आसावरी ऐनापुरे
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:'
जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवता वास करते आणि जिथे स्त्रियांचा सन्मान केला जात नाही तिथे सगळी केलेली चांगली कर्म निष्फळ ठरतात. किती आदर्शवादी आहे ना? पण मग मनात एक प्रश्न सलत राहतो. एकीकडे नवरात्र उत्सवातून स्त्रीशक्तीचा जागर करणारे आपण, देवी म्हणून तिला मखरात बसवण्यापलीकडे तिचा विचार करत आहोत का? याचे उत्तर खेदाने 'नाही' असेच म्हणावे लागेल. कारण आपला पुरुषप्रधान समाज. स्त्रिया कितीही शिकल्या, पुरुषांच्या बरोबरीने समाजात काम करू लागल्या तरी स्थान, सन्मान मात्र त्यांना पुरुषांच्या बरोबरीने मिळत नाही. समाजाची ही स्त्रियांविषयीची मानसिकताच मनाला खूप खटकते. घरापासूनच सुरुवात करूया. घरातली स्त्री कमावती असू दे किंवा नसू दे. पण अजूनही तिला तिच्या अस्तित्त्वासाठी संघर्ष करायला लागतोय हे वास्तव आहे आणि ते विदारक आहे. ती घरासाठी राबते. घरातल्या माणसांची काळजी घेते. घराचा ताठ कणा बनून प्रसंगी स्वतःचे मन दुखावले गेले तरी सगळा मान-अपमान विसरून नाती जपते. ती सांभाळते. एवढे सगळे करूनही घरात वर्चस्व मात्र पुरुषच गाजवतात. विचारांनी परिपक्व आपण कधी होणार आहोत की नाही? मुलांना वाढवताना मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक न देता दुजाभाव करणारे महाभाग अजूनही आपल्या समाजात आहेत. अर्थात स्त्रियाही काही अंशी या सगळ्याला कारणीभूत आहेत.
मुलाला वाढवताना, त्याच्यावर संस्कार करताना हे समानतेचे बाळकडू त्यास द्यावयास हवे. तरच मोठा झाल्यावर त्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होऊ शकेल. आपल्या भारताला फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांच्या विचारांची परंपरा आहे. पण आज ही परंपरा कुठेतरी खंडीत झाल्यासारखी वाटते. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन, ती एक भोगवस्तू असल्याची मानसिकता, ते अगदी तिचा जन्मच नको इतक्या टोकापर्यंतची विचारसरणी ही खरोखर एक लाजिरवाणी गोष्ट होऊन राहिली आहे. दिल्लीचं निर्भया प्रकरण, हैदराबादची डॉक्टर प्रियांका रेड्डी केस हे तर कळसाध्यायच म्हणायला हवेत या विकृत मनोवृत्तीचे. स्त्रीचा आत्मा आणि शरीर दोन्ही ठेचू पाहतोय हा समाज. स्त्रीवर अत्याचार होताना षंढपणे पहाणारा समाज निद्रिस्त म्हणायचा की मिजासखोर? शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाची परंपरा बाळगणार्यांचे रक्त का सळसळत नाही हा खरोखर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. स्त्री आपल्या वरचढ झालेली पुरूषांना सहन होत नाही. लहानपणापासून जोपासलेला आणि समाजानेच खतपाणी घालून वाढवलेला पुरुषी अहंकार हा सगळ्यात मोठा धोका ठरतो आहे, स्त्रियांच्या अस्तित्वासाठी, तिच्या प्रगतीसाठी.
यासाठी स्त्रियांनी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खंबीर असणे आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असणे ही काळाची गरज बनते आहे. समाजाची मानसिकता, स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रत्येक घराघरात ही विचारांची ज्योत पेटणे आवश्यक आहे. घरातली सावित्री सुरक्षित, आत्मनिर्भर झाली तर समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीकडे नेणारे ते पहिले पाऊल असेल. त्यासाठी घराघरात असे ज्योतिबा निर्माण व्हावेत आणि तिला नुसते 'देवी' म्हणून न पूजता किमान तिचा माणुसकीचा मूलभूत हक्क अधोरेखित व्हावा असे वाटते. गुन्हेगार मोकाट सुटू नयेत यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. तळागाळातल्या लोकांपर्यंत शिक्षण झिरपले पाहिजे. हे सारे स्वप्नवत् आहे. पण असे झाले तर याहून दुसरा 'सोनियाचा दिस' नसेल. कारण शेवटी ' ती' आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत हे विसरून कसे चालेल?
' या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रुपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः'.