योगेश खालकर

आयुष्य रूपी पाठ शाळेत शिक्षण कधी थांबत नसतं. कधी कधी आपल्याला अशी माणसं भेटतात की त्यांना पाहिलं की जीवन नव्याने जगण्याचे बळ मिळते. अगदी असचं एक संकटांना हसत स्विकारुन ती संकट निवारण करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे आमच्या रमा काकू. रमा काकू म्हणजे धैर्याचा सागर, उत्साहाचे मुर्तिमंत प्रतिक. रमा सदाशिव साने असे त्यांचे पुर्ण नाव. गल्लीच्या कोपर्‍यावर "भाजी, ताजी ताजी भाजी" अशी आरोळी सकाळी नऊ वाजता आली की समजावे रमा काकू भाजीची गाडी घेवून आल्या. आयुष्याच्या ऊन-पावसाळ्याचे त्यांनी अनेक कठीण प्रसंग अनुभवले आहेत. अगदी अपघातात घरातील सर्व सदस्यांचा स्वतःच्या डोळ्यादेखत झालेला मृत्यू त्यांना पचवावा लागला. त्यामुळेच की काय त्यांनी आम्हांला एका मोठ्या संकटातून बाहेर काढलं.

ही गोष्ट तशी जुनी आहे. त्यावेळी आम्ही सर्वजण कळव्याला राहत होतो. २६ जुलै रोजीचा तो महापुर आठवला की आजही अंगावर शहारे येतात. मुंबईमध्ये दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडत होता. ठाणे-मुंबईत रहाणार्‍या माणसांना मुसळधार पाऊस नवीन नसल्यामुळे काही नवल वाटत नव्हते. पण ती काळजाचा थरकाप उडवणारी २६ जुलैची सकाळ उजाडली. आई-बाबा मुसळधार पाऊस चालू असताना कामावर गेले.

आमचे घर पारसिक डोंगराच्या कुशीत होतं. सकाळचे आठ-साडेआठ झाले असतील मी कॉलेजला जायची तयारी करत होतो. अचानक धडधड धडधड आवाज आला मी गच्चीत येवून पहाणारचं तेवढ्यात मला आमच्या पुढच्या रूम मधील काचा फुटण्याचा आवाज आला. काय घडतंय हे पहाण्यासाठी मी पुढे येणार तेवढ्यात मला काय घडले ते कळलेच नाही कारण पारसिक डोंगरावरचे छोटे-छोटे दगड खाली आमच्या घरावर येवून पडत होते आणि नेमकी एक मोठी दरड आमच्या इमारतीवर आली. निसर्गापुढे कोणाचे चालत नाही या नियमाप्रमाणे त्या दरडी मुळे आमची इमारत भुईसपाट झाली. मी त्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलो. मला काहीच कळत नव्हते. हे सर्व अगदी काही क्षणात घडले होते.

नेहमीच्या सवयीप्रमाणे रमा काकू भाजी विकण्यासाठी आल्या पण त्यांना वेगळचं चित्र दिसले. इमारत भुईसपाट झाली आहे. लोक ढिगार्‍याखाली दबलेत. किंकाळ्यांनी तो परिसर भरून गेला होता. याही परिस्थितीत धीर न सोडता रमा काकूंनी अग्निशमक दलाला आणि पोलिसांना बोलावले आणि ते येईपर्यंत वाट न पहाता आजूबाजूच्या लोकांना एकत्र करून ढिगारा बाजुला करायला लागल्या हे करत असताना त्याच्या हातांना माझा हात लागला मी वर यायची धडपड करत होतो. त्यांनी मला धीर दिला आणि आजूबाजुच्या माणसांना बोलावून मला सुरक्षितपणे वर काढले. खरचं रमाकाकू त्यादिवशी माझ्यासाठी देवदुत बनून आल्या होत्या. खरोखर संकटकाळी त्यांनी जी मदत केली ती अविस्मरणीय आहे. ही मदत त्यांनी सर्व नात्यागोत्याच्या पलीकडे जावून केली, स्वतःचा जीव धोक्यात घातला. मानवताधर्म आपल्या कर्मातून सांगणार्‍या रमाकाकूंना काय म्हणावे ?  हे समजत नाही.      

*****

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel