अमुक एक कायदा करतांना, केवळ एखाद्या व्यक्तीचें किंवा एखाद्या वर्गाचें पाहून भागणार नाहीं. व्यक्तीचें हित हा प्रश्न नाही. सत्याग्रही व्यक्तीच्या दृष्टीनें व्यष्टीचें हिंत तें समष्टीचें असतें. माझ्या हिताची जी गोष्ट ती सर्व जगाच्या हिताचीहि असायला हवी. समष्टीच्या म्हणजेच सर्व मानवांच्या हितांतच आत्मकल्याण, स्वतःचें कल्याण असतें असें सत्यार्थी मानतो. जनतेची बुध्दि, सार्वजनिक बुध्दि, राष्ट्राच्या कायद्यांच्या पाठीमागें असायला हवी असें आपण लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणत असतो."General will" सर्वांची बुध्दि असा शब्द वापरूं. कायद्याला सर्वांच्या मताचा जास्तींतजास्त पाठिंबा असावा. सर्वांनीं मत व्यक्त करावें. परंतु नुसतें मत व्यक्त करावें एवढयानें भागत नाही. तें मत सर्वहितबुध्दीनें व्यक्त केलेलें असायला हवें. स्वहितबुध्दि सोडून सर्वहितदृष्टीनें बोललें पाहिजे.

अशा दृष्टीला विशिष्ट मनोरचना

ही जी सर्वभूतरहित पाहण्याची दृष्टि ती यावयाला विशिष्ट मनोरचनाच लागते. सर्वहितबुध्दि स्वतःची जागृत रहावी म्हणून अहर्निश प्रयत्न करावे लागतात. जागृत अनुसंधान असावें लागतें. समाजांतील कांही व्यक्तींनी तरी असे सतत प्रयत्न करायला हवेत. यासाठी कांही व्रतें पाळावीं लागतात. सत्य, अहिंसा, असंग्रह इत्यादि व्रतें आचारांत आणावीं. मला जर लोभ असेल, माझें हित कशांत गुंतलेले असेल, एखाद्या गोष्टींत माझे हितसंबंध असतील तर माझी दृष्टि सत्यदृष्टि होणें कठीण. ती भूतमात्राच्या हिताचा विचार मग कसा करील? विशिष्ट हितसंबंध फक्त पाहण्याची मग संकुचित दृष्टि आपली होते आणि ती आपली स्वार्थी दृष्टिच सर्वांचें हितहि पाहणारी आहे, असा आपण बुध्दिवाद लढवून दावा करीत असतों. यालाच मानसशास्त्रांत (Rationalising) म्हणतात. म्हणजे विवेकीकरण. मानसशास्त्रांतील विवेकवाद किंवा बुध्दिवाद तो हा. स्वतःला जें पटलेंलें असतें तेंच बरोबर धरून चालावयाचें. तेंच बरोबर आहे असे सिध्द करून दाखवावयचें. मला वाटतें तेंच, विवेकाचें असें भासवायचें, स्वतःच्या स्वार्थाचें विवेकीकरण करायचें. माझ्या बुध्दीला ज्या अर्थी पटलें आहे त्या अर्थी तें योग्य असलेंच पाहिजे. परंतु तुझ्या बुध्दीला तुझ्या हिताच्या दृष्टीनें पटलें, इतर गोष्टी पाहिल्यास का? न्याय, अन्याय, नीति, अनीति इत्यादींचा विचार केलास का? दुसर्‍यांच्या कल्याणाचा विचार केलास का? तें कांही नसतें. माझा स्वार्थ म्हणजेच न्याय, म्हणजेच परमार्थ, इतरांचेंहि कल्याण ! ज्या वेळेस स्वतःच्या स्वार्थालाच मनुष्य न्यायाचें रूप देतो, न्यायाचें आवरण त्याच्यावर घालतो, त्यावेळेस त्याचे विचार सत्य म्हणून कसे मानतां येतील? येथें इंग्रजांचें राज्य असावें कीं नसावें असा प्रश्न विचारला तर कोणी स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी इंग्रजी राज्य असावें असेंहि म्हणेल. नसावें म्हटलें तर तें दूर करण्याची जबाबदारी येते. कधीं कधीं कोणाचे इंग्रजांशी हितसंबंध असले तर तेहि म्हणतील कीं, इंग्रजी राज्य असावें. हितसंबंध म्हणून किंवा जबाबदारी टाळण्यासाठी म्हणून अशा प्रकारें कोणी उत्तर दिलें तर तें सत्य कसें असूं शकेल?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel