त्या सांखळीत काही तरी जादू आहे असें वाटून त्याने ती सांखळी घेतली आणि कुत्र्याच्या गळ्यांत बांधून एक टोक आपल्या हातात धरले. कुत्र्याने इकडे तिकडे पाहिले व पुन्हां जोर जोराने भूंकत चंद्रवर्माला ओढत ओढत झाडीत घुसला. तो कुत्र्याच्या पाठोपाठ जात होता खरा, पण त्याचे मन फार अस्वस्थ होते. हा कुत्रा साधा कुत्रा नसून कोणी राक्षस भूत असावे असे त्याला वाटत होते. आपले सर्व धैर्य एकवटून जीव मुठीत घेऊन तो चालला होता.
जंगलातून झाडीतून मार्ग काढीत कुत्रा त्याला एका टेकडीवर घेऊन आला. तेथून टेकडीच्या पायथ्याशी एका ओढ्याच्या काठी त्याला एक झोपडी दिसली. त्याने अंदाज केला की त्या झोपडीत याचा मालक असला पाहिजे. म्हणून त्याने सांखळी त्याच्या गळ्याभोवती गुंडाळून त्याला सोडून दिले. सांखळी सोडल्यावर सुद्धा कुत्रा पळून पुढे निघून गेला नाही.
तो तसाच चंद्रवर्माच्या पुढे वाटाच्याप्रमाणे चालत होता. झोपडी जवळ चंद्रवर्माने पाहिले पण कोणी असल्याचे त्याला दिसले नाही. कुत्रा जोर-जोराने भूंकत होता. पण आतून कोणी आलें नाही. कुत्राहि एकदा आंत जाऊन आला. पण त्याच्या पाठोपाठ सुद्धा कोणी आले नाही. त्याने झोपडी भोंवती एक चक्कर मारून पाहिले पण तेथे त्यास कोणीहि दिसले नाही.
शेवटीं चंद्रवर्मा आंत शिरला. आंत खरोखरच कोणी नव्हते. मात्र एका बाजूला एक मोडकीशी खाट होती. दुसऱ्या बाजूला एक चूल आणि चुली भोवती कांही भांडी मडकी पडलेली दिसली. पलीकडे भिंतीजवळ एक दोरी होती व तिच्यावर दोन चार फाटके कपडे लोंबत होते. सी झोपडी कोण्या गरिबाची असल्याचा भास होत होता. परंतु तो गरीब तरी अशा एकान्त झोपडीत राहून काय करीत असेल..! या ठिकाणी वेळ कसा घालवीत असेल...! वगैरे प्रश्न आपोआप चंद्रवर्माच्या मनात आले.
कदाचित येथे सुद्धा कोणी मांत्रिक तर रहात नसेल ना...?? या विचाराने तो थोडा घाबरला पण तशा त्या ठिकाणी तो काय करू शकणार तो धैर्याने पुढे सरसावला व गाडगी मडकी पाहिली. इकडे तिकडे काही माणसाची हाडे तर दिसत नाहीत ना..?? म्हणून लक्षपूर्वक पाहिले. तो पाठमोरा बसला होता. तोच त्याच्या कानावर हे शब्द पडले
"जसा आहेस तसाच्या तसाच बसून रहा. जरा जरी हाललास किंवा मागे वळून पाहिलेंस तर भाला पाठींत बसलाच म्हणून समज. प्रथम माझ्या प्रश्नांची उत्तरे दे."
चंद्रवर्माच्या अंगाला दरदरून घाम सुटला. कोण असावा हा..! त्याने खरोखरच भाला रोखला आहे काय..? मागे वळल्यास म्हटल्याप्रमाणे तो खरोखरच आपला अंत करील काय..? याविषयी त्याला काहीच कल्पना करवेना. आपल्याला कोणच्या प्रश्नांस उतरें द्यावयाची आहेत तें हि कोडे उलगडणे अशक्य होते. पण प्रसंगावधान राखून तो म्हणाला
"मी तुझा शत्रु नाही, मित्र आहे. मला पाहिल्यावर तुला याची खात्री पटेल."
“तू आणि माझा मित्र..! शक्यच नाही...!" मागे असलेला मनुष्य म्हणाला.
नंतर त्याने विचारलें
“तें राजाचे सैनिक कोठे आहेत?"
"राजाचे सैनिक?? मी तर या जंगलांत एकटाच भटकतो आहे. कुत्र्याच्या त्या साखळीनेच खरोखर आज माझ्यावर कृपा केली आहे. नाहीतर मी केव्हाच त्या कुत्र्याच्या आहारी पडलों असतो. तोच रस्ता दाखवीत मला ओढत येथपर्यंत घेऊन आला...”चंद्रवर्माने सांगितले.
"होय, त्या सांखळीमुळेच तुझे प्राण वांचले, यात काही शंका नाही. माझा मुलगा त्या कुत्र्याच्या गळ्यांत सांखळी घालून त्याला बरोबर घेऊन या साऱ्या जंगलांत हिंडत असे. पण राजाच्या शिपायांनी जेंव्हा त्याला पकडून नेले तेव्हां ती साखळी कोठे तरी पडून गेली...! कुत्र्याने तुझ्या हातांत सांखळी पहिल्यावर अनुमान केलें की तूं त्याच्या मालकाचा मित्र असशील. आणि म्हणूनच तुझे प्राण वाचवले. पण आतां सांग, माझा मुलगा जिंवत आहे की राजाने त्याला मारले..!" त्या व्यक्तीने विचारले
चंद्रवर्मा विचारांत पडला.