प्रश्न --उथळ मनुष्याने गंभीर कसे बनावे ?

उत्तर--आपण उथळ  आहोत याबद्दल प्रथम स्वतः जागृत असले पाहिजे.जागृत असणे आवश्यक नाही काय? उथळपणा म्हणजे आपली काय समजूत आहे ?अवलंबून असणे म्हणजेच उथळपणा नाही काय?प्रेरणा,संवेदना,आव्हान, दुसऱी व्यक्ति, काही तथाकथित मानसिक मूल्ये, अनुभव,काही विशिष्ट आठवणी,या सर्वांवर अवलंबून असणे म्हणजेच उथळपणा नाही काय ?जर मला काही विशिष्ट स्तोत्रे,प्रार्थना, इ.माझी एकत्वाची भावना टिकविण्यासाठी,किंवा एकदा अनुभवलेली भावना पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी, आवश्यक असतील, तर हा सगळा क्षुद्रपणा नाही काय ?मी जेव्हा स्वतःला एखाद्या भावनेला, राष्ट्राला, एखाद्या पक्षाला वाहून घेतो तेव्हा मी क्षुद्र  बनत नाही काय ?ही सर्व अवलंब प्रक्रिया म्हणजे स्वटाळाटाळ होय. माझ्याहून काही मोठे असलेल्याशी समरसता म्हणजे मी जो काही आहे ते नाकारणे होय.मी जो काही आहे ते मी नाकारू शकत नाहीं .मी जो काही आहे ते मला समजून घेतले पाहिजे .मी स्वतःला विश्व, परमेश्वर ,सत्य, एखादा राजकीय पक्ष ,राष्ट्र, इत्यादीशी समरस होण्याचा प्रयत्न करता कामा नये . हे सर्व उथळ विचाराला कारणीभूत होते व उथळ  विचारातून आलेली क्रिया ही नेहमीच खट्याळ  असते.  मग ती जागतिक पातळीवरील असो किंवा वैयक्तिक पातळीवरील असो .

प्रथम अापण हे सर्व करीत असतो याबद्दल अापण जागृत आहोत काय?आपण याबद्दल मुळीच जागृत नसतो. अापण हे करीत आहोत हेही आपल्याला माहीत नसते.उलट आपण याचे समर्थन करीत असतो .जर मी हे केले नाही तर मग मी करावे तरी काय ?माझी फारच शोचनीय स्थिती होईल. माझ्या मनाचे तुकडे तुकडे होतील.निदान मी आता काही चांगल्यासाठी तरी प्रयत्न करीत आहे .(मी जर काहीही प्रयत्न केले नाहीत तर मी ढ गोळा होऊन राहिन) आपण जो जो जास्त धडपडतो, तो तो जास्त उथळ  बनत जातो .प्रथम अापण हे जे काही करत आहोत ते लक्षात आले पाहिजे.स्वतःला मी जसा आहे तसे पाहणे,मी मूर्ख शिरोमणी आहे याची पावती देणे,मी उथळ आहे, मी संकुचित आहे,मी मत्सरी आहे, हे जाणणे खरोखरच लक्षात घेणे, ही फार बिकट आणि मोठी गोष्ट आहे .जर मी,जो काही मी आहे ते पाहीन, मी स्वत:ला ओळखीन,तर आता मी येथून सुरुवात करू शकतो .जे काही आहे त्यापासून जे मन पळू पाहाते, ते उथळ असते.न पळणे यासाठी अत्यंत बिकट असा स्वशोध घ्यावा लागतो .जे काही चालू आहे त्याचा,  बदलण्याच्या प्रवृत्तींचा, त्याग करावा लागतो .ज्या क्षणी मी उथळ आहे हे मी ओळखतो,त्या क्षणी खोल होण्याची प्रक्रिया सुरू  झालेली असते .मात्र मी त्या उथळपणा बद्दल काहीही करता कामा नये .जर मन म्हणेल कि "मी क्षुद्र आहे आणि मी या क्षुद्रपणाचा,मी का क्षुद्र  आहे त्याचा, छडा लावणार आहे.मी ही सर्व क्षुद्रता प्रक्रिया समजून घेणार आहे"तर मग बदलाची शक्यता आहे. "परंतु जर क्षुद्र मन स्वतः क्षुद्र आहे हे ओळखून वाचन, गुरू,महापुरुषांच्या भेटीगाठी, प्रवास व तीर्थयात्रा, इत्यादिकांनी माकडासारखे क्रियाशील राहून क्षुद्रपणा घालविण्याचा प्रयत्न करीत राहील ,तर ते अजूनही क्षुद्र आहे .

तुमच्या हे लक्षात आले असेल की खरी क्रांती समस्येकडे योग्य रीतीने जाऊनच होते.योग्य पद्धत, समस्येची योग्य हाताळणी, समस्येकडे पाहण्याची योग्य दृष्टी,असामान्य आत्मविश्वास देते.मी तुम्हाला खात्री देतो की जर योग्य दृष्टिकोन असेल तर तुम्ही स्वतःच्या पूर्वग्रहांचे, धारणेचे, पर्वत हलवू शकता .स्वतःच्या मनाच्या उथळपणाबद्दल जागृत झाल्यानंतर व जागृत असताना  कृपा करून खोल बनण्याचा प्रयत्न करू नका.उथळ मनाला खोल काय हे कधीही कळणार नाही.माझ्याजवळ अगणित ज्ञान माहिती असेल, मन शब्दांची पुनरुक्ती करू शकेल, क्रियाशील उथळ मनाचे हे सर्व खेळ तुम्हाला माहित आहेतच.जर तुम्ही स्वतः उथळ   आहा हे जाणाल,जर त्या उधळपणाबद्दल जागृत असाल , मनाच्या सर्व हालचाली योग्य अयोग्य निर्णयाविना समर्थनाविना, धि:काराविना पाहाल,तर तुम्हाला लवकरच आढळून येईल की तुमच्या कुठल्याही हालचाली शिवाय तो सर्व  उथळपणा नष्ट झाला आहे .या सर्वांसाठी प्रतीक्षा जागृतता अखंड पहारा लागतो. परिणामांसाठी फलप्राप्तीसाठी उताविळता असून उपयोगी नाही .फक्त उथळ  मनालाच यश फळ हवे असते .

तुम्ही जो जो या सर्व प्रक्रियेबद्दल जास्त जागृत व्हाल.तो तो मनाच्या निरनिराळया  हालचालींचा तुम्हाला  तपास लागेल .तुम्ही त्या हालचालींचाचा शेवट करण्याच्या प्रयत्नाविना फक्त पाहिले पाहिजे . ज्याक्षणी तुम्ही फलाशा करता त्या क्षणी पुन्हा तुम्ही "मी"व "मी नाही"या द्वैत विरोधात पकडले जाता व समस्या पुनः  चालूच राहते .

++++++++++++++++++

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel