आशिष कर्ले
भारत माझा देश आहे... सारे भारतीय माझे बांधव आहेत लहानपणापासून आपण ही प्रतिज्ञा म्हणत आलोय . मराठीमध्ये ,हिंदीमध्ये आणि अगदी चुकत चुकत इंग्रजीमध्येही! पण खरंच आपण या प्रतिज्ञेशी कितपत एकनिष्ठ असतो ? लहानपणी आपल्याला जात ,धर्म या सर्व गोष्टींशी काहीच देणंघेणं नसत पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण जात आणि धर्म यावरून विभक्त होतो. लहानपणी शाळेत मित्र एकत्र बसून एका डब्यात जेवतात आणि हेच मित्र जेव्हा मोठे होतात तेव्हा एकमेकांच्या जाती धर्मावरून वेगळे होतात. आपले सध्याचे राजकारणी गोऱ्या साहेबाकडून बाकी काही शिकोत वा नकोत पण जाती धर्मावरून लोकांना कस भडकवायचं आणि आपली पोळी कशी भाजून घ्यायची, हे बरोबर शिकले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पघड जातीच्या लोकांना एकत्र करून हे रयतेच स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त भारत देश नव्हे तर संपूर्ण जगासाठी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी साठी प्रेरणास्थान ठरले आणि आज काही मूर्ख त्यांना विशिष्ट जातीपुरते मर्यादित ठेवत आहे. सर्व महानपुरुषांना यांनी वाटून घेतलं आहे आणि अशी परिस्थिती निर्माण होण्यास फक्त आणि फक्त राजकारणी जबाबदार आहेत.
आपण सर्वजण म्हणतो.. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, पण आपण स्वतःच स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की खरंच आपण जात धर्म यापेक्षा आपल्या देशाला महत्व देतो का? की फक्त एक औपचारिकता म्हणून प्रतिज्ञा म्हणतो?
आजकाल आपण जाती आणि धर्मावरून भांडत बसलेलो आहोत कारण आपण कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सोशल मिडियावर येणाऱ्या मेसेजेसवर डोळे झाकून विश्वास ठेवत आहोत. इतिहासातील कोणताही संदर्भ न पाहता आपण येईल त्या अफवांना आपण बळी पडत आहोत.सोशल मीडिया हे एक संपर्काचं आणि माहितीची देवाणघेवाण करण्याचं एक प्रभावी मध्यम आहे यामुळे जग खूप जवळ आलं आहे मात्र या प्रभावी माध्यमांचा आपण कशा प्रकारे प्रयत्न करू यावर सर्व काही अवलंबून आहे.
आज आपल्या देशात सर्वात जास्त तरुण आहेत आणि तरुणांनी ठरवलं तर ते देशाचं भवितव्य घडवू शकतात, देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेऊ शकतात मात्र आपले राजकारणी तरुणांना योग्य ती संधी उपलब्ध करून देण्याऐवजी जात आणि धर्माच्या नावाखाली भडकवतत आणि खेळण्याप्रमाणे त्यांचा वापर करून घेतात. हे राजकारणी सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जातात आणि लोकांना भावनिक मुद्द्यावर भडकवतात.. या सगळ्यात विकासाचा मुद्दा तर बाजूला राहतो शिवाय लोक जाती धर्मावरून आपआपसात भांडत बसतात.
मला तर वाटतं, देशाबद्दल खर प्रेम आणि भक्ती कोणाला असेल तर ते फक्त आणि फक्त सीमेवर लढणाऱ्या सैनिकांनाच आहे. फक्त तेच आपल्या देशाच्या प्रतिज्ञेच काटेकोरपणे पालन करतात आणि आपण मात्र फक्त औपचारिकता म्हणून प्रतिज्ञा म्हणतो. हे सैनिक दिवस रात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी कष्ट करतात आणि आपण मूर्खपणे राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडून आपआपसात भांडत बसतो!
तसे पहायला गेलं तर प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल देशातील नागरिकांबद्दल अभिमान असतो पण आपण नको त्या अफवांना बळी पडून जातीवादी बनतो.
जिथं आपल्या प्राचीन भारतीय संस्कृती आणि साधु संतांनी संपूर्ण विश्वाला आपलं कुटुंब मानायची उच्च शिकवण दिली तिथे आज आपण जाती जातीवरून भांडत आहोत. विविधतेत एकता म्हणून सगळे जग आपल्या देशाकडे बघते आहे, त्या सगळ्यांना आपण आपल्या या वागण्यावरून काय संदेश देतोय याचा कोणीच विचार करत नाही
मुळात कुठलीच जात आणि धर्म कधीच भेदभाव करायला शिकवत नाहीत आणि आपण मात्र राजकारणाला बळी पडतो आणि भांडत बसतो!
आपण सारे खूप भाग्यवान आहोत की आपण भारता सारख्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो आहोत जिला खूप प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे आणि या प्राचीन संस्कृतचे संवर्धन करण्यासाठी आपण सगळयांनी भारतीय म्हणून एकत्र येण्याची गरज आहे भारतीय प्रतिज्ञेचे पालन करण्याची गरज आहे
भारत माता की जय
जय हिंद