प्रवचन ६ वे

'सत्ये संदृष्टे सिध्दिरात्मनः।' -- सत्याचे दर्शन झालें म्हणजे सिध्दि मिळते, मोक्ष मिळतो. आपले विचार सत्य, शुध्द होण्यासाठी काय काय बरें करायला हवें? मनुष्यामध्यें निरनिराळे गुणधर्म असतात. मनुष्याची बुध्दि त्रिगुणात्मक असते. सत्व, रज, आणि तम या सर्वांच्या कमी अधिक मिश्रणानें आपली बुध्दि बनलेली असते. ती केवळ सत्वमयी कशी करावयची? कोणती युक्ति, कोणता उपाय? काय करावें, काय करूं नये, बंध कशानें, मोक्ष कशानें, निर्भयता कशानें लाभेल, भीति कां हें सर्व जी सांगते, याचा विवेक जी करते, काय सोडावें, काय धरावें, हें जी जाणते, ती सात्त्वि बुध्दि.

अकर्तव्यें बंध भय, कर्तव्यें मोक्ष निर्भय ।
जाणे सोडूं धरूं, त्यास बुध्दि सात्त्वि ओळख ॥

असें सात्त्वि बुध्दीचें लक्षण भगद्गीतेंत आहे. आणि रजोगुणात्मक बुध्दि कोणती? ज्या बुध्दीला धर्म काय, अधर्म काय, याविषयी स्वच्छ स्पष्ट ज्ञान नसतें ती राजस बुध्दि.

कार्याकार्य कसें काय, काय धर्म अधर्म तो ।
जी जाणूं न शके चोख, बुध्दि राजस ओळख ॥

आणि तमोगुणी - बुध्दि कोणती? अधर्मालाच धर्म मानते, जिच्याजवळ प्रकाश नाहीं, सारें उलटेंच जिला दिसतें ती तामसबुध्दि.

धर्म मानी अधर्मास, अंधारें भरली असे ।   
अर्थ जी उलटा देखे, बुध्दि तामस ओळख ॥

जेव्हां आपण म्हणतों कीं, ज्यानें त्यानें स्वतःच्या बुध्दीला पटेल तदनुसार बोलावें, वागावें, तेव्हां एक जबाबदारी असते. ज्यानें बुध्दि निर्मळ केली आहे, उत्तरोत्तर ज्याचे तदर्थ अखंड प्रयत्न चालले असतात, त्यानें तसें केलें तर शोभेल. आपण आधीं बुध्दि सात्त्वि करण्याचा सारखा प्रयत्न करायला हवा. अशी बुध्दिच सदसद्विवेक करूं शकेल. बुध्दि सात्त्वि व्हावी म्हणून भगवद्गीता काय सांगते? कोणती साधनें, कोणते उपाय? महात्मा गांधी भगवद्गीतेचें सार अनासक्ति म्हणून सांगतात. फलाविषयी आसक्ति नसली म्हणजे पुष्कळसें काम होतें. परंतु अर्जुनासारख्या विशिष्ट जिज्ञासूला फलासक्ति सोड, अनासक्त रहा एवढेंच सांगितलें. सामान्य माणसाला दोन गोष्टी सांगायला हव्यात.

१. विषयासक्ति नको.
२. फलासक्ति नको.

या दोन्ही आसक्ति दूर करण्याचा जाणीवपूर्वक यत्न माणसानें करायला हवा. या दोन साधनांनी बुध्दि सात्त्वि होत जाईल. विषयासक्तीमुळें मनुष्य तमोगुणी होतो. फलासक्तीमुळें रजोगुणी होतो. दोन्ही टाकूं तेव्हां सत्त्वाकडे बुध्दि जाऊं लागेल. सत्कर्माच्या फलाचीही अपेक्षा नको. सात्त्विक कर्माचा एक प्रकारें अभिमान वाटत असतो. त्याचें फळ सुंदर असेल, मिळो लौकर असें वाटतें. परंतु सात्त्विक कर्मांच्या फलाचीहि अपेक्षा राखूं नये. कारण फलासक्ति-मग ती सत्कर्माच्या फलाची का असेना-आली कीं अनासक्ति सुटते. म्हणून विषय व फल दोहोंची आसक्ति नको. महात्मा गांधींनीं फलाविषयी जी आसक्ति तिची फोड केली आहे. विषयांचा ध्यास नको ही तर उघड गोष्ट आहे. फलत्यागाचें विवरण हवें. महात्माजी साधनशुध्दीवर भर देतात. साधनशुध्दीचा सिध्दान्त पटवायला फलासक्तीचा त्याग उपयोगी पडेल. आपण वाईट साधनें कां वापरतों? फलाची तीव्र आसक्ति उत्पन्न होते तेव्हांच आपण वाटेल त्या उपायांनी सिध्दि मिळावी म्हणून उभे राहतों. तीव्र आसक्तीमुळें आपण एक प्रकारें आंधळे बनतों. जसा विषयासक्त मनुष्य अंध बनतो, त्याला सारासारविवेक उरत नाहीं, तीच गत फलासक्त माणसाचीहि होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel