अक्षर प्रभू देसाई

अर्थशास्त्र हे मुळात मानवी स्वभावाचे शास्त्र आहे. अर्थशास्त्राचे नियम सर्व लोक आपल्या जीवनात चतुराईने वापरतात पण फार कमी लोकानां त्यांची माहिती असते. म्हणजे थोडक्यांत झाडावर दगड मारून फळ आम्ही सगळेच काढतो पण फळ नक्की कुठल्या नियमाने पडते आणि गुरुत्त्वाकर्षण नियम काय आहे हे सर्वांना ठाऊक असते असे नाही.

भारत देश प्रचंड गरीब देश आहे. मागील सुमारे ६० वर्षां पासून भारतातील गरिबी विशेष कमी झाली नाही. चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, हॉंगकॉंग इत्यादी देशांच्या तुलनेत भारताची प्रगती अतिशय कमी आहे. पुढील ५० वर्षांत सुद्धा भारत एक गरीब देशच राहील. पण ६० वर्षे मागे भारत ह्या सर्व देशांपेक्षा थोडा चांगल्या स्थितींत होता. भारताची स्थिती इतकी वाईट का आहे ह्याला लोक अनेक कारणे देतात. काही लोक भ्रष्टाचाराला जबाबदार धरतात तर काही लोक ब्रिटीश राज्याला दोष देतात. काहींच्या मते नेहरू गरिबीला कारणीभूत होते तर काहींच्या मते गुलामगिरीची मानसिकता त्याला कारणीभूत आहे. भारताच्या गरिबीला ही सर्वच कारणे काही प्रमाणात जबाबदार आहेत पण मुलभूत कारण मात्र अर्थशास्त्राच्या नियमाने एकच आहे. आम्ही ते कारण सगळ्यांत शेवटी स्पष्ट करू.

हा लेख म्हणजे एक प्रवास आहे. ह्या प्रवासांत लेखक आणि तुम्ही बरोबर प्रवास कराल. ह्या लेखांत अजिबात उपदेश नाही. लेखक आणि वाचक बरोबरीने सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील.

एक अज्ञात द्वीप आणि संपत्ती

संपत्ती म्हणजे काय ? अनेक लोकांच्या मते संपत्ती म्हणजे पैसा. हे एका दृष्टीकोनातून बरोबर आहे पण मुलभूत दृष्ट्या पैसा म्हणजे फक्त कागद असतो. पैशाला किमंत अशासाठी असते कि त्या कागदाच्या बदल्यांत आम्ही इतर लोकांपासून वस्तू किंवा त्यांचा वेळ/कौशल्य विकत घेवू शकतो. अर्थात हे अर्थशास्त्रीय ज्ञान आहे पण प्रत्यक्षांत पैसा म्हणजे संपत्ती नाही असे आम्ही कुणाला सांगितले तर तो आम्हाला वेड्यात काढील. संपत्ती म्हणजे काय हे आपण एका साध्या उदाहरणातून समजून घ्यायचा प्रयत्न करू.

समजा एक अज्ञात निर्जन द्वीप आहे. ह्या बेटावर काहीही नाही. ना अन्न ना पाणी. फक्त सपाट जमीन. बाहेरील जगाचा ह्या बेटावर काहीही संबंध नाही आणि भविष्यांत येणारही नाही. आता ह्या बेटावर संपत्ती काय आहे ? उत्तर आहे ०. जिथे मनुष्य नाही तिथे संपत्तीचा प्रश्नच येत नाही. चला तर आम्ही ही समस्या सोडवू. ह्या बेटावर आम्ही एक माणूस टाकू. समजा ह्या माणसाचे नाव गोपी. तर ह्या बेटावर आम्ही आता माणूस ठेवला. आता सुद्धा ह्या बेटावरची संपत्ती ० आहे कारण गोपीच्या खिशांत दमडी सुद्धा नाही.

चला तर समजा गोपीच्या खिशांत कोहिनूर हिरा ठेवला तर त्या बेटावर किती संपत्ती असेल ? आता सुद्धा उत्तर ० आहे कारण बेटावर अन्न नाही, पाणी नाही कोहिनूर हिरा असून सुद्धा गोपी अन्न पाण्याविना काही दिवसांत मरून जाईल आणि बेटावर काहीही राहणार नाही कारण माणसा शिवाय संपत्ती नावाचा प्रकार असूच शकत नाही.

आता समजा गोपीला आम्ही एक झाड दिले. हे झाड दर दिवसाला एक फळ देते. ह्या झाडाला पाण्याची वगैरे गरज नाही. फळ अतिशय गोड असून त्यांत प्रचंड प्रमाणात शर्करा आहे. हे फळ खाऊन माणूस सहज जिवंत राहू शकतो. पण एक समस्या आहे. गोपीला मधुमेह आहे त्यामुळे त्याच्यासाठी हे फळ विषासमान आहे. आता ह्या बेटावरची संपत्ती किती आहे ? उत्तर आहे ०; कारण फळ असले तरी ते खाऊन सुद्धा गोपी काही दिवसांत मरून जाईल.

आता आम्ही ह्या बेटावर आणखी एक माणूस पाठवूया. ह्या माणसाचे नाव आहे अली. अली बरोबर एक बकरी सुद्धा आहे. ही बकरी दररोज एक लिटर दुध देते. बकरीला पाणी किंवा चाऱ्याची गरज नाही ( गृहीत धरा). पण एक समस्या आहे, अलीला दुधाची अलर्जी आहे.

आता ह्या बेटावर किती संपत्ती आहे ? उत्तर आहे ०. कारण गोपी त्याच्या झाडाची फळे खावू शकत नाही, अली त्याच्या  बकरीचे दुध पिवू शकत नाही आणि दोघे जण अन्नाशिवाय मरून जातील.

आता समजा गोपीने आपला कोहिनूर हिरा अलीला देवू केला तर ? अली मूर्ख नसेल तर त्याला नक्कीच कळेल कि हिरा घेवून काही तो अन्न विकत घेवू शकत नाही. त्यामुळे त्याच्या दृष्टीने हिऱ्याची किमत ० आहे. त्यामुळे ह्या बेटावर दोन लोक असून सुद्धा त्या हिऱ्याची किमंत शून्य आहे. पैश्याचे सुद्धा असेच आहे. विकत घ्यायला जर वस्तू नसेल तर कोट्यावधी पैशांची किमंत सुद्धा शून्य असते.

चाणाक्ष वाचकांच्या लक्षांत आले असेल कि अली आपल्या बकरीचे दुध गोपीला देऊ शकतो आणि गोपी आपल्या झाडाचे फळ अलीला त्या बदल्यांत देऊ शकतो आणि दोघे जण ह्या प्रकारे जिवंत राहू शकतात. वर वर पाहता हि छोटीशी गोष्ट वाटली तरी अर्थशास्त्रातील हा सर्वांत महत्वाचा शोध आहे.

आम्ही आत्ताच पाहिले होते कि गोपी, अली, झाड आणि बकरी हे सगळे त्या बेटावर असून सुद्धा दोघांचा मृत्यू निश्चित होता आणि त्यामुळे बेटावरची एकूण संपत्ती ० असणार होती. पण अली आणि गोपीने बरोबर बोलून आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचे आदान प्रदान केले आणि दोघांचाही जीव वाचला. बेटावर नवीन काहीही वस्तू आली नाही तरी सुद्धा दोन माणसांचा जीव वाचला आणि इथेच संपत्तीचे निर्माण झाले.

इथे नक्की संपत्ती काय आहे ? समजा आम्ही गोपीला विचारले कि बाबा रे, तुझ्या ह्या कोहिनूर हिऱ्याची किमत काय आहे तर तो काय उत्तर देयील ? तो म्हणेल कि ०. समजा आम्ही त्याला विचारले कि तुझ्या ह्या झाडाच्या फळाची किमत काय आहे ? तर तो उत्तर देईल कि "माझे जीवन". कारण ते फळ आहे म्हणून मी दुध विकत घेवू शकतो आणि म्हणून माझा जीव वाचतो.

तोच प्रश्न जर आम्ही अली ला विचारला कि "बाबारे, तुझ्या बकरीच्या दुधाची किमंत काय ?" तर तो उत्तर देईल कि "माझा जीव"

ज्या बेटावर आता पर्यंत काहीही नव्हते तिथे अचानक दोन माणसांच्या जीवा इतकी संपत्ती निर्माण झाली. समजा हे बेट इतके प्रचंड आहे कि अलीला गोपीचे अस्तित्व ठाऊक नाही आणि गोपीला अलीचे अस्तित्व ठाऊक नाही. तर ह्या चारही वस्तू असून सुद्धा दोघे जण मरून जातील आणि बेटावरची संपत्ती ० होईल, फक्त हे दोघेजण समोरासमोर आले आणि त्यांनी व्यापार केला म्हणून दोघांचा जीव वाचला आणि संपत्ती निर्माण झाली.

धडा

ह्या प्रयोगातून एक गोष्ट सिध्द झाली कि व्यापारातून संपत्ती निर्माण होते. जितका व्यापार जास्त तितकी संपत्ती जास्त निर्माण होते. दोन माणुस समोर येऊन एकमेकांबरोबर गोष्टींचे आदान प्रदान करतात त्याला व्यापार म्हणतात.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बेटावर पैसा अजिबात नव्हता पण संपत्ती तरी सुद्धा निर्माण झाली.

तिसरी आणि सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे वरील उदाहरणात दोघे व्यापारी श्रीमंत झाले. दोघांचाही जीव वाचला म्हणजे एकाच व्यापारांत दोघांचाही फायदा झाला. काही लोकांना ऐकून आश्चर्य वाटते कि प्रत्यक्ष जीवनांत सुद्धा बहुतेक व्यापारात विकत घेणारा आणि विकत देणारा दोघांचाही फायदा असतो. कुणालाही नुकसान होत नाही.

नुकसान कधी होते ? अर्थशस्त्राने ह्या प्रश्नाचा आधीच अभ्यास केला आहे. प्रत्येक व्यापार हा दोघी लोकांना फायदेशीर असतो जेव्हा खालील मर्यादा पाळल्या जातात.

१. दोन्ही लोक स्वेच्छेने त्या व्यापारांत भाग घेतात आणि कुणावरही बळजबरी होत नाही. ( जेंव्हा एका माणसावर बळजबरी होते तेंव्हा त्या माणसाचा फायदा कमी होतो. )
२. दोन्ही लोकांना ज्या गोष्टीचा व्यापार होत आहे त्या गोष्टीबद्दल समान ज्ञान असते. ( ज्या व्यक्तीला जास्त ज्ञान असेल त्या व्यक्तीला जास्त फायदा होतो. )

नियम १:
समजा गोपीने रात्री उठून अलीच्या डोक्यांत दगड घालून त्याची बकरी चोरली तर ? ही अलीवर बळजबरी झाली. ह्यांत अलीचा जीव गेला आणि त्याचे १००% नुकसान झाले.

नियम २:
समजा अलीच्या बकरीला काही तरी रोग आहे. ह्या बकरीचे दुध काही दिवस प्राशन केल्याने मृत्यू निश्चित आहे. अलीला हे ठावूक आहे पण तो हे गोपीला सांगत नाही. तर ह्यांत गोपी बकरीचे दुध बिनधास्त पितो, दुसरे काही अन्न शोधण्याचा प्रयत्न करत नाही आणि शेवटी मरतो. ह्यांत हि माहिती दडवून ठेवल्याने अलीला फायदा होतो पण गोपीचे काही प्रमाणात नुकसान होते. (गोपी १००० दिवसां ऐवजी २०० दिवसांत मरतो, २ दिवसांत अन्न पाण्याशिवाय मारण्यापेक्षा २०० दिवस जगून मेलेले चांगले).

तात्पर्य: व्यापार हे संपत्तीचे प्रमुख कारण आहे. व्यापार जितका स्वेच्छेने होतो तितका दोन्ही भागीदारांना जास्त फायदा होतो. व्यापार जितका प्रामाणिकपणे होतो तितका दोन्ही लोकांना फायदा जास्त होतो.

पण हे झाले पुस्तकी ज्ञान. प्रत्यक्ष जीवन अज्ञात द्विपापेक्षां जास्त क्लिष्ट असते. इथे सुद्धा हे नियम लागू आहेत का ? ह्या प्रश्नावर सुद्धा आम्ही प्रकाश टाकू पण त्या आधी आणखीन दोन महत्वाच्या गोष्टी आपण लक्षांत घेतल्या पाहिजेत. त्या म्हणजे "पैसा" ह्या संकल्पनेचा अर्थ आणि "किमंत" ह्या प्रकारची परिभाषा. वरील उदाहरण घेवून आम्ही ह्या दोन्ही गोष्टी समजू शकतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel