प्रश्न --मी जर सत्याशी प्रामाणिक असेन तर मला हे कबूल केले पाहिजे की कधीकधी मी लोकांचा अत्यंत तिरस्कार करतो व कधी कधी द्वेषही करतो .यामुळे माझे जीवन अत्यंत क्लेशमय दुःख पूर्ण व त्रासदायक झाले आहे .बौद्धिकदृष्ट्या मला कळते की हा तिरस्कार व द्वेष  म्हणजे मीच आहे .परंतु मी त्याच्याशी मुकाबला करू शकत नाही .तुम्ही मला एखादा मार्ग दाखवू शकता काय़ ?

उत्तर---बौद्धिकदृष्ट्या म्हणजे आपली काय समजूत आहे ?जेव्हा एखादी गोष्ट बौद्धिकदृष्ट्या आपल्याला समजली असे आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला नक्की काय म्हणायचे असते?बौद्धिक समज आशी एखादी गोष्ट खरोखरच अस्तित्वात असते काय ?का मनाला फक्त शब्द कळतात. कारण एकमेकांशी दळणवळण ठेवण्याचा तोच एक उपलब्ध मार्ग आहे ?एखादी गोष्ट खरोखरच आपल्याला बौद्धिक दृष्ट्या,शाब्दिक दृष्ट्या,समजते काय?प्रथम मला हे स्पष्ट केले पाहिजे की तथाकथित बौद्धिक समज, ही खऱ्या समजाला अडथळा आहे की काय,हे प्रथम आपण पाहिले पाहिजे .  समज ही संपूर्ण असते ती विभागाश: अर्धवट असूच शकत नाही. एक ती असते किंवा नसते .एक मला काहीतरी समजते किंवा समजत नाही."मला बौद्धिकदृष्ट्या एखादी गोष्ट कळते"असे म्हणणे म्हणजे खऱ्या समजाला अडथळा निर्माण करणे होय .ती विभागश: प्रक्रिया आहे आणि म्हणून तिथे समजणे मुळीच नसते .

आता प्रश्न असा आहे की द्वेषमय व तिरस्कारमय अशा या "मी" पासून,या समस्येपासून स्वतंत्र कसे व्हावे?किंवा या समस्येशी मी मुकाबला कसा करावा .आपण एखादी समस्या कशी हाताळतो ?समस्या हे काय आहे?कोणतीही समस्या म्हणजे अंतरंगात निर्माण झालेली ढवळाढवळ होय.

मी मत्सरी आहे. मी द्वेषपूर्ण आहे. मी लोकांचा मत्सर करतो.द्वेष करतो.मला याचे फार दुःख होते.आता मी काय करावे?मी यांच्यापासून कसे स्वतंत्र व्हावे? केवळ काही क्षणी  नव्हे तर खरोखरच संपूर्णपणे मूलगामीरित्या मी यांच्यापासून कसे स्वतंत्र व्हावे ?मी काय करावे ?मी कसे वागावे ?

यामुळे माझी मन:स्थिती ढवळली गेली आहे. म्हणूनच ती समस्या आहे.जर माझी मन:स्थिती अस्थिर झाली नसती, जर मी ढवळला गेलो नसतो, जर मला दुःख झाले नसते, तर ती माझी समस्या नसती. त्यामुळे क्लेश, दुःख, अस्थिरता, ढवळाढवळ निर्माण होते अशी स्थिती, मला त्याज्य  निंद्य वाईट बेढब  वगैरे वाटते. म्हणून  मला त्यांच्यापासून स्वतंत्र व्हायचे आहे .म्हणजे मी द्वेषाला विरोध करीत नाही तर माझा विरोध ढवळाढवळीला आहे .मी ढवळाढवळीला विरोध करीत नाही काय ?निरनिराळ्या काळी निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या प्रसंगी मी माझ्या कलाप्रमाणे मर्जीप्रमाणे  लहरीप्रमाणे त्या ढवळाढवळीला निरनिराळी नावे देतो .एके दिवशी मी त्याला क्ष म्हणतो तर एका दिवशी मी त्याला ज्ञ म्हणतो .परंतु मूलभूत वासना मला त्रास होऊ नये,माझी  समस्थिती विचलित होऊ नये, अशी असते .आपली वासना बरोबर हीच नसते काय ?सुख हे ढवळाढवळ करणारे नसल्यामुळे मी त्याचा स्वीकार करतो .मला सुखापासून स्वतंत्र व्हावे असे वाटत नाही, निदान तूर्त तरी वाटत नाही.कारण त्यामुळे ढवळाढवळ होत नाही .द्वेष व तिरस्कार माझ्या मनात प्रचंड ढवळाढवळ निर्माण करतात ,म्हणून मला त्यांच्यापासून स्वतंत्र व्हायचे आहे .जर त्यांनी ढवळाढवळ केली नसती तर मला त्यांच्यापासून स्वतंत्र व्हावे असे वाटले नसते .

माझे खरे ध्येय मला धक्का पोचू नये, मी ढवळला जाऊ नये,हे आहे .मी एक असा मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहे की जिथे मी मुळीच ढवळला जाणार नाही.मी ढवळला का जावू नये ?मी ढवळला गेलोच पाहिजे .तरच मी शोध घेऊ शकेन .शोधासाठी मी ढवळला जाणे अत्यावश्यक नाही काय ?असामान्य चढउतार,असामान्य धक्केचपाटे,उताविळपणा,द्वेष, क्लेश, दुःख, यांच्यातून मी गेलो पाहिजे ;म्हणजे खरा शोध घेण्यासाठी मी तयार होईन.अशा परिस्थितीत  मला शोध घ्यावासा वाटेल .तसा मी जाणे आवश्यक नाही काय?जर मला धक्के मिळाले नाहीत, जर मी तळापासून ढवळला गेलो नाही, तर मी निद्रावस्थेत राहीन.आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी शांती, निद्रावस्थेतील शांती, हवी असते .त्यांना शांतता हवी असते.त्यांना निद्रा हवी असते.त्यांना धक्क्यांपासून दूर जायचे असते .त्यांना निराळे पणा हवा असतो. त्यांना वेगळे पडून रहायचे असते.त्यांना एकांत हवा असतो. त्यांना कोंडी करून राहायचे असते .त्यांना सुरक्षित राहायचे असते .ढवळला जाणे याबद्दलचा माझा दृष्टिकोन विरोधी नसेल,कारण मला खरेच समजून घ्यायचे आहे .मला शोध घ्यायचा आहे .मात्र हा दृष्टिकोन खरा आतून आला पाहिजे. उथळ वरवरचा असता कामा नये .या ढवळण्याचे मी स्वागत करू शकतो .आता मी शोध घेवू शकतो . द्वेष व तिरस्कार यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन आता पूर्णपणे बदललेला आहे .तो बदललेला नसतो काय ?त्यांच्यामुळेच मी शोध घेण्याला उद्युक्त झालो .जर मी ढवळले जाण्याला विरोध करीत नसेन तर मग  त्या ढवळण्याला दिलेल्या निरनिराळ्या नावांना काहीच अर्थ नाही .त्यांना काहीच महत्व नाही .आता त्या नावांना महत्त्व आहे काय?द्वेष मत्सर या शब्दांना आता काही महत्त्व नाही .त्याला काही महत्त्व आहे काय?अर्थातच नाही .कारण आता ती तिरस्कार स्थिती शब्दीकरण केल्याशिवाय मी अनुभवीत आहे.

राग हाही द्वेष  तिरस्कार मत्सर  याप्रमाणे फार ढवळाढवळ करणारा आहे .आपल्यापैकी  फारच थोडे जण राग हा शब्दीकरण केल्याशिवाय प्रत्यक्ष  अनुभवतात .जर आपण शब्दीकरण केले नाही, जर अापण त्याला राग म्हटले नाही, तर एक वेगळाच अनुभव येतो. तो येत नाही काय?आपण वर्गीकरण करतो . आपण नवीन अनुभव कमी करतो . किंवा जुन्या वर्गीकरणामध्ये बसवून आपण मोकळे होतो . जर आपण वर्गीकरण केले नाही तर तो अनुभव प्रत्यक्ष समजला जातो .ही समज, अनुभवण्यात बदल घडवून आणते .

उदाहरणार्थ आपण क्षुद्रपणा हलकटपणा घेउंया. आपल्यापैकी बरेचजण आपण  हलकट असू,तर त्याबद्दल जागृत नसतात .पैशांबाबतचा क्षुद्रपणा, क्षमा करण्याबाबतचा क्षुद्रपणा,आता क्षुद्रपणा म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहेच. मला खात्री आहे की क्षुद्रपणा व हलकटपणा म्हणजे काय हे आपण ओळखतो .आता याबद्दल जागृत होऊन आपण त्यापासून कसे काय स्वतंत्र होणार आहोत?क्षुद्रपणापासून स्वतंत्र होणे म्हणजे उदार बनणे नव्हे.कशाच्याही विरुद्ध बनणे हा मुद्दाच येथे उद्भवत नाही.क्षुद्रपणापासून स्वतंत्र असणे म्हणजेच उदार असणे .त्यासाठी तुम्हाला उदार बनावे लागत नाही.अर्थात याबद्दल आपण फार जागृत असले पाहिजे .तुम्ही तुमच्या मित्राला, तुमच्या समाजाला, देणग्या देण्यासाठी उदार असाल; परंतु एखाद्या हॉटेलमधील वेटरला किंवा आणखी कोणा कर्मचाऱ्याला बक्षीस देण्याबाबत कंजूष असाल.क्षुद्र असाल . क्षुद्रपणा म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला माहित आहे .फक्त आपण त्याबद्दल झोपलेले असतो .जेव्हा आपण त्याबद्दल जागृत असतो तेव्हा काय होते ?आपण आपली इच्छाशक्ती उदार बनण्याकडे लावतो .आपण क्षुद्रपणावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करतो .आपण उदार बनण्यासाठी स्वतःला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो वगैरे वगैरे . परंतु काही बनण्यासाठी इच्छाशक्ती वापरणे हाही एका मोठ्या वर्तुळातील का होईना, वेगळ्या प्रकारचा का होईना,  परंतु क्षुद्रपणाच आहे .जर आपण याबद्दल काहीही न करता जागृत असू,यातील सर्व गर्भितार्थसह, नामकरणाशिवाय, वर्गीकरणाशिवाय, जागृत असू तर आपल्याला असे आढळून येईल की अत्यंत मूलगामी क्रांतिकारक बदल घडून आला आहे . 

कृपा करून याचा प्रयोग करून पाहा .प्रथम एखादा ढवळला गेला पाहिजे . आपल्यापैकी बऱ्याच जणांना  ढवळले जाणे आवडत नाही .हेही साहजिकच आहे .आपल्याला असे वाटते की आयुष्याची दिशा आपण निवडलेली आहे .आपण योग्य आकार व दिशा निश्चित केली आहे .स्वाभाविक मग गुरू, एखादी श्रद्धा, किंवा आणखी काहीही असो, ते याठिकाणी महत्त्वाचे नाही; त्या ठिकाणी आपण स्थिर होण्याचा प्रयत्न करतो .हे एखादी लठ्ठ पगाराची नोकरी असणे व मग जन्मभर त्याच ठिकाणी चिकटून राहण्यासारखे आहे .त्याच साच्यातून, त्याच बौद्धिक साच्यातून, आपण ज्या गुणधर्मापासून मुक्त व्हावे असे वाटते, त्या गुणधर्माकडे पाहतो.आपण ढवळले जाण्याचे, अंतर्यामी अत्यंत असुरक्षित वाटण्याचे,व कशावरही अवलंबून नसण्याचे महत्त्व लक्षात घेत नाही. असुरक्षिततेतच तुम्ही शोध घेऊ शकता.पाहू शकता. समजू शकता .आपल्याला भरपूर पैसा व आरामशीर जीवन असलेल्या मनुष्यासारखे असावे असे वाटते .असा मनुष्य ढवळला जाणार नाही त्याला ढवळले जाणे नको असते.

ढवळणे धक्का हा समजासाठी आवश्यक आहे . सुरक्षितता शोध हा समजाला अडथळा आहे .जेव्हा आपल्याला ढवळण्यापासून मुक्त व्हावे ही इच्छा असते  तेव्हा ही इच्छा समजाला अडथळा ठरते .जर आपण एखादी भावना अनुभवू शकू, नाम करणाशिवाय अनुभवू शकू, तर मला असे वाटते की त्यामध्ये खूपच शोध लागू शकेल .नंतर आपले त्या ढवळण्याबरोबर युद्ध होणार नाही.कारण आता येथे अनुभवणारा व अनुभवावयाचे ही दोन्ही एकच असतात .हे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे .जोपर्यंत अनुभवणारा, अनुभवाचे शब्दीकरण करीत आहे, तोपर्यंत तो स्वतःला अनुभवापासून वेगळा पाडीत आहे .नंतर त्या शब्दीकृत भावनेवर कार्य करीत आहे .अशी क्रिया असत्य फसवी असते .जर शब्दीकरण नसेल तर अनुभवणारा व अनुभवावयाची वस्तू ही दोन्ही  एकच असतात .ही एकात्मता  आवश्यक आहे .तिला प्रत्यक्ष शूरपणे क्रांतिकारकररित्या तोंड दिले पाहिजे .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel