गर्भावस्थेत कॅफीन म्हणजेच कॉफी प्यायल्याने गर्भाला अपाय होतो की नाही हे अजून निश्चित माहीत नाही. असे दिसते की गर्भावस्थेत कमी प्रमाणात कॅफीन घेतल्याने (उदा. दिवसाला एक कप कॉफी) गर्भाला फारसा धोका नसतो. कॅफीन हे द्रव्य कॉफी, चहा, काही प्रकारचे सोडा, चॉकलेट आणि काही औषधांमध्ये आढळते. कॅफीन हे उत्तेजक (स्टिम्युलंट) आहे व ते नाळेला सहजपणे पार करून गर्भापर्यंत पोहोचते. ह्यामुळे गर्भापर्यंत उत्तेजना पोहोचून त्याच्या हृदयाचे ठोके वाढतात.
कॅफीनमुळे कधीकधी नाळेतून होणारा रक्तप्रवाहदेखील कमी होतो आणि लोह शोषले जाण्याचे पमाणदेखील घटते – ह्यामुळे पंडुरोग उर्फ ऍनिमिया होण्याची शक्यता वाढते. काही वेळा असे दिसले आहे की दररोज सातपेक्षा जास्त कप कॉफी प्यायल्यास मृत मूल जन्माला येण्याचा, अकाली प्रसव होण्याचा, नवजाताचे वजन कमी असण्याचा किंवा गर्भपाताचा धोका वाढतो. काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार कॉफीपान मर्यादेत ठेवणे किंवा डीकॅफिनेटेड् म्हणजे कॅफीनचा अंश काढून टाकलेली पेये पिणे चांगले.