मैत्रेयी पंडित
नाशिक
"आठ दिवसांवर आली आता लग्नाची तारीख!" तो मनातल्या मनात विचार करत होता, गालातल्या गालात हसत थोडासा लाजतही होता. परवा घराकडे रवाना व्हायचे म्हणून ओढ लागली होती त्याला, वेळ सरता सरत नव्हता. आणि त्यात आजचा दिवसही तसाच हुरहूर वाढवणारा होता. गेल्या चार दिवसात घरच्यांशी आणि खास करून तिच्याशी काहीच बोलणे झाले नव्हते, आठवण मात्र प्रत्येक क्षणी होती. तो थोडा हळवा झाला असावा, शांत उभा होता... इतक्यात मी तिथे पोहोचलो आणि आता निघायला हवे म्हणून त्याला सुचवले आणि स्वतःचे समान पाठीला लावून उभा राहिलो.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून महामार्ग बंद होता. त्यामुळे सायंकाळच्या आत जम्मू ते श्रीनगर अंतर पार करणे गरजेचे होते. जवळपास अडीच हजाराचा ताफा होता आमचा. सामान गाड्यांमध्ये भरताना तो खूप काही बोलत होता माझ्याशी! "लग्न ठरले आणि काही दिवसातच इथे आलो, येताना खरं तर मी तिला कबूल केले होते की या वेळीचा व्हॅलेंटाईन डे मी तिच्यासोबत घालावेल, पण बघ ना अजून इथेच आहे. खूप आठवण येतेय आज मला तिची, माझ्या घरच्यांची... ही गोष्ट तितकीच खरी आहे की माझे पाहिले प्रेम असलेल्या मातृभूमीच्या सेवेत मी खूप आनंदी आहे, तिच्या संरक्षणाचे जे मी वचन दिले होते त्याच्याशी मी एकनिष्ठ आहे... पण तरीही घरच्या आठवणी मला आज अस्वस्थ करताय."
मी शांतपणे ऐकत होतो, आणि मनात हाही विचार करत होतो की त्याचे काही चुकत नाहीये. अनेक दिवस घरच्यापासून दूर कुठेतरी सीमेवर आम्ही तैनात असतो. ना दिवस माहिती ना रात्र... कधी घरच्यांशी संपर्क होतो, तर कधी अनेक दिवस काहीच खबरबात नसते, पण विश्वासावर सारे काही चालू राहते. विश्वास!! प्रेमाला प्रेमाने बांधून ठेवणारी एक रेशीम गाठ... जितकी घट्ट तितकीच अतूट!! कधीतरी अचानक कोणाच्या घरून पत्र येते, प्रेमाने चिंब भिजलेल्या त्या शब्दांमध्ये आम्ही न्हाऊन निघतो. कधी कधी पत्र कोणाच्या घरून आले आहे याला महत्त्व राहत नाही... आपुलकीचे, प्रेमाचे, आशीर्वादाचे चार शब्द घरून खास आमच्यासाठी आलेत ही जाणीवच आम्हाला आनंद देते. आज सगळा देश, नव्हे तर संपूर्ण जग जेव्हा व्हॅलेंटाईन डे आपल्या प्रेमाच्या व्यक्ती सोबत साजरा करतंय, आम्ही केवळ त्या व्यक्तीच्या आठवणीने खुश होतोय... आणि हिमालयाच्या कुशीत शांतता आणि सौजन्य अबाधित राखण्याचे भारतमातेला दिलेले वचन निष्ठेने पाळतोय. तीच आमचे पाहिले प्रेम अन् तीच आमची प्रेयसी!
"....के तुम बिन ये घर सूना सूना है |" गाण्याचे स्वर अचानक कानावर येऊन आदळले आणि मी भानावर आलो. विचाराच्या ओघात कधी समान भरून गाडीत बसलो लक्षातही आले नव्हते माझ्या. माझी नजर पुन्हा त्याला शोधू लागली, पण तो या गाडीत नव्हता. कोणीतरी थट्टेच्या स्वरात म्हणाले,
"नवरदेव पुढच्या गाडीत गेलाय, लवकर श्रीनगरला पोहोचलो तर लवकर घरी निघता येईल असे वाटत असेल कदाचित त्याला..." गाडीत एकच हशा पिकाला.
पुन्हा एकदा गाणी म्हणत आमचा प्रवास सुरू झाला. मी आजूबाजूला पाहिलं, जणू स्वर्गाच्या पर्वतराजींमधून जात आहोत असे वाटले. मजल दरमजल करत एकामागे एक अश्या जवळपास अडीच हजार जवानांना घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा ताफा जम्मूचे एकामागून एक हिमपर्वत मागे सारत श्रीनगरकडे कूच करत होता. आणि अचानक.... धरणीकंप व्हावा तसे काही झाले आणि ज्वालामुखी फुटून त्यातील लाव्हा क्षणात सर्वत्र पसरावा तसे रक्ताचे फवारे आणि देहांच्या चिथडया उडताना दिसल्या...... सर्वत्र धूर धूर झाला अन् अंधारून आले सारे !! कोण कुठे आहे? वेळ काय आहे? काय घडले आहे? काही काही सुचत नव्हते की कळत नव्हते. स्वतःदेखील आडव्या-तिडव्या उडून पडलेल्या बसमध्ये कसेतरी फसलो आहोत, जखमी आहोत याची जाणीव व्हायला किती वेळ गेला ते अजूनही आठवत नाही... पण जे घडले आहे ते काहीतरी भयानक आहे याची जाणीव मात्र त्या क्षणी झाली. स्फोटाचा धक्का इतका भयानक होता की ज्या गाडीचा स्फोट झाला तिच्या आसपासच्या गाड्या देखील सुकलेले पान उडावे त्याप्रमाणे उडून फेकल्या गेल्या होत्या. अनेक जण गंभीर जखमी झाले आणि स्फोट झालेल्या गाडीतील जवळपास पस्तीस-चाळीस जणांचे तर मृतदेह देखील राहिले नाहीत. स्फोटाच्या त्या कानठळ्या बसवणाऱ्या एका आवाजानंतर मागे उरला होता तो फक्त अंधार... आणि हृदय सुन्न करून टाकणारा मृत्यूचा नंगा नाच... एकीकडे प्रेम आणि ममतेचा संदेश देणारा व्हॅलेंटाईन डे आणि अशा दिवशी मानवतेला काळिमा फासणारा कसला हा हाहाकार!!!
या घटनेने अनेकांच्या शरीराला झालेली जखम कदाचित भरून निघेलही पण मनांवर जी जखम झाली ती कायमचीच. बाह्यतः भरून आलेली जखम बघताना आजही डोळ्यांसमोर स्पष्टपणे दिसतेय, ती छिन्नविच्छिन्न झालेल्या देहांची रांगोळी आणि त्यांच्या रक्ताच्या पिचकाऱ्यानी काश्मिरी भूमीवर साचलेली रक्ताची थारोळी!! याची पुढे पुष्कळ चौकशी व शहानिशा झाली. आतंकवादी संघटनेने केलेल्या या पाशवी कृत्यात जवळपास तीनशे किलो स्फोटकांचा साठा एका गाडीत भरून ती गाडी आमच्या ताफ्यावर चढवली गेली, म्हणजे जिवंत मनुष्यबॉम्बच म्हणा की!! त्याचे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटले. पण... पण त्या पडसदांचे काय जे या तीस-चाळीस शहिदांच्या घरांवर, त्यांच्या स्वप्न आणि आकांक्षांवर उठले? एखाद्या सौभाग्यकांक्षिणीला आपल्या ओल्या मेहेंदीने लाल होण्याआधीच रक्ताचे अश्रू रडावे लागले.... तर कुणा वृद्ध मातापित्यांना आपल्या तरुण मुलाच्या मृत्यूचे दुःख पचवावे लागले. काश्मीरमध्ये पोस्ट असणाऱ्या प्रत्येकाच्या घरात तेव्हा फोनची घंटी वाजणे म्हणजे जणू काळाने त्या कुटुंबावर फिरवलेल्या वक्रदृष्टीची चाहुलच वाटू लागली होती. मनामनांमध्ये धुमसणारी आग देशाला ज्वालामुखी बनवू लागली होती. एक इंच उंची कमी असली तरी अपात्र ठरवणाऱ्या लष्कराला प्रत्येक मातेचे मन आक्रंदून 'माझ्या मुलाचा हा छिन्नविच्छिन्न देह मी कसा स्वीकारू?' असा हृदय पिळवटून टाकणारा प्रश्न विचारात होते. 'मैं वापस आऊगा...' गुणगुणत घरच्यांना निरोप देऊन गेलेल्या जवानांचे असे घरी परतणे कोणाला रुचणार होते?? सारे सारे कधीही न घडावे असे घडले होते.
तावूनसुलाखून घेतलेले, प्रशिक्षित केलेले चाळीस जवान एकाएकी नाहीसे होताय आणि ते देखील कुणा आतांकवाद्याने केलेल्या भ्याड आणि अमानुष हल्ल्यामुळे ही राष्ट्राच्या दृष्टीने फार मोठी हानी होती. यामुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेवरदेखील बोट उचलले गेले. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती या काळात. कितीही सरकारी मदत या परिवारांना मिळाली, किंवा शहिदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी कितीही कँडलमार्च निघाले तरी न भरून येणारी हानी कशी भरून निघणार होती? निधड्या छातीने मृत्यूला सामोऱ्या जाणाऱ्या त्या सिंहांचे छावे उद्या त्याच निधड्या छातीने जरी सैन्यात सामील झाले तरी त्यांच्या अंतर्मनाला लागलेली बोच अन् पोरकेपणाची पोकळी थोडीच भरू शकणार होते? भ्याड हल्लेखोरांस यातून मिळाले तरी काय? मागे प्रश्न उरला होता तो एकच या सगळ्यांत जिंकले कोण ? रक्ताची होळी खेळून माणुसकीला काळिमा फासणारा अमानुष आतंकवाद, की लाल रंग प्रेमाचा ही मनामनांतील भावना तशीच हळवी रहावी म्हणून मातृभूमीच्या प्रेमासाठी तिरंग्यात गुंडाळून घरी परतलेले शहीद जवान??