आणि त्या पृथ्वीवरच्या नंदनवनात ती तिघे आली. एका शांत अशा ठिकाणी ती उतरली. समोरच समुद्र होता. गंभीर समुद्र. सुमित्रा शांत पडून होती. डॉक्टर बाहेर गेले होते. सायंकाळी मिरी एकटीच बाहेर पडली. ती हिंडत हिंडत रेल्वेच्या बाजूला गेली. रेल्वेचे फाटक ओलांडून ती पलीकडे गेली. तो ती एकाएकी थबकली. जणू विजेचा धक्काच बसला असे तिला झाले ! ती तेथे खिळल्यासारखी झाली. ती एका दिशेकडे सारखी पाहत होती. कोणी तरी दोन माणसे एका झाडाखाली उभी होती. एक तरुण होता नि एक तरुणी. मिरीकडे त्या दोघांचे लक्ष नव्हते. परंतु मिरी सारखी तिकडे बघत होती. तिचे सारे भान गेले. जणू शुध्द गेली. ती पाहा तिकडून एक मोटर येत आहे. मिरीला भान नाही. तो तिला एकदम कोणी तरी बाजूला ओढले.

'मिरे !'

'कोणी ओढले मला ?'

'मी.'

'तुम्ही इतके दिवस कोठे होतात ? आम्हांला सोडून एकदम गेलात !'

'पुढच्या मुक्कामावर तुमची व्यवस्था करण्यासाठी. मिरे, तू काय बघत होतीस ?'

'काही नाही.'

'तू त्या दोन माणसांकडे पाहात होतीस; खरे ना ? माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. कोण होती ती दोघे ? तुझ्या ओळखीची होती ? गाडीत बसून ती दोघे गेली.'

'जाऊ देत.'

'माझा हात धर. तू थरथरत आहेस. मिरे, काय झाले ? तुझी श्रध्दा कोठे गेली ? धीर धर. चल.'
'मी एकटी घरी जाईन.'

'तुला पोहोचवून मग मी जाईन. माझ्याविषयी तुला सहानुभूती वाटते ना ? येऊ दे तुझ्याबरोबर. तुला दु:खाचा, निराशेचा वारा न लागो. चल बाळ.'

त्या पाहुण्याने मिरीला पोहोचविले नि तो गेला. त्या रात्री मिरीला झोप आली नाही. अंथरुणात ती रडली. ती मध्येच उठून बाहेर येऊन बसली. वारा वाहत होता. समुद्राला भरती येत होती आणि मिरी दु:खगंभीर होऊन तेथे निराधाराप्रमाणे बसली होती.

दुसरा दिवस उजाडला. मिरी उजाडताच तेथील सुंदर उपवनाकडे फिरत गेली. ती एका शीतल वृक्षाखाली बसली. समोर सर्वत्र हिरवळ होती. मधून फुलांचे मनोहर ताटवे होते. कोठे कारंजी उडत होती. मधून फुलांचे मनोहर ताटवे होते. कोठे कारंजी उडत होती, सूर्यकिरण त्यांच्यावर पडून नाना रंग दिसत होते. परंतु इतक्यात मिरीच्या जवळच एका झाडाखाली ती दोन माणसे येऊन बसली. मिरी हळूच उठली. झाडाआड उभी राहिली. परंतु असे चोरून ऐकणे बरे नाही असे तिला वाटले.

'लवकर ये. उशीर नको. एकेक क्षण तुझ्याशिवाय कंठणे...'

तो तरुण बोलत होता. मिरीला पुढचे ऐकवेना. ती गोरीमोरी झाली. इतक्यात तो पाहुणा तेथे हजर.

'मिरे चल. धर माझा हात.'

'तुम्ही नेमके येथे कसे ?'

'तू दु:खी आहेस. तुला सुखी करीन तेव्हाच मी सुखी होईन. तुझी श्रध्दा अभंग ठेव, चल बाळ, माझे ऐक.'

त्याने तिला घरी पोहोचविले नि निघून गेला.

दिवस कसातरी गेला. मिरी आज हसली नाही. गाणे गुणगुणली नाही. दोन घास खाऊनच ती अंथरुणावर जाऊन पडली. रोजच्या प्रमाणे ती सुमित्राताईंजवळ येऊन बसली नाही. त्यांना तिने काही वाचून दाखविले नाही. सुमित्राताईंनाही झोप येईना. मिरीला बरेबिरे नाही की काय, असे त्यांच्या मनात आले. तिला कृपाकाका, यशोदाआई, मुरारी यांच्या आठवणी तर नाही ना आल्या ? आपण सुखाने हवापालट करीत फिरत आहोत. परंतु यशोदाआईंना कधी कुठे जाता आले नाही. कृपाकाका मरेपर्यंत शिडी घेऊन जातच होते. मिरी त्यामुळे का दु:खी आहे ? सुमित्राताई तर्क करीत होत्या.

तिकडे मिरी अंथरुणात रडत होती. ती आता बसून राहिली. तिला मोठाच हुंदका आला.

'मिरे,' सुमित्राताईंनी जवळ येऊन विचारले.

'सर्वनाश झाला तुमच्या मिरीचा.' त्यांच्या गळयाला मिठी मारून मिरी रडत म्हणाली. तिचे अश्रू आवरताना जणू बंधारा फुटला. काही वेळ सुमित्राताई बोलल्या नाहीत. नंतर प्रेमाने, वात्सल्याने म्हणाल्या,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel