इंट्रोगेशन रूममध्ये अनंत महाकाल आणि रणधीर समोरासमोर बसले होते.

बाकी सर्व टीम मेम्बर दुसऱ्या खोलीत बसले होते. डॉ.मेहता त्यांच्या कुटुंबीयांशी बोलत होते. रोहिदास, KGB आणि अभिषेक हे तिघे एका लाकडी टेबलाभोवती आरामात बसले होते. डॉ.सोनाली पर्रीकर यांनी काही काळ शांत राहणे पसंत केले. त्या बाजूच्या दुसऱ्या टेबलावर बसून डायरीत काहीतरी लिहीत होत्या. KGB तिच्या मोबाईलवर काहीतरी करत होती. अभिषेक रोहिदासला स्वतःबद्दल आणि त्याच्या प्रोफेशनबद्दल सांगत होता. त्याच्या बोलण्यामध्ये तो कसा श्रेष्ठ आहे याबाबत अहंकार दिसून येत होता. रोहिदास आपल्या मनातील विचार आणि अभिषेकचे बोलणे यांची सांगड घालायचा प्रयत्न करत होता. अशा विचित्र परिस्थितीमध्ये संपूर्ण टीमचे इंडक्शन सुरु होते.

“डॉ.सोनाली तुम्ही पण आमच्यासोबत या ना, एकमेकांना थोडं जाणून घेऊया.” KGB ने डॉ.सोनाली पर्रीकर यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला.

"नक्की! मी ५ मिनिटात आलेच.” डॉ. सोनाली पर्रीकर यांनी सांगितले.

त्या सर्वांपेक्षा सिनियर असल्यामुळे त्या सर्वांच्या फाईल्स मधून त्यांच्याबद्दल डॉ. सोनाली यांना सर्व काही माहित होते. त्या या लोकांसोबत आल्या तेव्हा त्यांना कोणासोबत काम करायचं आहे हे ठाऊक होते पण किती दिवस करायचं आहे हे माहीत नव्हतं.

अभिषेकच्या शेजारी असलेल्या रिकाम्या खुर्चीवर त्या बसल्या. डॉ.सोनाली पर्रीकर बसल्याबरोबर अभिषेक लगेच उठून उभा राहिला आणि पलीकडे जाऊन रोहिदाससोबत त्याने जागा बदलली. त्याचे असे वर्तन सर्वांनी पाहिले परंतु कोणीही काहीही बोलले नाही. डॉ. सोनाली पर्रीकर यांना वाईट वाटले. त्या खजील झाल्या. अभिषेक श्लोकाचा अर्थ सांगताना त्या अभिषेकशी तुटक वागल्या होत्या त्याचा राग कदाचित त्याने मनात धरला होता आणि डॉ. सोनाली यांच्याकडे संमोहन करण्याची दिव्य शक्ती आहे याचा त्याला कॉम्प्लेक्स सुद्धा आला होता. डॉ.मेहता अजूनही फोनवर बोलत होते.

"त्या डायरीत काय आहे?" KGB ने डॉ. सोनाली पर्रीकर यांच्या हातातील डायरीकडे बोट दाखवत बिनधास्तपणे विचारले.

“मी चौकशीत घडणाऱ्या सर्व सामान्य आणि असामान्य घटनांचा मागोवा घेत आहे आणि त्यांची नोंद करते. त्या नोंदी नंतरच्या तपासणीत फायदेशीर सिद्ध होतात." डॉ.सोनाली पर्रीकर यांनी हसतमुखाने उत्तर दिले.

"कोणत्या असामान्य घटना?" रोहिदासने त्याच्या मूळ चौकस स्वभावानुसार विचारले.

“तुम्ही बघा, तो क्षुल्लक प्रश्न विचारत नाही. जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा तो काळजीने विचारतो की आपण कोण आहोत, आपण काय करतो आहोत इत्यादी, जणू काही त्याला आधीच माहित आहे की तो एक दिवस पकडला जाईल.”

"कदाचित त्याने हे आधी अनुभवले असेल, कदाचित त्याला माहित देखील असेल की आपण काय शोधत आहोत!" रोहिदास यांनी मांडले.

"आपल्याला त्याच्याकडून काय हवे आहे हे जाणून घेण्याइतके आपण  भाग्यवान नाही!" डॉ. सोनाली पर्रीकर नाराजीच्या स्वरात म्हणाल्या.

"त्याने इतर कोणते असे असामान्य भाव व्यक्त केले आहेत?" रोहिदासने विचारले.

“तो कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय माझ्या संमोहनाच्या प्रभावातून जागा होतो, तेही एकदम पटकन जणू तो या क्षणी तो झोपला आहे आणि दुसऱ्या क्षणी अचानक टक्क जागा होतो." सोनाली पर्रीकर टिचकी वाजवत म्हणाल्या.

"डॉ. मेहता देखील खूप चिंतेत आहेत कारण सामान्यतः काही तासांपर्यंत औषधाचा परिणाम लगेच कमी होत नाही." रोहिदास म्हणाला.

“डॉ. मेहता यांच्या उपस्थितीने मला पर्सनली खूप भीती वाटते. का कोण जाणे, ते नेहमी रागावलेले असतात” KGB म्हणाली.

"डॉ. मेहता एक चांगली व्यक्ती आहेत. He is a gem of a person. ते सध्या bad patch मधून जात आहेत, दुसरे काही नाही. ” डॉ.सोनाली पर्रीकर यांनी स्पष्ट केले.

"तुम्ही त्यांना आधीपासूनच पर्सनली ओळखता का?" KGB विचारले.

"हो, yes off course आम्ही याआधी एकत्र काम केले आहे."

"मग? सध्या त्यांना काय त्रास होत आहे?"

“सामान्यपणे ते असे वागत नाहीत. खरे तर त्याची पत्नी आजारी आहे. त्यामुळे ते दुःखी आहेत; ते स्वत: एक प्रख्यात डॉक्टर आहेत तरी त्यांना त्यांच्या पत्नीसाठी काहीही करता येत नाही. हेच त्यांच्या निराशेचे कारण आहे.” सोनाली पर्रीकर यांनी सहानुभूती व्यक्त केली.

KGB ने डॉ. मेहता यांची परिस्थिती समजून न घेता त्यांच्याबद्दल  स्वतःचे मत व्यक्त केल्यामुळे खंत व्यक्त केली आणि डॉ.सोनाली किती समंजस आहेत याचा तिला हेवा वाटला.

काही वेळ शांतता पसरली. डॉ. पर्रीकर मनात विचार करू लागल्या  ‘डॉ. मेहता यांना किती मानसिक वेदना होत असतील? शहाणा माणूस संकटातून बाहेर पडतो तो पूर्वीपेक्षा अधिक शहाणा होऊनच. डॉ.मेहता खऱ्या अर्थाने हुशार आहेत.’

“ रोहिदास मला सांग, अनंत महाकाल संस्कृतमध्ये काय म्हणत होता?” डॉ.पर्रीकर विचारले.

रोहिदास म्हणाला, “तो एक संस्कृत श्लोक होता. मला तो पूर्णपणे समजला नाही, पण मला वाटते की तो काळाच्या ओघात मानवी जीवनाच्या झपाट्याने कमी होण्याबद्दल बोलत होता, ज्याचे त्याला आश्चर्य वाटते. त्याचा आवाज माझ्यापर्यंत नीटसा पोहोचू न शकल्यामुळे तो नक्की काय बोलला ते मला समजले नाही. जर मला ते आणखी एकदा ऐकायला मिळाले, तर मी तुम्हाला त्याचे नेमके भाषांतर सांगेन.”

“मी ते सहज करू शकते. मी त्याला संमोहित करून सर्व काही पुन्हा वदवून घेऊ शकते.” डॉ.सोनाली पर्रीकर यांनी आत्मविश्वासाने उत्तर दिले.

"आपण ते रेकॉर्ड केले पाहिजे." KGB ने सुचवले.

"काय? आपण आधीच रेकॉर्डिंग करत नाही आहोत?" रोहिदासच्या डोळ्यांत आश्चर्य स्पष्ट दिसत होतं.

त्याचवेळी डॉ.मेहताही तिथे आले आणि डोकं धरून बसले.

"नाही." सोनाली पर्रीकर यांनी उत्तर दिले.

"का?" रोहिदासला खूप आश्चर्य वाटले.

"कारण डॉ. चंदावरकरांना काहीही नोंदवायचे नाही." डॉ. मेहता वैतागले होते.

"आणि आपण त्यांच्या आदेशाचे पालन करीत आहोत?"

“होय, कारण ते बॉस आहेत.” KGB म्हणाली. हे म्हणताना तिने डोळे उपरोधिकपणे  गोल फिरवले.

"ते बॉस आहेत असे मला वाटत नाही." अभिषेक शांतपणाने म्हणाला.

"तुला काय म्हणायचंय?" KGB ने विचारले.

डॉ.मेहता आणि सोनाली पर्रीकर यांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. अभिषेक काय बोलतोय याकडे कोणी लक्ष देण्यापूर्वीच डॉ. मेहता यांनी विचारले   

"KGB, तू मला कोणाबद्दलही माहिती देऊ शकतेस का?"

“सर, इथे उपलब्ध उपकरणे आणि साधनांचा वापर करून मी तुम्हाला कोणाचीही म्हणजे अगदी कोणाचीही माहिती देऊ शकते. त्याचा अकाऊंट नंबर, पासवर्ड, ईमेल, तो कुठे होता, आता कुठे आहे? त्यांचे फोन नंबर आणि त्यांचे वैयक्तिक तपशील...त्यांचा जन्म झाल्यापासून ते आत्तापर्यंतची सर्व माहिती.” KGB आत्मविश्वासाने म्हणाली. तिच्या डोळ्यात चमक होती.

"ठीक आहे, अनंत महाकाल बद्दल जितके शक्य असेल तितके शोधायचा प्रयत्न कर." डॉ.मेहता म्हणाले.

क्रमश:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel