली. तिने मग रेनकोट काढून आपल्या हातातच घेतला, पर्स खांद्यालाच लटकवली. भरभर चालता येईल, गरमही कमी होईल. तेवढ्यात एक कार तिच्यामागून आली आणि तिच्या पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबली. गाडीचे दिवे बंद झाले. मनीषाने बघितले की गाडीत तीन तरुण होते .ते एकामागोमाग खाली उतरले. पण त्यांनी गाडीची दारे बंद केली नाहीत. मनीषाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली . तरीही थोडी सावध होत ती पुढे गेली. गाडीसमोरून पुढे गेली. त्या माणसांनी काही हालचाल केली नाही. ते फक्त एकटक तिच्याकडे बघत होते. पुरुषांनी एकटक पाहणे मनीषाला नवीन नव्हते. ती पुढे निघाली. आता जास्त सावधपणे ती थोडी पुढे गेली आणि तिने मागे वळून पाहिले तर त्यातील दोन जण आता रस्त्याच्या मध्ये येऊन थांबले होते. ती तशीच थोडी पुढे आली. तेवढ्यात त्या तिघातील एक जोरात पळत आला आणि त्याने मनीषाला मागून कंबरेत मिठी मारून पकडले. अगदी घट्ट. एक हात त्याने मनीषाच्या तोंडावर दाबून धरला. मनीषाला घातलेली मिठी एका हाताची होती पण ती सुध्दा मजबूत होती. आता ते दुसरे दोघेही मागून आले. मनीषाच्या लक्षात आले की हे आता आपल्याला त्या गाडीत घालून पळवून नेणार. आपण एकटी यायचा निर्णय घेऊन चूक केली काय असे तिला वाटायला लागले होते, पण क्षणभरच. त्या गुंडाने पकडले तेव्हा तिचा रेनकोट तिच्या हातातून खाली पडला होता. पर्ससुध्दा तिच्या पायापाशी पडली होती. तिकडे लक्ष न देता मनीषा एकदम पुढे झुकली....त्या तरुणासकट! त्या तरुणाच्या आपल्या पोटावरच्या हाताची दोन बोटे पकडून तिने सर्व शक्ती लावून ती मागे वळवली. तो तरुण वेदनेने किंचाळला. त्याच्या हातांची पकड सुटली. तेवढ्या संधीचा फायदा घेत मनीषाने आपल्या कोपराने त्या तरुणाच्या मानेच्या बाजूला एक दणका ठेवून दिला. तो मागे सरकला. आपले दोन्ही हात त्याने आपल्या मानेकडे नेले. तेवढा वेळ मनीषाला पुरेसा होता. ती थोडी मागे गेली आणि पळत पुढे येऊन एक उडी मारून त्याच्या छातीवर एक जोरकस लत्ताप्रहार केला. तो एकदम खाली पडला. तिच्या कराटे गुरूंचे वाक्य तिला आठवले, "डोके शांत ठेव आणि समोरच्याची मर्मस्थाने शोध !"
ती पटकन फिरली मागच्या दोघांकडे. ते दोघे एकदम आश्चर्यचकित झाले होते. तो खाली पडलेला बहुदा त्यांचा नेता असावा. त्यातला एक तरुण म्हणाला, "अरे ये कराटे जानती है! चलो भाग चलो .." आणि तो त्यांच्या गाडीच्या दिशेने मागे सरकला. दुसरा मात्र जरा धाडशी असावा किंवा आपल्या नेत्याला जरा मदत करावी म्हणून तो पुढे आला. मनीषाने पटकन खाली पडलेल्या तरुणाकडे वळून पाहिले. तो अजून सावध होत होता. त्याला उठायला अजून दहा बारा सेकंद लागणार होते. आपल्याकडे येण्याऱ्या तरुणाकडे पाहून मनीषाने अंतराचा अंदाज घेतला. वेग आणि शक्ती याचे गणित जुळवले आणि त्याच्याकडे धावत जात त्याच्या दोन पायांमध्ये सणसणीत लाथ हाणली. आज तरी तिने पावसाळी बूट घातले होते. थोडा आघात कमी झाला होता. पण पुरूषांचा सगळ्यात कमकुवत अवयव आणि नेमकेपणाने घातलेली लाथ. तो तरुण आपल्या दोन्ही मांड्यात दोन्ही हात घालत विव्हळत खाली पडला. आता एकच राहिला, नेता.
मनीषाने पाहिलं की तो तिच्या अंदाजापेक्षा तो लवकर उठला होता आणि त्याच्या हातात चाकू आला होता. ती पूर्ण वळायच्या आत तो तिच्या अंगावर धावून आला. मनिषाचे दोन्ही हात वार अडवण्यासाठी वर गेले होते. तो तरुण आता जरा सावध झाला होता. लहानपणापासून मारामारीत तयार झाले असल्यामुळे किंवा मनीषाला वळायला थोडा उशीर झाला असल्यामुळे असेल पण त्याला थोडा जास्त वेळ मिळाला. त्याचा चाकू मनीषाच्या डाव्या दंडावरून सरकन फिरला. तीव्र वेदनेने मनीषा किंचाळली. तिने पाहिले की तिच्या कमीजच्या हाताला मोठी चीर पडली होती. रक्तप्रवाह सुरु झाला होता. त्या आघाताने ती खाली पडली होती. तो चाकूवाला तरुण चाकू पुन्हा उगारत पुढे आला आणि गुर्मीत म्हणाला, " जागची हललीस तर सगळे कराटे बाहेर काढीन. माझी बोटे वाकवतीस काय? आता मी तुलाच वाकवतो. तुला खरे तर आत्ताच संपवायला पाहिजे, पर तू तो एकदम तिखा माल है ! तुला आता पळवतो, दोन तीन रात्र मजा करतो, मग संपवतो. मग त्याने त्या तिसऱ्या तरुणाला हाक मारली," ए हरामखोर, ये आता मदत करायला, साला पळून जातो !"
तो तिसरा तरुण आपल्या नेत्याच्या हातातील चाकू आणि खाली पडलेली बाई बघून लगबगीने पुढे आला. मनीषाच्या लाथेचा प्रसाद खाल्लेला दुसरा तरुणसुध्दा आता हळूहळू उठू लागला होता.
मनीषाने विचार केला. धोका आणि लाभ, फायदा काय आणि तोटा काय? आपल्या दंडातून होणाऱ्या रक्तपाताकडे पाहिलं, आपल्या कमी होत चाललेल्या शक्तीचा अंदाज घेतला आणि तिने पटकन निर्णय घेतला, शेवटचा उपाय! पूर्वीच्या स्त्रिया करतात तसा जोहार तिला कधीच मान्य नव्हता. शत्रूला मारा. आपलेच बलिदान का करता ? पण ते अशक्य असेल तर ? तिने आपल्या शेजारीच पडलेल्या पर्समध्ये हात घातला आणि आपले पिस्तुल बाहेर काढले. सुरक्षा चाप काढला आणि त्या चाकूधारी तरुणावर ते पिस्तुल आपण खाली पडलेल्या अवस्थेतच रोखले. आज आपल्याला रात्री एकटीला उशिरा यायला लागणार म्हणून घेतलेली खबरदारी योग्य होती तर ! असे मनीषाला वाटून गेले.
तो गुंडांचा नेता वेड्यासारखा त्या पिस्तुलाकडे पहातच राहिला. हातातील चाकू आपल्या हातातून केव्हा गळून पडला त्याचे त्यालाच कळले नाही.
"हात वर! ताबडतोब", मनीषा कडाडली. त्या गुंडांच्या नेत्याने त्वरेने आपले दोन्ही हात वर केले.
"सुरा पायाने मागे ढकल. हुशारी करायची ही वेळ नाही हे तुला कळले असेलच", मनीषा पुन्हा दरडावून म्हणाली. एव्हाना नेत्याचे सगळे अवसान गळाले होते. हे काही तरी वेगळे प्रकरण आहे हे त्याने ओळखले होते. त्याने आपल्या पायाने चाकू आपल्या मागे सरकवला. लाभ काही नाही, फुकटात जीव जायचा फार मोठा धोका.
"मेमसाब ...मेमसाब ..माफ करो ...गलती हो गयी… आपण बिनधास्त जा ...आपण काय बी करणार नाय !", तो आता थरथर कापायला लागला होता.
"का रे ? आता मेमसाब काय ? तुला सोडून देऊ ? मग तू उद्या आणखी कुणाला तरी पळवून न्यायला मोकळा, अजून कुणावर तरी बलात्कार करायला मोकळा. गुन्ह्याला शिक्षा ही हवीच", मनीषा असे बोलत आता उभी राहिली होती. तिने पिस्तुल रोखले आणि त्या गुंडांच्या नेत्याच्या दोन्ही गुढघ्यावर दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही गुडघ्याच्या वाट्या फोडून टाकल्या. मग ती मागे वळली आणि त्या खाली पडलेल्या दुसऱ्या गुंडावरही हाच प्रयोग केला. ते दोन्ही गुंड जोरजोरात किंचाळत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले.मग मनीषा त्या तिसऱ्या गुंडाकडे वळली. तो घाबरून जागच्या जागीच उभा होता
"समोर ये असा", मनीषा ओरडली. तो घाबरतच पुढे आला आणि म्हणाला, "मी काही केले नाही … सिर्फ उनके साथ आया... मी सिर्फ गाडी चलाता हू!….मुझे जाने दो …"
"बेशरम, एका मुलीला पळवून बलात्काराचा प्रयत्न करता आणि मी काही केले नाही म्हणतोस ? तुला पळपुटा साथीदार म्हणून कमी शिक्षा", असे म्हणत मनीषाने त्याचा फक्त उजवा गुढघा निकामी केला.
आजकाल असे गुन्हे वाढत आहेत याचे कारण धोका आणि लाभ याचे व्यस्त प्रमाण. Risk and Reward. प्रतिकार करणाऱ्या मुली विरळा, संधी भरपूर आणि समजा पकडलो गेलोच तरी किती शिक्षा होणार? खूप पैसे चारून वा भ्रष्ट पुढाऱ्यांचा वशिला लावून सुटायची शक्यताच फार, धोका अगदी कमी आणि बक्षीस मात्र एका स्त्रीचे फुकट भोगायला मिळणारे ताजे तवाने शरीर, एका स्त्रीचा माज उतरवला, अब्रू लुटली याचे असुरी समाधान असा विचार करत मनीषाने आपले पिस्तुल आपल्या पर्समध्ये ठेवून दिले. सगळीकडे पहात आपल्याला अजून काही धोका नाही ना याची खात्री केली. मग पोलीस सबइन्स्पेक्टर मनीषा घोरपडेने एक दीर्घ निश्वास सोडला. आपला मोबाईल काढून वापरला, रूग्णवाहिका आणि पोलिसांना वर्दी देण्यासाठी, मग आपल्या आईला कळवण्यासाठी.
आता मनीषाची पाळी होती, धोका आणि लाभ याचा विचार करण्याची. आपण दिलेल्या शिक्षेला कायदा मान्यता देईल स्व संरक्षण म्हणून? का आपल्यालाच शिक्षा होईल? आपण शक्तीचा अतिरिक्त वापर तर केला नाही ? पण हे तीन गुंड आपल्या एकटीवर तुटून पडले तो शक्तीचा अतिरिक्त वापर नाही ?
मनीषाला असेही वाटले की आता विचार करून काय उपयोग ? आपली अब्रू वाचवली. तीन गुंडांना धडा शिकवला. सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हेच काम आहे ना आपले ?
मनीषाने मग आपली मान ताठ केली. आपण केले ते योग्यच केले याची तिला खात्री झाली. आपल्या जवळच्या ओढणीने आपल्या दंडाची जखम तात्पुरती बांधली. रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात लांबून सायरनचा आवाज आला. "शिक्षा झाली तर झाली! आपली अब्रू वाचण्यासाठी ही छोटीशी किमत तर काहीच नाही. A small price to pay!" मनीषा मनाशीच म्हणाली. पूर्वी स्त्रिया जोहार करायला का तयार होत याचा तिला आता थोडासा अंदाज आला होता. दुसरा कुठलाही पर्याय उरला नसताना वापरायचा तो मार्ग होता. आपली अब्रू जाऊ नये म्हणून शेवटचा उपाय, अगदी अपरिहार्य झाले तरच वापरायचा. आत्ता मनीषाने वापरला तसाच पण मनीषाकडे मारायचा पर्याय होता. तो नसता तर मनीषाने काय केले असते ? मनीषा थरारून गेली. प्रत्येक स्त्रीचा शेवटचा उपाय वेगळा हेच खरे.
या रस्त्यावर एवढे सगळे रामायण झाले पण आजूबाजूच्या घरातून एकहीजण बाहेर आला नाही. परत तोच गणिती प्रश्न, दुसऱ्याचा जीव वाचवताना आपलाच जीव गेला तर? धोका किती आणि लाभ काय ?