परंतु प्रत्यक्ष व्यवहारांत, राजकारणांत अहिंसा कशी आणता येईल ते त्यांनी सांगितले नाही. तसा प्रयत्नहि कोणी केला नाही. महात्मा गांधी आज असे म्हणतात की मी सत्य, अहिंसा इत्यादी तत्त्वे सर्व जीवनांत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत, समाज, राजकारण, धर्म सर्व ठिकाणीही सनातन तत्त्वे आणण्यासाठी मी झटत आहे. यामुळेच महात्माजी आज नवीन दर्शन देत आहेत. पूर्वजांचे प्रयोग आणखी पुढे नेत आहेत. त्यात भर घालीत आहेत.  नवीन दृष्टि व नवीन अनुभवाचे तत्त्वज्ञान देत आहेत. ते आज म्हणतात की, सत्यनिष्ठा ज्याला रहावयाचे असेल त्याने सरकारशी झगडले पाहिजे. अन्याय्य सरकारशी जोपर्यंत आपण झगडत नाही तोपर्यंत आपण सत्यनिष्ठ आहोत, धर्मनिष्ठ आहोत, अहिंसक आहोत, असा दावा करणे खोटे आहे. ही थोर तत्त्वे आपण पाळतो असे म्हणणे खोटे आहे. महात्माजी राजकारणात शिरले ते जगाची सुधारणा करावी म्हणून नाही शिरले. या वृत्तीने ते राजकारणप्रवृत्त झाले नाहीत. स्वतःची सुधारणा करण्यासाठी म्हणून ते राजकारणात उतरले. स्वतःची सुधारणा, स्वतःची आध्यात्मिक व नैतिक सुधारणा करता करता त्यांना असे दिसून आले की स्वतःची सुधारणा व जगाची सुधारणा या गोष्टी भिन्न नाहीत. त्या एकच आहेत. ते दक्षिण आफ्रिकेत गेले. बॅरिस्टर होऊन गेले. परंतु तेथे त्यांना लौकरच असे दिसून आले की झगडा केल्याशिवाय स्वतःचा धर्म पाळता येत नाही. मी येथील सरकारशी झगडा न करीन तर माझा विकास थांबेल, मी कर्तव्यच्युत होईन, मी आत्म्याची प्रतारणा केली असे होईल असे त्यांना वाटले. आणि हा झगडा केवळ माझाच न राहाता तो सर्वांचा झाला पाहिजे, असेही त्यांस दिसले आणि हा झगडा आजपर्यंत कधी कोणी केला नाही अशा पध्दतीने करायला ते उभे राहिले. सत्यार्थी लोकांनी राजसत्तेविरुध्द झगडा केल्याची उदाहरणे जगाच्या इतिहासात फार थोडी आहेत. आपल्या देशात फारशी नाहीत व जगाच्या इतिहासातही फारशी नाहीत. महात्मा गांधींचा हा प्रयोग असा अपूर्व आहे. द. आफ्रिकेत त्यांना दिसले की मी जर झगडणार नाही तर मला धर्म पाळता येणार नाही. इतरही बंधु न उठतील तर त्यांचेही कल्याण नाही. त्यांनीही या झगडयांत आले पाहिजे. द. आफ्रिकेतील झगडा तेथील सर्व हिंदी जनतेचा त्यांनी केला. परंन्तु पुढे असे दिसले की दक्षिण आफ्रिकेचा प्रश्न सुटायला हवा असेल तर हिंदुस्थान स्वतंत्र केला पाहिजे. जोपर्यंत हिंदुस्थान स्वतंत्र होत नाही तोपर्यंत हिंदी जनतेचे, जगातील गुलामगिरीचे प्रश्न सुटणार नाहीत. म्हणून आफ्रिकेतून येथे येऊन हिंदी जनतेच्या स्वातंत्र्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला आणि हिंदी स्वातंत्र्यार्थ लढता लढता त्यांना असे दिसून आले की हिंदी स्वातंत्र्याचा प्रश्न जगाशी जोडलेला आहे. सा-या जगाचीच सुधारणा झाली पाहिजे. तोपर्यंत माझा, देशाचा किंवा इतर देशांचाही प्रश्न ख-या संपूर्ण अर्थाने सुटणार नाही, अशा रीतीने स्वतःच्या कष्टिधर्मांतून, स्वतःच्या वैयक्तिक मोक्षांतून ते समष्टीच्या, सर्व जगाच्या धर्माकडे, जगाच्या मोक्षाकडे आले. स्वतःच्या मोक्षाची त्यांना जितकी उत्कट इच्छा आहे, तितकीच जगाच्या मोक्षाचीही आहे. सारे जग सुधारावयाचे असेल तर राजकारण, अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण ही अलग ठेवून चालणार नाहीत. ही गोष्ट त्यांना स्पष्टपणे दिसली आणि म्हणून ते जरी मोक्षार्थी असले तरी ते राजकारण करू लागले. अर्थकारण करू लागले आणि हे सर्व व्यवहार करीत असतांना एक नवीन दृष्टि यांनी दिली. धर्म या सर्व गोष्टींत भरून राहिला आहे, सत्याची व अहिंसेची हवा या सर्वांत खेळती राहिली पाहिजे असे त्यांनी शिकविले. महात्माजींची दृष्टि मोक्षार्थी असली तरी अर्थकारण, राजकारण, समाजकारण, धर्मकारण या सर्वांत ती वावरत असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel