'मला ओढून घ्या.' तो काकुळतीस येऊन म्हणाला.

'गायींचा उध्दार करणारे तुम्ही गोपाळ ना ?' लडी म्हणाली.

परंतु मिरीने युक्ती केली. पलीकडे एक झाड होते. त्या झाडाचा एक फोक तिने प्रेमाच्या साहाय्याने ओढून आणला. तिने त्याचे एक टोक रमाकांताकडे फेकले. दुसरे टोक चौघींनी ओढून धरले, नि रमाकांत धीरेधीरे खेचला गेला.

'अंधार पडल्यावर आता घरी जाऊ.' रमाकांत म्हणाला.

'तुम्ही या मागून. आम्ही जातो घरी. सृष्टिसौंदर्य पाहिले तेवढे पुरे.' असे लडी नि मडी म्हणाल्या.

'प्रेमा, तू येतेस डोंगरावर ?' मिरीने विचारले.

'चल, एवढी आल्यासरशी जाऊन येऊ.' ती म्हणाली.

मडी नि लडी घरी गेल्या. रमाकांत तेथेच झाडाखाली बसला. मिरी नि प्रेमा डोंगरावर गेल्या. समोर अनंत समुद्र दिसत होता. फारच रमणीय देखावा. दोघीजणी पाहात होत्या. तेथे आणखी कोणी नव्हते.

'चल मिरा, परत फिरू.' प्रेमा म्हणाली.

'चल जाऊ.' ती म्हणाली.

दोघी निघाल्या. वाटेत रमाकांत भेटला.

'तुम्ही अद्याप येथेच ?' प्रेमाने विचारले.

'तुमची मी वाट पाहात होतो. मी का कृतघ्न आहे ? या मिराबेनने तारले. या उपकाराची फेड कशी करू?'

'नीट वागून, नीट बोलून.' मिरी म्हणाली.

'तुम्ही शिकवा.'

'तुमचा विवेक तुम्हांला शिकवील.'

'तुम्हा चारी जणींत ही प्रेमाच प्रेमळ आहे.'

'प्रेमा भोळी आहे.'

'भोळी माणसे चांगली.'

'कारण ती जाळयात अडकतात; होय ना ?'

मिरी नि रमाकांताचे बोलणे प्रेमा ऐकत होती. ती काहीच बोलत नव्हती. बंगला आला. रमाकांत निघून गेला.

'मिरे, यांना शेवटी चिखलात पाडलेस ना ? रस्ता दाखवायला गेलीस नि स्वत: मागे राहिलीस.' राणीसरकार रागाने ओरडल्या.

'मी त्यांना थांबा थांबा म्हणून सांगत होते.' मिरी म्हणाली.

'परंतु त्यांच्याबरोबर जायला पाय मोडले वाटते ? तुला त्यांची फजिती करायची होती. तुला त्यांचा हेवा वाटतो. त्या शिकलेल्या, सुंदर म्हणून त्यांचा मत्सर करतेस. होय ना ? सुमित्राताईजवळ हेच आजपर्यंत शिकलीस वाटते ? त्या आंधळीला तरी आमचे सुख कोठे बघवते ? जगात जिकडेतिकडे द्वेष नि मत्सर. वरून सारी गोंडस सोंगेढोंगे. मने काळीकुट्ट मेल्यांची.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel