गोष्ट बत्तिसावी

क्षुद्राचे शस्त्र जे न करी, ते थोराचे नुसते नाव करी.

एकदा हंस, पोपट, बगळे, कोकीळ, चातक आदि पक्षी मोठ्या चिंताग्रस्त मनःस्थितीत एकत्र जमले व एकमेकांना म्हणू लागले, 'गरुड, हा जरी आम्हा पक्ष्यांचा राजा असला, तरी तो सदान्‌कदा भगवान् विष्णूंच्या सेवेत गुंतून गेला असल्याने, त्याचे आम्हा प्रजाजनांकडे लक्ष नसते. अशा स्थितीत जर का आपल्यावर कधी एखाद्या पारध्याच्या जाळ्यात अडकण्याचा प्रसंग ओढवला, तर आपल्याला फुकट प्राणांना मुकावे नाही का लागणार ? राजा हा कसा प्रजेचे रक्षण व तिचे नेतृत्व करणारा हवा. राजा असा नसेल, तर त्याच्या प्रजेची स्थिती कर्णधार - म्हणजे सुकाणूधारक - नसलेल्या व समुद्रावरील वादळात सापडलेल्या नौकेसारखी होते. योग्य तर्‍हेने शिकवू न शकणारा शिक्षक किंवा पतीशी प्रेमळपणे बोलू न शकणारी स्त्री ही जशी निरुपयोगी, त्याचप्रमाणे प्रजेचे रक्षण करू न शकणारा राजासुद्धा कुचकामी होय. तेव्हा अशा त्या गरुडाला राजपदी ठेवण्याऐवजी ज्याचे आपल्यावर सदैव लक्ष राहील, अशा दुसर्‍या एखाद्या पक्ष्याला आपण आपला राजा बनविणे योग्य नाही का?' त्या पक्ष्यांच्या विचारांनी असे वळण घेतले आणि नेमके त्याच वेळी त्यांचे लक्ष जवळच्याच एका अंधार्‍या कोपर्‍यात बसलेल्या 'भद्रकार' नावाच्या एका गुबगुबीत घुबडाकडे गेले. मग त्यांनी त्यालाच आपला राजा करण्याचे ठरविले.

त्याप्रमाणे राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. सुतारपक्ष्याने एक लाकडी सिंहासन बनविले. पोपटाने त्यावर सप्तद्वीप, पृथ्वी व सागर यांची शुभचित्रे रेखाटली, मग कुणी त्या सिंहासनावर वाघाचे कातडे पसरले, तर कुणी त्या कातड्यावर निरनिराळ्या तीर्थांतील पवित्र पाण्याने भरलेला कलश ठेवला. भारद्वाज पक्ष्याने एकशेआठ वनस्पतींची फुले आणली, तर घुबडाला राजपदाचा अभिषेक करीत असतानाच त्याच्या घुबडिणीला पट्टराणीपदाचा अभिषेक करता यावा, यासाठी तिला सन्मानाने आणण्याकरिता कोकिळा, मैना आदि 'बाईमाणसे' रवाना करण्यात आली.

तेवढ्यात त्या ठिकाणी आलेल्या एका कावळ्याने त्या पक्ष्यांना 'हा कसला समारंभ चालला आहे ?' अशी पृच्छा केली. तेव्हा ते पक्षी आपपासांत म्हणाले, 'कावळेकाका कसे अगदी वेळेवर आले. आपण घेतलेला निर्णय त्यांना कळवावा व मगच तो अंमलात आणावा. कारण विचार व चातुर्य ज्यांच्या ठिकाणी असते, अशांच्या सल्ल्याने हाती घेतलेल्या कार्यांत कधी अपयश येत नसते. आणि जगातल्या हाताच्या बोटांवर मोजता येणार्‍या धूर्त प्राण्यांत सुभाषितकारांनी कावळ्याचीही गणना केली आहे. ते म्हणतात -

नराणां नापितो धूर्तः पक्षिणां चैव वायसः ।

दंष्ट्रिणाञ्च शृगालस्तु श्वेतभिक्षुस्तपस्विनाम् ॥

(माणसांत न्हावी, पक्ष्यांमधे कावळा, हिंस्त्र पशूंत कोल्हा आणि संशयात श्वेतांबरधारी भिक्षू हे धूर्त असतात.)

याप्रमाणे बोलणे झाल्यावर त्या पक्ष्यांनी आपण घुबडाला आपला राजा का बनवीत आहोत याचे त्या कावळ्यापाशी स्पष्टीकरण केले व त्याचे त्या बाबतीतले मत विचारले. तेव्हा तो कावळा मिस्किलपणे हसून म्हणाला, 'काय म्हणावे या तुमच्या निर्णयाला ? एक राजा जिवंत असताना कधी दुसर्‍याला राज्याभिषेक करता येतो का ? त्यातून राज्याभिषेक कुणाला तर ज्याला सूर्य उगवताच चांगलेसे दिसेनासे होते व ज्याची चर्या राग आलेला नसतानाही त्याच्या भेसूर गोलाकार डोळ्यांमुळे रागावल्यासारखी दिसते त्या घुबडाला ? वास्तविक राजाचे दर्शन प्रजेला आनंददायी वाटायला हवे. त्या घुबडाच्या दर्शनाने कुणाला तरी आनंद होईल का ? माझ्या पक्षीबांधवहो, तुम्ही म्हणाल की, राजा म्हणून गरुडाचा काहीएक उपयोग नाही. पण मी विचारतो जे घुबड सूर्यप्रकाशात चुकूनही कधी बाहेर पडत नाही, ते दिवसा आपल्यावर संकट ओढवले असता आपल्या मदतीला धावून येईल का ? त्यापेक्षा तो शक्तिशाली गरुड कितीतरी बरा, कारण त्याचं जरी नुसत नाव घेतलं तरी शत्रू आपल्या वाटेला जायला घाबरेल आणि आपल्याला आपोआप सुरक्षितता लाभेल. म्हटलंच आहे -

गुरुणां नाममात्रेऽपि गृहिते स्वामिसम्भवे ।

दुष्टानां पुरतः क्षेमं तत्क्षणादेव जायते ॥

(दुष्टांसमोर थोरामोठ्यांचे नुसते नाव घेतले किंवा ते आपले स्वामी असल्याचे जरी नुसते त्यांना कळले तरी त्याच क्षणी आपल्याला सुरक्षितता प्राप्त होते.)

तो कावळा त्या पक्ष्यांना पुढे म्हणाला, 'प्रत्यक्ष चंद्र हा आपला राजा असल्याचे सशांनी सांगताच, त्यांचे त्या उन्मत्त हत्तींपासून संरक्षण झाले, ती गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे ना?'

'कावळेकाका, ती गोष्ट आम्हाला ठाऊक नाही.' असे त्या पक्ष्यांनी सांगताच तो कावळा म्हणाला, 'तर मग ऐका -

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel