नीला पाटणकर

गुलाबी थंडीचे दिवस होते.पहाटेची वेळ उबदार दुलईतून बाहेर यावेसे वाटु नये, इतपत हवेत सुखद गारवा होता. सुमतीबाईंना दिनचर्या सुरू करणे क्रमप्राप्त होते. थंडी झटकून त्या रोजच्या सवयी प्रमाणे उठुन परसदारी देवासाठी फुले खुडण्यास गेल्या. अंगावर शाल पांघरली असली तरी थंडी प्रकर्षांने जाणवत होती. वातावरणात अंधुकसे धुके पसरून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते. चहू बाजूस हिरवे गार तृणं, तरूंचे गालिचे पसरून एकमेकांना साथ देत डुलत होते. प्रांगणी धवल शेंदरी देठावर उभ्या असलेल्या प्राजक्तांचा सुंदर, सुबक, गोंडस, नक्षिदार पडलेला सडा पाहुन मन भारावून जात होते. तो नेत्रसुखद आनंद घेतच सुमतीबाईंनी पटापट ओंजळभर फुले टिपत परडीत टाकली. त्यांनी लावलेल्या विविध रंगाच्या जास्वंदीकडे त्यांचा मोर्चा वळला. त्यातील त्यांनी मोजकीच फुले खुडून घेतली. व उरलेली शोभेसाठी झाडावर ठेवून त्या घरात निघाल्या, इतक्यात त्यांची नजर तुळशी वृंदावनाकडे गेली. हिरवे गार वस्र परिधान करून डौलात तुळस त्यांचे कडे बघून खुदकन् हसते की काय असा त्यांना भास झाला आणि मनोमन हसू फुटले.

सुमतीबाईचे, पती विनायकराव. नयना, नम्रता ह्या मुली असे चार जणांचे मध्यमवर्गीय चोकौनी कुटुंब होते. आज सुमतीबाईंना थोडा निवांत वेळ होता. पतिराज विनायकराव चार-पाच दिवसा साठी काही कामानिमित्त जुन्या वडीलोपार्जीत गावा कडील शेती, घराच्या देखभाली करीता गावी गेले होते. नुकतेच ते बॅंकेतून निवृत्त झाले होते.

सुमतीबाईंच्या दोन मुलींपैकी पहिली नयना व दुसरी नम्रता, नावा प्रमाणेच त्या होत्या. नयनाचे मोठे टपोरे बोलके डोळे गौर वर्ण अवखळ, चुणचुणीत तोंडावरचा आकर्षक भाव तिच्या सौंदर्यात अधिकच भर टाकत होता. नयना एम.एसी होऊन काॅलेज मधे प्रोफेसर होती. नम्रता गव्हाळ वर्णी, नम्र, शालीन, मधाळ वाणी नटखट, मिष्कील, हुषार, धडाडीची होती. ती इतिहास हा विषय घेऊन नुकतीच एम्.ए झाली होती. ऐतिहासिक विषयात गोडी असल्याने ती महाराष्ट्रातील किल्ले व इतिहास यावर पी.एच.डी करत होती. आज ती मैत्रिणीं सह महाराष्ट्रातील किल्ले पाहण्यास सहलीला गेली होती. तिला शूरवीर जवानांचे शौर्य, पराक्रम, ऐतिहासिक माहीती जाणून घेण्यात रूची व उत्सुकता असल्याने ती वारंवार अशा सहलींना जात असे. तिच्या मनी नेहमी त्याच्या विषयी आदर भाव असे.

सुमतीबाई ही शिक्षिकेच्या पेशातून निवृत्त होऊन गरजू मुला-मुलींचे विरंगुळा, आवड व विद्यार्थांना मदत म्हणून विना शुल्क शिकवणी वर्ग घरातच घेत होत्या. मुलं चार नंतर शाळा सुटल्यावर शिकवणीला येत असत. आज त्या घरात एकट्याच होत्या. मोठी मुलगी नयना नुकतीच लग्न होऊन सासरी गेली होती. तिला साजेसा सुविद्य नवरा मिळुन मुलगी सुयोग्य स्थळी पडल्याने सुमतीबाई अगदी खुषीत होत्या. नयनाच्या पुढील वर्षभराच्या सणांविषयी रिकाम्या वेळात मनात आयोजन करणे चालू होते. नयनाचे लग्न जमवण्यात एक विलक्षण योगायोग होता. नयनाच्या सासूबाई विमलाबाई ह्या ही शिक्षिका होत्या. कांही वर्षांपूर्वी एका शैक्षणिक मेळाव्यात सुमतीबाई व विमलाबाई यांची भेट होऊन ओळख झाली होती. मधूनमधून कामानिमित्त त्यांचे फोनवर बोलणे होत असे. एकाच क्षेत्रातील दोघी असल्याने अनुभवाची देवाण-घेवाण खुलेपणाने होऊ लागली. दोघींतील अंतर कमी होऊन, मैत्रीचे नाते जास्त दाट घट्ट झाले होते.

हळुहळु घरातील सदस्या विषयी बोलणे होऊन मुल काय करतात इ.एकमेकांना कळु लागले. कांही दिवसांनी नयनाचे शिक्षण होऊन नयनाला काॅलेजमध्ये जाॅब मिळाला. सुमतीबाईमधील आई जागृत होऊन त्यांनी नयना साठी वर संशोधनास सुरूवात केली. व त्यांच्या डोळ्यासमोर विमलाबाईंचा मुलगा नकुल आला. विमलाबाईंचे ही नकुल साठी स्थळ बघणे सुरू झाले होते. आणि एके दिवशी सुमतीबाईंनी फोन वरून नयना साठी नकुल विषयी प्रस्ताव मांडला. व सर्व कांही दोन्ही बाजुने जुळून येऊन दोघी मैत्रिणींचे विहीणीत रूपांतर झाले. घरातील सर्व माणसं मायाळू, प्रेमळ व सुशिक्षित होती.

मध्यंतरीच्या काळात नयनाच्या लग्नाआधी विनायकरावांची कित्येक दिवसाची अपुरी राहिलेली बंगल्याची इच्छा निवृत्तीच्या आलेल्या पैशातून छोटासा टुमदार बंगला घेऊन त्यांनी पूर्ण केली होती. शेजारच्या फणसे काकूंचा ओळखीचा व परीचित बंगला त्यांनी विकत घेतला होता.त्यामुळे त्या बंगल्यविषयी एक प्रकारची ओढ आपुलकी घरातील प्रत्येकाला होती. त्यांच्या दोन्ही मुली लहानपणा पासून तेथे खेळल्या बागडल्या होत्या. फणसे काका वृध्दापकाळामुळे गेल्यावर काकू येथील सर्व विकून मुलाकडे अमेरिकेत कायम वास्तव्यास गेल्या होत्या.

सुमतीबाईंच्या दोन्ही मुली नयना व नम्रता त्यांच्या लहानपणी फणसे काकूंच्या अंगा-खांद्यावर खेळल्या होत्या. दोघीही सुट्टीच्या दिवशी फणसे काकूंच्या बंगल्याच्या परसातील बागेत रोप लावणे. झाडाला पाणी घालणे ही काम हौसेने करत असत. त्या नंतर काकू तितक्याच प्रेमाने त्यांनी केलेला चविष्ट लाडू दोघींच्याही हातावर देत असत. त्या वयात त्यांना त्याचे फार अप्रूप, मौज वाटे. चांगला कुठलाही पदार्थ केला की काकू आगत्याने  मुलींसाठी घरी आणून देत. मुलींच्या आवडी-निवडी काकूंना चांगल्या ठाऊक होत्या. त्या मुद्दामच ते पदार्थ करत व कधी-कधी बोलावून खाऊ घालत असत. काकूंची हाक आली की समजत असे की काही तरी गोड-धोड खायला मिळणार. हातातले काम सोडून असतील तशा मुली धावत जाऊन त्यांच्याकडे धडकत. काकूंच्या हाताला अप्रतिम चव होती. त्या उत्तम सुगरण होत्या. स्वादिष्ट पदार्थ करण्यात त्यांचा हातखंडा होता. फणसे काका फावल्या वेळात झोपाळ्यावर बसून मुलींना गंमती-जमती व बोधकथा सांगत असत. त्यांची नातवंड दूर असल्याने ते यांच्यातून नातवंडांच सुख मिळवून उपभोगित असत.

नयनाची लग्नासाठी घेतलेली रजा शिल्लक होती. म्हणून ती घरी होती. पती नकुलला नुकतीच बढती मिळाली होती. त्यामुळे अनेक कामाच्या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. लग्नासाठी घेतलेली रजा शिल्लक असूनही हनिमूनला न जाता त्याला ऑफिसच्या कांही महत्त्वाच्या कामानिमित्त तातडीने परगावी जावे लागले होते. नकुलचा धाकटा भाऊ निशांत अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी असतो. तो नुकताच भावाच्या लग्नासाठी येऊन पुन्हा अमेरिकेत परत गेला होता. त्यामुळे नयनाशी बरोबरीचे गप्पा मारण्यास घरी कुणीच नव्हते. नुकतीच लग्न करून सासरी आलेली नयना बाल्कनीतल्या झुल्यावर सांजवेळी मंद हेलकावे घेत बसली होती. हवेत मंद-कुंद वातावरण होते. पती देव बाहेर गावी गेल्यामुळे तिला थोडे उदास, एकटे वाटत होते. झुल्याच्या खाली वर होणाऱ्या झोक्याबरोबर साहजिकच माहेरच्या गोड आठवणी तिच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या होत्या.

सासू बाईंनी चाणाक्ष नजरेने ते अचूक ओळखल. तिला एकटीला बसलेले पाहुन तिला प्रेमाने हाक मारून आत बोलावले.

"अशी एकटी कां बसलीस ? करमत नाही कां ? होत असे नवीन जागेत. नवी माणसे, नवे वातावरण हो की नाही?" असे म्हणत तिच्याकडे एक कटाक्ष टाकत त्या म्हणाल्या "नयना ये ग अशी माझ्याजवळ बस. संकोच मानू नको. अग मला मुलगी नाही. हे दोन टगे मुलगे त्यामुळे घरात मुलींचा वावर नाही. मला ही घरात मुलीच्या असण्याची सवय नाही. मुली जरा हळव्या असतात. हळुहळु जमेल हो आम्हांला पण तुझ्याशी मोकळ होणे. तुला काय हवे नको ते मला नि:संकोचपणे सांगत जा हो." असे म्हणत नयनाच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवून मायेने म्हणाल्या

"तुला माहेरची आठवण येत असेल तर चार दिवस जाऊन ये माहेरी, नकुल ही फिरतीवर गेलाय. तेवढीच तुझी भेट होईल आई-वडील, बहीणीची व तुला ही बदल थोडा होईल. दोन तासाचे तर अंतर आहे."

सासू बाईंच्या ममतेच्या हाताची उब तिला क्षणभर आईच्याच हाताची वाटली. व डोळे आसवांनी डबडबले ते ऐकून लगेच नयनाची खळी खुलली. आणि चेहऱ्यावर स्मित हास्य चमकले. हे सासूबाईंनी हेरले.

सासुबाई म्हणाल्या, "अग मी पण तुझी आईच आहे समज."

सासरे ही तिची आपुलकीने चौकशी करत. कांही खाल्लं-प्यायले का विचारत. नकुल ही प्रेमळ होता. तिला समजून घेत असे. धाकटा दीर निशांत मजा-मस्ती करत दिलखुलास होता. शेंडेफळ होत नां ? तिच व त्याच छान जमल होत. या बाबतीत नयनाने अगदी नशिब काढलं होत.

दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे सकाळी चार कपडे घेऊन ती कोकणात तिच्या माहेरी गेली. जाण्या अगोदर तिने नकुलला फोन करून सासू बाईंच्या परवानगीने माहेरी जात असल्याचे कळवले. सासू-सासऱ्यांना नयनाच्या हुषारी बद्दल कौतुक होते. त्यांनी व नकुलने तिला सांगितले होते. तुला जे काय पुढे शिक्षण,करीअर करायचे ते तूं खुशाल कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.

सासूबाई तर म्हणाल्या, "घरातले सर्व मी पाहीन त्याची काळजी तूं बिलकूल करू नको. मला अनुभव आहे हो यातला," त्या ही शाळेमधे शिक्षिका होत्या. तेव्हां त्यांच्या सासू-सासऱ्यांनी पण हेच त्यांना सांगितले होते. आजकाल संसाराची दोन्ही चाक चालती ठेवावी लागतात. तरच संसार निभावून नेणे सोयीस्कर होते.

अचानक मुलगी आलेली पाहुन आई खूष झाली. नयनाने चार दिवस आईकडून लाड करून घेतले. मैत्रिणींचा गप्पाष्टकांचा रात्रभर अड्डा, धांगडधिंगा झाला. तिच्या आवडीच्या आईने केलेल्या पदार्थावर ताव मारून झाला. बहीण नम्रता त्याच रात्री सहलीहून आली. तिचे वडील विनायकराव ही नुकतेच गावा कडून परत आले होते. ते ही खुषीत होते. त्यांच्या लाडक्या लेकीने अचानक येऊन दर्शन दिल्याबद्दल, सहलीच्या गप्पा

टप्पा, गंमती-जमती, गुपीत कुजबुजण्यात कसा वेळ गेला कळल सुध्दा नाही. मनसोक्त माहेरपण उपभोगुन झाले. पण मायेच्या सासू-सासऱ्यांची ही नयनाला प्रकर्षांने आठवण झाली. ती सर्वांना अभिमानाने सांगत होती. माझी सासरची सर्वजण देव माणस आहेत. खरा सुखाचा अर्थ मला कळला. या सुखाची तुलना कशाशी होऊ शकत नाही. मी खूप भाग्यवान आहे. हे मुलीच्या तोंडून ऐकून सुमतीबाई व त्यांचे पती मनोमन खूष झाले मुलगी सुस्थळी पडल्याचे समाधान वाटले.

माहेरपणाच सुख तिला सासरच्या सुखाच्या सहकार्यामुळे घेतां आलं. त्यामुळे नयनाचा ही आनंद गगनात मावत नव्हता. निसर्गरम्य वातावरणाची लहानपणा पासून नयनाला खूप आवड व आकर्षण होत. तिथेच सर्व बालपण गेले होत. ते स्वर्गसुख होते तिचे. फणसे काकूंच घर म्हणजे ते तिचेच घर होत. लहानपणी त्यांच्या घरी सारखा दोघी बहीणींचा राबता असायचा.काही ताजा पदार्थ केला की काकू हाक मारून आवर्जुन दोघींना खाऊ घालत. हे आठवून ती क्षणभर भूतकाळात गेली. सुमतीबाईंना कामावरून येण्यास कधी उशिरा झाला तरी त्यांना मुलींची चिंता नसे. पहिल्या पासून मुलींना काकुंचे घर हे आपलेच घर आहे असे वाटत आले होते.

तिने व नम्रताने फणसे काकूंच्या परसात लावलेली गुलाब, शेवंती, मोगरा, जाई-जुईची रोप आपुलकीने  न्याहाळली. आंबा, पेरु, केळीचे सिता फळाचे झाड, गर्द जांभळ्या रंगाने भरलेले जांभूळ झाड, त्यांना लगडलेले फळं निरखुन झाली. व लहानपणी कसा आपण यथेच्छ फलाहार करून तृप्त होत असू हे आठवून गालावर गोड हसू आले. त्यांच्या बागेतली रोज सकाळी हक्काने जाऊन कशी फुले तोडून कांही काकूंना देवपूजेस देऊन उरलेली गजरे करून केसात माळत होतो याची प्रकर्षाने नयनाला आठवण झाली. रोज अबोली, जुई, चमेली, मोगरा, बकुळीचा गजरे माळून कसे आपण शाळेत जात असू, हे तिला आठवलं. तेव्हां मैत्रिणी तिला डोक्यावर फुलांचा बगीचा घेऊन आली असे लाडिकपणे चिडवत असत. तिला त्याचा राग येत नसे. आनंदच व्हायचा. तिच्या आयुष्यातील ते सर्व दिवस असेच होते.

लहानपणी तिने शाळेत मराठीचा तास चालू असतांना मागच्या बेंचवर बसून एक कविता केली होती. त्यावरून तिला वर्ग शिक्षिकेचा ओरडा ही बसला व शाबासकीची व कौतुकाची थापही मिळाली होती. टीचरला ती कविता इतकी आवडली की ती शाळेच्या स्नेहसंमेलनांत स्पर्धेत तिला वाचून दाखविण्यास सांगितली आणि चक्क तिला मान्यवरांनी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर केल. डेरेदार विविध रंगांनी सजलेला टवटवित गुलाब पुष्प गुच्छ आणि बक्षीस देऊन तिच पोटभर कौतुक केल होत. ती कविता काय आहे ती वाचून आपण कवितेचा आस्वाद

वाट वळणाची नागमोडी दाट झाडीची
वळणा वळणाची राईतून जायची
वळणाची काट्या-कुट्यांची
सुखद गोड गारव्याची
वाट मायेच्या माझ्या माहेराची ॥१॥

चुकल्या-मुकल्या वाटसरूंची
काटेरी झुडपांची,करवंदाच्या जाळ्यांची
अंबराईच्या मोहराची,सुगंधाची
लाल मातीच्या डोंगरांची
लाल मातीच्या वासाची,लाल मातीची ॥२॥

ढगाळलेल्या मेघांची,सळसळत्या पानांची
गुलमोहराच्या रंगांची,मंद-कुंद सुवासाची
कधी रणरणत्या उन्हाची
कधी निरभ्र आकाशाची
खूणावते वाट माझीया माहेराची ॥३॥

डोंगरा पलीकडील अस्ताचलाची,प्रतिबिंबाची
क्षितीजा पाशी दूरवर दिसणाऱ्या मृगजळाची
पाऊल वाटेवर पडणाऱ्या वर्षा बिंदूंची
डोळी साठविलेल्या स्वप्नमय आभासाची ॥४॥

माझ्या माहेराची वाट दऱ्या-खोऱ्यांची
ओढ्या-नाल्यांची,गोड आठवणींची
सदा राहील,हृदयी कोरलेल्या आठवांची
ओंजळ भरून,वाहीलीया वाट माहेराची ॥५॥

आठवणीत रममाण झालेली कवि मनाची नयना दचकून सत्यात आली. ती अजून ही कविता करते, कविता वाचनात भाग घेते. तिचा एक कविता संग्रह "काव्य सरीता" या नावाने नुकताच प्रसिध्द झाला असून रसिकांचा त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला, तो तिचा आवडीचा छंद आहे.

इतक्यातच नकुलचा फोन खणखणला अन् स्वप्नरंजनातून जागी होत तिने नकुलचा फोन उचलला. तो नुकताच घरी पोहचला होता. त्यालाही त्याने आणलेली सरप्राईज वस्तु तिला द्यायची घाई झाली होती. लगेचच पहाटेच्या गाडीने ती सासरी जायला निघाली. सासर माहेराचा समन्वय राखून समाधानाची चटणी भाकर, तूप-रोटी खाऊन तृप्त होऊन, नयना तिच्या माहेराची सुखाची ओटी भरभरून दुसऱ्या माहेरी अर्थात सासरी आनंदाने गेली. सुख म्हणजे काय असत? ते हेच तिच्यासाठी अनमोल नात्यांच अविस्मरणीय सुख होत. शोधून न मिळणाऱ्या सुखाने तिची ओंजळ ओतप्रोत भरून वहात होती. "सामंजस्य" हे सुखाचे ब्रीदवाक्य आहे. व त्याचा समन्वय झाल्याने 'सुख आले माझ्या दारी' असे सहज तिच्या मुखातून वाक्य बाहेर आलं.

*****

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel