नीता चापले
अगदी सहजच ,त्या दिवशी निशाला तिची बाई बोलता बोलता बोलून गेली,
" मॅडम, मी तुमच्याकडे बघून काम करते, " मला वेळ द्या. ८ ला निघाले तर ८.३० ला घरी जाते, माझी पण मुले वाट बघतात , घरी जाऊन माझाही स्वयंपाक असतो.
" परंतु . तुम्ही जे ह्या वयात करता ते खूप कौतुकास्पद आहे, तुमचं नाव खूप आहे.
मग निशा बोलली हो ग, "रस्त्याने जातांना लोक मानाने बोलतात, नमस्कार करतात, तुम्ही ते मिळवलंय तुमच्या कष्टाने, मेहनतीने,व मुलीचा मोठा आघात सोसून देखील तुम्ही खंबीरपणे उभ्या आहात. हाताशी आलेली हुशार मुलगी डोळ्यादेखत, पोटच दुःख कसं पचवलत".
" हो, मॅडम! तरीही तुम्ही खंबीरपणे उभ्या आहात . खरंच तुम्ही आजच्या पिढीला, एक प्रेरणास्रोत आहात,म्हणून मला सुद्धा तुम्हाला वेळ नाही अस बोलायची हिंमत नाही झाली".
निशाची कामवाली खूप शिकलेली नव्हती, वयाने तिच्यापेक्षा भरपूर लहान असेल, पण आज तिला जे परिस्थितीने शिकवलं होत. वय जास्त आहे म्हणून तुम्ही समजदार असता असे नाही . आयुष्य आणि अंगावर आलेली अवेळी जबाबदारी हे सुद्धा माणसाला खूप काही शिकवून जाते. माणुसकीचे उत्तम उदाहरण देऊन गेली. तिच्या बोलण्याने ती मात्र भूतकाळात गेली. खरंच हे सर्व इतकं सोपं होत का? तिच्या माणसांनी सोडलेली तिची साथ, बंद झालेला संवाद. पोटच आणि आईच दुःख सर्व एकाच वेळेला. किती मोठा भावनिक संघर्ष होता. स्वतःचा स्वतः सोबत. तिच्या समोर मुलगा आणि नवरा. जाणाऱ्यांच्या मागे जाऊ शकत नाही. कुणासाठी तरी जगायचं असतं.
निशा एका सर्वसामान्य घरात जन्माला आलेली, भावंडात सर्वात मोठी, वडिल सरकारी नोकरीत पण विचाराने मात्र रुढीवादी, स्वतः च्या तत्वांशी तडजोड न करणारे, फक्त स्वतः जे म्हणतील तीच पूर्व दिशा.आई लग्न झाल्यावर 10 वी पहिल्या वर्गात पास झाली होती पण बाबांनी तिला पुढे शिकायला परवानगी नाही दिली, त्यामुळे तिचा सूर्य घरातच उगवायचा व घरातच मावळायचा. ती लग्न होऊन आली तेव्हा संयुक्त कुटुंब. सासरे पैलवान, सासू शांत आणि सरळ , दीर, भाचा आणि येणारे जाणारे सुरूच असायचे.
निशाचा जन्म झाला. त्या काळात," मुलगी झाली, मुलगा पाहिजे होता ", असा काही अट्टाहास नव्हता. मुलगी किंवा मुलगा पण सुदृढ व्हावीत हीच माफक अपेक्षा होती. तिचा बाजी म्हणजे आजोबा " अरे माझा पैलवान आला पोरीच्या रूपात". पोरीच्या रूपात एका वाघिणीने जन्म घेतला होता. जिच्या जगण्याची धडपड अगदी जन्माच्या पहिल्या दिवसापासून सुरू झाली होती. जन्म झाला आईला दूध नाही. आईच्या स्तनात गाठी झाल्या होत्या. तिसऱ्या दिवसापासून तिच्या योनीच्या जागेतून रक्त वाहायच. सर्व वैद्य झाले पण रक्त काही थांबेना. मोठे वडील व मोठी आई अगदी कापडात गुंडाळून ह्या वैद्याकडून त्या वैद्याकडे फिरत होते. शेवटी एक वैद्य बोलले," हिला शेवटचा उपाय बारलींगीच्या पाल्याचा रस पाजा. नाहीतर ही पोरगी गेली हे समजा." दोघांच्याही प्रयत्नामुळे तिला जीवनदान मिळाले. आजही दोघे बोलतात की," सरडा गेला होता कुंपणावरून आम्ही आणला ओढून."
तीच नागपुरला मातीच घर होत. मग घरात सारवायला , व अंगणात सडा टाकायला शेण लागायचं ते सुद्धा ती शाळेतून आल्यावर बाजूच्या मैदानातून आणत असे. जर एखाद्या दिवशी नाही मिळालं तर 20 पैसे ला शेण विकत आणून अंगणात सडा टाकायचा, घरात सारवण असायचं, पांढऱ्या चुन्याने कोरा भरुन घ्याव्या लागत असायच्या. रोजच ती करायची अस नाही पण मध्ये मध्ये असायच. ऐकलं नाही की बाबांचा मार आहेच. त्यांची भिती सर्वानाच होती. त्यांचं मुलांवर कटाक्षाने लक्ष होत.निशावर तर जास्तच. लिपस्टिक, उंच हीलच्या चप्पलांचा फार राग त्यांना. ती एकदा मोठ्या बाबांच्या मालकाकडे लग्नाला गेली होती. त्यांनीच लिपस्टिक लावायला दिली पण तिला मात्र रात्री दीड वाजता मार खावा लागला. त्यांना बिना तेलाचे केस कधीच आवडत नव्हते. तिने बाजूच्या मुलाच्या लग्नाला जाताना केसांना तेल नाही लावलं म्हणून वडीलांनी अर्धा लिटरची खोबरेल तेलाची बाटली तिच्या डोक्यात ओतली. तिचे बाबा धरुन तिघे भाऊ. मोठे वडील व काका आधुनिक विचारांचे, फक्त निशाच्या बाबांचे विचार, स्वभाव वेगळा होता. पण सर्वांना घेऊन तेच होते. आज ते तिघे भाऊ - बहीण खरंच घडलेत ह्याच श्रेय सुद्धा तिच्या वडिलांना जात. आता ह्या वयात आल्यावर तिला कळत की संस्कार करायची पद्धत वेगळी होती.
तिचा लहान भाऊ सतीश त्याच्यात व निशामध्ये फक्त पावणे दोन वर्षाचं अंतर तो कमालीचा हट्टी होता. बाबांचा स्वभाव जरा चिडका होता. त्यांना ऑफिस मधून आले की घर स्वच्छ लागायचं, ५ वाजले की तिची मां म्हणजे आजी हातात फडा घेऊन आधी घर आंगण झाडात असे. त्यांना जेवण सुद्धा चविष्ट लागत असे. त्यांना सर्व जण घरातले घाबरायचे. घरात कोणतेही काम करताना त्यांना आवाज झालेला मुळीच आवडतं नसे. आवाज झाला तर डायरेक्ट धुलाई. तिने तर बाबांचा खूप मार खाल्ला . बरेचदा मार खाण्याची कारणेच तिला कळत नव्हती. घरातील सर्वच कामे तिला फार कमी वयात यायला लागलीत. आजीचा म्हणजे मा आणि बाजी चा सहवास जास्त लाभला कारण दोघेही खूप लाड करायचे. मार मिळत असताना आडवे यायचे. बाजीचं तिला सर्व करायला लागायचं म्हणजे त्याला दोन्ही वेळेला जेवण वाढणे, चहा नेऊन देणे, तो फिरून आला की त्याचं अंग खुंदून देणे. अस सर्व सुरळीत सुरू असताना. अचानक एक दिवस. तो दिवस देखील आठवतो महाशिवरात्रीचा दिवस होता. आजीला अर्धांगवायूचा झटका आला. तेव्हा ती दुसर्या गावातल्या काकांकडे होती. तेव्हा निशा १२ वर्षाची असेल. मा ला बाबांनी नागपूरला आणलं. १९८४ ते १९८८ गोकुळाष्टमीच्या दिवशी मा देवाघरी गेली. सलग 4 वर्षांपैकी एक वर्ष ती मुलीकडे भुयारला होती. आजीच सर्व खाटेवरच होत. तिला जेवण काय हव नको ते सर्व निशा बघायची. आई स्वयंपाक, मां ची अंघोळ हे तिचे काम. ती शाळेत असेल तेव्हा आई सर्व करायची. खूप कमी वयात तिच्या अंगावर जबाबदारी आलेली. मां ने मात्र तिला खूप आशीर्वाद दिले. आजही ती तिच्या सोबत आहे असेच वाटते. तिची सुश्रुषा करताना तिला सुद्धा मनात सलत होत. ती तिच्या नशिबाला दोष द्यायची पण ती खूप आशीर्वाद देऊन गेली. आजी आणि मुलीचा सहवास निशाला १७ वर्षाचा लाभला. हा दैवी योगायोग म्हणावा लागेल.आजीच्या आशीर्वादाने निशाला सर्वच खूप भरभरून मिळालं. सर्वच कुठेच कमतरता नव्हती. तिच्या पोटी सुध्दा तीच आली गुरु म्हणून मुलीच्या रूपात १७ वर्षाचं आयुष्य घेऊन. आणि परत तिच्यावर मुलगी गेल्याचा दुःखाचा डोंगर कोसळला . तिच्या मुलीच्या सुखाला नजर लागली. असे म्हणत तिची आई सुद्धा नातीच दुःख नाही पचवू शकली. व अवघ्या 4 महिन्यात आई सुद्धा सोडून गेली. ती मात्र आता कायमची पोरकी झाली होती. अनाथ झाली कारण मायेचं कुणीच नव्हतं.
कुठल्याही वयात आपल्या जवळच्या माणसाचं कायमच सोडून जाणं. तो धक्का पचवन कठीणच असतं त्यातही जिला पोटी जन्म दिला आणि जिच्या पोटी जन्म घेतला ह्या दोघींचं कायमच निघून जाणे. दोघींच्या मृत्यूचे ढग कायमच तिच्या मनावर काळोखच पसरवीत होते .
हे बोलण फार सोपं असतं. ज्याचा त्याचा प्रवास असतो. येणारा मोजून श्वास घेऊन येतो. दोघींच्या जाण्यान मात्र तिच्या मनातला कोपरा
कायम उदासीन झाला होता.
जन्माला आल्यापासून जिने आपल्या पंखात बळ येईपर्यंत आपल्या खांद्यावर खेळवल अशी आई व जिला निशानं स्वतः च्या अंगाखांद्यावर खेळवलं अशी मुलगी अश्या ह्या दोघी.
ज्या दिवशी मा च निधन झालं त्याच दिवसापासून निशाचं क्रिकेट सुरू झालं. इथ तिला बाबांनी क्रिकेटला कधीच विरोध केला नाही. त्यांना ती कुणाकडे गेलेली आवडत नसे. खूप मैत्रिणी नाही आवडायच्या पण क्रिकेट ची मुल दर रविवारी घरी यायची त्यांचा नाश्ता, त्यांच्याशी हसून खेळून बोलणे हा विरोधाभास बाबांचा मात्र तिला कधीच कळला नाही. ह्याला एकमेव कारण हेच असावं त्यांच्या आईची केलेली मनापासून सेवा. कारण मां चा हरी हा लाडका मुलगा . ऑफिस मधून आले की," मां काय करते." हा त्यांचा प्रश्न असायचा.. मां ने देह त्यागण्याच्या आदल्या दिवशी सुद्धा सर्वांनी मिळून जिलेबी खाल्ली होती. बाबांना एक सवय पगार झाला की काही तरी स्वीट दर महिन्याला आणायचे.
निशाची बॅट अशी तळपत होती की ज्या दिवशी तिने स्वतः हुन क्रिकेट बंद नाही केलं तोपर्यंत ती राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळत होती. विविध ठिकाणी सामने खेळली व विदर्भाचे नाव रोशन केले. नागपूर विद्यापीठाचे कप्तान पद भूषविले नाबाद ९१ धावांची खेळी मात्र तिच्या क्रिकेट बंद होण्याला आणि तिच्या जोडीदार मिळण्याला कारणीभूत ठरली. पेपर ला नाव बघून त्याच म्हणजेच नीरजच प्रपोजल आल .
तो पाहता क्षणी प्रेमात पडला. ह्याच मुलीशी लग्न करायचं. हीच खेळाडु पाहिजे असा अट्टाहास त्याचा होता. पहिलाच मुलगा लग्न झाल. सुशिक्षित सुसंस्कृत घराणं मिळालं होत. कलागुणांना वाव देणारी लोक होती. नाही बोलायला कुठेच तिला वाव नव्हता. तीच आणि त्याच लग्न झाल.
क्रिकेट अर्ध्यावर सुटलं पण डोक्यातून ते गेलेलं नव्हतं, ती कमालीची महत्वाकांक्षी. "मुंबईत स्वतःची अकॅडमी करेन" ह्याच एका ध्येयाने झपाटलेली होती. पण आता संसारात पुरती रमली होती. दोन वर्षात मुलगी झाली. तीच नाव शाळेत टाके पर्यंत दुसरा मुलगा झाला. मध्येच नवऱ्याची बदली कलकत्त्याला झाली तिथे एक वर्ष राहिली. मग मात्र बस्तान परत मुंबई. क्रिकेट अकादमी ची ठिणगी कलकत्त्यामध्येच पडली होती. ते साकारायला मात्र मुंबई पुढे सरसावली. 2005 साली तिने स्वतःची क्रिकेट अकादमी केली. तेव्हा मुलगा फक्त ४ वर्षाचा होता. पुरुषांची मक्तेदारी असलेलं हे क्षेत्र होत. पण तिने हार नाही मानली. एकाच वेळेला तीन शाळा, एक महाविद्यालय असे क्रिकेट सुरू झाले. अकॅडमी चा एक विद्यार्थी राष्ट्रीय संघात खेळला. तिच्या मुलीची सुद्धा मुंबई U १९ मुलींच्या संघात निवड झाली होती. पण तो काळा दिवस उजडला. 14 जुलै 2013 होत्याच नव्हतं झालं. मुलीचं अपघाती निधन झालं. डोळ्यासमोर पूर्णपणे अंधार, सर्व संपलं होत. तिची मुलगी म्हणजे तिचा विश्वास. सर्वस्व तिचं तिला सोडून गेली. मुलगा फक्त 12 वर्षाचा होता. त्यात त्याला फिट्स यायच्या. त्याच बहिणीसोबत बोंडिंग फार होत. तो तीच त्याच्या आयुष्यातून निघून जाणे व्यक्त करू शकत नव्हता. तिला मात्र आता घरात थांबणे आवश्यक होते. सर्व पुरते कोलमडलो होतीत. तितक्यात ४ महिन्यांनी आईच्या अचानक जाण्याने ने तर तिला विश्वास बसेना की इतकं काय पाप करून ती जन्माला आलेली. वर्षभर घरातून पाय बाहेर नाही काढला. नीरजच सर्व घर सांभाळायला लागला.
शेवटी एक दिवस तो बोलला, " किती दिवस घरात बसणार आहेस."जितके प्रश्न करशील स्वतः ला. उत्तर मिळणार नाहीत, आता तरी मान्य कर. त्या दोघी आपल्याला सोडून गेल्या आहेत." स्वप्ने होती तिची, त्याच काय? सर्व प्रश्न स्वतः ला विचारायचे." नीरजच्या आधाराने निशा जरा सावरली. आणि त्यातूनच मग लेखणी हातात घेतली महिला क्रिकेट वर पुस्तक लिहिलं ते मुलीला व आईला समर्पित केलं. किती खेळण्यापेक्ष्या कस खेळलो हे महत्वाचं तिची मुलगी १७ वर्ष आयुष्य घेऊन आलेली पण जोपर्यंत महिला क्रिकेट आहे. तोपर्यंत ती आठवणीच्या रूपात जिवंत आहे.
ग्रंथाली प्रकाशन प्रकाशित माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे विमोचन झाले.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे , येथे मागच्या वर्षी निवड समिती सदस्य व प्रशिक्षक पदी निवड. महाराष्ट्र शालेय क्रिकेट U 17 संघ मुलींना रौप्य पदक मिळाले.बरेच पुरस्कार मिळाले.
मुलीचे स्वप्न पूर्ण करायला निघालेली ही आई आज बऱ्याच ऐश्वर्या घडवायचं स्वप्न उरी बाळगून आहे.
मागच्या वर्षी वयाच्या ४८ वर्षी पॉवर लिफ्टिंग सुरू करून ती आता राष्ट्रीय व एशियन पातळीवर खेळते.पॉवर लिफ्टिंगला स्नायूंची ताकद कमी पडायची म्हणून पोहायला सुरवात केली .खेळ असू दे किंवा कुठलीही कला त्यात सातत्य आणि मेहनत करायची तयारी पाहिजे सर्व शक्य आहे. कुठेही वय तिला आड येत नव्हत. एकच ध्येय मैदान गाजवायच. फक्त टाळ्या आणि टाळ्या
आधीची मुजोर, हट्टी ती आता मात्र एक महत्वाकांक्षी स्त्री झालेली दिसली . एक व्यावसायिक क्रिकेट कोच, पॉवर लिफ्टर, .लेखिका आणि स्विमिंग चे प्रयत्न आजपण प्रामाणिक पणे सुरू आहेत सातत्याने आणि चिकाटीने.
*****