करवीरपूर पार करून थोडे अंतर चालुन गेल्यावर त्यांना वाटेंत मोठमोठे उंच पर्वत लागले. आता त्यांना पंचाईत पडली. की हे पर्वत ओलांडून कसे जायचे? कारण ते सर्व डोंगर खडकाळ असल्यामुळे खेचरांना सुद्धा त्यांच्यावर चढणे फार कठीण होते. खांचाखळग्यांतूनच वाट पुढे गेलेली होती. चंद्रवर्माने सांगितले की आपल्या बरोबर जेवढी सामग्री नेणे शक्य होईल तेवढी पाठीशी बांधून घेऊं व खेचरांना येथेच मैदानांत सोडून जाऊं.

शिवसिंहाच्या नोकरांना ही कल्पना आवडली नाही. ते म्हणाले

"कोण जाणे, पलीकडे काय आहे. समजा तेथे अन्नसामग्री मिळाली नाही तर? एवढी सर्व सामग्री येथे सोडून जाणार आणि आपण तेथे उपाशी मरणार. हे काही बरें नाहीं. आम्हांला नाही पसंत."

"माणसांनाच चढणे जेथें कठिण काम आहे, तेथे खेचरें कशी येऊ शकतील. येथे वर चढण्यासाठी पाऊलवाट सुद्धा नाही. आपल्यालाच दोरखंडाच्या मदतीने जावे लागणार आहे. मग काय खेचरांना दोरी बांधून वर ओढणार? म्हणून मला वाटते, आपल्याला थोडे सामान आणि ही खेचरें येथेच सोडून जावे लागणार आहे.” चंद्रवर्मा म्हणाला.

काहींना चंद्रवर्माचे म्हणणे मान्य झाले. त्यांनी खेचरांवरून सामान उतरविले व त्यांतील त्यांना पाहिजे असलेले सामान पाहून जेवढे बरोबर नेता येईल तेवढे घेतले. आता चंद्रवर्मा बरोबर वाट चालु लागले. पहाटे पहाटे त्यांनी चढण्यास आरंभ केला. रस्ता फार कठिण असल्याने डोंगर चढतांना ते परस्परांची मदत घेत होते. चंद्रवर्माच देव सर्वात पुढे होते. ऊन डोक्यावर येईपर्यंत ते चढत राहिले. तेथे वाटेत त्यांना एके ठिकाणी थोडी विश्रांती करण्यासारखी जागा मिळाली. म्हणून त्यांनी तेथेच मुक्काम केला.

स्वयंपाक केला, जेवले, थोडी विश्रांति घेतली आणि पुन्हां मार्ग चावू लागले. दरड उभट रस्तांतून वाट काढीत ते पुढे चालले होते. सुर्यास्ताच्या सुमारास ते डोंगराच्या शिखरावर येऊन पोहोचले. संध्याकाळच्या संधिप्रकाशांत त्यांना तेथील दृश्य फार रमणीय व अल्ल्हादकारक वाटले. ते सर्व अगदि थकलेले असल्याने विसाव्यासाठी तेथेंच बसले. तेथून त्यांना चारी बाजूंना दृष्टि वळवली. त्यांना आश्चर्यच वाटले, डोंगराच्या पलीकडे पायथ्याशी स्वांनाहून सुंदर एक गांव दिसले. त्यांत मोठमोठी घरे होती, मोठमोठ्या बागा होत्या, मधून मधून शेतें होती आणि फळांच्या बागा सुद्धा पुष्कळ होत्या.

डोंगरापासून तों त्या गावापर्यंत सर्वकडे हिरवळ पसरली होती. ते गांव पाहून सर्वांना हायसें बाटले. त्या गांवाचे नांव काय असेल? तें कोणाचे असेल? तेथील राजा कोण असेल श्वाची चंद्रवर्माला काहीच कल्पना नव्हती. एवढयात शिवसिंहाचा माणूस एक आश्चर्यानें म्हणाला

"अरे! हे शिवपूर दिसत आहे. होय. शिवपूरच"

“तुला रे काय माहीत हें शिवपूर म्हणून...! कधी आला होतास काय येथे?" चंद्रवर्माने विचारलें.

"काही दिवसांपूर्वी मी येथे एक महीनाभर होतो. हे रुद्रपुर राज्याच्या पश्चिम सीमेवरील नगर आहे. येथे जो राजप्रतिनिधि आहे त्याला मी चांगला ओळखतो. ह्या नगराच्या पलीकडे रेताड वाळवंट आहे." तो म्हणाला.

“म्हणजे तुला शिवपुरची वाट माहीत आहे तर...! मग तूं की काही बोलला नाहीस?" चंद्रवर्माने विचारले.

हा प्रश्न ऐकून तो जरा कावराबावरा झाला. पण आपल्याला सांवरून तो म्हणाला

“रुद्रपुर राजधानीहून शिवपुरला येणारा दुसरा एक रस्ता आहे. मी त्याने गेलों होतो. पण तो रस्ता मला आतां चांगला आठवत नाही."

ठरल्याप्रमाणे त्यांचे बोलणे चालले असता त्या गांवांतून बिगुल वाजल्याचा आवाज ऐकू आला. त्याचरोबर त्याचा प्रतिसाद म्हणून सर्व बुरुजांवर जोरजोराने नगारे वाजू लागले आणि काही सशस्त्र सैनिक निरीक्षणासाठी बुरुजावर आलेले दिसले. आपल्याला शत्रू समजून ते सावध असल्याची सूचना देत आहेत ही गोष्ट चंद्रवर्माने ओळखली, त्यांच्याकडून बाण वर्षा होण्यापूर्वीच आपण त्यांचे मित्र असल्याची सूचना देणे बरें, नाहीतर मागाहून फार घोटाळा होईल. म्हणून त्याने एक शुभ्र पांढरें कापड घेतले व आपल्या तलवारीच्या टोकाला लावून वर हात करून फडकावलें. बुरुजावरील सैनिक पाहात क्षणभर निश्चल उभे राहिले.

तेवढ्यात चंद्रवर्माने पाहिले की एक धष्ट पुष्ट मनुष्य काही सैनिकांना घेऊन ते बसले होते त्या बाजूकडे धांवत ते आला. त्याने तेवढ्यांत एक बाण धनुष्यावर चढवून सोडला. तो चंद्रवर्माच्या पायापाशी चार पावलांच्या अंतरावर येऊन पडला. त्या बाणाच्या टोकाशी एक कागद बांधलेला होता. चंद्रवर्मानें तो कागद उलगडला आणि वाचून पाहिला.

आपण कोण..? नांव काय..? येथे येण्याचे कारण काय..? वगैरे गोष्टी शिवपुरच्या किल्लेदाराला पाहिजे आहेत. जर त्या आपण कळविल्या नाहीत तर शत्रु समजून आपल्यावर हल्ला करण्यात येईल, असें त्यांत लिहिले होते. चंद्रवर्माने रुद्रपुरच्या राजाने दिलेलें आज्ञापत्र त्या बाणाला बांधून तो बाण उलट पाठवून दिला.

थोड्याच वेळांत किल्याच्या बुरजावर गडबड सुरू झाल्यासारखे दिसले आणि त्यांच्या स्वागतासाठी जयजयकार होऊ लागल्यासारखे भासले. त्या नगराकडे जाण्यासाठी डोंगरापासून किल्लापर्यंत पायऱ्या केलेल्या होत्या. त्या वाटेने चंद्रवर्मा आणि त्याचे साथीदार किल्लाच्या खंदकापर्यंत गेले. तोपर्यंत काही सैनिक तेथपर्यंत येऊन पोहोचले होते. त्यांना पाहून त्याला आश्चर्य व फार आनंद झाला. कारण त्यांचा म्होरक्या चंद्रवर्माचा जुना मित्र सुबाहु होता. सुबाडूला पाहून व ओळखून चंद्रवर्मा तर थक्कच झाला.

अगदी अनपेक्षित पणे व अगदी अनपेक्षित अशा जागी एक जुना मित्र भेटल्याने जो आनंद होता तोच चंद्रवर्माला झाला. परंतु काळवेळ ओळखून वागण्याचे त्याने ठरविले. ओळख दाखविल्यास दोषांचा जीव धोक्यांत पडण्याचा संभव होता. म्हणून क्षणार्धात आपण तुला ओळखलें आहे, अशी डोळ्याने खूण करून चंद्रवर्मा गप्प राहिला.

सुबाहूने देखील आपल्या मालकाला म्हणजेच युवराज चंद्रवर्माला ओळखले. पण लगेच त्याने देखील हाताने खूण केली की आपली ओळख कोणाला कळतां उपयोगी नाही. हा इशारा चंद्रवर्माने ओळखला. तो अनोळखी माणसाप्रमाणेच पुढे गेला आणि त्याला मोठ्या आदराने नमस्कार केला.

“आपण शिवपुरचे सेनापति आहांत का??? मला येथील राजप्रतिनिधि बीरमल्लाची भेट घ्यावयाची आहे आणि काही विशेष मुद्यांवर बोलणी करावयाची आहेत." चंद्रवर्मा म्हणाला.

"ठीक आहे. पण प्रथम आपल्या आणि आपल्या मित्रांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ दे. आपण थोडी विश्रांति घ्या. मग त्यांची भेट करवितो.”

असा सांगून सुबाहून आपल्या सैनिकांच्या बरोबर चंद्रवर्माच्या लोकांना पाठवून दिले. ते सर्वजण किल्लयांत गेल्यावर सुबाहूनें भक्तिपूर्वक चंद्रवर्माला नमस्कार केला. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. तो म्हणाला

“महाराज, माझें दैव मोठे म्हणूनच मला पुन्हां आपलें दर्शन घडलें, आज खरोखर सुदिन आहे. चला घरी, तेथे सावकाशीनें गप्पागोष्टी करूं." सुबाहूच्या घरी गेल्यावर सुगहनें आपली सर्व हकीगत चंद्रवर्माला सांगितली.

तो म्हणाला, "त्या दिवशी आपण शत्रूना चुकवण्यासाठी नदीत उडी घेतली. आठवतें ना? पण थोड्या वेळाने मी पाण्यावर डोके काढून पाहिले तर आपण मला दिसला नाहीत आणि मी पण नदीच्या प्रवाहांत वाहात वाहात एका खाडीत गेलो. जेथे वर आलो त्या ठिकाणी मी एकटाच असल्याने माझे बरेच हाल झाले. एके दिवशी अचानक एका डोंगरांवर मला धीरमल्ल भेंटला. तो बरेच दिवस सर्पकेतूशी लढला पण त्याचा निभाव न लागल्याने आपल्या सैनिकांसह तो जंगलांत पळून गेला. काही दिवसांनी आम्ही सर्वजणच रुद्रपुरच्या शिवसिंहाकडे नोकरीसाठी, म्हणून गेलो. शिवसिंहानेंच आम्हाला येथे पाठविले. सर्यकेतून कळू नये म्हणून जेव्हां आम्ही नोकरीला गेलो तेव्हां धीरमल्लने आपले नाव बीरमल्ल केले."

त्या नंतर चंद्रवर्माने आपली सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला,

"मी कांशाच्या किल्ल्याकडे जाण्यासाठी निघालो आहे."

कांशाच्या किल्ल्याचे नांव ऐकतांच सुबाहूचे डोके ठणकलें.

तो म्हणाला, "आता आपले सुविन जवळ आले. ह्यावेळी धीरमल्ल किल्ल्यांत नाही. तो गुप्तपणे काही सैनिकांना घेऊन कांशाच्या किल्लाकडेच गेला आहे. कारण सर्पकेतु कांहीं सेना बरोबर घेऊन तिकडेच गेला आहे. म्हणून त्याच्या सैन्याच्या शक्तीचा पत्ता लावण्यासाठी तो गेला आहे. शक्य झाल्यास तो सर्पकेतूचे पारिपत्य करूनच परत येणार आहे. त्याला जाऊन दोनच दिवस झाले आहेत. तरी पण आम्ही ही बातमी अगदी गुप्त ठेविली आहे."

सर्पकेतूचे नाव ऐकल्यावर चंद्रवर्मा संतापला. ते पाहून सुबाहू म्हणाला,

“सर्पकेतु फक्त वीरपुरचाच राजा नाही, त्याने सर्व माहितीये राज्य काबीज केलें आहे. यशोवर्धन महाराज परलोकी गेले. त्यांचा वडील मुलगा तपोवर्धन वैरागी होऊन जंगलांतून हिंडत आहेत. नंतर सर्पकेतूने धाकटा मुलगा गुणवर्धन याला आपल्या विश्वासात घेतले आणि त्याची मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याच्या कडून आपले काम साधून घेतले. शेवटी त्याला मारून टाकले आणि स्वतः गादीवर बसला."

"अस्सं. तर मग तो इतका मोठा धनवान झाला आहे. तरीसुद्धा धनलोभ सुटला नाही. धनासाठी तो कांशाच्या किल्याकडे चालला आहे." चंद्रवर्मा म्हणाला.

“नुसता धनलोभीच नव्हे, तो राज्य लोभी सुद्धा आहे. त्याने शिवपुरवर अचानक हल्ला केला नाही हीच मोठी गोष्ट आहे. तो कांशाच्या किल्लाकडे कोणच्या वाटेनें जात आहे हे आमच्या हेरांनी आम्हाला कळविले आहे. आमचे हेर सतत त्याच्या पाठीवर आहेत.” सुबाहूने सांगितले.

सुबाहू व चंद्रवर्माच्या गोष्टी चालल्याच होत्या की एका दूताने येऊन सुबाहूच्या हातांत एक पत्र दिले. सुबाहूनें तें पत्र ध्यान पूर्वक वाचलें व वाचणे झाल्यावर तें पत्र सुबाहूनें चंद्रवर्माला वाचावयास दिले. चंद्रवर्मानें तें वाचलें. ते धीरमल्लाने सुबाहूला लिहिले होते. त्यांत असे लिहिले होते की धीरमल्लाने शिवपुरच्या उत्तरेकडील वाळवंटात सर्पकतूला गाठला पण त्याची प्रचंड सेना पाहून तो शिवपुरच्या बाजूला परत फिरला, सर्पकेतूला हे समजले आणि काही सैनिकांना घेऊन त्याने धीरमल्लचा पाठलाग केला. म्हणून आता किल्लाच्या संरक्षणासाठी थोडे सैन्य ठेवून बाकी सर्व सैन्यासह सुबाहुनें धीरमल्लाच्या मदतीस यावें असे सांगितले होते. 

“भयंकरच अरिष्ट झाले आहे म्हणावयाचें.” चंद्र्वर्मा म्हणाला.

“शिवपुरला पोहोचण्यापूर्वीच जर सर्पकेतूनें धीरमल्लाला गाठलें तर फारच पंचाईत आहे. तसे झाले तर धीरमल्लाचा पराजय तर होईलच, आणि वर सर्पकेतु तसाच पुढे येऊन शिवपुरचा देखील नाश करून टाकील. म्हणून शक्य तेवढ्या लवकर त्याच्या मदतीला गेले पाहिजे." सुबाहू म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel