काकोलूकीय

वनातल्या त्या आश्रमातील शांतदांत व मंगल वातावरणात एका वटवृक्षाच्या पारावर बसलेल्या त्या तीन राजकुमारांनी गुरू येताच त्यांना वंदन केले व ते म्हणाले, 'गुरुदेव, पंचतंत्राच्या पहिल्या दोन प्रकरणांतील गोष्टी ऐकून जगाच्या बाह्यांगाप्रमाणेच त्याच्या अंतरंगाचेही आम्हांला बरेच ज्ञान झाले. आता आजपासून आपण आम्हाला कोणत्या गोष्टी सांगणार आहात?'

यावर विष्णुशर्मा म्हणाला, 'बाळांनो, आजपासून मी पंचतंत्राच्या तिसर्‍या तंत्राला सुरुवात करणार आहे. काक म्हणजे कावळा आणु उलुक म्हणजे घुबड हे तुम्हाला ठाऊक आहे ना ? मग कावळा व घुबड यांच्याबद्दलची मुख्य गोष्ट या तंत्रात म्हणजे प्रकरणात आली असल्याने या तंत्राला काकोलूकीय असे नाव देण्यात आले आहे.' एके काळचा शत्रु जरी नंतर मित्र बनला, तरी त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकू नये,' हे तत्त्व प्रामुख्याने या प्रकरणात सांगितले आहे. नाहीतर त्या कावळ्यांकडून त्या घुबडांचा जसा नाश झाला तसा प्रसंग ओढवतो.'

'तो कसा काय?' असा प्रश्न त्या राजकुमारांनी केला असता, विष्णुशर्मा म्हणाला, 'ऐका-

गोष्ट एकतिसावी

शत्रूशी मैत्रीचे नाटक करावे, पण संधी मिळताच त्याला मारावे.

महिलारोप्य नगरीच्या सीमेवरील एका विशाल वटवृक्षावर कावळ्यांचा राजा मेघवर्ण, हा आपल्या अनेक अनुयायांसह राहात होता. त्याच वटवृक्षापासून बर्‍याच अंतरावरील एका पर्वताच्या गुहेत 'अरिमर्दन' नावाचा एक घुबडांचा राजा त्याच्या अनेक प्रजाजनांसह वास्तव्य करीत होता. तो अरिमर्दन मधूनच रात्रीच्या वेळी आपल्या लढवय्या अनुयायांसह त्या वटवृक्षावरील कावळ्यांवर हल्ला करी आणि त्या कावळ्यांपैकी काहींचे प्राण घेई व त्यांना खाऊन फस्त करी. 'जशास तसे' या न्यायाने न वागता, आपण जर दुष्ट शत्रूशी चांगलेपणाने वागलो, तर त्याच ह्रदयपरिवर्तन होऊन तो आपला मित्र होईल, या विचाराने मेघवर्णाने शत्रूकडे काही दिवस दुर्लक्ष केले. पण त्यामुळे शत्रूच्या मनोवृत्तीत बदल न होता तो अधिक उन्मत्त बनला व दिवसेंदिवस त्या कावळ्यांवर अधिकाधिक हल्ले करून त्यांचे प्राण घेऊ लागला. म्हटलंच आहे -

जातमात्रं न यः शत्रुः व्याधिं च प्रशमं नयेत् ।

अतिपुष्टाङ्गयुक्तोऽपि स पश्चात् तेन हन्यते ॥

(शत्रु व रोग हे निर्माण होताच जो त्यांचा नाश करीत नाही, तो जरी अतिशय बलवान् असला तरी नंतर त्यांच्याकडून म्हणजे शत्रू वा रोग यांच्याकडून मारला जातो.)

अखेर एके दिवशी आपल्या मंत्र्यांना बोलावून राजा मेघवर्ण त्यांना म्हणाला, 'शत्रूवर दया दाखविल्याने किंवा त्याच्याशी चांगले वागल्याने त्याचे मतपरिवर्तन होऊन तो आपल्याशी चांगला वागतो, हा माझा विचार आत्मघातकी ठरला. तेव्हा आता आपल्याला शत्रूला तोंड देण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. पण घुबडांना रात्री चांगले दिसत असल्याने त्यांचा राजा अरिमर्दन हा आपल्यावर रात्री हल्ले करतो आणि आपल्याला रात्री दिसत नसल्याने प्रत्येक वेळी आपण त्याच्याकडून मार खातो. अर्थात् दिवसा आपल्याला दिसत असल्याने, पण घुबडांना दिसेनासे होत असल्याने, आपण त्यांच्यावर दिवसा हल्ला केला असता, परंतु त्या अरिमर्दनाचं राहण्याचं ठिकाण कुठे आहे याची आपल्याला माहिती नाही. अशा स्थितीत साम, दंड व भेद यांपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब करून आपण शत्रूपासून आपले रक्षण करावे, याबद्दल योग्य तो सल्ला तुम्ही मला द्या. वास्तविक विचारलं नसतानाही मंत्र्यांनी त्याला महत्त्वाच्या बाबतीत त्याच्या व राज्याच्या हिताचा सल्ला द्यावा. मग प्रत्यक्षात राजानं विचारलं असता त्याला निर्भयपणे सल्ला न देऊन कसे चालेल ? म्हटलंच आहे -

यः पृष्टो न ऋतं ब्रूते परिणामे सुखावहम् ।

सुमंत्री च प्रियवक्ता च केवलं स रिपुः स्मृतः ॥

(जो [ राजाने ] विचारले असताही, परिणामी सुखावह ठरणारे सत्य बोलत नाही, तो मंत्री म्हणून इतर दृष्टींनी जरी लायक असला व जरी गोड बोलणारा असला, तरी तो [ राजाचा ] शत्रू समजावा. )

राजा मेघवर्ण याप्रमाणे बोलताच त्याच्या उज्जीवी, संजीवी, अनुजीवी, प्रजीवी व चिरंजीवी या पाच मंत्र्यांपैकी उज्जीवी म्हणाला, 'महाराज, शत्रू बलवान असता, त्याला वेळप्रसंगी मित्रराजांची मदत मिळण्याची शक्यता असता, किंवा त्याच्याशी युद्ध करून आपल्याला विजय मिळेलच मिळेल अशी शाश्वती नसता, विनाकारण युद्धात पडून आत्मनाश करून घेऊ नये. अखेर युद्ध हे तरी कशाकरिता करायचे ? भूमी, संपत्ती किंवा नवे उपयुक्त मित्र मिळविण्याची खात्री नाही, ते युद्ध करण्याऐवजी शत्रूशी तह करणेच योग्य नव्हे का ? याचा अर्थ आपण शत्रूपुढे सपशेल शरणागती पत्करावी असा नव्हे, तर एक सोयीचा डाव म्हणून सध्या शत्रूशी तह करावा आणि आपले सामर्थ्य वाढवून संधी मिळताच त्याचा काटा काढावा. म्हणून तर प्रत्यक्ष बृहस्पतीसुद्धा म्हणतो -

कौर्मं सङ्कोचमास्थाय प्रहारानपि मर्षयेत् ।

काले काले च मतिमान् उत्तिष्ठेत् कृष्णसर्पवत् ॥

(बुद्धिमान जे असतात त्यांनि -प्रतिकूल काळी - शत्रूचे प्रहारसुद्धा कासवाप्रमाणे अंग संकोचून सहन करावेत, पण योग्य वेळ येताच मात्र कृष्णसर्पाप्रमाणे शत्रूवर चालून जावे. )

यावर संजीवी नावाचा मंत्री उभा राहून राजा मेघवर्णाला म्हणाला, 'महाराज, मंत्रीमहोदय उज्जीवी यांचे हे तह करण्याचे पडखाऊ विचार मला बिलकूल पटत नाहीत. आपला शत्रू अरिमर्दन हा धर्माची चाड न बाळगणारा व लोभी आहे. आज आपल्याशी तह करायला तो तयार झाला, तरी त्या तहानुसार तो वागेलच याची ग्वाही कुणी द्यावी ? त्यातून त्याच्या सामर्थ्याचा बागुलबुवा उभा करण्यात तरी काय अर्थ आहे ? तसा सामर्थ्याचा विचार करता, हत्ती हा सिंहापेक्षा कितीतरी वरचढ असतो ना ? पण अंगच्या शौर्यामुळे व पराक्रमामुळे तो सिंह त्या हत्तीला भारी ठरतो. तरीही त्या शत्रूच्या सामर्थ्याचे भय वाटत असल्यास, त्याच्याशी समोरासमोर युद्ध न करता, त्याला कपटाने मारावे. स्त्रीरूप घेऊन भीमाने नाही का त्या दुष्ट कीचकाचा वध केला ? तेव्हा शत्रूपुढे नमते घेण्याचा विचारही मनात आणु नये. त्यामुळे शत्रू मात्र आपल्याला गवताप्रमाणे तुच्छ मानू लागेल. महाराज, शत्रूपुढे पड खाण्यासाठी का आपल्याला आपल्या मातांनी जन्म दिला आहे ? मुळीच नाही. शत्रूचा संहार हा करायलाच हवा. म्हणून तर युद्धाशास्त्रावरील एका ग्रंथाने राज्यकर्त्याला स्पष्ट भाषेत सवाल केला आहे-

रिपुरक्तेन संसिक्ता वैरिस्त्रीनेत्रवारिणा ।

न भूमिर्यस्य भूपस्य का श्र्लाघा तस्य जीवने ॥

(शत्रूच्या रक्ताने व शत्रूस्त्रियांच्या डोळ्यातील आसवांनी ज्याची भूमी शिंपडली गेली नाही, अशा राजाच्या जीवनात प्रौढी मिरविण्यासारखी कोणती गोष्ट आहे ?)

त्यानंतर राजा मेघवर्णाने मंत्री अनुजीवी याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले असता तो म्हणाला, 'महाराज, शत्रू बेभरंवशाचा व कपटी असल्यामुळे आणि त्याच्या सामर्थ्याचा आपल्याला अचूक अंदाज नसल्याने, त्याच्याशी तह किंवा युद्ध यांपैकी काहीही करण्यात अर्थ नाही. त्यातून त्याच्या राज्याच्या भौगोलिक परिस्थितीचे ज्ञानही आपल्याला नाही. तेव्हा सध्या आपण इथून पळ काढून एखाद्या सुरक्षित प्रदेशाच्या आश्रयाला जावे.

'महाराज, असा पळ काढण्यात किंवा माघार घेण्यात कुठल्याही प्रकारचा कमीपणा नाही. एडका धडका मारण्यापूर्वी जस थोडासा मागे सरकतो किंवा आपल्या लक्ष्यावर झेप घेण्यापूर्वी पशुराज सिंह हा जसा आपले अंग आखडून घेतो, तशा स्वरूपाची आपली ही माघार आहे. तेव्हा सध्या नव्या सुरक्षित ठिकाणाचा आश्रय घेऊन, आपण युद्धात जय मिळविण्याच्या दृष्टीने जोरात तयारीला लागू आणि शत्रूच्या सामर्थ्याची व त्याच्या राज्याच्या भौगोलिक रचनेची इत्थंभूत माहिती आपल्या हेरांमार्फत मिळवून, मग कार्तिकात वा चैत्रात त्याच्यावर घणाघाती हल्ला करू, म्हणजे आपल्या मोहिमेत पावसाचा अडथळा येणार नाही आणि शत्रूच्या राज्यातील तयार पिके हाती लागल्याने, आपल्या सैन्याची उपासमारही होणार नाही.'

चौथा मंत्री प्रजीवी म्हणाला, 'महाराज, तह, युद्ध वा पलायन यांपैकी कुठलाच मार्ग हिताचा नाही. आपण आहो तिथेच राहून ऐक्याच्या बळावर शत्रूला भुईचित करू. एकमेकांजवळ उभे असणारे वृक्ष महाभयंकर वावटळीला सहज तोंड देऊ शकतात. पाण्यात असताना जी मगर एखाद्या हत्तीलासुद्धा खेचू शकते, तीच मगर पाण्याबाहेर पडली की, एखाद्या कुत्र्यापुढेसुद्धा हतबल ठरते. तेव्हा जे काय करायचे ते इथे राहूनच करू व शत्रूला पुरे पडू.'

पाचवा मंत्री चिरंजीवी याने राजाला वेगळाच सल्ला दिला. तो म्हणाला, 'महाराज, आपण आपले स्थान न सोडता, इथूनच आपल्या शत्रूचा पुरता बीमोड करू शकू. अर्थात त्याकरिता एखाद्या बलवान मित्राची मदत मात्र मिळायला हवी. म्हटलंच आहे -

असहायः समर्थोऽमपि तेजस्वी किं करिष्यति ।

निर्वाते ज्वलितो वन्हिः स्वयमेव प्रशाम्यति ॥

(एखादा जरी समर्थ व तेजस्वी असला, तरी त्याला जर कुणाचे सहाय्य नसेल, तर तो एकटा काय करू शकणार ? हवा नसलेल्या जागी जर अग्नी पेटविला, तर तो आपणहून विझून जातो.)

चिरंजीवी पुढे म्हणाला, 'पण महाराज, आपल्याला मदत करणारा एखादा बलवान् मित्रच असावा असेही नाही. अनेक सामान्य पण निष्ठावंत मित्र जरी आपल्यामागे छातीठोकपणे उभे राहिले, तरी त्यांचाही आपल्याला तेवढाच उपयोग होऊ शकतो. म्हटल्च आहे ना ?-

संघातवान् यथा वेणुर्निबिडैर्वेणुभिर्वृतः ।

न हि शक्यः समुच्छेत्तुं दुर्बलोऽपि तथा नृपः ।

(एक वेळूही जर अनेक वेळूंनी वेढलेला असेल, तर ज्याप्रमाणे वावटळ त्याला पाडू शकत नाही, त्याचप्रमाणे दुर्बळ राजाची सहाय्यक मित्रांमुळे स्थिती होत असते. )

चिरंजीवी शेवटी म्हणाला, 'महाराज, ज्यांची मदत घ्यायची ते खरोखरच चांगले असले तर आजचे चित्र पार बदलून जाईल, म्हटलंच आहे-

महाजनस्य संपर्कः कस्य नोन्नतिकारकः ।

पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम् ॥

(थोराचा सहवास कुणाला उन्नतिकारक झालेला नाही ? कमळाच्या पानावर पडलेल्या पाण्याला मोत्यांचे रूप प्राप्त होते. )

अशा तर्‍हेने पाचही मंत्र्यांचा सल्ला ऐकून झाल्यावर आपल्या वडिलांपासून सचीवपदी असलेल्या व सर्व शास्त्रांत पारंगत असलेल्या स्थिरजीवीला राजा मेघवर्णाने विचारले, 'काका, या बाबतीत तुमचे म्हणणे काय आहे ?'

स्थिरजीवी म्हणाला, 'महाराज, आतापर्यंत पाच मंत्र्यांनी आपल्याला जो सल्ला दिला, त्या प्रत्येकाच्या म्हणण्यात जरी काही ना काही तथ्य असले, तरी या बाबतीत माझे म्हणणे असे आहे की, सध्या आपण एकीकडे शत्रूशी मैत्री जोडू इच्छित असल्याचा बहाणा करावा व त्याच वेळी दुसरीकडून शत्रूला अडचणीत आणून त्याचा नायनाट करावा. ही नीती साधूसंतांच्या दृष्टीने कुटिल व म्हणून वाईट असली तरी, ज्याला राज्य चालवायचे व टिकवायचे आहे, अशा राजाचे अशा नीतीशिवाय चालायचे नाही. त्या दृष्टीने शत्रूच्या राहण्यावावरण्याच्या ठिकाणांची इत्थंभूत माहिती आपल्या हेरांच्या सहाय्याने मिळवावी. शत्रूकडील मंत्री, पुरोहित, सेनापती, युवराज, अंतःपुरावरील अधिकारी, त्या राजाची प्रेमपात्रे, परराष्ट्रमंत्री, दुर्गरक्षक, सीमारक्षक, शरीररक्षक, राजाला पाणी देणारे, त्याला विडा देणारे, यांच्यापैकी जे कुणी धन वा सत्ता यांसाठी हपापलेले असतील, त्यांना निरनिराळी आमिषे दाखवून फितवावे. त्याचबरोबर आपल्या राज्यातील अशा लोभी व्यक्ती शत्रूला फितूर होऊ नयेत म्हणून त्यांच्यावर सतत करडी नजर ठेवायला आपल्या हेरांना सांगावे. असे केल्याने शत्रूशी फारसे युद्ध करावे न लागता आपल्याला विजय प्राप्त करून घेता येईल आणि आम्हा कावळ्यांशी पूर्वापार वैर करीत आलेल्या घुबडांचा निःपात करता येईल.'

यावर 'पण कावळे व घुबडे यांच्यात वैर उद्भवण्याचे मूळ काय कारण ?' असा प्रश्न राजा मेघवर्णाने विचारला असता सचीव स्थिरजीवी सांगू लागला-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to पंचतंत्र


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
गावांतल्या गजाली
सापळा
श्यामची आई
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
अजरामर कथा
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
रत्नमहाल
शिवचरित्र
वाड्याचे रहस्य