आपल्याला उपयोगी पडणाऱ्या वस्तू आपल्या हातांत येतां येतां निसटल्या. याचे चंद्रवर्माला क्षणैक दुःख वाटले. पण त्याने मन घट्ट केले. म्हणाला
“जें झालें तें झालें. आता त्याच्यासाठी दुःख करण्यांत काय फायदा आहे..! आपण एवढ्यातच समाधान मानू की एक दुष्ट मांत्रिक या जगांतून नाहीसा झाला."
इतकें बोलून चंद्रवर्मा थांबला. क्षणांत काही तरी त्याला आठवलें. तो डोळे विस्फारित करून म्हणाला
“कपालिनी, तुला तारुण्य देणारा शंख तर ह्या पाण्यात बुडून गेला. मग तशी दुसरी कोणची वस्तु आहे? आणि ती कोठे मिळेल."
"आतां सारं जग पालथं घातलेस तरी तशी वस्तु मिळणार नाही. तशी वस्तूच ह्या जगांत राहिली नाही. कपालिनी निराशेने बोलत होती. माझ्या इतके वयोवृद्ध या जगांत कोणी हि माणूस नाहीं आणि आतां हें असेंच जीवन कंठत राहाण्याची मला इच्छाहि नाही.”
पुढे ती म्हणाली.
“मला एकहि अशी नवी वस्तु दिसत नाहीं की जिचा उपभोग घेण्याचा मला मोह होईल, आनंद तर राहू देच, मला एका गोष्टीचें फार दुःख होत आहे. तूं माझ्यासाठी इतके कष्ट सोसलेस. इतक्या संकटांशी झुंजलास. मृत्यूच्या मुखात उडी घेतलीस आणि शेवटी मी तुझी कोणत्या हि प्रकारे मदत करूं शकत नाही. हीच गोष्ट मनाला राहून राहून बोचत आहे."
कपालिनी जसजशी बोलत होती तसतसा तिच्या बद्दलचा आदरभाव चंद्रवर्माच्या मनांत वाढत होता. आपले सर्व प्रयत्न निष्फळ झाल्याचे तिला फार दुःख होत होते आणि त्यांतल्या त्यांत चंद्रवर्माची मदत करण्याचे एका बाजूला राहून त्याला संकटांत पाडल्याचेच तिला जास्त दुःख वाटत होतें.
“कपालिनी, तूं असं का समजतेस...? तूं ऐन वेळी माझी मदत केली आहेस. ज्यावेळी मी नदीत पडून वाहात वाहात तुझ्या प्रदेशांत आलो तेव्हा मी जीवनाची आशाच सोडून दिली होती. पण आपल्या घरी नेऊन तू माझे प्राण वाचविलेस. तुझे हे उपकार काय कमी आहेत का??. तुझे उपकार मी काही विसरू शकणार नाही. तुला याच्यासाठी खेद वाटण्याचे कारण नाही." चंद्रवर्मा सांत्वना देत म्हणाला.
जवळच्या डोंगराकडे बोट दाखवून कपालिनी म्हणाली,
"वर्मा, हा पुढील आपले दोघांचे मार्ग निरनिराळे आहेत. मी माझें राहिलेले आयुष्य या डोंगरावर घालविणार आहे. आयुष्याचे अखेरचे दिवस स्वस्थ चित्ताने एका जागी राहिन, शेवटचे दिवस आपल्या आवडत्या ठिकाणी घालविणे बरें असते."
"ठीक आहे. मग मी आणि कालसर्प मिळून तुझ्यासाठी या डोंगरावर एक झोपड़ी बांधण्याचा प्रयत्न करतो. चल आपण डोंगरावर जाऊ."
असे म्हणत चंद्रवर्मा पाऊलवाटेनें डोंगराकडे निघाला. त्याच्या मागोमाग कपालिनी आणि कालसर्प सुद्धा जाऊ लागले. चंद्रवर्मा डोंगरावर गेला व ज्या ठिकाणाहून शंख खाली पडला होता तेथे जाऊन उमा राहिला. तेथून चहू बाजूंना दृष्टि फेंकून त्याने खाली पाहिले. तेथे दगडावर पालथा पडलेला शंख मांत्रिक त्याला दिसला. त्याने थोडा वेळ त्याला निरखून पाहिले. तेव्हां त्याला वाटले की शंखाचा हात थोडा थोडा हलतो आहे. त्याला जिवंत असलेला पाहून त्याचा क्रोध बळावला. तो कपालिनीला म्हणाला,
“मला वाटते आहे की तो दुष्ट मांत्रिक अद्याप मेलेला नाही. जर का यदाकदाचित तो खराच जिवंत राहिला असेल तर मात्र आपली धडगत नाही. म्हणून म्हणतो त्याचा पूर्ण नायनाट केलेला बरा."
असे म्हणत त्याने एक भला मोठा दगड घेतला आणि नेम धरून त्याच्या डोक्यावर मारला, थोड्या वेळाने दोघं शंखाच्या पूजागृहच्या ठिकाणी येऊन पोहोचले. त्या जागी आधी पूजागृहाचा फक्त पायाच दिसत होता. चंद्रवर्मानें तो पाया दाखविला व म्हणाला
"कपालिनी..! तुझ्यासाठी या पायावरच घर बांधतां येईल.”
कपालिनीने मान हलवून होकार दिला. तोपर्यंत सूर्य चांगला डोक्यावर आला होता. पूर्वेकडे पाहून चंद्रवर्मा म्हणाला,
"फार भूक लागली आहे मला. काही तरी खायला मिळेल तर खाऊन पिऊन कामाला लागावें, म्हणतो. फळांकरितां पुन्हां डोंगर उतरून खाली जावे लागेल."