जयंत नाईक

राहुल:

प्रेम माणसाला किती असहाय्य बनवते नाही का ?

आता माझ्या सारखा मध्यमवयीन माणूस आणि तो सुद्धा लंडन मधील एक प्रथितयश डॉक्टर असा कसा काय वागू शकतो?  मी म्हणजे डॉक्टर राहुल. माझे लग्न झालेले आहे आणि एक अतिशय प्रेमळ आणि सुंदर बायको आहे मला. दोन  गोड मुली  सुद्धा आहेत.  एक सात  वर्षांची आणि  एक चार  वर्षांची . त्यांना जर हे सगळे कळले तर ते काय म्हणतील ? मी काही कामासाठी पुण्याला आलो आहे एवढेच त्यांना माहीत आहे. माझ्या बायकोला माझे लग्नाआधीचे प्रेम माहित आहे . मी लग्नाआधीच तिला रीना बद्दल सांगितले होते.

रीना! तिचे नाव घेतले तरी अजून पोटात कालवाकालव होते. तिला सुद्धा असेच होत असेल का? एम.बी.बी. एस. च्या शेवटच्या वर्षी आमची भेट झाली. तो दिवस अजूनही मला  लख्ख आठवतो आहे. शेवटच्या वर्षाचा पहिला दिवस. तास सुरू होत होता, मी त्या विषयाची वही काढून बाकावर ठेवली होती. तेवढ्यात एक मंजुळ आवाज माझ्या कानापाशी किणकिणला ...

"May I sit here..?"

मी दचकून पाहिलं तर एक ठेंगणी, ठुसकी, काळी, सावळी मुलगी मला विचारत होती. अतिशय गोड चेहरा, काळेभोर डोळे आणि चेहऱ्यावर एक बारीकसे स्मित हास्य आणि  दोन्ही गालावर खळ्या.  मी जरा गोंधळून गेलो आणि बहुतेक मी काहीच उत्तर दिले नसावे . तिने परत मला विचारले, आता मराठीत,

" मी इथे बसू का ? सगळा वर्ग जवळ जवळ भरून गेलाय .."

"हो हो बसा ना! By all means" असे काही तरी मी म्हणालो असेन.

तिने आपली पुस्तके बाकावर ठेवली आणि आपली एक वेणी  खांद्यावरून पुढे घेत ती माझ्या शेजारी बसली.

" मी राहुल " मी माझी ओळख करून दिली.

" मी रीना" ती म्हणाली.

तेवढ्यात  प्रोफेसर वर्गात आले आणि आमचे संभाषण तिथेच थांबले.

बहुतेक आम्ही  दोघेही त्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडलो. आमचा नंतर बराच वाद व्हायचा, पहिल्यांदा कोण कुणाच्या प्रेमात पडले? मी का ती? काय वेडेपणा?

आणि आजचा हा वेडेपणा? अगदी कहर आहे. काल मुंबई विमानतळावरून  पुण्याला येताना किती वेळा तरी मनात विचार आला ,परत जावे का लंडनला?  रीना हे सगळे आता विसरून सुद्धा गेली असेल.  

फोन करावा का तिला? आणि काय विचारणार तिला?

"काय ग ? तू तुझ्या संसारात सुखी आहेस ना ?"

मी  Holiday Inn मध्ये पोचलो तरी माझे नक्की ठरत नव्हते.  उद्या १ जानेवारी  २०१३.  सकाळी १० वाजता  सारस बागेत जायचे की नाही ? रीना येईल का ? तिच्या लक्षात असेल का?

खरे तर ही रीनाचीच कल्पना.

सारस बाग. आमचे भेटायचे आवडते ठिकाण. आम्ही जेव्हा शेवटचे भेटलो तेव्हा रीना किती भरभरून बोलत होती. मला तिची ही सवय माहित होती. ती खूप  टेन्स  असेल तेव्हा ती खूप बडबड करायची. आणि ती काय बोलायची हे तिचे तिला बऱ्याच वेळा कळायचे नाही.


2

१ जानेवारी २००८.

सूर्य नुकताच मावळला असावा. संध्या छाया हळू हळू पसरत होत्या. माझ्या आयुष्यात अंधार असाच चोर पावलांनी शिरत होता का? सारस बागेतील एका कोपऱ्यात हिरवळीवर बसून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे आम्ही दोघे आमचे पुढचे आयुष्य रेखाटायचा प्रयत्न करत होतो. ज्यात आम्ही दोघे एकमेकांजवळ नसू.

"राहुल ,तू मला विसरू शकणार नाहीस हे मला माहित आहे. तरी सांगते मला विसरून जा. माझ्या बहिणीच्या मुलाला माझी गरज आहे."  रीना मला सांगत होती.

तिच्या मोठ्या बहिणीचे बाळंतपणात नुकतेच निधन झाले होते. मूल सुद्धा वाचले नाही. तिला अगोदर एक दोन वर्षाचा मुलगा होता. म्हणून रीनाने आपल्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर लग्न करावे असे तिच्या वडिलांनी सूचवले. तिच्या बहिणीच्या नवऱ्याचे पाषाण मध्ये खूप मोठे हॉस्पिटल होते. रीनाचे शिक्षण संपले कि तिने सुद्धा तिथेच काम करावे असे सुद्धा ते म्हणत होते. रीनाच्या वडिलांनी जणू तिच्या जीवनाचा सगळा मार्ग ठरवला होता. खरे तर त्यांना आमचे प्रेम माहिती होते मग ते असे कसे करू शकतात?

"मान्य आहे मला. त्या मुलाला तुझी गरज आहे. आणि मला तुझी गरज नाही? आपण त्याला सांभाळू, पाहिजे तर त्याला आपण दत्तक घेऊ पण हे अघोरी वागणे सोडून दे. रीना असे सिनेमात घडते. आपल्या  खऱ्या जीवनात असले काही नसते."  मी  कसा बसा म्हणालो.

हे सगळे माझ्या समजुतीच्या बाहेर होते. सिनेमात घडणारा प्रसंग माझ्या आयुष्यात असा कसा काय घडू शकतो? रीनाने माझा हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या गालावर ठेवला. तिच्या डोळ्यातील अश्रूंनी माझा हात ओला झाला.

"हे अश्रू तुला काय सांगत आहेत राहुल? मी हा निर्णय स्वखुशीने घेतलेला  नाही. हा प्रसंग आलाय हे सत्य आहे. मला यातून दुसरा मार्ग दिसत नाही म्हणून मी हा निर्णय घेते आहे. आपल्या जीवनात असेच जर व्हायचे होते तर आपण भेटलोच का राहुल? आणि आपण प्रेमात का पडलो?"

"नको रीना, असा निर्णय नको घेऊस ! जीवनात बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की त्यावेळी घेतलेले निर्णय तुमच्या सगळ्या जीवनाची दिशा ठरवतात. आपण या क्षणी जर एकमेकाबरोबर राहायचे ठरवले तर आपण  एकमेकांचे पती-पत्नी म्हणून आपले पुढचे आयुष्य जगू शकतो … नाही तर आहेच... तू कुणाची तरी पत्नी आणि मी कुणाचा तरी पती."

" The die is cast.. राहुल! आपल्या हातात फक्त खेळणे एवढेच असते."

"Rubbish, आपण आपले आयुष्य घडवू शकतो. तू फक्त हो म्हण. आपण आत्ता लग्न करू शकतो. आपण तुझ्या बहिणीच्या मुलाला सुद्धा सांभाळू."  मी असे बरेच काही बोलत होतो. पण रीनाचा निर्णय झाला होता. मी त्या निर्णयाचा हिस्सा नव्हतो . ती मला फक्त सांगायला आली होती तिचा निर्णय.

आम्ही जायला उठलो. तेवढ्यात रीना मला म्हणाली,

"राहुल जाण्याआधी एकदा तुझ्या मिठीत येऊ? फक्त एकदाच."

मी आवेगाने  तिला मिठीत घेतले. माझ्या छातीवर डोके ठेऊन ती म्हणाली,

"एका क्षणापूर्वी मी हक्काने तुझ्या मिठीत येत असे आणि आता मला तुझी परवानगी घ्यावी लागते. I hate this life. I hate this."

शेवटी अगदी जड पावलांनी आम्ही निघालो . तो रीनाच्या गाडीपर्यंतचा प्रवास माझ्या कायम लक्षात आहे. मी आणि माझ्या शेजारून मला स्पर्श सुद्धा न करता चालणारी रीना.


3

मला वाटले एका अंधाऱ्या बोगद्यातून आम्ही दोघे जात आहोत. एक न संपणारा बोगदा. एक वेड्यासारखा विचार मनात आला. या क्षणी   आकाशातून उल्का पडावी आणि आम्ही दोघेही त्यात जळून भस्म व्हावे. पण तसे काहीही

झाले नाही . आम्ही सुखरूप गाडीपाशी पोचलो. रीनाने गाडीचा दरवाजा उघडला. मग माझ्या डोळ्याकडे न बघता, आपल्या पायाकडे बघत रीनाने आपला उजवा हात माझ्या दिशेने करत, किती तरी वेळाने आपल्या तोंडातून पहिले वाक्य उच्चारले,

"राहुल ..माझी एक विनंती आहे. मान्य करशील ?"

मी तिचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. तो उबदार, घामाने थोडा ओलसर झालेल्या तिच्या हाताचा स्पर्श, जीवघेणा...मग किती तरी दिवस मला आठवत राहिला.

"काय सांग..."

"आपण आता ,एकमेकांना भेटूया नको. फक्त एकदाच भेटूया. आज पासून बरोबर पाच  वर्षांनी. दुपारी चार वाजता. इथेच सारस बागेच्या देवळाच्या दारात. १ जानेवारी २०१३. आपल्या जीवनात आपण काय कमावले आणि काय गमावले हे समजून घ्यायला. तो पर्यंत काहीही संपर्क नाही. नाही तरी तू लंडन मध्ये, तुझे  MS झाल्यावर तू तिकडेच राहणार आहेस. चालेल. येशील मला भेटायला पाच वर्षांनी?"

मी तिचा हात अगदी घट्ट माझ्या हातात धरून ठेवला,

"म्हणजे आता पाच वर्षे तुला भेटायचे नाही असेच ना? इतकी दुष्ट तू कशी काय होऊ शकतेस? आपण मित्र मैत्रीण म्हणून का नाही भेटू शकणार? अगदी थोड्या वेळासाठी...अधून मधून ...मी भारतात जेव्हा येईन तेव्हा."

रीनाने नुसतेच नकारात्मक डोके हलवले. मी बहुदा या सगळ्या वेळात तिचा हात माझ्या हातात धरून ठेवला होता. तो बहुदा मी जास्तच जोरात दाबला असावा...ती एकदम विव्हळली,

"हाय ..Rahul You are hurting me…"

मी एकदम तिचा हात सोडला आणि तिला म्हणालो, माझी सगळी वेदना जणू त्या वाक्यातून आक्रन्दली,

"so you are ..my girl..so you are"  

मग मी एकदम वळलो आणि तिच्याकडे पाठ करून, तिच्याकडे एकदाही मागे वळून न पाहता माझ्या गाडीकडे  निघून गेलो.

ती माझी रीनाची शेवटची भेट.

आणि उद्या मला रीना पाच वर्षांनी भेटणार. किती घटना घडल्यात माझ्या आयुष्यात ! लंडनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतानाच माझ्या आईच्या पसंतीच्या मुलीशी माझे लग्न झाले. अतिशय सुंदर आणि सुशील. शिरीन पुण्यातीलच होती. तिचे सगळे कुटुंब आमच्या ओळखीचे होते. मग मी आणि शिरीन लंडनला राहायला लागलो. आईसुद्धा आता माझ्याकडे लंडनमध्ये रहात होती.

पण खरेच रीना येईल ? तिच्या लक्षात असेल उद्या भेटायचे ?

मी  जणू एखाद्या नुकतेच मिसरूड फुटलेल्या तरुणाच्या अधिरतेने, दुपारी साडेतीन वाजताच सारस बागेतील मंदिराच्या पायऱ्यापाशी जाऊन थांबलो. रीना कशी दिसत असेल आता ? आपल्याला ओळखू येईल का ती ? आणि मूळ म्हणजे ती मला ओळखेल का ? मी आपले शरीर दररोजच्या जॉगिंगमुळे आणि योगामुळे अगदी तंदुरुस्त ठेवले होते, पण माझे केस बरेच कमी झाले होते आणि मी अगदी बारीकशा मिश्या ठेवल्या होत्या.


4

पावणेचारच्या सुमारास एक पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी रुबाबदार चालीने देवळाकडे आली. डोळ्यावर काळा चष्मा... अगदी मानेपर्यंत नीट कापलेले केस! रीनाची तर नेहमी एक वेणी असे...आणि ती इतक्या भरभर चालत नसे. रीना अगदी सडसडीत होती. आणि ही मुलगी एकदम बांधेसूद. ती जवळ आली आणि आणि चष्मा काढून हातात घेतला. अरे ही रीनाच ! तिनेही मला लगेच ओळखले. माझ्या अगदी समोर येऊन उभी रहात ती हळूच हसली. तिच्या दोन्ही गालावरच्या खळ्या एकदम दिसायला लागल्या. तेच ते जीवघेणे हास्य आणि ते मला पाहून आनंदाने नाचणारे ते काळेभोर डोळे. मी त्यांना नाचरे डोळे म्हणत असे.

"Good Evening...राहुल ..आलास तू . कसा काय झाला प्रवास? कुठे उतरला आहेस?" तिने एकदम माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. खूप टेन्स असेल तर बोलत सुटण्याची तिची सवय अजून होती तर!

" Good Evening, रीना. तू तर आपला गेटअप एकदम बदलून टाकलास? पण आता एकदम प्रथितयश डॉक्टर वाटतेस... Nice." मी काहीतरीच बोलत होतो का?

"मग आहेच मी प्रथितयश डॉक्टर. मी माझी गाडी तिकडे पार्क केली आहे. चल जाऊ या. जाता जाता बोलू या. तुझे केस अगदीच कमी झालेत पण बाकी होतास तसाच आहेस." रीना म्हणाली आणि त्याच आपल्या भरभर चालीने मागे वळून आपल्या गाडीकडे चालायला लागली. पूर्वी माझ्या बरोबर चालायचे म्हणजे तिला भरभर चालायला लागायचे. आता ती सहज माझ्या बरोबर चालत होती. मग आंम्ही एकमेकांना फारसा स्पर्श होणार नाही याची काळजी घेत तिच्या गाडीपर्यंत आलो.

रीना:

मी राहुलला देवळाच्या पायऱ्यांपाशी पाहिलं  आणि जणू पाच वर्षाचे अंतर एका क्षणात विरघळून गेले. माझा न राहिलेला माझा राहुल. सहा फुटापेक्षा थोडी जास्त उंची. मी त्याच्या खांद्यापर्यंत सुद्धा यायची नाही. थोडासा थोराड म्हणावा असा बांधा. अगदी युरोपिअन गोरा रंग, पण काळे केस. निळसर झाक असणारे डोळे. ब्रिटीश वडील आणि भारतीय माता दोन्हीही त्याच्यात मला दिसायचे. आई वडील दोघेही डॉक्टर. आई मिरजेच्या मिशन हॉस्पिटल मध्ये असताना, बरोबरच्या ब्रिटीश डॉक्टरशी त्यांचे लग्न झाले होते. मग राहुलचा जन्म आणि पुढे १०-१२ वर्षांने घटस्फोट. पण राहुलच्या वडिलांचे त्याच्यावर खूप प्रेम होते. ते सारखे त्याला तू "लंडनला ये" म्हणून मागे लागायचे. कॉलेजमध्ये किती मुली याच्या मागे असायच्या. हा कसा काय माझ्या प्रेमात पडला कुणास ठाऊक?

मी त्याच्या समोर जाऊन उभी राहिले ,आणि एकदम माझ्या लक्षात आले. अगदी एखादी कडकडून वीज चमकावी तसे काही तरी मनात झाले.

तुम्ही तुमचे मनापासून केलेले प्रेम मनात खोल कुठेतरी दडपून टाकू शकता. मनाच्या एखाद्या खोलवरच्या कप्प्यात कुलुपबंद करू शकता; पण त्याला पूर्ण पणे मिटवू शकत नाही.

" Good Evening..राहुल ..आलास तू. कसा काय झाला प्रवास? कुठे उतरला आहेस ?"


5

असे  काही तरी विचारात नेहमी प्रमाणे मी त्याचा हात हातात घेणार होते पण मग मी सावरले. मी आता दुसऱ्या कुणाची तरी बायको होते आणि तो दुसऱ्या कुणाचा तरी नवरा.

का मी तो अघोरी निर्णय घेतला असेन? आपण केवढा त्याग करतोय याची धुंदी? का नियतीचा अनाकलनीय डावपेच?  राहुलने मला किती समजवायचा प्रयत्न केला. याच बागेत त्याला मी माझा निर्णय सांगितला होता. मला ताई गेल्यावर तिच्या नवऱ्याबरोबर लग्न करावे लागणार होते. ताईचा तेव्हा दोन वर्षाचा गोड मुलगा कैवल्य ..कोण त्याच्याकडे बघणार ? मग मी त्याची आई झाले. पण ताईचा नवरा जीवन? मी त्याची बायको झाले पण ..प्रेयसी ..मैत्रीण कधीच होऊ शकले नाही. पण मग लग्न झाल्यावर मला दुसरा मुलगा झाला..रिहान!  मग मी संसारात अपरिहार्यपणे गुरफटत गेले. राहुलला मी विसरून गेले किंवा तसा मी प्रयत्न करत होते, पण गेले काही दिवस या आजच्या दिवसाची चातकासारखी वाट पहात होते. राहुल येईल का? त्याच्या लक्षात असेल का भेटायचे? पाच वर्षापूर्वी मी वेड्यासारखी केलेली ती विनंती. तो मला विसरून सुद्धा गेला असेल... का मी जशी त्याला विसरू शकले नाही तसेच तो सुद्धा  मला विसरला नसेल? असे किती प्रश्न ..पण जाऊन बघू या तरी! म्हणून मी आले. राहुल बरोबर गाडीकडे जाताना असे अनेक विचार माझ्या मनात येत होते. पण मला राहुल येणार याची एका बाजूला खात्री होती का?"

"आपण भेटतोय पाच वर्षांनी! आपण दोघांनीही ही असली  विचित्र कल्पना लक्षात ठेवली होती तर?" गाडीत आम्ही बसता क्षणीच राहुल म्हणाला.

मी अगदी खळखळून हसले ...किती तरी वर्षांनी असेल ...

" We were really  a crazy couple…" मी म्हणाले आणि एकदम दचकून थांबले . मी we are... असे

म्हणणार होते का ?

" नक्कीच ...रीना मग आजचा काय प्लान ? आपण कुठेतरी बसून कॉफी पिऊया का? मला तुझ्याबरोबर खूप बोलायचे आहे… I  hope you have some time." राहुल मला विचारत होता.

"वेळ? आपल्याला वेळच वेळ आहे . मी आज जीवनला ..म्हणजे माझ्या नवऱ्याला सांगितले आहे, मुलांकडे  लक्ष ठेवायला आणि पेशंटकडे सुद्धा. आम्ही कॉलेज मधील काही मित्र मैत्रिणी भेटणार आहोत त्यामुळे."

मी राहुलला म्हणाले. आम्ही मुद्दाम जरा जास्तच casual बोलत होतो का ?

पण मग? पाच  वर्षापूर्वी प्रियकर आणि प्रेयसी असलेले आणि आता एकमेकांचे कोणीही नसलेले, पाच  वर्षानंतर भेटल्यावर काय बोलतात?

"I have a better plan. सिंहगड रस्त्यावर आमचे एक फार्म हाउस आहे. आपण तिथे जाऊ या. आपण  खूप गप्पा मारू. थोडी वाईन पिऊ. तुला चालते ना? आमचा एक  care taker आहे तिथे तो रात्रीचे जेवण करेल. तिथे एक गेस्ट रूम सुद्धा आहे. आमची एक बेडरूम आणि मुलांची एक बेडरूम आहे. तिथून सूर्यास्त सुंदर दिसतो. चालेल? खूप सुंदर जागा आहे."

"चालेल...मला आवडेल तुमचे फार्म हाउस पहायला."  राहुल म्हणाला.

मग वाटेत आम्ही आमच्या कॉलेज मधील मित्र आणि मैत्रिणी बद्दल बोललो. राहुलचा काही लोकांशी संपर्क होताच. उद्या किवा परवा आपण सर्वांना रात्री डिनरला बोलवावे असे राहुलला वाटत होते.


6

थोड्याच वेळात आम्ही फार्मवर पोचलो. माझी ही अतिशय आवडती जागा. ३-४ वर्षापूर्वी  इथे जागा घेऊन मी अगदी माझ्या आवडीची झाडे लावली होती. तिथे अगोदरच खूप आंब्याची झाडे होती. एक मोठे चाफ्याचे झाड होते. मग मी तिथे एक तीन बेडरूमचा छोटा बंगलाच बांधून घेतला. बहुतेक सुट्टीच्या दिवशी मी आणि मुले इथे राहायला येत असतो. जीवनला त्याच्या हॉस्पिटलच्या कामामुळे प्रत्येक वेळी यायला जमेलच असे नसे. पण मग तो थोडा वेळ येऊन जात असे.

मी राहुलला सगळा फार्म फिरून दाखवला. एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली  मी एक पार बांधून घेतला होता. तिथे बसून कॉफी घेता घेता आमच्या गप्पा परत सुरु झाल्या. मग एकदम मला जाणवले की मला राहुलशी जे महत्वाचे बोलायचे होते ते सांगायची वेळ आली आहे. सदशिव आमचा care taker आमच्या रात्रीच्या जेवणाची सोय करून गावात त्याच्या घरी  गेला होता. मला एकदम काही सुचेनासे झाले. तळहाताला एकदम घाम यायला लागला. मी कसे सांगणार होते हे राहुलला?

राहुलला माझा बदलेला मूड लगेच समजला.

त्याने माझा हात आपल्या हातात घेतला. पाच वर्षानंतरचा त्याचा पहिला स्पर्श.

"काय झाले रीना? तू एकदम इतकी टेन्स  का झालीस?"

"राहुल मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुला मी अगोदरच सांगायला हवी होती…

पण धीर झाला नाही ..तुला काय वाटेल ? या विचाराने मी तुला सांगायचे पुढे पुढे ढकलत होते. पण आता अजून उशीर नको. मी तुझी अगोदरच माफी मागते. माझ्यावर रागावणार नाहीस असे मला वचन दे."

"रीना, आता प्रस्तावना पुरे. नाही रागावणार. मला सांग काय झाले आहे? नाही तरी आता तुझ्यावर रागावण्याचा मला काय अधिकार आहे ?"

मी एकदम दचकून राहुलकडे पाहिले. तो खूप दुखावला गेला आहे याची मला कल्पना होती. मीच त्याला कारणीभूत होते आणि आता मी त्याला आणखीन दुखावणार होते. मी माझा हात त्याच्या हातातून काढून घेतला, त्याच्याकडे न बघता. आपल्या पायाकडे पहात मी माझे सगळे धैर्य एकवटून त्याला म्हणाले, "कदाचित हे सगळे सांगितल्यावर मला सुटल्यासारखे होईल का ? किती दिवस हे ओझे मी असेच एकटीने वागवणार होते?

" तर नो प्रस्तावना. माझा मुलगा रिहान.. जो आता पाच वर्षाचा आहे तो जीवनचा मुलगा नाही… तो आपला मुलगा आहे. तुझा आणि माझा." एकदाचे सांगितले मी.  मला एकदम थकून गेल्यासारखे झाले. त्याच बरोबर एकदम एक ओझे मनावरून उतरल्यासारखे झाले.

राहुलने ते ऐकले... पण एकदम त्याला  सगळे समजले नाही ..तो एकदम गोंधळला. तो एकदम माझ्या शेजारून उठून माझ्या समोर येऊन उभा राहिला. माझे दोन्ही खांदे आपल्या दोन्ही हाताने धरून मला हलवत माझ्या  चेहऱ्याजवळ आपला चेहरा आणत तो म्हणाला,

"काय? तू हे काय बोलते आहेस रीना? खरे आहे हे? आणि हे तू मला  आत्ता सांगती आहेस ? का रीना ? का ? मी तुला इतका परका वाटलो का?

"परका नाही माझ्या राजा...अजूनही मला तू खूप आपला वाटतोस. पण मला जेव्हा मी आई होणार याची खात्री झाली तो पर्यंत तुझी engagement झाली होती शिरीन बरोबर. निनाद आपल्या मित्राने मला ते कळवले  होते. माझे सुद्धा लग्न ठरले होते. मी जीवनला सांगितले आणि त्यांनी त्याला आपला मुलगा समजायची मान्यता दिली. आम्ही मग रजिस्टर लग्न केले. मी आणि जीवन जणू एकमेकावर केलेल्या उपकाराच्या बेडीत अडकून पडलो."


7

राहुल आता माझ्यापासून थोडा दूर जाऊन माझ्याकडे पाठ करून लांबवर दिसणाऱ्या डोंगररांगाकडे पहात उभा होता. तो काहीही बोलत नव्हता. खरंच मी किती दुखावले आहे याला आणि अजून दुखावतेच आहे. माझा जन्मच जणू याला दुखावण्यासाठी झाला आहे. मी त्याच्या जवळ गेले. त्याला मागूनच मिठी मारली आणि त्याच्या पाठीवर डोके ठेऊन माझ्या अश्रुंना वाट करून दिली. मग एकदम मला आतून खूप उचंबळून आले….आणि मी जोरजोरात हुंदके देऊन रडायला लागले. माझ्या अश्रुंनी राहुलचा शर्ट ओला झाला. मला राहुलला खूप काही सांगायचे होते. परत परत त्याची माफी मागायची होती, पण माझे शब्द मला सोडून गेले होते.

शेवटी राहुल वळला. त्याच्याही डोळ्यात आता अश्रू आले होते. एका हाताने माझे अश्रू पुसत त्याने मला आपल्या मिठीत घेतले . मी सुद्धा त्याच्या मिठीत किती तरी वेळ हमसून हमसून रडत होते. आम्ही दोघेही किती वेळ असेच एकमेकाच्या मिठीत उभे होतो कोण जाणे? मग राहुलच  सावरला.

मला तो आत दिवाणखान्यात घेऊन गेला. आम्ही सोफ्यावर बसलो...तसेच एकमेकाच्या मिठीत...किती तरी वेळ.

"रीना मी तुला मागेच म्हणालो होतो...आयुष्याच्या महत्वाच्या वळणावर आपण जे निर्णय घेतो ते आपल्या  पुढील जीवनाची दिशा ठरवतात. नको असे आततायी, अघोरी  निर्णय घेऊस! चेस खेळताना कसे, महत्त्वाच्या वेळची खेळी चुकली की  मग पुढची प्रत्येक खेळी जणू चुकतच जाते...मग शेवटी मात ठरलेली. अगदी तसेच होते आयुष्याचे. आपण परके झालो. माझ्या मुलाला मी ओळख दाखवू शकत नाही. तू जीवनावर अन्याय करत आहेस आणि मी शिरीनवर. तू तुझा संसार सोडू शकत नाहीस आणि मी माझा. We have created a fine mess of our life!" राहुल मला म्हणत होता.

मी काहीच बोलले नाही. बोलण्यासारखे काही नव्हतेच. आम्ही बसलो होते तिथल्या खिडकीतून आता सुंदर सूर्यास्त दिसत होता. पण आमचे दोघांचेही तिकडे लक्ष नव्हते. हळूहळू अंधार पसरत होता. मी उठून वाईनची बाटली काढली आणि ग्लास काढले आणि थोडीशी वाईन दोन्ही ग्लासात ओतून एक ग्लास राहुलच्या हातात दिला. आम्ही एकमेकांकडे पहात  ग्लास उंचावून हळू हळू वाईन प्यायला सुरुवात केली. किती तरी वेळ आम्ही काहीही न बोलता तसेच एकमेका शेजारी बसून होतो.  

मग मी उठून, केव्हातरी सोफ्याशेजारील टेबल लॅम्प लावला.एक अस्वस्थ शांतता आमच्या भोवती पसरत गेली.

"राहुल तुला आठवते ?  आपण महाबळेश्वरला  ट्रीपला गेलो  होतो तेव्हा आपल्याला इंद्रधनुष्य दिसले होते आणि मला किती आनंद झाला होता. मला आत्ता वाटते आहे , तू माझ्या आयुष्यातील आनंदाचे इंद्रधनुष्य आहेस. अगदी थोडा वेळ दृश्यमान होणारे पण आयुष्य रंगीबेरंगी करून टाकणारे. जरी हवेहवेसे वाटले तरी...केव्हा तरी दिसणारे आणि थोडाच वेळ असणारे..." बऱ्याच वेळाने मी म्हणाले.

राहुल काहीच बोलला नाही. मग मीच काही तरी बोलत बसले. राहुल आपला गप्पच.

"राहुल...राहुल अरे कुठे हरवलास ? मी चुकले...मला माफ कर असे किती वेळा सांगू ? राहुल ..राहुल"

मी शेवटी त्याला खांद्याला धरून हलवत म्हणाले.


8

राहुल:  

" राहुल ..राहुल .." रीना माझ्या खांद्याला धरून हलवत होती.

मी एकदम भानावर आलो. रीनाशी मला किती बोलायचे होते. मग मी किती तरी वेळ रीनाला माझ्या आयुष्यातील गेल्या ५ वर्षातील घटना सांगत बसलो. ती सुद्धा  मला असेच काही तरी सांगत बसली. किती रात्र झाली होती कुणास ठाऊक ? पण आमच्या गप्पा संपत नव्हत्या. रीना भेटली. इतक्या वर्षांनी. किती बोलायचे होते आम्हाला. किती तरी सांगायचे होते.

मग केव्हातरी ...आम्ही दोघेही ज्या प्रसंगाला भीत होतो आणि जो क्षण पुढे पुढे ढकलत होतो तो क्षण आमच्या नकळत अचानक  आमच्या पुढ्यात येऊन उभा राहिला..माझे लक्ष एकदम आम्ही बसलो होतो त्या दिवाणखान्याच्या दाराकडे  गेले. मधेच केव्हा तरी रीनाने आम्ही ज्या सोफ्यावर बसलो होतो, त्याच्या शेजारी असलेला Table lamp लावला होता. चांदण्याचा एक पट्टा दारातून हळूच आत आला होता. आम्ही लावलेल्या दिव्याला घाबरून तसाच तो आपले अंग चोरून दरवाज्याशेजारी जणू लाजून उभा होता. मी आत येऊ का ?असे विचारत. मला एकदम हसू आले.

" का हसलास ?" रीनाने विचारले.

आमच्या समोरच्या टेबला वरील आमच्या दोघांच्याही वाईनचे ग्लास आता रिकामे झाले होते. माझा डावा हात केव्हातरी माझ्या शेजारी बसलेल्या रीनाच्या खांद्याभोवती होता आणि रीनाने आपले डोके माझ्या खांद्यावर टेकवले होते. रात्र बरीच झाली होती

"हा चांदण्याचा पट्टा पाहिलास? काही वेळापूर्वी हा दारा बाहेर लाजून उभा होता. आता थोडी धिटाई करून बराच आत आलाय. पण अजून सगळ्या खोलीभर पसरलेला नाही. आपण लावलेल्या टेबललॅम्पला घाबरतोय. मी आत कसा येऊ असे जणू विचारतोय." मी म्हणालो.

" पण तू हसलास का?"

"मला आठवले, तू नेहमी म्हणत असायचीस...स्त्री आणि पुरुषा मध्ये खरे नाते असावे ते मैत्रीचे. ते एकमेकाचे सखा आणि सखी असावेत. बाकीची नाती, नवरा-बायको, मुलाचे आई-वडील, कुणाचे तरी सून आणि जावई ही सगळी नाती, या मैत्रीच्या नात्यामुळे टिकतात. अशी मैत्रीच जर नसेल तर बाकीची नात्यात फारसा रंग भरत नाही. ती सगळी कृत्रिम असतात. मला या चांदण्याकडे पाहून वाटले की आपले ते मैत्रीचे  खरे नाते असेच या चांदण्यासारखे अंग चोरून बाहेर उभे होते. आता थोडेसे आत आले आहे. या लहानश्या पट्ट्या सारखे, मी आत येऊ का? असे आपल्याला विचारत अजूनही लाजून उभे आहे. मला या कल्पनेनेच एकदम हसू आले."

रीना एकदम खळखळून हसली...आपले नाचरे डोळे माझ्यावर रोखत तिने हात मागे करून Table lamp बंद केला. ते थोडेसे आत आलेले चांदणे एकदम धीटपणे… भसकन आत आले. साऱ्या दिवाणखान्यात पसरले. दारातून आत आले. खिडकीतून आत आले. त्याने आम्हाला पुरते वेढून टाकले.

"आता? अजून लाजतेच आहे का ते नाते?" रीना म्हणाली.

आमचे  खोल खोल  मनाच्या कुठल्यातरी बंद करून ठेवलेल्या कप्य्यातील प्रेम असे एकदम चोर पावलांनी आले  पण एकदम  बेभान कसे झाले ते  आम्हाला कळलेच नाही. सगळ्या बेड्या झुगारून... समुद्रातील बेभान लाटेसारखे एकदम आमच्यावर कोसळले आणि आम्हा दोघांना एका अतीव सुखाच्या नंदनवनात घेऊन गेले. जिथे आम्ही दोघे नव्हतो, फक्त एक इंद्रधनुष्य अवतरले होते. ते कायमचे असणार नाही, काही क्षणापुरते असणार आहे याची जणू आम्हाला काहीच फिकीर नव्हती.


9

या  आमच्या प्रियकर प्रेयसीच्या नात्याला आमच्या सखा आणि सखी या नात्याला, उद्याची अजिबात फिकीर नव्हती.

प्रेम माणसाला किती असहाय आणि हतबल  बनवते नाही का ?

आणि बेफिकीर सुद्धा....!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel