"कांशाच्या किल्लासंबंधी लहानपणी मी ऐकले होते. तेव्हां मोठी माणसे सांगत असत की कांशाचा किल्ला कुठे तरी पश्चिमेच्या बाजूला समुद्र किनाऱ्यावर आहे. तो किल्ला शोधण्याचा कोणी प्रयत्न केला आणि जर त्याला तिकडे जाण्याचा रस्ता मिळालाच तर मनुष्य जिवंत परत येत नसे. त्या साठीच आपल्याला तो मार्ग माहीत आहे म्हणालात म्हणून मला आश्चर्य वाटले."

"होय, आश्चर्याची गोष्ट तर खरीच."

असे म्हणत म्हातारा मान खाली करून विचार करूं लागला. थोड्या वेळाने त्याने डोके वर उचलले. चंद्रवर्माच्या नजरेला नजर भिडवून म्हणाला

“कांशाचा किल्ला कुठे आहे हे तर तुला माहीतच आहे. तूं म्हणतोस त्याप्रमाणे खरोखरच त्याचा मार्ग शोधून काढण्यांत पुष्कळ आपले लोक प्राण गमावून बसले आहेत. जो कोणी त्या वाटेला जाई लो मारला जात असे, हे अगदी खरे आहे."

"असेंच तर आम्ही ऐकले होते." म्हातारा स्मित करून म्हणाला

"मला पण आश्चर्य वाटत आहे की कांशाच्या किल्लयासंबंधी तुला हे सर्व कसे माहीत आहे? माझ्याजवळ त्याच्या वाटेचा नकाशा आहे आणि तो आमच्या पूर्वजांपैकी कोणीतरी मिळविलेला आहे. ही गोष्ट रुद्रपूरच्या राजाला माहीत आहे. म्हणूनच तो मला पकडू पाहात आहे. त्याच्या शिपायांचा डोळा चुकवून मी रानोमाळ भटकत आहे. त्यानेच माझ्या मुलाला पकडून नेलें”

पुढे आपले अश्रू पुसत तो सावरून म्हणला कांशाच्या किल्यांत हजारों रत्न राशी आहेत.

त्यातील काही हिस्सा मला देण्याचे जर त्याने कबूल केले तर मी त्याला तो नकाशा दाखवीन. त्या साठीच तुझ्या मध्यस्थीची मला आवश्यकता आहे. सर्वात अगोदर माझा मुलगा देव याची सुटका केली पाहिजे. या सर्व कामासाठी मला तुझी मदत मिळाली तर मी माझ्या हिश्श्यांतील कांही वाटा तुला हि देईन. त्या द्रव्याच्या बळावर तू सैन्य जमवून आपले गेलेले राज्य परत मिळव."

म्हाताऱ्याच्या बोलण्यावरून तो साधा-सुधा माणूस नसून पक्का कावेबाज आहे, हे चंद्रवर्माला कळून चुकले होते.

“आपली अट मला एकदम मान्य. बरं बघू दे तरी कांशाच्या किल्लाच्या रस्त्याचा नकाशा...!" चंद्रवर्माने विचारले.

म्हातारा चंद्रवर्मावर खुश झाला, त्याने त्याची पाठ थोपटली. त्याच्याकडे पाहात तो त्याला काहीतरी सांगू लागणार तोच बाहेर त्यांना कोणाची तरी चाहूल लागली. म्हाताऱ्याने डोकावून पाहिले तर, त्याला राजाचे शिपाई येत असल्याचे दिसले. ताबडतो तो मागे वळून तो म्हणाला

"राजाचे शिपाई इकडेच येत आहेत. जर त्यांनी माझ्या मुलाच्या केसाला हि धक्का न लावण्याचे वचन दिलेस तर मी त्यांची भेट घेईन, तसेच त्या किल्यांतील संपत्तीचा किती हिस्सा मला देणार तें हि विचारून वचन घेऊन ठेव."

एवढे सांगून तो झोपडी बाहेर पडून जंगलांत घुसला व अदृश्य झाला.

म्हातारा आपल्याला संकटांत टाकून निघून गेला. त्याच्या धूम पळण्याचे चन्द्रवर्माला आश्चर्य वाटले, संकटाला तोंड तर द्यायचेच आहे. पण कसे??? या विचारांत तो पडला. थोड्याच वेळात सैनिकांनी झोपडीला वेढा दिला. दरवाज्याशी येऊन त्यांचा सरदार ओरडला.

"आंत कोण असेल त्याने बाहेर यावें. जरा जरी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर हा भाला जाईल आरपार, लक्षांत असू दे."

चंद्रवर्मा निर्भयपणे झोपडीच्या बाहेर येऊन उभा राहिला व सर्व सैनिकांकडे आब्धय मुद्रेने पाहू लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel