नीला पाटणकर
शिकागो
माणसाच्या जीवन प्रवासात प्रेम या शब्दाला खूप महत्व आहे. प्रेम आणि जीवन यांचे अतूट नाते आहे. प्रेमाशिवाय माणूस अधुरा राहतो. माणसा पासून ते प्राणीमात्रां पर्यंत सर्वांना प्रेमाची नितांत आवश्यकता असते. ते प्रेम कुठे ना कुठे प्रत्येकजण शोधत असतो. कांहींना ते पटकन गवसते. तर कांहींना खूप जीव लागल्यावर किंवा लावल्यावर मिळते. प्रेमाची अनुभूती आल्यावर मनातून स्वर्ग दोन बोटे राहिल्याची प्रचिती येते. प्रेम म्हणजे प्रेम असते. जिव्हाळा ही सच्च्या प्रेमाची पहीली पायरी आहे. प्रेमाने प्रेम जिंकत असतं.
प्रेम दिल्या घेतल्या शिवाय मिळत नसते व दिसतही नसते. प्रेम भरभरून दिल्यावर आणि घेतल्यावर आनंदे
दोघांची झोळी भरत असते. सर्वांगाने फुललेल प्रेम जिवाभावाच बनून राहते. प्रेमाची व्याख्या खूप विस्तिर्ण आहे. प्रेम या एका शब्दात भाव-भावनांचा तुडुंब सागर भरलेला असतो. प्रेम ही भावना,फुला सारखी फुलुन बहरत असते. व पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वृध्दींगत होत असते. ती जतन केल्याने मुरांब्यागत त्याची गोडी अवीट होते. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव आहे. जीवन एक संघर्ष आहे. असे म्हटले जाते. मग हे प्रेमाने प्रेम देऊन आपण बदलू नाही का शकत? नक्कीच साध्य करता येईल. प्रेमाने प्रेम जिंकून जीवनाच्या अनेक टप्प्यावर प्रेमाच्या पायऱ्या चढून सर्वोतोपरी ते अनुभवता येत. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिण, शेजारी आपल्या जीवाची धडकन् होऊन जात असतात. त्यातून मिळणारे प्रेम वेगळेच आकार घेऊन जाते. जीवन ही रंगभूमी आहे. त्यात आपण अनेक विध प्रेमाचे रंग भरू शकतो. प्रेम कशावर ही होऊ शकते. व्यक्ती प्राणी, गाव, शाळा-कॉलेज, पुस्तक, काव्य, एखादी वस्तु इ. प्रेमाची परिभाषा प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून वेगळी असते.व्यक्ती प्रमाणे व प्रसंगानुरूप ती बदलत असते.
रस्त्याने चाललेल्या अंधाची काठी होणे असो किंवा लंगड्याचा आधार होणं असो की अनाथांचं पालकत्व
स्विकारून त्यांना प्रेम देणं असो, ती सर्व प्रेमाची प्रतिक असतात. हे सत्कर्म लोक हल्ली हिरीरिने पुढे येऊन करत असतांना दिसतात. कित्येकांचा हा आवडीचा छंद झाला आहे, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. समाजात कैक प्रकारची अशी सेवाभावी जागृती झाली आहे हा कौतुकास्पद बदल मनाला भावून जातो. आपल्या जीवनात आपण कसे व किती खूष आहोत यापेक्षा आपल्यामुळे किती लोक खूष आहेत हे फार महत्वाचं असते. यावर खर माणसाचं सुख अवलंबून असते. सत्कर्म ही अंतर्मनातील उर्मीतून आलेली प्रेम भावनाच असते. ही जीवंत ठेवणे आपलं काम असत. प्रेम हे फक्त व्यक्तीनिष्ठ, वस्तुनिष्ठ असूच शकत नाही. आत्मकेंद्रित व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा कधीच विचार
करू शकत नाही. त्यामुळे ती इतरांचे प्रेम जाणून न घेता त्याचा स्विकार करत नाही. अशांपासून दूर राहणं उचीत असते.
प्रेमाचा आदर केल्याने प्रेम द्विगुणीत होते.निखळ प्रेमाला तोड नसते.ते नेहमी प्रेमाला पोषकच ठरते.प्रेम द्यावे व घ्यावे. जबरदस्तीने प्रेम घेणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे. प्रेमाचा आदर केला की ते हिरावून घेण्याची गरज पडत नाही. प्रेम व्यक्त करण्याची घाई करू नये. ते कृतीतून आपोआप जाणवते. दुसऱ्यासाठी व स्वत:साठी जगण्याने जीवन एक अनुभव प्रवाह होऊ शकतो. "सत्यम् शिवम् सुंदरम्" असे सुंदर जीवन ब्रह्यरूप होऊन जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जाते. खेळ, साहित्य, संशोधन यातून रूचीनुसार प्रेम मिळत असत. यातूनच प्रवाही जीवनधारा जन्माला येते. आपण करत असलेल्या कृतीला अर्थ प्राप्त होतो. थोडे प्रेमाने आंजारले-गोंजारले तर प्राणी सुध्दा आपल्या व आपण त्याच्या प्रेमात पडतो.असे प्रेममय सरळ जीवन जगण्याचा अनुभव पहाटेच्या मंदिरातील घंटानादा इतका प्रसन्न करून जातो. हा मंजुळ घंटानाद ऐकून आभाळात उडणारे पक्षी सुध्दा त्या नादात तल्लीन होऊन आवाजाच्या प्रेमात पडून उंच भरारी घेऊन झेपावतात व सजलेलं प्रेमाचं सुंदर जीवन आनंदाने जगतात. हीच तर प्रेमाची खरी जादू व किमया आहे. कांही तरी रंगत आल्या शिवाय माणूस तरंगत जात नाही.
तसच कांहीस पुस्तक प्रेमींच असत. त्यांना इतकी वाचनाची आवड असते की चणे-फुटाणे व फुलपुडीच्या आणलेल्या पुडीच्या कागदाच्या तुकड्यापासून ते रद्दीतील कागदा पर्यंत सगळ्या कागदांच्या कपट्यांचे वाचन केल्या शिवाय त्यांच्या नजरेतून ते सुटत नाही ती अक्षरे वाचून ते वाचन सुख मिळवून समाधानाचा तृप्तीने ढेकर देतात. त्यांना इतकी वाचनाची आवड असते की लायब्ररीतील पुस्तक वाचून परत करावी लागतात म्हणून स्वत: स्वखर्चाने पुस्तक विकत घेऊन वाचून त्याचा संचय करतात. कारण थोड्या कालावधीने पुन्हांपुन्हां ती पुस्तक वाचतां यावी हा त्या मागील हेतू असतो. त्यासाठी ऐपत नसतांना अगर आर्थिक दृष्ट्या न परवडणारे असले तरी त्यांना तो वायफळ किंवा अनाठायी केलेला खर्च आहे असे कधीच वाटत नाही.याला म्हणतात सच्चे प्रेम !
एखाद्यावर प्रेम करणे म्हणजे नेमके काय ? ओढूनताणून केलेले प्रेम व आणलेला प्रेमाचा खोटा पुळका कधी खरे प्रेम ठरत नाही. प्रेमाचे सच्चे बंध पुढे नेतात. मागे खेचत नाहीत. मनांतून प्रेम करण्याची,साऱ्यांना सामावून घेण्याची क्षमता असावी लागते. ते आपले आप मिळते. मिळवावे लागत नाही. दिव्य प्रेम आकाशाप्रमाणे भव्य असते. त्याला सीमा नसते. मनातून प्रेम करून, साऱ्यांना सामावून घेतलेलं प्रेमसुख परमानंद टाळी लागल्या सारखी अनुभूती देऊन जाते. प्रेम दुखावल की त्यातून क्रोधाची निर्मिती होते. व त्याची ईर्षा बनून प्रवाहित होऊन कारूण्याने प्रज्वलित होत असते. अशा प्रेमाची उबग येण्यात निर्मिती होते.
या उलट प्रापंचिक प्रेम सागराप्रमाणे अथांग व सागर तळाचा ठाव घेणारे सखोल असते. आदरयुक्त भावनेत
डुंबणारे विशाल भावसंबंध असलेले असते. त्याचा सहसा कंटाळा येत नाही. वाजवी पण आवश्यक सुख सुविधानी नटलेले, हवेहवेसे वाटणारे ते जिव्हाळ्याचे दिव्यप्रेम असते. आकर्षणातून आलेले क्षणैक प्रेम,यातून सबळ नाते संबंध जुळु ही शकतात. अगर विपरीत पध्दीतीने विस्कळीतही होऊ शकतात. तेथे सतर्कतेचे भान ठेवावे लागते. अवाजवी व निष्फळ गोष्टीं पासून दूर राहुन गहन प्रश्न येणार नाही ना याकडे लक्ष ठेवावे लागते. गोडीगुलाबीने नात्यांची नवनिर्मिती होऊ शकते. बालिश प्रेम,परीपक्व प्रेम नसते. तुमच्या आयुष्यात कोण येणार, हे तुमच्या कपाळावरची भाग्यरेषाचं ठरविते.अपरीपक्व प्रेम नेहमी आयुष्य विध्वंसक करून धुळधाण करू शकते. त्यासाठी सतर्क असणे अत्यंत गरजेचे असते.
आईचे प्रेम हे वात्सल्यामूर्तीच्या निरागसतेतून व त्यागातून आलेले असते.तिच्या त्या प्रेमाला कसलीच तोड
नसते. मुलांना मायेने हाकाटणारी आई जितकी श्रेष्ठ आहे, तितकीच वासरासाठी हंबरणारी गाय, पिल्लांसाठी म्याव,म्याव करणारी मांजर, पाखरांसाठी चिवचिव करणारी चिमणी किंवा भू,भू करणारा श्वान, कावकाव करून लेकरांना बोलविणारी कावळीणही तितकीच वंदनीय आहे. कारण त्या बोलवण्यातून एकच ममतेचा ओलावा असतो. म्हणूनच तर आईच्या प्रेमाला उपमाच असूच शकत नाही. ते उदरातून निपजलेल अगाध प्रेम असत. म्हणून तर मस्तकात झालेला शूळ अथवा पायात रूतलेला काटा काढतांना आलेली कळ न सोसवून आपल्या तोंडून न कळत "आई" हा शब्दोच्चार बाहेर पडतो.
आईच्या प्रेमा इतकेच राष्ट्रप्रेमाची महती आहे. आपली जन्मभूमी ही मातेसमान असते. त्यावर जीवाच्या
आकांताने प्रेम करणारे व धारातिर्थि पडलेले देशप्रेमी आपण पाहात आलोय व पाहात आहोत. मायदेश व माय यांना एकाच तराजूत तोलले जाते. अशी श्रेष्ठ व थोर ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नाहीत पिंपळाच्या रोपा सारखं खडकावर उगवतां आलं पाहीजे. कारण जिव्हाळ्याचं प्रेम, अक्षय टिकणारा घराचा तसेचं राष्ट्रीचा तो कळस असतो. व त्यावर भक्तीचा झेंडा फडकत असतो. हेच तर "प्रेम म्हणजे प्रेम असतं"
म्हणून तर प्रेमाने प्रेम जिंकतं असतं……