'मिरा, काही दिवस तरी चैन पडणार नाही. क्षणात मी सारे कसे विसरू ? मी काही नाटक नव्हते करीत तू माझा स्वभाव जाणतेस.'

'हो प्रेमा. तुझा भोळा, प्रेमळ स्वभाव मी ओळखते. म्हणूनच तू जे प्रेम करीत होतीस, त्याची खोली, गंभीरता, तीव्रता तू अनुभव. तोच अनुभव पुढेही राहिला तर मी सांगितले त्याप्रमाणे कर.'

'कठीण आहे हे सारे. केवळ मनोमय रमाकांताची पूजा करून मला का संपूर्ण आनंद मिळेल ?'

'प्रेमा, हे मी सांगते आहे खरे. परंतु मलाही असे जीवन जगणे अशक्य होईल. आपण उच्च ध्येयासाठी धडपडायचे. सुमित्राताई हाच आदर्श पूजीत आहेत.'

'काय ? त्यांचीही अशीच कोणी निराशा केली होती ?'

'तो सारा इतिहास मला माहीत नाही. परंतु एकदा त्या सूचक बोलल्या होत्या. 'मी प्रेमाच्या वेदनांतून गेले आहे.' असे काही तरी म्हणाला होत्या.'

'मिरा, मी येथे आता राहू इच्छित नाही.'

'तुला येथे राहणे आवडणार नाही हे मी समजू शकते. त्या दुसर्‍या दोघी तुझी थट्टाही करतील. परंतु सुमित्राताईंचे वडील येईपर्यंत राहा. चल आपण जरा फिरायला जाऊ.'

'नको, मी माझ्या खोलीत एकटीच पडून राहते.'

'बरे तर, मी जाते.'

प्रेमा आपल्या खोलीत रडत बसली, तिने ती प्रेमपत्रे वाचली. फाडून टाकावी असे तिच्या मनात येईल. परंतु तिला फाडवेत ना. पुन:पुन्हा ती पत्रे ती हृदयाशी धरीत होती. परंतु एकदम तिने डोळे पुसले. तिची मुद्रा गंभीर झाली. तिने पत्रे फाडली. काडयाची पेटी आणून त्या तुकडयांना तिने अग्निसंस्कार दिला. त्या होळीकडे ती बघत होती. नंतर ती उठली. शून्य मनाने खिडकीशी ती उभी होती. बागेत मिरी नि सुमित्राताई फिरत होत्या.

'प्रणाम, तुम्हा दोघींना प्रणाम.' ती मनात म्हणाली.

रमाकांत आता मुळीच येईनासा झाला. तो परगावी गेला असेही कळले. मडी नि लडी नाना प्रकारची कुजबूज करीत.

'प्रेमाचे त्याच्यावर प्रेम होते. तो अकस्मात का गेला ?' लडी म्हणाली.

'त्या मिरीचे कारस्थान. तिने यांच्या प्रेमात माती कालवली. मत्सरी आहे ही मिरी.' मडी म्हणाली.

'दुसर्‍याच्या सुखात माती कालवणे फार वाईट.' राणीसाहेब म्हणाल्या.

मिरीच्या कानांवर ती दुष्ट कुजबूज येई. परंतु ती परम शांती धारण करी.

थोडया दिवसांनी कृष्णचंद्र आले. मिरीवरचा त्यांचा राग अद्याप गेला नव्हता. दोनचार दिवस झाले. घरातील बदल त्यांच्या ध्यानात आला. मिरी नि सुमित्रा एका खोलीत राहात होती. सुमित्राचे कपडे मिरीच धुवी. त्या लडी नि मडीचा त्यांना तिटकारा वाटू लागला. त्यांची फुलपाखरी वृत्ती त्यांना आवडेना. त्या दोघी उशिरा उठत. काडीचे काम करतील तर शपथ. फुले तोडीत नि केसात घालीत. परंतु कधी बादलीभर पाणी घालणार नाहीत. पाट घेणार नाहीत. ताटे ठेवणार नाहीत. सारे मिरी करी. चहाचे काम तर मिरीवरच नव्या राणीसाहेबांनी सोपविले होते.

'आज ही लडी करील चहा.' कृष्णचंद्र म्हणाले.
'मिरीच चांगला करते.' राणीसाहेब बोलल्या.

'यांना अधिक चांगला येईल, शिकलेल्या, मोठया शहरात राहणार्‍या, बडया घराण्यातल्या या आहेत. लडे, तू करतेस की मडी करणार ?'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel