११६

ब्रिटिश राजकन्येचे लग्न व्हायचे होते. त्या वेळेस माउंटबॅटन व्हाइसरॉय होते. राजकन्येला भेट काय पाठवायची? महात्माजी रोज खास सूत कातीत होते. त्या सुताचा रुमाल विणून घेऊन ते पाठविणार होते. ती गोष्ट फक्त माउंटबॅटन यांनाच माहीत होती. आणि ती गांधीजींच्या हातच्या सुताच्या रुमालाची भेट ब्रिटिश राजकन्येला विवाहप्रसंगी पाठवण्यात आली. गांधीजी जणू दोन राष्ट्रांचे हृदय धाग्याने जोडीत होते.

११७

त्या वेळेस महात्माजी महाबळेश्वरला होते. रोजच्याप्रमाणे ते सायंकाळी फिरावयास निघाले. जवळच्या खेड्यातून आलेला एक दहा-बारा वर्षांचा मुलगा रस्त्याच्या कडेला हात जोडून उभा होता. कमरेला एक मळकट लंगोटी फक्त होती. खांद्यावर एक मळलेले पटकूर होते. आंघोळही बहुधा त्याने केलेली नसावी. गांधीजी, बरोबरच्या एका माणसास म्हणाले; ‘त्याच्याजवळून ते अंगावरचं फडकं मागून घ्या. म्हणावं उद्या आणून देऊ.’ तो मुलगा देईल. ‘उद्या इथंच आलास तर खाऊ मिळेल.’ असे त्याला सांगायला सांगून गांधीजी पुढे निघाले.

दुस-या दिवशी फिरायला निघायची वेळ झाली. गांधीजींनी प्यारेलालजींना थोडे खादीचे कापड, खाऊ व साबणबार बरोबर घ्यायला सांगितले. तो मुलगा तेथे होता. बापूंनी त्याला जवळ घेऊन कुरवाळले व सांगितले; ‘अंग व कपडे स्वच्छ धुवून ये. आणखी खाऊ मिळेल’ आणि पुढे रोज गांधीजींची वाट बघत स्वच्छ कपडे परिधान करून हात जोडून तो मुलगा व आणखीही मुले तेथे उभी असत. गांधीजी खरोखरच राष्ट्रतात होते.

११८

१९३७-३८ सालातील गोष्ट. अनेक प्रांतांत काँग्रेस सरकारांनी राजबंदी सारे मुक्त केले. परंतु बंगालमधील राजबंद्यांचे काय? महात्माजी सर्व राष्ट्राचे तात. ते स्वस्थ थोडेच बसणार! ते कलकत्त्यास गेले. त्यांनी बंगालचे गव्हर्नर व मुख्यमंत्री फजलुक हक यांची भेट घेतली. हिंसेचा त्याग करायला राजबंदी तयार असतील तर त्यांना सोडता येईल, असे गांधीजींस सागंण्यात आले. गांधीजी तुरुंगात जाऊन राजबंद्यांच्या भेटी घेऊ लागले, त्यांना हिंसेचा फोलपणा पटवू लागले.

गांधीजींना त्यावेळेस रक्तदाबाचा त्रास होत होता. तरी ते राजबंद्यांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न करीत होते. गुरुदेवांनी लिहिले; ‘गांधीजींवर विश्वास टाका. त्यांचा शब्द माना.’ ते पहा, महात्माजी तुरुंगातून चर्चा करून येत आहेत. दोन्ही हातांनी डोके धट्ट धरून येत आहेत. रक्तदाब का वाढला? राष्ट्रपित्याच्या अशा ह्या आठवणी येऊन डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू उभे राहतात!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel