वंदना मत्रे
एस.एन.डी.टी. वुमन युनिव्हर्सिटी नवी मुंबई
आज मी पुन्हा एकदा शाळेत जाणार अन तेही माझ्या शाळेत ह्या भावनेने मन आनंदित झाले होते. मनात खूप आठवणी होत्या सोबत जबाबदारी पण होती. कारण मी आता विद्यार्थी म्हणून नाही तर शिक्षिका म्हणून जाणार होते .एकदाचे शाळेत पाऊल पडले. मी सरळ स्टाफ रूम मध्ये गेले. सगळ्या टीचरांना नमस्कार केला. त्यांनीही माझे अभिनंदन केले. मी माझ्या वर्गात पोहचले. नवीन शिक्षिका म्हणून ओळख झाली. वेळ जास्त वाया न घालवता मुलांना मराठीची पुस्तके उघडायला लावली. माझ्या हाती आलेला पहिलाच धडा "भारत माझा देश आहे". रोजच्या शालेय दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक दिवशी बोलली जाणारी हि प्रतिज्ञा आज धडा स्वरूपात समजवायचे कारण थोडे वेगळे होते. अन समजावणे पण गरजेचे होते. "भारत माझा देश आहे "ह्या माझ्या शब्दामध्ये किती प्रेम आणि जिव्हाळा आहे. स्वतःची आई कुठेही दिसली तरी अभिमानाने सांगतो. "हि माझी आई आहे". तिला आपण कुणालाही द्यायला तय्यार नसतो. माझ्या म्हणवणाऱ्या ह्या व्यक्तीची आपण जीवापाड काळजी घेतो. ह्या व्यक्तीशी आपण वेळोवेळी प्रामाणिक राहतो. जीव पणाला लावून माझ्या व्यक्तीची किंवा माझ्या वस्तूची काळजी घेतो. त्या माझ्या व्यक्तीला संरक्षण निर्माण करतो. कारण ती वस्तू किंवा ती व्यक्ती फक्त माझी असते. म्हणजे प्रत्यक्षात स्वतःचे हृदयच जणू. मग अगदी तसेच आपण आपल्या भारताची काळजी ती माझी भारतमाता आहे असे समजून घेतली पाहिजे. ह्या भारतातले बांधव म्हणजे माझ्याच कुटुंबातले भाऊ बहीण आहेत. असे मनाशी ठाम करून फक्त त्यांच्याशी प्रामाणिक नाही तर त्यांचे वेळोवेळी सरंक्षण करायचे कर्तव्य सुद्धा मनाशी ठाम करायला पाहिजे. जेव्हा आपण हे कर्तव्य मनाशी ठाम करू तेव्हा माझा एकही भाऊ चुकीच्या मार्गाने जाणार नाही. तर माझ्या एकही बहिणीच्या केसाला सुद्धा असुरक्षिततेचा धक्का लागणार नाही. ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे. अन ह्या सगळ्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपले बॉर्डरवरचे सैनिक. ते जेव्हा दुश्मनांशी लढतात ना तेव्हा फक्त एकच लक्षात ठेवतात कि हि भारतमाता माझी आहे. तिचे सरंक्षण फक्त मलाच केले पाहिजे. तरच माझे बांधव सुखी होतील. मी हरलो थांबलो तर हे दुश्मन माझ्या मातेचे लचके तोडतील. मी हे नाही होऊन देणार मला लढले पाहिजे माझ्या मातेसाठी. सगळे सैनिक जात ,धर्म ,पंथ ,वेष, भाषा हि सगळी दूषित लक्तरे अंगावरून काढून फेकून देतात. अन एकमताने एकजुटीने लढत असतात. आपल्या पूर्वजांचा आणि आपल्या देश भक्तांचा आदर्श समोर ठेवून. खूप वर्षांपूर्वी जे काही देशभक्त व समाजसेवक होऊन गेले. त्यांनी ह्या भूमीवर स्वतःचे रक्त सांडले आहे. हे रक्त सांडताना ,बलिदान देताना त्यांनी कधीही तुझ माझं केले नाही. किंवा स्वतःच्या कर्तव्यापासून पळतीवाट काढली नाही. त्यांनी एकच लक्षात ठेवले "हा भारत देश माझा आहे ","ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं माझं कर्तव्य आहे". अन हे कर्तव्य पूर्ण करून मगच त्यांनी जीव सोडला. अशा ह्या स्वातंत्र्यपूर्ण देशामध्ये आपण घडत आहोत. हया भूमीवर सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाशी आपण बांधले गेलेलो आहोत. कारण ते रक्त माझ्या बांधवांचे आहे. आपल्या नाहीतर माझ्या भारतमातेचे हे एकजुटीचे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर प्रत्येक बांधवाला तिच्या अंगी ठासून भरलेले कर्तव्यनिष्ठता, प्रामाणिकपणा ,सत्यता, एकनिष्ठता, तेजस्वीपणा , कणखरपणा ,तत्परता, समभावना आणि दिव्यता हे गुण स्वतःच्या अंगी बळकावून घेतले पाहिजेत. तरच अन्यायाविरोधात एकमताने आणि एकजुटीने लढायची तयारी प्रत्येक बांधवाच्या मनगटात खऱ्या अर्थाने निर्माण होईल अन तेव्हाच आपल्यावर सत्ता गाजवणाऱ्याचे तोंड खऱ्या अर्थाने बंद होईल. जेव्हा माझी पेन्सिल हिकडे तिकडे जाते. तेव्हा ती कुठे गेली हे शोधण्यासाठी माझा जीव कासावीस होतो. अन जेव्हा सापडते तेव्हा जीवात जीव येतो. मग माझा देश लोकशाहीप्रधान असूनही २६ जानेवारीला आणि १५ ऑगस्ट ला दिमाखात फडकवलेला तिरंगा दुसऱ्या दिवशी एखाद्या गल्ली बोळात किंवा रस्त्यावर पडलेला का दिसतो? कारण तो मी टाकलेला नाही .मी नाही टाकला तर मी का उचलू? ज्याचे त्याला काळत नाही का उचलायला? त्याला नाही का देशाभिमान? ह्या सगळ्या भावना बाजूला सारून माझा तिरंगा फक्त कागदाचा तुकडा नाही, तर तो मी भारतीय असल्याची ओळख आहे. हि माझी ओळख मला सुरक्षित ठेवली पाहिजे. कुठेही पडलेला असू दे माझा तिरंगा तिथे जाऊन मी उचलून त्याला मानाच्या ठिकाणी ठेवेन. अन पुन्हा तो कधीही झुकला जाणार नाही. ह्याची मी काळजी घेण्याची प्रतिज्ञा करेन. कारण माझा तिरंगा कुठेही पडण्यासाठी नाही, त्याचा चोळामोळा होण्यासाठी नाही तर तो अभिमानाने फडकण्यासाठी आहे. अन जोपर्यंत माझ्या जिवातजीव आहे. तोपर्यंत असाच डौलाने आणि अभिमानाने फडकत राहील. हे माझे परमकर्तव्य आहे. अन हीच अपेक्षा मी माझ्या बांधवांकडून करणे ह्याचा मला पूर्ण अधिकार आहे. कारण हा भारत देश माझा आहे. अन मी भारताची आहे.