गोष्ट अठ्ठावन्नावी

काळ पाहून उपाय योजावे आणि आपले घोडे विजयाकडे दौडवावे.

महाचतुरक नावाच्या एका कोल्ह्याला वनात हिंडत असता, एक मेलेला हत्ती आढळला. 'हा हत्ती आपल्याला एकट्यालाच खायला मिळावा,' यासाठीच्या उपायाचा तो विचार करीत असतानाच त्या ठिकाणी एक सिंह आला. त्याला पाहून तो मोठ्या नम्रतेनं म्हणाला, 'दुसर्‍याने मारलेले वा स्वतःहून मेलेले श्वापद महाराज कधी खात नाहीत. तरीही जर त्यांना फारच भूक लागलेली असली, तर त्यांना यथेच्छ हात मारता यावा, यासाठी मी या मृत हत्तीची राखण करीत बसलो होतो.' त्याचे हे बोलणे ऐकून तो सिंह म्हणाला, 'चतुरका, तुझं म्हणणं खरं आहे. शास्त्रच मुळी सांगतं-

वनेऽपि सिंहा मृगमांसभक्षा बुभुक्षिता नैव तृणं चरन्ति ।

एवं कुलीना व्यसनाभिभूता न नीतिमार्गं परिलङ्घयन्ति ।

(पशूंचे मांस भक्षण करून त्यावर जगणारे वनातले सिंह हे जरी भुकेने व्याकूळ झाले, तरी ते गवत खात नाहीत. तसेच जे कुलवन असतात, ते जरी संकटात सापडले, तरी नीतीचा मार्ग सोडून वागत नाहीत.)

याप्रमाणे बोलून व 'तो हत्ती मी तुलाच इनाम देत आहे,' असे म्हणून सिंह तिथून निघून जातो न जातो तोच, एक वाघ तिथे टपकला. 'हा वाघ या हत्तीला खाईल व त्याची हाडे तेवढी मागे ठेवील, असा विचार मनात येऊन तो महाचतुरक त्याला म्हणाला, 'वाघोबा, केवळ तुमच्याबद्दल वाटणार्‍या आपुलकीपोटी, मी तुम्हाला एक गुपित सांगतो. सिंहमहाराज या हत्तीची शिकार करून नदीवर स्नानाला जाताना मला म्हणाले, 'इथे जर कुणी वाघ आला तर त्याच्याशी गप्पा मारीत त्याला थांबवून ठेव. गेल्या महिन्यात मी एक शिकार करून नदीवर स्नानाला गेलो असता एका वाघाने ती शिकार उष्टावली. तेव्हापासून या वनात एकही वाघ जिवंत न ठेवण्याची प्रतिज्ञा मी केली आहे.' चतुरकाचे हे बोलणे ऐकून त्या वाघाने तिथून पळ काढला.

नंतर आलेल्या चित्त्याच्या दाढा मजबूत व धारदार असल्याने, महाचतुरकाने त्याला तो हत्ती खाण्याचा आग्रह केला. पण वरचे राठ व चिवट कातडे त्या चित्त्याने फाडताच महाचतुरक त्याला खोटेच म्हणाला, 'चित्तूकाका, सिंह आला. पळा, पळा, पळा.' चित्त्याला ते खरे वाटून त्याने पळ काढला. त्याच्यानंतर आलेला कोल्हा तुल्यबळ असल्याने त्याच्याशी दोन हात करून महाचतुरकाने त्याला पळवून लावला व सवडीनुसार पण एकट्याने त्या हत्तीला खाऊन खलास केला.'

ही गोष्ट त्या मगराला सांगून ताम्रमुख वानर त्याला म्हणाला, 'हे मगरा, तुझ्या घरात शिरलेल्या तुझ्या जातवाल्याशी तू शर्थाने लढून त्याला पळवून लाव. मग तुला कुणीही त्रास देणार नाही. कारण प्रत्येकाचे खरे पण छुपे शत्रू त्याच्या जातीतच असतात. म्हणून तर परदेशात जाऊन आलेल्या चित्रांग नावाच्या कुत्र्याने तिकडे त्याला तसाच आलेला अनुभव आपल्या गावकरी कुत्र्यांना सांगितला ना?''

'तो कसा ? असा प्रश्न मगराने केला असता ताम्रमुख म्हणाला, 'ऐक-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel