गोष्ट सत्तावन्नावी

जो सज्जनांचा उपदेश अव्हेरी, तो स्वतःचेच नुकसान करी.

उज्ज्वलक नावाचा एक सुतार बाहेरगावी चालला असता, त्याला वाटेत लागलेल्या झाडीत एक उंटीण व्यायलेली आढळली. तिला व तिच्या पिल्लाला घेऊन तो घरी गेला व त्याने त्यांचा चांगला सांभाळ केला. पिल्लाच्या गळ्यात त्याने एक घंटा बांधली.

त्या उंटिणीच्या दुधावर त्याला पैसा मिळू लागताच, त्याने तात्पुरते कर्ज काढून आणखी काही उंट-उंटिणी खरेदी केल्या. उंटिणीचे दूध व त्यांना होणारी पिल्ले तो विकी व पैसे मिळवी. एरव्ही त्याचे उंट व उंटिणी चरण्यासाठी वनात नेऊन सोडी. तिथे ते एकत्रपणे चरत. गळ्यात घंटा बांधलेले पिल्लू तेवढे आपण इतरांपेक्षा कुणी विशेष आहोत, अशा ताठ्याने इतरांपासून दुर राहून चरे.

'तू असा एकटा चरत राहू नकोस,' असा उपदेश त्याला काही सूज्ञ व सज्जन उंटउंटिणींनी अनेक वेळा केला. पण त्यांच्याकडे त्याने दुर्लक्ष केले. अखेर एके दिवशी संध्याकाळी ते सर्व उंट-उंटिणी वनातून घराकडे चालले असता, मुद्दाम मागे राहिलेल्या त्या घंटाधारी गर्विष्ठ पिल्लाला एका सिंहाने फाडून खाल्ले.' ही गोष्ट सांगून ताम्रमुख वानर म्हणाला, 'हे मगरा, त्या उंटाच्या पिल्लाप्रमाणेच तूही मूर्क आहेस. म्हणुन मी तुला उपदेश करणार नाही.'

तो मगर म्हणाला, 'ताम्रमुखा, मी मूर्ख आहे, वाईट आहे, हे तर खरेच ! पण चांगल्याशी कुणीही चांगले वागतो. वाईटाशीही जो चांगला वागतो, त्यालाच सज्जन म्हटले जाते ना ? मग तू एक सज्जन असल्यामुळे मी माझे घर परत कसे मिळवू या बाबतीत मला मार्गदर्शन कर.'

यावर ताम्रमुख म्हणाला, 'आता तू माझा पिच्छाच पुरविला आहेस तर सांगतो. प्राप्त परिस्थितीत तू तुझे घर बळकावून बसलेल्या त्या दांडगट मगराशी द्वंद्वयुद्ध करून व त्याचा पराभव करून त्याला हाकलून दे. कारण म्हटलंच आहे -

उत्तमं प्रणिपातेन शूरं भेदेन योजयेत् ।

नीचमल्पप्रदादेन समशक्तिं पराक्रमैः ॥

(जो श्रेष्ठ असेल त्याच्यापुढे हात जोडून, जो पराक्रमी असेल त्याच्या बाबतीत भेदनीतीचा अवलंब करून, नीच असेल त्याला थोडीफार लाच देऊन, तर तोडीस तोड असलेल्यांना पराक्रम दाखवून आपले काम साधावे.)

याप्रमाणे सांगून शेवटी तो वानर म्हणाला, 'हे मगरा, महाचतुररक नावाच्या एका कोल्ह्याने याच तंत्राचा वापर करून, एक मेलेला हत्ती आपल्या एकट्याच्या पदरात पाडून घेतला.'

'तो कसा काय?' असे त्या मगराने विचारले असता ताम्रमुख म्हणाला, 'त्याचं असं झालं-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel