'तू माझ्या शांतारामाची मुलगी ?'

'ऐका सारे. मी एक पत्र वाचून दाखविते.'

तिने ते पत्र भावनोत्कट वाणीने वाचून दाखविले. दोघीजणी स्तब्ध होत्या. सुमित्रेच्या डोळयांतून शांत अश्रुधारा चालल्या होत्या.

'त्या आजीबाईंच्या शब्दांनी केवढा हा गोंधळ झाला ! आणि शांतारामाने त्या शब्दांवर विश्वास ठेवला ! असो, देवाची इच्छा तसे झाले. मिरे, कोठे आहेत ते ?'

'ते आज तिसर्‍या प्रहरी येणार आहेत.'

मिरी निघून गेली. ती आज अपार आनंदली होती. पिंजर्‍यात पक्षी नाचत होता. 'मिरे ये, मुरारी ये,' असे तो म्हणत होता.

'आज येईल हो मुरारी.' ती त्याला सांगत होती.

'मिरे, आज सारे वातावरण विद्युन्मय दिसत आहे. तुझ्या तोंडावर आज अपार आनंद आहे. त्या आनंदात एक प्रकारची प्रेमळ कोवळीक आहे. काय आहे आज ?'

'आज माझा मुरारी मला भेटणार. सुमित्राताईंचा हृदयेश्वर त्यांना भेटणार. माझे वडील मला पोटाशी धरणार. आजचा दिवस त्रिवार धन्य आहे.'

मिरीने प्रेमाला सारी हकीकत सांगितली. मिरीची तहानभूक सारी हरपली होती. तिचे पोट आज भरून आले होते. ती आज सुंदर पातळ नेसली होती. तिने सुंदर फुले केसांत घातली होती. कानांत कर्णफुले घातली होती. ती अती मधुर दिसत होती.

आणि मुरारी आला.

'बाबा, मुरारी आला.' तिने कृष्णचंद्रांस सांगितले.

कृष्णचंद्र दिवाणखान्यात आले. मुरारीने त्यांना नमस्कार केला.


'बस मुरारी. मिरी तुझ्या वाटेकडे डोळे लावून होती. आता दोघे सुखी व्हा.' ते म्हणाले.

मिरीने सुमित्राताईंना खाली आणले, मुरारीने त्यांना नमस्कार केला.

'मुरारी, तुझी आई आज हवी होती. परंतु या मिरीने त्यांची सेवा केली. वाईट नको वाटून घेऊस. बैस. मिरे, तूही बैस.' ती म्हणाली.

त्यांची आनंदमय बोलणी चालली होती. तो शांताराम आले. कृष्णचंद्र बघतच राहिले.

'सुमित्राचे बाबा, हा शांताराम तुम्हांला प्रणाम करीत आहे.'

'कोण शांताराम ?' ते चकित होऊन उद्‍गारले.

'होय. मीच तो दुर्दैवी शांताराम.' तो म्हणाला.

सुमित्रा थरथरत उभी राहिली. तिने आपला कृश हात पुढे केला. शांतारामाने तो हातात घेतला.

'सुमित्रा, मी दोषी नाही. मी का जाणूनबुजून तुला अंध केले ? नाही हो. प्रभू साक्षी आहे.'

'शांताराम, मी असे नाही रे कधी मनात आणले. चुकूनही कधी तसे मी बोलले नाही. मनातच आले नाही, तर बोलेन तरी कसे !'

'स्वयंपाकीणबाईने तसे सांगितले.'

'माझ्यावरच्या प्रेमाने ती तसे बोलली. माझ्या हृदयात सदैव तुझीच प्रेममूर्ती गेली वीस वर्षे आहे.'


'शांताराम, आता कोठे जाऊ नका. सुमित्राची नि तुमची आता ताटातूट नको. येथेच राहा.'

'परंतु मी पैसे खाणारा.'

'ते का अद्याप तुमच्या मनात आहे ? दुकानातील दुसर्‍याच एका कारकुनाची ती लफंगेगिरी होती असे मागून उघडकीस आले. मी तुम्हांला निष्कारण दोष दिला. टाकून बोललो. शांताराम, आता जाऊ नका. सुमित्राला थोडे दिवस तरी खरे समाधान लाभो.'

प्रेमा पक्ष्याचा पिंजरा घेऊन आली. पक्षी नाचत होता. 'मिरे ये, मुरारी ये' म्हणत होता.

'आणि ही माझी मुलगी मिरी.' शांताराम म्हणाला.

'तुमची मुलगी ?' कृष्णचंद्रांनी विचारले.

शांतारामाने सारा इतिहास सांगितला. अनेक वर्षांची दु:खे, वेदना, अनुभव त्याने सांगितले. सारी मंडळी स्तब्ध होती.

'शेवटी अंधारातून प्रकाश आला.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel