जयंत नाईक

नदीच्या काठी, घाटावर नेहमी वर्दळ असे.  घाटाच्या थोडे पुढे एक दत्ताचे पुरातन देऊळ होते. सकाळ-संध्याकाळ आरतीचे आणि घंटेचे आवाज आसमंतात भरून जात असत. देवळात गेले की मोठे प्रसन्न वाटे. देवळाच्या शेजारीच एक उंबराचे झाड होते.  ते सुद्धा त्या मंदिरासारखेच पुरातन होते. कदाचित मंदिरापेक्षा जास्त पुरातन असावे. त्या झाडाभोवती बसण्यासाठी एक पार कुणीतरी बांधला होता.  तो मात्र नुकताच कुणी तरी बांधला असावा.

आज त्या पारावर एक साधू महाराज बसले होते. त्यांच्यासमोर त्यांचे सात आठ भक्तगण बसलेले होते. स्वामीजी मोठ्या गोड आवाजात भगवतगीतेवर काही भाष्य करत होते. त्यांचे शिष्यगण मोठ्या आदराने प्रवचन ऐकत होते.

" आत्मा हा अमर आहे, अविनाशी आहे. त्याला कोणतेही शस्त्र मारू शकत नाही, त्याला अग्नीसुद्धा जाळू शकत नाही. चराचरात तोच व्यापून आहे.  हे आपण अनेक वेळा ऐकले आहे. पण याचा आपल्याला अनुभव यायला हवा तरच ते सत्य नाहीतर नुसते सगळे पढत पंडित.

आपल्या सर्व प्राणीमात्रात एकच आत्मा आहे याचा अनुभव घ्या!  सगळीकडे ब्रम्ह व्यापून आहे, हे जाणून घ्या. त्याचा अनुभव घ्या. नुसते गीतेचे पारायण करू नका." स्वामीनी आपले प्रवचन संपवले. भक्तगण हळू हळू निघून गेले. एक भक्त मात्र थोड्या वेळाने पुन्हा परत आला. त्याच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी होती.

" महाराज ,मी तुमच्यासाठी थोडी पोळी भाजी आणली आहे. त्याचा स्वीकार करावा" भक्त म्हणाला.

" अरे याची काही जरुरी नाही. आमच्या मठात माझ्या जेवणाची सर्व सोय आहे",  स्वामी म्हणाले.

" नाही म्हणू नका जी! मी मोठ्या प्रेमाने खास आपल्यासाठी आणली आहे" तो भक्त म्हणाला.

स्वामीजींनी मग स्मित करत ती पिशवी आपल्या शेजारी ठेऊन घेतली. तो भक्त मोठ्या आनंदात स्वामीजींना नमस्कार करून निघून गेला.

स्वामीजींनी आपल्याजवळील जपमाळ काढली आणि नदीच्या संथ प्रवाहाकडे बघत आपला जप सुरु केला.

थोड्या वेळाने कसल्याशा आवाजाने त्यांनी डोळे उघडले. त्यांनी बघितलं की एक भिकारी मोठ्या गडबडीने नदीकडे निघाला होता. त्याचा एक पाय लहानपणीच बहुदा पोलिओमुळे अधू झाला होता. तो अधू उजवा पाय, जमिनीवरून घासत घासत तो नदीच्या घाटापर्यंत गेला. मग तो आपल्या डाव्या चांगल्या पायावर आपला डावा हात दाबून धरत खुरडत खुरडत नदीचा घाट एक एक पायरी मोठ्या कष्टाने उतरायला लागला. अस्ताव्यस्त केस,गुढग्यापर्यंत कशीबशी येणारी एक बरीचशी फाटलेली अर्धी चड्डी असे त्याचे ध्यान मोठे केविलवाणे दिसत होते.  अंगात खाकी रंगाचा कधी काळी धुतलेला आणि आता बऱ्याच ठिकाणी फाटलेला शर्ट त्याने घातला होता.

स्वामीजी मोठ्या कुतूहलाने ते दृश्य पाहत होते.

तो भिकारी हळूहळू पाण्यापर्यंत पोचला. पाणी पिण्यासाठी तो खाली वाकणार इतक्यात कोणीतरी त्याला हटकलं,

" ए भिकाऱ्या तिकडे जा, तिकडे!"

तो भिकारी आपला उजवा पाय फरफटत थोडा बाजूला सरकला. मग तो पुन्हा खाली वाकला. आपल्याला कोणी येथून हाकलत तर नाही ना अश्या भावनेने त्याने इकडे तिकडे पाहिले आणि त्यांनी एक ओंजळ भरून पाणी घेतले आणि मोठ्या अधाशीपणे ओंजळ तोंडाशी लावली. थोडे पाणी पोटात गेल्यावर त्याच्या थोडा जीवात जीव आला. परत घाबरत घाबरत त्याने आणखी एक ओंजळ भरून पाणी घेतले आणि ते पाणी पिऊन टाकले. मग तो एकदम आपला अधू पाय सावरत पायरीवरच बसला आणि ओंजळी मागून ओंजळी पाणी पिऊ लागला. जरावेळाने तो जरा सावरून बसला. त्याने एकदा खळखळून चूळ भरली आणि आपल्या तोंडावर पाण्याचे दोन तीन हबके मारले. त्याचा शर्ट या प्रकारात पूर्ण भिजून गेला होता. त्याकडे दुर्लक्ष करत तो समाधानाने उठला आणि पुन्हा आपला अधू पाय फरफटत मोठ्या कष्टाने एक एक पायरी चढत तो घाट चढून वर आला.

हळूहळू तो स्वामी बसले होते त्या झाडापर्यंत आला. त्या भिकाऱ्याने स्वामींना खाली वाकून नमस्कार केला. सर्व साधूबाबांना काहीतरी जादूटोणा येतो अशी त्याची समजूत होती, म्हणून तो रस्त्यात दिसलेल्या सर्व साधूबाबांना नेहमी नमस्कार करत असे. आपण नमस्कार केला नाही आणि त्या साधूने काही जादूटोणा केला तर काय घ्या? त्याला अशीही एक आशा होती  की कोण जाणे कधीतरी कोणीतरी साधू त्याचा अधू पाय बरा करेल!

तेवढ्यात त्या साधूबाबांनी त्याला हाक मारली.

" अरे ! जरा इकडे ये बघू!"

तो भिकारी गोंधळला. हे साधूबाबा दुसऱ्याच कुणाला तरी तर हाक मारत नसावेत ना? असे समजून त्याने इकडे तिकडे पहिले. त्याला दुसरे कोणीच दिसले नाही.

" अरे मी तुलाच हाक मारतो आहे! ये इकडे ये!" तो साधू बाबा त्यालाच बोलवत होता तर! तो भिकारी घाबरत घाबरत त्या झाडाच्या जवळ गेला. आपला अधू पाय सावरत तो कसाबसा ताठ उभा राहिला. आपण बोलावे का नाही या विचारात तो असतानाच तो साधू बाबा त्याला म्हणाला,

" अरे ,आज काही खाल्ले आहेस की नाहीस? का नुसतेच पाणी पिऊन आलास नदीवरून?"

तो भिकारी एकदम गोंधळून गेला. हा साधू बाबा आपल्याला असे का विचारतोय कुणास ठाऊक?त्याने काहीच उत्तर दिले नाही.

"अरे बोल की!"

" नाही जी ! दोन दिवस काहीच खाया  घावले नाही जी!" तो भिकारी कसे बसे म्हणाला. आपल्याला हा साधूबाबा काही तरी खायला देईल अशी त्याला आता आशा वाटायला लागली.

"मग काय नुसतेच पाणी पिऊन पोट भरलेस की काय?"

" होय जी"

" काय नाव तुझे?" तो साधू बाबा म्हणाला.

" मला भिक्या म्हणतात जी !"

"अरे हे काय असले नाव ? चांगले भिकाजी वगैरे असेल. भिक्या काय?" तो साधू बाबा म्हणाला.

" नाय जी! मला ठाव नाही. मी लहान होतो तेव्हा बी भीक मागत होतो म्हणून मी भिक्या!" तो भिकारी हळूच म्हणाला. स्वामीजी फक्त हसले.

" बर असू दे! हे बघ माझ्या जवळ ही थोडी पोळी भाजी आहे ,ती तू घे. घेशील ना?"

" घेईन जी !" भिक्याने मग त्या साधूबाबांनी दिलेली पोळीभाजी घेतली आणि तिथेच पारापाशी बसकण मारून अधाशीपणी ती पिशवी उघडली आणि ती पोळी खायला सुरुवात केली. त्याने खायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात एक भटका  कुत्रा  दबकत दबकत त्याच्यापाशी आला आणि मोठ्या आशेने त्या पोळीकडे पहायला लागला. थोड्यावेळाने आपल्याला कोणी इथून हाकलत नाही हे लक्षात आल्यावर ते कुत्रं एक पाऊल पुढे सरकलं.

स्वामीजीनी ते कुत्रं त्या भिकाऱ्याच्या जवळ येतेय हे पाहिलं.

" अरे भिक्या ते कुत्रं पोळी घेईल बघ! हाकल की त्याला!", स्वामीजी म्हणाले आणि त्यांनी स्वतःच हाड हाड करून त्या कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला.

ते कुत्रे काही जागचे हलले नाही! त्याने फक्त आपला एक पुढचा पाय मागे घेतला आणि परत ते त्या पोळीकडे हावरटपणे पाहत  तिथेच उभं राहिले .

भिक्याने एकदा त्या कुत्र्याकडे पाहिलं आणि सहजपणे आपल्या पोळीतील अर्धी पोळी  तोडून त्या  कुत्र्यासमोर टाकली.

" असू दे जी ! भुकेला जीव हाय त्यो!", भिक्या म्हणाला.

ते कुत्रे त्या पोळीवर तुटून पडलं आणि मचमच असा काहीतरी आवाज करत ती पोळी खायला लागलं.

स्वामींच्या मनात वीज चमकावी तसे झाले.

त्यांनी त्या अधू पायाच्या, दोन दिवस उपाशी असलेल्या,अंगावर फटके आणि कळकट कपडे घातलेल्या भिक्याकडे आश्चर्याने बघितलं. त्यांना जणू तो भिक्या नव्यानेच  दिसला!

" अरे भिक्या!  तू कसला भिक्या? तू तर श्रीमंत्या!", ते हळूच म्हणाले.

भिक्याने त्यांच्याकडे काहीच न कळून पाहिलं. स्वामीजी फक्त हसले आणि त्या  भुकेल्या दोन जीवांकडे समाधानाने पहात  राहिले.

" आम्ही जे शिकवतो ते ब्रम्ह आम्हाला अनुभवता आले नाही ते या भिक्याला सहज अनुभवता आले!", स्वामीजी स्वताशीच पुटपुटले.

*****

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel