गोष्ट - सहावी

'युक्ती अशी प्रभावी, की तिच्यापुढे शक्ती मस्तक वाकवी.'

एका वनातील वटवृक्षावर कावळ्याचे एक जोडपे घरटे बांधून राहात होते. त्याच वृक्षाच्या ढोलीत राहणारा एक भलामोठा व काळाकुट्ट सर्प त्या जोडप्यातील मादीने घरट्यात घातलेली अंडी - ते जोडपे भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर गेले असता - खाऊन फस्त करी. एकदा त्या महासर्पाने त्यांच्या घरट्यात शिरून, अशीच त्यांची अंडी स्वाहा केली असता, दुःखी झालेले ते जोडपे आपला हितचिंतक असलेल्या एका चतुर कोल्ह्याकडे गेले व घडलेला प्रकार त्याला सांगून म्हणाले, 'कोल्हेदादा, त्या वडाच्या झाडावर आम्ही घरटे बांधण्यात चूक केली हे सुरुवातीलाच कबूल करतो-'

'तुम्ही कसली चूक केली ?' असे त्या कोल्ह्याने मोठ्या उत्कंठेने विचारले असता कावळा म्हणाला, 'म्हटलंच आहे ना ? -

यस्य क्षेत्रं नदीतीरे भार्या च परसङ्गता ।

ससर्पे च गृहे वासः कथं स्यात् तस्य निर्वृतिः ।

(ज्याचे शेत नदीतीरी असते, ज्याची बायको दुसर्‍याच्या नादी लागलेली असते व ज्याचे वास्तव्य सर्प राहात असलेल्या घरात असते, त्याला निश्चिंतपणा कसा लाभावा?)

'तेव्हा कोल्हेदादा, ज्याच्या ढोलीत सर्पाचे वास्तव्य आहे अशा त्या वडावर घरटे बांधण्यात आमची चूक झाली खरी, पण आता दुसर्‍या दूरच्या झाडावर नव्याने घरटं बांधायचं आणि तिथेही दुसरा एखादा साप आला की, पुन्हा तिसरीकडे बिर्‍हाड हलवायचं, ही काय साधी गोष्ट आहे? तेव्हा एकतर या कायमच्या बोकांडी बसलेल्या संकटातून सुटण्याचा आम्हाला उपाय सांग, किंवा आमच्यासारख्या दुर्बळांचा जन्म असली संकटे निमूटपणे भोगण्यासाठीच असतो, असे तरी स्पष्टपणे सांग.'

कोल्हा म्हणाला, 'कावळेमामा व कावळूमामी, तुम्ही बिलकूल निराश होऊ नका. या जगात जो युक्ती योजतो, तो शरीराने जरी दुर्बळ असला तरी प्रबळ ठरतो, तर युक्ती योजू न शकणारा जरी शारीरिक सामर्थ्याच्या दृष्टीने कितीही प्रबळ असला, तरीही तो दुर्बळ ठरतो. म्हटलंच आहे ना ?

उपायेन जयो यादृग् रिपोतादृग न हेतिभिः ।

उपायज्ञोऽल्पकायोऽपि न शूरैः परिभूयते ॥

(युक्तीने जसा शत्रूवर विजय मिळविता येतो, तसा तो शस्त्रांनीही मिळवता येत नाही. युक्तिबाज हा सामर्थ्याच्या दृष्टीने जरी किरकोळ असला, तरी तो पराक्रमी लोकांकडूनही पराभूत होत नाही.)

'कावळेमामा व कावळूमामी, लहानसानच नव्हे, तर मध्यम व मोठ्या आकाराच्या माशांनाही कपटाने खाणार्‍या एका बगळ्याचा, एका किरकोळ खेकड्याने कसा जीव घेतला ते तुम्हाला ठाऊक आहे ना?'

'ती गोष्ट मला ठाऊक नाही,' असे कावळा म्हणताच कोल्हा म्हणाला, 'कावळूमामी, तुम्ही पण ऐका-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel