चार महिन्यांची मुलगी बरोबर घेऊन रमा एकटी सुरगावला आली. त्या वेळेस रात्र होती. तिने कुलूप उघडले. वरती पाळणा होता.
त्यात मुलीला तिने निजविले. नंतर तिने दिवा लावला आणि देवघरात गेली. म्हणाली, ‘आई जगदंबे! मुलीला क्षमा कर. माझी पापे तूच पचवू शकशील. कृष्णनाथ! आई , तो असेल तेथे सुखी ठेव. या मुलीला पदरात घे. शेवटी तूच एक आधार! तूच सांभाळ करणारी!’

एके दिवशी रात्री दारावर कोणीतरी थाप मारली.

‘कोण आहे?’

‘रघुनाथ!

ती लगबगीने खाली आली. तिने दार उघडले. रघुनाथ आत आला. कोणाच्याही तोंडून शब्द फुटेना. दोघे वर आली. तो पाळण्यात मुलगी उठली. रमाने काढून आणली. रघुनाथने जवळ घेतली.

‘तू आता नको हो सोडून जाऊ. तू माझी नवीन आशा!’  तो म्हणाला.

‘मी तिचे नाव आशाच ठेवले आहे. अंधारातील आशा!’

‘रमा, मी चांगला होऊन घरी आलो आहे.’

‘परंतु आपण गरीब आहोत आता!’

‘हृदयाची श्रीमंती आता आली आहे!’

‘ती दोन प्रहरी पुरी पडत नाही. उद्या खायचे काय? आणखी मुले झाली नि जगली तर त्यांना काय?’

‘आशेने राहू, सारे कष्ट सहन करु. कोटयावधी कामगार राहतात तशी आपण राहू.’

‘तुझ्याच्याने का काम होईल?’

‘वेळ आली म्हणजे सारे करता येते. आता निराश नको होऊ. आपण आशेने जगू. ही बघा. आशा हसते आहे. आशा, तू हस व आम्हांलाही हसव!’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel