आसावरी ऐनापुरे
'प्रेम कुणावर करावं?
कुणावरही करावं
प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं,
भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं,
दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं
प्रेम कुणावरही करावं'
कुसुमाग्रजांची ही कविता 'प्रेमावरच्या' भावना व्यक्त करते. प्रेमाविषयीची उदात्तता अधोरेखित करते. त्यादृष्टीने 'प्रेम' या भावनेची सर्वसामावेशकता सूचित करते. 'प्रेम' म्हणजे काय? ढोबळमानाने त्याचा अर्थ ममता, वात्सल्य असा होतो. मनात निर्माण झालेली ही भावना जेव्हा प्रकट रूप धारण करते तेव्हा ती कृती, ते वर्तन दुसऱ्याबद्दलचा जिव्हाळा प्रकट करत असते. दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाटणारी कळकळ, आस्था त्यातून प्रकट होते. 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' असे साने गुरुजी म्हणतात. जे दुसऱ्याला दिल्याने वाढते, वृद्धिंगत होते ते 'प्रेम'. प्रेमाने माणसे जवळ येतात. जग जवळ येते. प्रेमाने नाती निर्माण होतात. ती घट्ट बांधली जातात. जग जिंकण्याची ताकद 'प्रेम' देते. द्वेषाला जाळून टाकण्याचे काम प्रेम करते. प्रेम म्हणजे मैत्री. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेमात माणूस जीव लावतो. एखाद्याला जीवापाड जपतो. त्यामुळेच प्रेमात जर विश्वासघात झाला तर तो सहन करू शकत नाही. या 'हृदयाचे' त्या 'ह्रदयाशी' जे नाते असते, ते प्रेमाचे असते. 'प्रेम' ही एक नैसर्गिक भावना आहे. ती निर्माण करु म्हटल्याने कधीच निर्माण होत नाही. प्रेम हे कायमच पवित्र असते. ज्यात सर्वस्व अर्पण करण्याची, समर्पणाची भावना सामावलेली असते. समोरच्या व्यक्ती मधली कुठली गोष्ट आपल्याला आवडेल आणि त्यामुळे प्रेम निर्माण होईल हे सांगता येत नाही. ते व्यक्ती सापेक्ष असते. कुणाला तिचे बाह्य सौंदर्य, कुणाला विचारांचे सौंदर्य तर कुणाला एखाद्याचा साधेपणा भावतो. प्रत्येकाचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळा असतो. कविवर्य मंगेश पाडगावकर प्रेमाविषयी म्हणतात,
'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं सेम असतं'.
तर गुलजार एके ठिकाणी म्हणतात,
'ये इश्क, मोहब्बत की रिवायत भी अजीब है
पाया नही है जिसको, उसे खोना भी नहीं चाहते'.
'मोहब्बत', 'इश्क', 'प्यार', 'लव' हे सगळे शब्द 'प्रेम' आणि 'प्रेमच' व्यक्त करतात. माणूस एकदा प्रेमात पडला की तो आंधळा होतो असं म्हणतात. त्या व्यक्तीसाठी तो काहीही करायला तयार असतो. प्रेम हे ठरवून होत नाही. करु म्हटल्याने करता येत नाही. प्रेमाला बाह्यरंग नसतो. अंतरंगी मात्र ते शुद्ध असते. व्यक्तीव्यक्ती मधले, माणसांवरचे प्रेम ही प्रेमाची ढोबळ व्याख्या झाली पण जरा खोलवर जाऊन विचार केला तर आपल्या असे लक्षात येते की प्रेम आपण सद्गुणांवर करू शकतो, सद्विचारांवर करू शकतो, सकारात्मकतेवर करू शकतो. जे जे उत्तम, उदात्त आहे,मंगल आहे त्या सगळ्यांवर करू शकतो. प्रेमाची ही व्याख्या विस्तारताना कुसुमाग्रज म्हणतात,
'ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं, त्याच्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं
प्रेम योगावर करावं, भोगावर करावं
आणि त्याहुनही अधिक, त्यागावर करावं.'
एकीकडे ही हळुवार भावना आणि दुसरीकडे प्रेमात पडलेल्या माणसाची अवस्था वर्णन करताना तेच कुसुमाग्रज म्हणतात,
'प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा, मेघापर्यंत पोचलेलं.'
प्रेमाला भाषेचे बंधन नाही. प्रेमाची परिभाषा ज्याला कळली, त्याचं जगणं खऱ्या अर्थाने समृद्ध होतं. प्रेम हे निशब्द असतं. नि:स्वार्थी असतं. निरपेक्ष असतं. आई-मुलांमधलं नातं, गुरू-शिष्याचं नातं, पती-पत्नी, भाऊ-बहीण यांचं नातं ही प्रेमाचीच रुपे आहेत. जगात सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते प्रेमच. कारण 'प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे' हेच खरे आहे. त्यामुळे प्रेम करुया. प्रेम देऊया. प्रेम वाढवूया आणि प्रेम जगू या. कारण कुसुमाग्रजांच्याच भाषेत :-
'प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव.......'