चंद्रवर्माला नागरिकांच्या जयघोषांत राजवाड्यापर्यंत आणण्यात आले. तेथे राजा शिवसिंह त्याच्या स्वागतासाठी तयारच होता. चंद्रवर्माला हाताचा आधार देऊन उत्तरवीत शिवसिंह मोठया कौतुकाने म्हणाला
"इतक्या लहान वयांत तुम्ही एवढी विद्या अवगत केलीत. आमच्या राज्यांत राहून तुम्ही महा मांत्रिक शंखाचा नाश केलात. केवढे उपकार झाले आमच्यावर. ह्यामुळे आमची प्रजा व आम्ही फार खुश आहोत तुमच्यावर.”
राजाच्या बोलण्याचे चंद्रवर्माला आश्चर्य वाटले. परंतु ते प्रकट न करता तो म्हणाला
“शंख फार दुष्ट होता. त्याला त्याचे प्रायश्चित्त देणे भाग होते. म्हणून दिले पावून त्याला यमपुरीला."
"वर्मा शंखाच्या डोंगरावर तुझा मित्र कालकेतु राहातो ना! त्याच्याकडून समजली मला सर्व हकीकत. तुझ्या विषयी सुद्धा मला त्यानेच माहिती सांगितली. त्याच्याच सांगण्यावरून मी तुला कांशाच्या किल्लाकडे जाण्याची प्रार्थना करणार आहे. तूं आल्यामुळे मला किती चरें आनंद होत आहे म्हणून सांग."
“कांशांच्या किल्लयासंबंधी म्हणता होय?" चंद्रवर्मा स्मित करून म्हणाला.
चंद्रवर्मा पुढे काही म्हणणार तेवढ्यात मंत्र्याने राजाच्या कानात काहीतरी सांगितले. राजा चंद्रवर्माच्या खांद्यावरून हात बाजूला करून आणि राजवाड्याच्या दिशेकडे वळून म्हणाला.
“दूरच्या प्रवासामुळे तूं फार थकला असशील म्हणून जेवणखाण करुन थोडावेल विश्रांति घेत्यानंतर आपण शांतपणाने बोलु."
चंद्रवर्मानी राहण्याची व्यवस्था राजवाड्यात केली होती. खाणे पिणे आटोपल्यावर चंद्रयमाने झोपण्याचा बराच प्रयत्न केला पण त्याला झोपच येईना. त्याच्या मनांत सारखे विचार येऊ लागले. शंख पर्वतावर राहणऱ्या कपालिनी आणि कालकेतूकडून शिवसिंह ने माझ्याविषयी सर्व माहिती काढून घेतली आहे. पण कालकेतूनें हे का सांगितले की मी एकटाच कांशाच्या किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो म्हणून...???
शेवटी विचार करता करतां कालकेतूचा हेतू त्याच्या लक्षात आला. कांशाच्या किल्ल्यावर अलोट धनराशी आहे. या धनाच्या सहाय्याने सेना उभी करून आपले गेलेले राज्य आपणांस पुन्हा मिळविता येईल हाच त्याचा हेतु असला पाहिजे...!! थोड्या वेळाने प्रधानाने येऊन चंदवर्मास म्हणाला,
“राजा तुमची वाट पाहात आहे.”
चंद्रवर्मा त्याच्या बरोबरच राजाकडे गेला. राजाने मोठ्या आदराने त्याला बसावयास आसन दिले व म्हणाला
“वर्मा, कांशाच्या किल्ल्यात असलेल्या धनाचा मला मुळीच लोभ नाही. तुला वाटेल मग मी एवंढा त्या किल्यापर्यंत जाण्यासाठी उत्सुक कां?? आणि तसे वाटणे साहजिक आहे. त्याचे कारण हि फार विचित्र आहे. पण आहे मात्र खरे. तुला हे तर माहीत आहेच की कांशाचा किल्ला समुद्र किना-यावर आहे." राजा म्हणाला.
“हो, पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर आहे. आणि सुमारे हजार वर्षापासून कोणी हि मनुष्य तेथे जाऊं शकलेला नाही.” वर्मा म्हणाला.
हे ऐकतांच मंत्र्याने आश्चर्याने राजाकडे पाहिले. राजा मान हालवून म्हणाला
"होय असेल तसें. पुष्कळांचे असे म्हणणे आहे की त्या किल्लाची एका बाजूची भिंत अगदी समुद्र किनाऱ्याला लागून आहे. होय ना?"
"मी सुद्धा असे ऐकले आहे.” चंद्रवर्मा म्हणाला.
“आमच्या पूर्वजांचे असे म्हणणे होते की त्या भिंतीच्या बाजूच्या समुद्रांत कांशांच्या हंडयातून एका मांत्रिकानें कांहीं सुंदर प्राण्यांना कैद करून ठेविले आहे. माझ्या वडिलांनी त्यांना सोडविण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु त्यांना त्या कामांत यश आले नाही. तुझा तो मित्र आहे ना कालकेतु म्हणून..! तो म्हणे वाटेल तेव्हां मनुष्य होतो वाटेल तेव्हा काळा सांप होतो. त्याच्या सांगण्यावरून असे वाटते की तूं तें कांशाचे सर्व हंडे आम्हाला आणून देऊ शकशील. अर्थात त्याला थोडे फार कष्ट पडणारच." शिवसिंह म्हणाला.
शिवसिंहाचे हे बोलणे ऐकुन चंद्रवर्मानें तेव्हांच ओळखलें की कोठे तरी पाणी मुरतें आहे. कारण कांशाच्या किल्ल्यात असलेल्या धनराशीला सोडून कोणी त्या प्राण्यांच्या मागे लगणे शक्य नाही. शिवसिंहाला धनच पाहिजे होते. त्याने ते मिळविण्याचा प्रयत्न सुद्धा केला. पण त्याला यश आले नाही. चंद्रवर्मा मोठा मांत्रिक आहे. त्याच्या मदतीनें धन आपल्याला मिळविता येईल. या बुद्धीनेंच शिवसिंहानें चंद्रवर्माचा मोठा सत्कार केला व त्याच्या विषयी आपलेपणा दाखविला.
"जर खरोखरच त्या किल्ल्यावर धन मिळाले तर त्यांतील फुटकी कवडी सुद्धा मी त्याच्या हाती लागू देणार नाही. मला फसवू पाहतो काय...! ते काही नाही ठकास महाठक होउन मी याच्याशी वागले पाहिजे." चंद्रवर्माने विचार केला.
चेहरा नीट करून चंद्रवर्मा म्हणाला
"आम्हां मांत्रिकांचे कामच ते आहे. अशा तऱ्हेने, कसलें हि दुरापस्त काम करून दाखविण्यासाठीच आमची मंत्रशक्ति आहे. मी अवश्य कांशाच्या किल्यापर्यंत जाईन. त्या साठी तुम्ही माझ्याबरोबर घोड सैन्य पाठवा. आणि त्यात मुख्यतः देव नावाचा जो एक तरुण आहे त्याला पाठवा."
असे निक्षून म्हणाला. राजा आणि मंत्री परस्परांकडे बघू लागले. काही क्षणा नंतर शिवसिंह म्हणाला
“त्या देव नांवाच्या मुलाचा बाप जंगलांत राहातो. तूं भेटलास काय त्याला?"
"ओ होssss! हं, तो म्हातारा ना?" असे म्हणत चंद्रवर्माने आपल्या उजव्या हाताचा तळवा पुन्हा एकदां न्याहाळून पाहिला.
म्हणाला, "तो जंगलांत एका झोपडीमध्ये राहातो, त्याला पाहिजे असलेल्या सर्व जरूरी वस्तू द्या. आणि जर तो नगरांत येऊन राहूं इच्छित असेल तर तशी हि त्याची व्यवस्था करा. त्याला कसल्या हि प्रकारचा त्रास होता कामा नये. अहो, माझा प्रवास यशस्वी होण्याशी त्या पिता पुत्रांचा फार संबंध आहे. किंबहुना त्यांच्यावरच माझी सर्व भिस्त आहे." चंद्रवर्माने एवढे सांगितल्यावर राजाने किंवा मंत्र्याने कोणीच विरोध केला नाही.
"बरें तर तूं म्हणतोस त्याप्रमाणे मी करतो. तूं त्याला बरोबर घेऊन जा. तुझ्याबरोबर मी एक हजार सैनिक पाठवतो. पुरतील ना ?" राजाने विचारलें.
ते ऐकून चंद्रवर्मा जोराने हंसला
“मी कोठे देश जिंकायला चाललो आहे असे का वाटले तुम्हांला...? मला युद्ध करावयाचेच झाले तर.......! मी सैन्याच्या मदतीने का करणार? माझ्याजवळ जी मंत्रशक्ति आहे तिचा उपयोग केंव्हा करावयाचा?? मंत्रशक्तीचे उत्तर मंत्रशक्तीनेच करावें लागणार. तुमचे हे सैन्य काय उपयोगी..! मला सामान व रसद नेण्यासाठी खेचरें व गाढवतो हांकण्यासाठी चार सहा नोकर पाहिजेत. दहा जणांहून जास्त लोकांची मला गरज नाहीं आणि सैनिकांची तर मुळीच गरज नाही."
"तें नाहीं चालायचे! आपल्या अधिकाऱ्यापैकी मी निवडक व विश्वासू पांच दहा जणांना तुझ्याबरोबर पाठवतो. त्यांच्या बरोबर पत्रास सैनिक येतील. आमच्या राज्याची सरहद्द ओलांडून पलीकडे तूं गेलास म्हणजे तुला पश्चिमेकडील घाट लागेल, त्या डोंगरी मुलखाचा अधिकारी वीरमल वाटल्यास तुला मदत करील," राजा ऐटीत म्हणाला.
वीरमलचे नांव ऐकताच चंद्र्वर्माला त्याचा सेनापति वीरमल याची आठवण झाली. तो आणि त्याचा स्वामीभक्त अनुयायी सुबाहु कोटें करें असतील! थोड्या वेळाने तो म्हणाला,
“महाराज! आपणांस वाटेल तसे आपण करावें. मी मात्र उद्या उजाडतांच निघणार. कांशाच्या किल्यापर्यंत वाटेत डोंगर, राने, दऱ्या खोरी, वाळवंटे पार करावी लागतील. जसा प्रदेश येईल तसे माल वाहणारे पाणी बदलावे लागतील, वाळवंटांत उंटांची गरज पडेल. आपल्या अपेक्षे प्रमाणे वीरमलने एव्हढे केले म्हणजे पुरे." चंद्रवर्मा म्हणाला.
“मी ते सर्व पहून घेइन. तू काही काळजी करू नकोस." राजा शिवसिंह म्हणाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रवमा काशांचा किल्ला सर करण्यासाठी निघाला. शिवपुरच्या सरहद्दीपर्यंत राजा, मंत्री आणि प्रजा त्याला निरोप द्यायला आले होते. त्याच्याबरोबर त्याचा मुख्य अनुयायी म्हणून देव आला होता. त्याला आदल्या दिवशीच्या रात्रींच तुरुंगांतून सोडण्यात आले होतें.
रानांत चंद्रवर्मा व त्याचे सर्व अनुयायी कित्येक योजन चालन गेले. म्हाताऱ्याने दिलेला नकाशा कांशाचा किल्याचा मार्ग दाखविण्यास तितका उपयोगी पडला नाही. वाटेत एकही मनुष्य भेटला नाही. डोंगर आणि दाट अरण्ये एका मागून एक पार करीत तो चालला होता. सूर्याच्या उदय अस्तावरच दिशेचे ज्ञान त्याला होत होतें. अशाच प्रकारे काही दिवस प्रवास केल्यावर एके दिवशी सूर्योदयाच्या वेळेस देव एका उंच टेकडीच्या टोकाला गेला आणि जोराने टाळी बाजबून ओरडला
"ते पहा, एक पडकें नगर दिसत आहे. हाच कांशाचा किल्ला तर नसेल?" त्याचे ते ओरडणे ऐकून चंद्रवर्मा व त्याचे दोघे तिघे अनुयायी धांवत टेकडी चढून त्याच्याजवळ गेले.
पडके नगर
सगळे देवनें दाखवलेल्या दिशेकडे पाहु लागले. समोर खरोखरच एक मोठे नगर त्यांना दिसले, तें जुनाट व पडकें नगर होते. माणसांची हाल चाल त्यांत दिवस नव्हती. भिंतीमधून मोठ-मोठी झाडे उगवलेली दिसत होती. सर्व दृश्य भयाण वाटत होते.
"हा कांशाचा किल्ला असणे शक्य नाही. जुने पडके नगर असले तरी आपण तें जाऊन पाहिले पाहिजे. कदाचित पुढील मार्गाचा काही सुगावा लागेल, चला जाऊ या.”
चंद्रवर्मा म्हणाला आणि डोंगर उतरून त्या पडक्या नगराकडे जाऊ लागला. सर्व नगराजवळ पोचले तेव्हा एका पडक्या इमारतीसमोर त्यांना सिंहाचे तीन छावे दिसले. ते चंद्रवर्मा व त्याच्या अनुयायांना पाहुन गुरगुरत एका पडक्या भिंतीच्या आड जाऊन लपून बसले. काही वेळाने त्यांना सिंहाची गर्जना ऐकू आली. ती गर्जना ऐकून चंद्रवर्मा म्हणाला
"तिकडे जाणे बरें होणार नाही. चला आपण दुसऱ्या बाजूला जाऊ या."
ते पडके नगर फारच मोठे होते. त्याचा घेर कमीत कमी पांच सहा मैलांचा असेल. पण वाटेत त्यांना कोठे मनुष्य म्हणून दिसला माही. प्रत्येक घर पडके होते. कित्येक घरें तर जाळपोळ झाल्याने गळून गेल्यासारखी भासत होती. ज्या घरात एका काळी माणसे रहात होती त्यांत आज रान श्वापदें बाघ, सिंह, चित्ते व रानटी डुकरें रहात होतो. व चंद्रवर्मा नगराच्या मध्य भागी एका रस्त्यासारख्या जागी पोचला. तेथे एका उंच शिळेवर काही तरी लिहिले असावे असे त्याला वाटलें. तो एक शिलालेख होता. अक्षरें जुळवून त्याने वाचण्याचा प्रयत्न केला.
"हें करवीरपूर नगर होय, एक हजार वर्षेपर्यत एक वैभवशाली शहर म्हणून हे प्रसिद्ध होतें. उत्तरेकडून काही धर्धर जातीच्या लोकांनी हें नगर लुटले आणि यांत होते नव्हते ते सर्व धन घेऊन जाऊन त्यांनी कांशाच्या किल्लयांत ते साठवून ठेवले आहे.”
ते वाचल्यावर चंद्रवर्मा आपल्या अनुयायांना म्हणाला
"आता वेळ व्यर्थ घालविण्यांत अर्थ नाही. येथें तगडा घोड्यांशिवाय काय आहे? हा कांशाचा किल्ला नाही. चला पुढे."
सर्व नाखुशीने हे एकमेकांच्या पाठोपाठ जाऊ लागले.