प्रश्न --बदल म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ?
उत्तर--मूलगामी क्रांतिकारक बदल अर्थातच आवश्यक आहे .जगावरील चालू संकटात त्याचीच गरज आहे .आपले अस्तित्व त्याची मागणी करीत आहे.दैनंदिन आकांक्षा,घटना, उतावळेपणा,त्याची आवश्यकता दर्शवित आहेत .अत्यंत मूलगामी सर्वांगीण क्रांती आवश्यक आहे .आपल्या भोवतालची प्रत्येक गोष्ट जमीनदोस्त झालेली आहे .वरवर आपल्याला व्यवस्था दिसत आहे, परंतु मंदगतीने विनाश व विघटन सुरू आहे .जीवित लहरीवर विनाश लहरी पसरत आहेत .
तेव्हा क्रांतीची निश्चित आवश्यकता आहे .ही क्रांती कल्पनाधिष्ठित असून चालणार नाही .कल्पनाधिष्ठित क्रांती म्हणजे कल्पना सातत्य होय.अशी क्रांती मूलगामी क्रांती असूच शकत नाही. कल्पनाधिष्ठित क्रांती अव्यवस्था विनाश व रक्तपात आणते. अव्यवस्थेमधून तुम्ही व्यवस्था कधीही आणू शकणार नाही .जाणून बुजून अव्यवस्था आणून ,त्यातून व्यवस्था निर्माण करण्याची आशा तुम्ही करू शकत नाही .या गोंधळातून सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलेले नाही .या पद्धतीने विचार करणारे लोक आणखीच गोंधळ निर्माण करतात .मात्र त्यातून व्यवस्था निर्माण करण्याची आशा करतात .ही सर्व विचार पद्धतीच चुकीची आहे .या क्षणी त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, म्हणून ते असे धरून चालतात की सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे मार्ग त्यांना माहीत आहेत .प्रत्यक्षात लहान मोठी युद्धे सर्वत्र चालू अाहेत. निरनिराळ्या लोकांमध्ये वर्गांमध्ये देशांमध्ये भयानक स्वरूपाची विषमता आढळून येते.आर्थिक सामाजिक व राजकीय विरोध सर्वत्र आढळून येतो .सत्ता संपत्ती व सामर्थ्य यामध्येही मोठ्या प्रमाणात विषमता आढळून येते. आनंदी सामर्थ्यशाली व न ढवळलेले एका बाजूला आणि दुःख विरोध व क्लेश यांनी ग्रासलेले दुसऱ्या बाजूला अशी वस्तुस्थिती दिसून येते . या दोन प्रकारच्या लोकांमध्ये खोल दरी आढळून येते .हे सर्व पाहिले म्हणजे क्रांतीची जरुरी आहे, मूलभूत बदलाची आवश्यकता आहे ,असे तुम्हाला वाटत नाही काय?
हा बदल ही मूलगामी क्रांती शेवट आहे कि क्षणाक्षणाला अस्तित्वात येणारी गोष्ट अाहे.?ती एक शेवटी प्राप्त होणारी गोष्ट असावी,असे असले तर ते तुम्हाला आवडेल हे मला माहित आहे .कारण जे दूर आहे त्या भाषेत बोलणे फार सोपे आहे .शेवटी आपण बदलू. शेवटी आपण आनंदी असू . शेवटी आपल्याला सत्य सापडेल.असे म्हटले की आता काही करण्याला शिल्लक रहात नाही.तूर्त आपण येरे माझ्या मागल्या चालू ठेवू शकतो .असे भविष्याच्या भाषेत विचार करणारे मन,हे वर्तमानात क्रिया करण्यास असमर्थ आहे. म्हणूनच असे मन हे बदलाचा शोध घेत नाही.ते फक्त बद्दल टाळीत असते .बदल म्हणजे आपली काय समजूत आहे?
बदल भविष्यात नव्हे तो भविष्यात कधीही असू शकणार नाही .बदल फक्त आत्ता असेल.तो क्षणाक्षणाला असेल.बदल म्हणजे आपली काय समजूत आहे ?बदल होणे फारच सोपे आहे .सत्य हे सत्य म्हणून पाहणे व असत्य हे असत्य म्हणून पाहणे म्हणजेच बदल होय .
जेव्हा तुम्ही काहीतरी, सत्य म्हणून स्पष्टपणे पाहता तेव्हा ते सत्य तुमची मुक्तता करते .जेव्हा तुम्ही काहीतरी, असत्य म्हणून पाहता तेव्हा ते असत्य आपोआपच गळून पडते.जेव्हा तुम्ही धार्मिक प्रार्थना ,म्हणजे पोकळ पुनरुक्ती आहे हे स्पष्टपणे पहाता,जेव्हा तुम्ही त्यातील सत्य पहाता, जेव्हा तुम्ही त्याचे समर्थन करीत नाही,तेव्हा बदल घडून येत नाही काय ?कारण आतां आणखी एक बंध गळून पडलेला असतो .जेव्हा तुम्ही वर्गभेद असत्य आहे हे पाहता, त्यामुळे विरोध क्लेश व दुःखे निर्माण होतात हे पाहता, त्यामुळे लोक दुभंगले जातात हे पाहता,जेव्हा तुम्ही यातील सत्य पाहता, तेव्हा ते सत्य तुमची सुटका करीत नाही काय ?(सत्य खरोखरच आतून उमजले पाहिजे केवळ वरवरची तोंडपाटीलकी उपयोगी नाही) सत्यग्रहण म्हणजे बदल नव्हे काय ? आपण असत्याने वेढून गेलेले आहोत .ती असत्यता प्रतिक्षणी ग्रहण करणे म्हणजेच बदल होय.सत्य हे साचत जाणारे नाही.ते क्षणाक्षणाला प्रतिक्षणी आहे .जे साचत जाणारे व शक्यतो न जाणारे असे आहे ते म्हणजे स्मरण होय .स्मरणातून तुम्ही कधीही सत्य शोधू शकणार नाही.स्मरण हे कालातील आहे. काल म्हणजे भूत वर्तमान भविष्य होय.काल म्हणजे सातत्य होय. त्याला ते अनादि अनंत कधीही सापडणार नाही.अनादि अनंत सातत्य असू शकत नाही .ज्याला सातत्य आहे ते अनादि अनंत असू शकत नाही .अनादि अनंत प्रत्येक क्षणात असते .अनादि अनंत आत्ता .आत्ता ही भूत प्रक्रिया नाही .ते भूताचे भविष्यात वर्तमानामार्फत टिकणारे सातत्यही नाही.
जे मन भविष्यकाळात बदल घडून यावा अशी इच्छा करते,जे मन बदल म्हणजे शेवटी घडून येणारी एक गोष्ट असे समजते,अश्या मनाला सत्य कधीही सापडणार नाही .सत्य ही एक अशी वस्तू आहे की जी क्षणाक्षणाला अस्तित्वात येत असते .ती प्रतिक्षणी नवीन म्हणून शोधली जाते .ती प्रतिक्षणी नवीन म्हणून ग्रहण केली जाते .ती संग्रह प्रक्रिया नाही .जर जुन्याचे ओझे तुम्ही वहात असाल तर तुम्हाला नवीन कसे काय सापडणार?जुन्याचे ओझे थांबले की नवीनाचा शोध लागलाच.नवीनाचा,अनादिचा, अनंततेचा,प्रतिक्षणी क्षणाक्षणाला शोध लागण्यासाठी असामान्य तत्पर तरल मनाची गरज आहे . असे मन फलप्राप्तीची इच्छा करीत नाही.असे मन काहीही बनत नसते.सतत बनत असलेल्या मनाला पूर्ण तृप्तता म्हणजे काय ते कधीही कळणार नाही. जे तरल नाही,ज्याला काहीही आकांक्षा नाही, जे स्वतःमध्येच मश्गूल आहे,असे मन म्हणजे पूर्ण तृप्त मन नव्हे. ध्येयप्राप्तीचे समाधान म्हणजे पूर्ण तृप्तता नव्हे .मन जेव्हा जे आहे त्यातील सत्यता पहाते, व जे आहे त्यातील असत्यही पाहाते, अशी स्थिती म्हणजे पूर्ण तृप्तता होय .त्या सत्याचे ग्रहण क्षणाक्षणाला होत असते .
बदल हे फल नाही .बदल हा शेवटही नाही बदल हे ध्येयही नाही . फल म्हणजे अवशेष आले, कार्यकारण आले.जिथे कार्यकारण आहे तिथे परिणामही आहे .परिणाम हे तुमच्या बदल व्हावे या वासनेचे फल आहे .जेव्हा तुम्ही बदल व्हावा अशी वासना करता,तेव्हा तुम्ही अजूनही बनायच्या भाषेतच विचार करीत असता .जे बनत आहे त्याला असणे म्हणजे काय ते कधीही कळणार नाही .प्रतिक्षणी केवळ असणे म्हणजेच सत्य होय .ज्या आनंदाला सातत्य आहे तो आनंद नाही. कालरहितस्थितीअस्तित्व म्हणजेच आनंद होय .जेव्हा असामान्य असमाधान असेल, तेव्हाच ती कालरहित स्थिती अस्तित्वात येईल .ज्या असामान्य असमाधानाने कुठली ना कुठली पळवाट शोधून काढली आहे, कुठचा ना कुठचा मार्ग शोधून काढला आहे,असे असमाधान नव्हे .ज्या असमाधानाला कुठची ही पळवाट राहिली नाही, जे फलप्राप्तीची आशा करीत नाही, असे असमाधान होय.तेव्हाच त्या विलक्षण असमाधान स्थितीमध्ये सत्य अस्तित्वात येऊ शकेल.सत्य विकत घेता येत नाही.सत्य विकताही येत नाही. सत्याची पुनरुक्तीही करता येत नाही .क्षणाक्षणाला प्रतिक्षणी प्रत्येक स्मितात,प्रत्येक अश्रूत, प्रत्येक निर्जीव पर्णात, प्रत्येक भटक्या विचारात ,केवळ प्रेम परिपूर्णतेत, शोधावयाची बघावयाची समजावयाची व अनुभवण्याची ती वस्तू आहे .
प्रेम हे सत्याहून भिन्न नाही .काल म्हणून विचार प्रक्रिया जेव्हा पूर्णपणे थांबते, ती स्थिती म्हणजे प्रेम होय .जिथे प्रेम आहे तिथे बदल आहे .प्रेमाविना क्रांतीला काहीच अर्थ नाही .प्रेमाविना क्रांती म्हणजे विनाश,विघटन, जास्त जास्त क्लेश व गोंधळ होय.जिथे जिथे प्रेम आहे तिथे तिथे मूलगामी क्रांती आहे . कारण प्रेम म्हणजे प्रतिक्षणी बदल होय.
++++++++++++++++++
प्रभाकर पटवर्धन
राजश्री घापे यांस,कोणाचेही विचार समजताना आपल्या विचारांचा पडदा आड येतो. तो एकदा दूर करण्याचे कसब साधले कि कृष्णमूर्ती समजणे सोपे होते.