५१

एकदा बंगालच्या दौ-यावर असताना गांधीजी एका जमीनदाराचे पाहुणे होते. हा जमीनदार नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रत्येक कामासाठी नोकरांचा उपयोग करीत असे. नोकरांची सर्व धावपळ या जमीनदाराची कामे करण्यासाठी.

एक दिवस बंगल्याच्या व्हरांड्यात नेहमीप्रमाणे गांधीजी प्रार्थनेसाठी उच्चासनावर बसले. समोर त्यांची प्रार्थना व प्रार्थनोत्तर प्रवचन ऐकायला खूप मंडळी बसली होती. त्या वेळी गांधीजी चालू असलेले दिवे मालवून प्रार्थना करीत असत. प्रार्थना सुरू होताना जमीनदार त्यांच्या जवळ येऊन बसला. प्रार्थना सुरू होण्यापूर्वी गांधीजींनी जमीनदाराला दिवे मालवण्या, खूण केली. दिव्याचे बटन जमीनदाराच्या डोक्यावरच होते. पण त्याने सवयीप्रमाणे नोकराला बोलावले.

तोच चमत्कार झाला. दिवे एकाएकी मालवले गेले व काळोखात प्रार्थनेला सुरुवात झाली. गांधीजींनी स्वत: उठून पटकन बटन दाबले होते.

प्रार्थनेनंतरच्या प्रश्नोत्तरांच्या वेळी गांधीजी संधी साधून म्हणाले : ‘अलीकडच्या शिकलेल्या व श्रीमंत लोकांना शरीरश्रम करणं ही फार शरमेची व नीच गोष्ट वाटते. पण ती चूक आहे. गीतेत तर सांगितलं आहे की, जो शरीरश्रम न करता अन्न सेवन करतो, तो चोर आहे.’

जमीनदाराला आपली चूक कळली. आपल्याला मारलेला टोमणा त्याने ओळखला आणि नंतर...

नंतर एक गंमत झाली. गर्दीमध्ये जवळचेच एक टेबल लवंडल्यामुळे त्याच्यावरील चिनी मातीची एक कुंडी खाली गडगडून फुटून गेली होती. लगेच जमीनदाराने उच्चासनावरून खाली उडी मारून त्या फुटलेल्या कुंडीचे तुकडे गोळा करण्यास सुरुवात केली.

थोड्याच वेळात दोन नोकर तुकडे गोळा करायला धावत आले, पण मालकच गुडघ्यावर बसून तुकडे गोळा करीत होता.

हा प्रकार बापूजींनी पाहिला नाही. परंतु त्यांच्या शब्दांनी मात्र त्यांच्या नकळत आपले काम केले होते.

बापूजींचे धावते जीवनसुद्धा शिकवणींनी भरलेले होते.

त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण आजूबाजूच्या जगाला अपला संदेश देत होता.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel